दृष्टिकोन : महिला सक्षमीकरणातील अडथळे

Rajaram Pangavane
Rajaram Pangavaneesakal
Updated on

लेखक : राजाराम पानगव्हाणे

शिक्षणामुळे आज आपली सर्वार्थाने प्रगती होत असली, तरी महिला अजूनही पूर्ण सक्षम झालेल्या नाहीत, ही आपल्या खंडप्राय भारत देशातील स्थिती कुणीही नाकारू शकत नाही.

ग्रामीण विचारसरणीचा प्रभाव, समान काम करूनही मिळणारे कमी वेतन, कामाच्या ठिकाणी होणारे शोषण आणि भयमुक्त वातावरणात ती घराबाहेर पडू शकेल व सुखरूप परत येऊ शकेल याची शाश्वती नसणे, अशा अनेक कारणांमुळे ती अजूनही सर्वदृष्टीने सक्षम झालेली नाही.

घर सांभाळून त्याचे उत्तम व्यवस्थापन करणारी स्त्री ही व्यवस्थापनाचे एक चालतेबोलते विद्यापीठच म्हणावे लागेल. महिलांबद्दलची आपली जुनी विचारसरणी बदलून घटनात्मक आणि कायदेशीर तरतुदींमध्ये बदल करणे अत्यंत आवश्यक आहे. (saptarang latest marathi article by rajaram pangavane on Barriers to Women Empowerment nashik)

esakal

भारतीय संस्कृतीत स्त्रियांना एक मानाचे स्थान देण्यात आले आहे. पौराणिक व ऐतिहासिक काळातही स्त्रियांचा उल्लेख आपणास पुरुषांबरोबरच तितक्याच बरोबरीने, आदराने घेतलेला आढळतो.

आजच्या आधुनिक युगातही स्त्रियांनी सर्वच क्षेत्रांत आपल्या बुद्धी व कर्तृत्वाच्या कौशल्यावर योगदान दिलेले आहे. आज एकही क्षेत्र असे नाही, की ज्यात स्त्रियांनी आपले कर्तृत्व सिद्ध केलेले नाही.

एक स्त्री ही आपल्या दैनंदिन जीवनात अनेक प्रकारे समाज व आपल्या कुटुंबाला घडविण्याचे काम करीत असते. खऱ्या अर्थाने स्त्री एक चालतं-बोलतं व्यवस्थापनाचं विद्यापीठ आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

अंगभूत कौशल्याचा आविष्कार

नोकरी, उद्योग, सामाजिक, शासकीय, आरोग्य अशा सर्व क्षेत्रांत स्त्रियांचे योगदान अनन्यसाधारण राहिले आहे.

आपली कौटुंबिक भूमिका पार पडत असताना त्यांच्या जीवनशैलीतून छोट्या-छोट्या गोष्टीतूनही आपले व्यवस्थापन कसे आहे, हे अतिशय योग्य रीतीने त्या सिद्ध करीत असतात.

एक स्त्री आपलं कुटुंब सर्वांगाने व्यवस्थित चालवत असताना, घरातील स्वच्छता, अन्न, आर्थिक नियोजन, मुलांचे शिक्षण, योग्य संस्कार, नातेसंबंधांमधील जपणूक, गृहोपयोगी वस्तू खरेदी करताना आर्थिक कौशल्य अशा एक ना अनेक जबाबदाऱ्या आपल्या व व्यवस्थापनाच्या अभ्यासक्रमाचे अंगभूत कौशल्य दर्शवीत असते.

सक्षमीकरणापासून अजूनही दूर

कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळूनच आपले करिअरही त्या योग्य प्रकारे घडवीत असतात. त्याला क्रीडा, साहित्य, शेती, उद्योग, शासकीय, राजकीय असं एकही क्षेत्र नाही, की ज्यात जगाच्या पटलावर स्त्रियांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलेलं नाही.

खऱ्या अर्थाने समाजाला घडविण्यासाठी स्त्रिया या समाजाच्या कणा आहेत. म्हणूनच स्त्रियांच्या सक्षमीकरणाबाबत आपण सर्वांनीच अधिक जागृत होण्याची आवश्यकता आहे.

समाज खऱ्या अर्थाने जागरूकही झाला आहे, त्यासाठी शासन दरबारीही सर्वतोपरी प्रयत्न केले जातात; पण अजूनही आपल्या देशातील काही परिसर किंवा काही भाग हा स्त्रियांच्या सक्षमीकरणापासून काही प्रमाणात का होईना वंचित आहे.

Rajaram Pangavane
तू मेरी चांदणी....

जुन्या विचारसणीचा पगडा

भारतीय समाज हा असाच एक समाज आहे. ज्यात अनेक प्रकारच्या रूढी, श्रद्धा आणि परंपरांचा समावेश आहे. यापैकी काही जुन्या समजुती आणि परंपरा आज भारतातील महिला सक्षमीकरणात अडथळा ठरतात.

यात प्रामुख्याने जुन्या विचारसरणीमुळे भारतातील अनेक भागांत महिलांना घराबाहेर पडण्यास बंदी आहे. अशा भागात महिलांना शिक्षण किंवा नोकरीसाठी घराबाहेर पडण्याचे स्वातंत्र्य नाही.

जुन्या विचारसरणीच्या वातावरणात राहिल्याने स्त्रिया स्वतःला पुरुषांपेक्षा कमी समजू लागतात आणि त्यांची सध्याची सामाजिक आणि आर्थिक स्थिती बदलण्यात अपयशी ठरतात.

अजूनही पुरुषी वर्चस्वाचा जाच

कामाच्या ठिकाणी होणारे शोषण हाही महिला सक्षमीकरणातील एक मोठा अडथळा आहे. खासगी क्षेत्र जसे की सेवा उद्योग, सॉफ्टवेअर उद्योग, शैक्षणिक संस्था आणि रुग्णालये या समस्येने सर्वाधिक प्रभावित आहेत.

समाजातील पुरुषी वर्चस्वामुळे स्त्रियांसाठी समस्या निर्माण होतात. कामाच्या ठिकाणी महिलांवरील हिंसाचार अलीकडच्या काळात खूप वेगाने वाढला आहे. गेल्या काही दशकांत त्यात वाढ झाली आहे.

भारतात, अजूनही कामाच्या ठिकाणी महिलांशी लिंग पातळीवर भेदभाव केला जातो. याबरोबरच त्यांना स्वतंत्रपणे काम करण्याचे किंवा कुटुंबाशी संबंधित निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नसते आणि प्रत्येक कामात त्यांना नेहमीच पुरुषांपेक्षा कमी समजले जाते.

समान काम, तरीही वेतन कमी

भारतातील महिलांना त्यांच्या पुरुष समकक्षांपेक्षा कमी पगार दिला जातो आणि असंघटित क्षेत्रात ही समस्या गंभीर आहे. समान वेळ, समान काम करीत असूनही, स्त्रियांना पुरुषांपेक्षा खूपच कमी मोबदला दिला जातो.

असे काम स्त्री आणि पुरुष यांच्यातील शक्ती असमानता दर्शविते. संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना त्यांच्या पुरुष समकक्षांइतकाच अनुभव आणि पात्रता असूनही त्यांना पुरुषांपेक्षा कमी वेतन दिले जाते.

महिलांमध्ये निरक्षरता आणि अभ्यास सोडणे यांसारख्या समस्याही सक्षमीकरणातील प्रमुख अडथळे आहेत.

शहरी भागातील मुली शिक्षणाबाबत मुलांच्या बरोबरीने असल्या, तरी ग्रामीण भागात त्या खूपच मागे आहेत. शाळेत जाणाऱ्या अनेक ग्रामीण मुलींचा अभ्यासही अर्धवट सोडला जातो आणि त्यांना दहावीही उत्तीर्ण करता येत नाही.

Rajaram Pangavane
सुखावणारी सार्वजनिक वाहतूक

ग्रामीण-शहरी महिलांतील फरक

गेल्या काही दशकांत सरकारने घेतलेल्या प्रभावी निर्णयांमुळे भारतातील बालविवाहासारख्या दुष्कृत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली असली, तरी त्यासाठी शासनाने अजून कठोर पावले उचलणे अपेक्षित आहे.

लवकर लग्न झाल्याने महिलांचा विकास थांबतो आणि त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास होऊ शकत नाही. हुंडाबळी, ऑनर किलिंग आणि तस्करीसारखे गंभीर गुन्हे भारतीय महिलांवरील अनेक घरगुती हिंसाचारासह दिसतात.

मात्र, ग्रामीण भागातील महिलांपेक्षा शहरी भागातील महिला गुन्हेगारी हल्ल्यांना अधिक बळी पडतात, हे वास्तव आहे. नोकरदार महिलाही त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रात्री उशिरा सार्वजनिक वाहतूक वापरत नाहीत.

खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण तेव्हाच होऊ शकते, जेव्हा महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करता येईल आणि पुरुषांप्रमाणे त्याही बिनधास्तपणे कुठेही येऊ शकतील.

स्त्री भ्रूणहत्या थांबविणे गरजेचे

स्त्री भ्रूणहत्या किंवा लिंग-आधारित गर्भपात हा भारतातील महिला सक्षमीकरणाच्या मार्गातील सर्वांत मोठा अडथळा आहे. स्त्रीभ्रूणहत्या म्हणजे लिंगाच्या आधारे भ्रूणहत्या, ज्या अंतर्गत स्त्रीभ्रूण आढळून आल्यावर आईच्या संमतीशिवाय गर्भपात केला जातो.

स्त्रीभ्रूणहत्येमुळे हरियाना आणि जम्मू-काश्मीरसारख्या राज्यांत स्त्री-पुरुषांच्या लिंग गुणोत्तरात मोठी तफावत निर्माण झाली आहे. स्त्रीभ्रूण हत्येचे समूळ उच्चाटन केल्याशिवाय आपले महिला सक्षमीकरणाचे हे दावे पूर्ण होणार नाहीत.

आज ज्याप्रकारे भारत हा जगातील सर्वांत वेगाने विकसित होणारा देश बनला आहे, त्यादृष्टीने नजीकच्या भविष्यात भारतानेही महिला सक्षमीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यावर भर देण्याची गरज आहे.

भारतीय समाजात खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण घडवून आणण्यासाठी, समाजातील पुरुषसत्ताक आणि पुरुषाभिमुख व्यवस्था असलेल्या महिलांवरील वाईट प्रथांची मुख्य कारणे समजून घेऊन ती दूर केली पाहिजेत.

महिलांबद्दलची आपली जुनी विचारसरणी बदलून घटनात्मक आणि कायदेशीर तरतुदींमध्ये बदल करणे अत्यंत आवश्यक आहे.

आजच्या समाजात अनेक भारतीय महिला राष्ट्रपती, पंतप्रधान, प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर, वकील झाल्या आहेत; पण तरीही आजही अनेक महिलांना सहकार्य आणि मदतीची गरज आहे.

त्यांना अजूनही शिक्षण, मुक्तपणे काम करण्यासाठी, सुरक्षित प्रवास व काम आणि सामाजिक स्वातंत्र्यासाठी अधिक समर्थनाची गरज आहे. महिला सक्षमीकरणाचे हे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण भारताची सामाजिक-आर्थिक प्रगती ही महिलांच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीवर अवलंबून आहे.

महिला सक्षमीकरण महिलांना ते बळ देते, जे त्यांना त्यांच्या हक्कांसाठी लढण्यास मदत करते. आपण सर्वांनी महिलांचा आदर केला पाहिजे, त्यांना प्रगतीची संधी दिली पाहिजे. महिला आता प्रत्येक क्षेत्रात पुढे येत आहेत.

आजची स्त्री आता जागृत आणि सक्रिय झाली आहे. कुणीतरी खूप छान म्हटले आहे, की जेव्हा एखादी स्त्री तिच्यावर लादलेल्या बेड्या आणि बंधनं तोडायला लागते, तेव्हा जगातील कोणतीही शक्ती तिला रोखू शकत नाही. सध्याच्या घडीला लोकांची विचारसरणी बदलत असली तरी या दिशेने अजून प्रयत्नांची गरज आहे.

Rajaram Pangavane
समानतेच्या पाऊलवाटा....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com