मानव कल्याणाच्या मार्गाचा विवेकनिष्ठ प्रवास : बा तथागता!

Marathi Book Baa Tathagata
Marathi Book Baa Tathagataesakal

‘बा तथागता!’ हे खंड काव्य, नव्हे महाकाव्य आहे. मानवाधिष्ठीत उच्चतर मूल्यांवर आधारित विवेकवादाची भूमिका गडद करणारे. ही भूमिका अधोरेखित करताना विज्ञाननिष्ठतेच्‍या कसोटीवर बुद्धिवादाची मांडणी करणारे प्रेरक तत्त्व आहे. अर्थात, मानव कल्याण् आणि मानवी मूल्यांचं हे काव्य मानवतावादी विचारधारेचे प्रकटन आहे. मानवाच्या केवळ भौतिक प्रगतीचे हे द्योतक आहे असे नाही; तर समस्त मानवजातीच्या सत्यप्रवण आध्यात्मिक, नैतिक प्रगतीचा तो परिपाक आहे. हे काव्य की महाकाव्य या भ्रमात न पडता यातील मानवतावादी तत्त्वज्ञानाची आखणी करताना बौद्ध तत्त्वज्ञानाच्या परिघाचे केंद्र अचूकपणे पकडून बिंदू-बिंदूतून परिघाची व्यापकता स्पष्ट करण्याचे कौशल्य कवितेच्या प्रत्येक शब्दातून प्रतीत होताना दिसून येते.

ॲड. विलास मोरे (मो. ७५८८००७८६६)

(saptarang latest marathi article Conscious Journey to Path of Human Welfare Ba Tathagata nashik)

दया, क्षमा, करुणा, शांती, प्रेम, सहानुभूती आणि समानुभूती या तत्त्वांच्या संयोगाने मानवाचे कल्याण आणि त्यांना उच्चतर प्रगती आणि उन्नतीपर्यंत नेण्याची क्षमता, सामर्थ्य हे मानवतावादी तत्त्वज्ञानातच आहे.

ते निर्माण करण्याची आवश्यकता नाही. ते वृद्धिंगत कसं होईल? या मूल्याची जोपासना आणि संवर्धन तसेच प्रचार आणि प्रसार कसा करता येईल? ही मानवी जीवनमूल्यांची विचार प्रणाली रुजविताना स्वातंत्र्य आणि समानतेचा हक्क संपूर्ण मानवजातीला कसा प्राप्त होईल? या प्रश्नांचे वैज्ञानिक विश्लेषणात्मक उत्तरच आहे.

दांभिकतेपेक्षा विज्ञानवादी दृष्टिकोन हा मानवाला तारक आहे आणि या विज्ञानवादी विचारसरणीला अहिंसेचा स्पर्श होणार असेल तर त्यातच जगाचे कल्याण आहे. हाच विचार प्रकर्षाने या महाकाव्याचा गाभा आहे, हीच या काव्याची आभा आहे.

कवी, प्रा. डॉ. म. सु. पगारे यांच्या लेखणीतून पाझरलेली सत्यनिष्ठ वाणी ‘बा तथागता!’ या शीर्षकातून किरणोत्सर्गीत होते. तथागतास अभिप्रेत असलेल्या बुद्धिप्रामाण्यवादी, मानवतावादी, विज्ञाननिष्ठ माणूस गवसल्याचा आनंद हे महाकाव्य वाचताना वाचकांना सहजी प्राप्त होतो.

‘बा तथागता!’मधील अर्पण पत्रिकाच मानवतावादाचे प्रकाशपर्व आहे. यातील कवितांची मांडणी वेगवेगळ्या तीन आविष्करणांत केलेली असली, तरी या तिन्ही भागांतील मानवतावादाचे सूत्र मात्र समान आहे.

यातील प्रथम आविष्करणात कवी डॉ. म. सु. पगारे मानवाला सृष्टीच्या निर्मितीचे वैज्ञानिक आणि निसर्गदत्त रहस्यच उलगडून दाखवितात.

या सबंध सृष्टीचा आहे तो

प्राकृतिक नियम

घटकांच्या समुच्चयातून,

संमिलनातून,

सर्जनाच्या उत्क्रांत

प्रवासाने निर्माण

होते नवे ‘सृजन.’

आहे त्याच्या

अस्तित्वाचा

कालावधी ठरलेला.

या सत्यापासून

तू अनभिज्ञ का? (११)

हा अनभिज्ञतेचा प्रश्न सृजनाकडून त्यांच्या मर्त्यावस्थेपर्यंत प्रवाहित होणाऱ्या सगळ्या घटकांचे व घटनांचे सत्त्व आणि तत्त्व सांगून जातो.

याच प्रश्नाच्या शोधात हजारो संत आणि महात्मे, मठाधिपती, पीठाधिपती हजारो वर्षांपासून तत्त्वांना घिरट्या घालताना दिसून येत आहेत. अगदी साध्या आणि सरळ शब्दांत याचे अंतिम सत्य या वरील शब्दावळीतून विदित झालेले आहे.

मानवी मनातील विकार अर्थात रोगाबाबतचे भाष्य ही बुद्धिप्रामाण्यवादाची काठोकाठ भरलेली घागर आहे.

या घागरीला सागराचे मोल आहे, कारण मानवाच्या आतील अहंकार आणि त्याच्याच दावणीला बांधलेले अनेक विकार यांची केलेली शस्त्रक्रियाच आहे...

तुझ्या बुद्धीला स्पष्टपणाने

आकलन झाले नाही,

तुझ्यामध्येच

‘ठाण’ मांडून बसलेले दोष,

तू बुद्धीवादी असूनही

नाही हाकलता आले तुला बाहेर,

नाही केलीस तू शस्त्रक्रिया

आतमध्ये दडलेल्या रोगांची... (१३)

ही शस्त्रक्रिया एकदा का झाली, की माणूस निर्विकार होतो, निरोगी होतो. मग सशक्ततेच्या लाटेवर स्वार होऊन मानव वादळाशीं सहज सामना करू शकतो.

Marathi Book Baa Tathagata
सूर तेच छेडीता…

हा आशावाद मनात रुजविण्याचा प्रयत्न म्हणजे कर्मकांडावर आणि धर्मकांडावर केलेला जोरदार हल्लाच म्हणता येईल. रोगांची चिकित्सा करताना आपण आपल्या मानसिकतेवर करावयाच्या शस्त्रक्रियेची उकलं म्हणजे मानवी मनाला सर्वार्थाने शुद्धतेची दिलेली विश्वास मुद्रा आहे.

प्रकाशपर्व अंतरंगात जिरवून त्याला गतीचे, प्रगतीचे धुमारे फुटावेत, असा आशावाद कवी प्रा. डॉ. म. सु. पगारे यांनी प्रथम आविष्करणात व्यक्त केलेला आहे. ही गती आणि प्रगती केवळ भौतिक नाही, तर मानवतावादी विचारांची विज्ञाननिष्ठतेची आहे.

ही गती आणि प्रगती आध्यात्मातल्या सत्याच्या, समतेच्या आणि मानवतेच्या केंद्रबिंदूशी संलग्न असून, तिला वैज्ञानिकतेची जोड आहे. या प्रथम आविष्करणातील प्रत्येक कविता ही ‘हे मानवा’ या संबोधनाने सुरू होत असल्याने मानावाशी कवितेतून साधलेला कवी संवाद हा सुसंवादी झाला आहे.

द्वितीय आविष्करणातली सर्व काव्ये तथागतांना संबोधून अवतीर्ण झाल्याचं दिसून येतं. तथागत म्हणजे सत्याचा प्रकाश दाखविणारा सूर्य होय. कवी केवळ एका सूर्याची वास्तविकता कथन करीत नाही, तर लक्ष-लक्ष सूर्यांचे विज्ञानही स्पष्ट करून जाताना भगवान बुद्धांची ऊर्जा, चेतनेतून प्रस्फुटित होऊन सृष्टीच्या अंतरंगाचाही कसा वेध घेतात, याची सुस्पष्‍ट व्याख्याच देऊन जातात.

संपूर्ण विश्वजाणिवेच्या मूळ केंद्रालाच कवी हात घालून त्यांची चेतना पूर्णत्वाने जागरूक करून मानवतावादी, जीववादी, विज्ञानवादी तत्त्वाशी मानवाचं नातं सांगून जातात.

तथागतांची विविध रूपं आणि नावं त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण अर्थाने समोर आली. त्यांच्या रूपात एका शास्त्रज्ञाचे प्रज्ञा, शील, करुणेचे उच्चारण करणारी मूर्ती मनाच्या बोधीवृक्षातटी विराजित झाली.

अविवेकी तत्त्वावर मात करण्यासाठी प्रज्ञेने अनुभवली जाणारी सम्यक समाधी अर्थात विपश्यनेचे समर्थन करताना कवीने फारच विस्ताराने आणि पोटतिडकीने आपले मत मांडलेले आहे.

आपल्या ज्ञानाचा ठेवा करुणेच्या रूपाने प्रवाहित ठेवला, की अस्सल संस्कारांचा उदय माणसाच्या ठायी निर्माण होतो, या सैद्धांतिक तत्त्वावर यथार्थ विश्वासही कवी या ठिकाणी व्यक्त करताना दिसतात. मुक्त मानवतेची संकल्पना या खंडकाव्यात प्रवेशित झालेली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Marathi Book Baa Tathagata
जयची शोकांतिका!

आर्यअष्टांगमार्गाचे तत्त्वज्ञानात सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मात, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाधी या मार्गांचा अवलंब म्हणजे दृष्टीपासून समाधीपर्यंतची सम्यकता कवीने ‘बा तथागतां’च्या साक्षीने आणि सामर्थ्याने अधोरेखित झालेली वाचकास दिसून येते.

मग आर्यअष्टांगिक मार्ग पुष्ट होऊन निब्बाणाच्या दिशेने जाऊ लागतो. आर्यअष्टांगिक मार्गाने जाणारा, माणसाला माणूस बनविणारा लोककल्याणकारी नीतिमान धम्म हा मंगलमय आहे. तेव्हा तू अनुसरण कर आणि दहा दिशांतून निनाद झाला,

बुद्धं शरणं गच्छामी !

धम्मं शरणं गच्छामी !

संघ शरणं गच्छामी !

ही तथागतांच्या संवादातून सांधलेली संवादिनी द्वितीय आविष्करणात निश्चितपणे संवादित होते, प्रवाही होते, गतिमान होते. आणि गौतम बुद्धांचा सिद्धार्थ राजकुमारापासून बुद्धांपर्यंतचा प्रवास चलचित्रासारखा मनाच्या पटलांवर बिंबून जातो.

तृतीय आणि अंतिम आविष्करण म्हणजे माणूस आणि मानवतेच्या संदर्भातील चिंतनिका आहे. खरे तर या चिंतनिकेला अवतर्णीका म्हणणे वावगे ठरू नये. यात कवीची मानवतेविषयीची तळमळ आणि संपूर्ण मानवजातीचा कळवळा अवतीर्ण झालेला आहे.

प्रत्येक माणसाला महामानव होता येणार नाही, या संदर्भात कवी म्हणतात, ‘प्रत्येक माणूस महापुरुष होऊ शकत नाही; पण महापुरुषांच्या पाऊलखुणांवर मात्र तो निर्धास्तपणे चालू शकतो’. त्याचा हा प्रवास निश्चितपणे त्याला शाश्वत सत्याकडे नेणारा ठरतो.

हा प्रवास मानवतावादी असतो, समतावादी असतो, सत्यवादी असतो. मिथ्या आणि काल्पनिक गोष्टींना येथे स्थान नसते, हा विश्वास या काव्यातून व्यक्त होताना दिसतो.

अंतिम चरणांमध्ये दिलेला ‘स्वयं प्रकाशित व्हा’ हा संदेश समस्त मानवजातीला ऊर्जा देणारा स्रोत ठरतो.

तो आवाज

सातत्याने निनादतो आहे,

अडीच हजार वर्षांपासून

या पृथ्वीतलावर

बोलावतोय प्रत्येकाला,

प्रकाशमान सूर्याचं आवतन देत

म्हणतो आहे,

उद्‌घोषतो आहे,

अतः दीप भव !

स्वयंप्रकाशित व्हा !

दु:खमुक्त व्हा ! (२३३)

अज्ञानाचा, दु:खाशी असलेला संबंध अधिक ठळकपणे मांडताना, प्रकाशमान सूर्याचं आमंत्रण घेऊन स्वयंप्रकाशित होण्याचे, पर्यायाने दु:खमुक्त होण्याची उद्‌घोषणा ‘बा तथागता!’ या संवादातून कवीने उद्‌घोषित केलेली आहे.

मानवाच्या कल्याणकारी विचारांचा समुच्चय म्हणजे कवी म. सु. पगारे यांच्या ‘बा तथागता!’ या काव्याचा उल्लेख करावा लागेल. या काव्यसंग्रहामुळे मराठीला एका नव्या सृजनाची चाहूल लागली, असे एक रसिक म्हणून ठामपणे मी अधोरेखित करू इच्छितो.

या महाकाव्यातील प्रत्येक आविष्करणाची सुरवातीची बुद्धांची रेखाटनं कवितेच्या आशय आणि विषयाशी सुसंगत आहेत. मुखपृष्ठ कल्पना आणि संकल्पना ही संपूर्ण कवितेचं अक्षर ठरावी इतकी अक्षय आहे.

तथागतांच्या मुखपृष्ठाचं रेखांकन राजा बिंबिसारने वर्णिलेल्या तथागतांच्या ३२ लक्षणांसह आविष्कृत झालेला आहे.

प्रशांत प्रब्लिकेशन्सचे संचालक रंगराव पाटील यांनी हे महाकाव्य, महाकाव्याला साजेशा रंगरूपात प्रकाशित केल्याने त्याचा साज आणि बाज हा भारदस्त झाला आहेच. पण, हा ग्रंथ हमदस्त घ्यावा आणि वाचत बसावा इतका सुंदर, सुबक आणि वास्तव आहे.

बा तथागता !

म. सु. पगारे

प्रशांत पब्लिकेशन्स

पृष्ठे : २३६, किंमत ः रु. ४५० /-

Marathi Book Baa Tathagata
चित्रपटांची दुनिया

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com