कोण जाणे, ते कशाला... गझलरूपी गुगली!

Book & Pen
Book & Penesakal
Updated on

श्रीनिवास कृष्ण पाटणकर (१९१५ ते १९३६) या नावाचा खऱ्या अर्थाने बालजीवन जगणारा कवी सोलापुरात जन्मला होता. वयाच्या ३१ व्या वर्षी कुठल्याशा दुर्धर आजाराने त्यांचे निधन झाले. शेवटच्या केवळ तीन वर्षांत त्यांच्या प्रतिभेला बहर आला होता. तो बहर इतका विलक्षण होता, की माधव ज्युलियनासारख्या ज्येष्ठ कवीला त्याच्या निधनानंतर म्हणावेसे वाटले, की आपल्या कवितांनी संस्मरणीय चटका लावून अचानक दिवंगत होणारे कवी, बालकवींच्या मागून हेच होत. (saptarang latest marathi article on marathi poet shrinivas patankar by dr neeraj deo nashik news)

Book & Pen
वेगळं व्हायचंय; पण कुणापासून?

खरोखरच पाटणकरांच्या कविता रमणीय, संस्मरणीय होत्या. पाटणकरांनी केवळ वय वर्षे १९ ते २१ या तीन वर्षांत केलेल्या थोड्याबहुत कविता ‘प्राजक्तांची फुले’ या नावाने त्यांच्या मृत्यूनंतर वर्षभराने १९३७ मध्ये प्रकाशित झाल्या. आज कवी वा त्याची कविता फारशी ज्ञात नाही. तरीही कवीच्या ज्या मोजक्या कविता उपलब्ध आहेत, त्या त्याच्या विलक्षण प्रतिभेची साक्ष द्यायला पुरेशा आहेत. अगदी कोवळ्या वयात जगाचा निरोप घेणाऱ्या या बालकवीने प्रेमाची अन् प्रेमात येणाऱ्या तारुण्यसुलभ लज्जतेमुळे निर्माण होणाऱ्या नाजूक बंधनांची जाणीव व्यक्तविताना लिहिले,

असूनी मोकळ्याच या भासती बंद दिशा चारी

कवीला आवडणारी ती आसपास दिसत असताना, तिच्याशी सहज संपर्क होऊ शकत असताना, तत्कालीन सामाजिक नि नीतिनियमांची कवीने दिलेली ही हळवी ओळख अत्यंत तरल शब्दात त्याच्या भावना व्यक्तवून जाते. ‘सूर्य गेला मावळून’ ही पाटणकरांची सर्वांगसुंदर रचना आहे. या कवितेत आई मुलाला झोका देत येणाऱ्या रात्रीचे रम्य वर्णन करीत आहे. तीत ती सांगते,

लिंबोणीच्या झाडामागे चांदोबाची कोर
बाई, चांदोबाची कोर
भोवताली मेघ गोळा झाले काळेभोर
झिम्मा खेळे मेघावरी घेता घेता झोल
बाई, घेता घेता झोल
तारकेचा तोल गेला गेली खोल खोल

रसिका! लिंबोणीच्या झाडामागे लपलेली चांदोबाची कोर, तिच्याभोवती गोळा झालेले काळेभोर मेघ आणि त्या मेघावर स्वार होऊन झिम्मा खेळणाऱ्या त्या तारका व तोल जाऊन खाली खोल खोल पडणारी ती तारका! सारेच वर्णन अत्यंत रसाळ नि प्रतिभासंपन्नतेची जिवंत साक्ष देणारे आहे. हे काव्य वाचताना बालकवींच्या अरुण वा दत्तकवींच्या स्मरणशक्तीके जागृत होई! या कवितेची चुणूक लागून जाते. वाटते जर पाटणकरांना फार जास्त नाही; पण किमान अजून दहा-बारा वर्षे आणखी लाभली असती तर मराठीला आणखी एखादा दत्तकवी वा बालकवी लाभला असता.

पण नियतीला ते रुचणारे नव्हते; कवीलाही याचा अंदाज आला असावा का? अनेकांना वाटते, की कवीला आपल्या अल्पजीवी जीवनाचा किंवा अकाली मरणाचा अंदाज आला असावा. त्यासाठी वानगी दाखल ‘कोण जाणे, ते कशाला’ या सुंदर नि रसाळ गझलेचा हवाला दिला जातो. लेखकाने सर्वप्रथम ही गझल वाचली तेव्हा त्याला ही तसेच वाटले होते. ही गझल पाहिल्यावर गझलकार सुरेश भटांचा पाटणकरांवरील अभिप्राय हटकून आठवतो ते म्हणाले होते, की पाटणकर अजून काही वर्षे जगते तर माझा मार्ग खूपच सुकर होता. गझलसम्राटाने दिलेल्या या दादवर आणखी काय बोलावे?

Book & Pen
मीठ आणि पक्षी

गझलेच्या आरंभीच कवी सांगतो, “का कोण जाणे, कशासाठी मी केवडे तोडीत होतो अन् पर्वताच्या पायथ्याशी देह खाली पडलेला होता.” दृश्य जगाला दिसणारा हा अनुभव कथन करता करता त्या देहाच्या देही भावापासून दूर होत कवी सांगू लागतो,

आतला संकोचलेला जीव झाला मोकळा
अन् कुणाला पाहवेना भंगलेल्या देहाकडे


रसिका! किती गूढ तरी सहज सांगणे आहे हे ! इतका काळ ज्या देहाच्या बंधनांत त्याचा जीव अडकला होता, तो आता मुक्त झाला. येथे कवी मोकळा श्वास घेतोय असे न म्हणता केवळ मोकळा झालो. असे म्हणतो कारण त्याला आता श्वास घेण्याचेही बंधन राहिलेले नाही शिवाय येथे कवी देह नि देहाचा स्वामी जीव वेगळा आहे, हे त्याला जाणवणारे सत्य नकळत उलगडून जातो आणि त्याचवेळी त्याच्या भग्न देहाकडे पाहून हळहळणारे देहात असणारे जीवही त्याला दिसतात. गंमत म्हणजे याला देहबंधनातून मुक्त झाल्याची भावना वाटते तर देहात बद्ध असणाऱ्यांना हळहळ वाटते. या हळहळीतही त्याला विविधता दिसायला लागते.

त्याला, त्याच्या देहाला ओळखणारे सखे सवंगडी एकत्र जमायला लागतात अन् त्याच्या काष्ठवत पडलेल्या देहासाठी लाकडे रचायला लागतात. पण प्रत्येकाच्या मनात त्याची वेगळी ओळख आहे. एकजण म्हणतो, ‘अरे तोच हा वेडा याचे खड्ग वाकडे आहे, तर दुसऱ्याला त्याच्यातून मृगाजिनाचा कस्तुरी गंध येतो.’ येथे वाकडे खड्ग नि कस्तुरी गंध अनुक्रमे वाईट नि चांगले संबंध दाखवतात. त्यामुळेच मैत्रीचे संबंध असणाऱ्याला त्याच्या देहात अहिंसक मृगाची कातडी नि कस्तुरी गंध दरवळताना दिसतो. हे वर्णितांना त्याची रसवंती वाणी गाते,

एक बोले, ‘मित्र माझा खूण मैत्रीची पाहा
कस्तुरीचा गंध याला हे मृगाचे कातडे!
खेळते होते जयाचे आर्जवी डोळे निळे
आज ते मंदावलेले लागले कोणाकडे?


शिवाय त्या मित्राला त्याच्या त्या आर्जवी निळ्या डोळ्यांची याद येते नि ते आता मंदावले असून, त्या दूर देशाकडे लागलेत याची व्यथा दाटून येते. तितक्यात त्याची प्रिया येते; पण तिने वा त्याने अजून परस्पर प्रीतीची जाणीव दिलेली नसावीसे वाटते. कारण ती येताच त्याचा देह पाहून देहभान हरपत त्याच्या देहावर लोळण घेत नाही, तर विस्मित होऊन केवळ म्हणते, ‘अग बाई! हा तोच की, ज्याच्या रत्नमालेचे खडे मला तेजाळ वाटत होते.’ रसिका! कवीची वयानुसारची मानसिकता येथे स्पष्टपणे दृष्टीगोचर होते.

कारण दयितेचे प्रेम त्याला कधी लाभले नव्हते. उलट ज्येष्ठ कवयित्री शांताबाई शेळके सांगतात, ‘प्रेमभंगाच्या सूक्ष्म; पण दुर्धर आघाताने त्याचे कोवळे हृदय दुखावले. मानसिक दुःखाने शरीरही घेरून टाकले आणि त्यानेच शेवटी त्यांचा बळी गेला.’ खरेखोटे ठाऊक नाही; पण या ओळीत ते दुःख गडद व्हायला लागते. कारण तिची लाघवी तरी अलिप्त प्रतिक्रिया हे आहे. त्यामुळेच अत्यंत व्यथित अंतःकरणाने देहमुक्त झालेला; पण कुठेतरी जगातच अडकलेला तो सांगतो,

Book & Pen
तेजोनिधी : एस. एम. जोशी

केस माझे, वेष माझा आणि माझी कुंडले
हे कुणाला, ते कुणाला ओळखीचे सापडे
दूर थोडी विस्मृतीला सारुनी आता तरी
अंतरीची प्रीत माझी ओळखाया ये, गडे!


पहिल्या दोन ओळी कवीला जाणतेपणाच्या शिखरावर नेतात. माणसाला माणसाचे देहीक फक्त स्वरूपच ज्ञात असते, व्यक्ती-व्यक्तीतील संबंध केवळ देहाभोवतीच गुंडाळलेला असतो. म्हणून तर ‘मरणांतानि वैराणि म्हणतात ‘देह संपला ! वैर संपले!’ असा साधा सरळ हिशेब त्यामागे असतो. हे सत्य उद्घोषिताना देह सोडलेला हा कवी, देहातून मुक्त झाल्याचा आनंद व्यक्तविताना शेवटच्या दोन ओळीत, ‘माझ्या अंतरीची प्रीत आता तरी ओळख.’ म्हणत तिच्याप्रति असलेला देहाभावच व्यक्तवित जातो. त्यामुळे नकळत तो त्या जाणिवेच्या शिखरावरून खाली उतरत विरहवेदना गडद करत जातो.

कित्येक वेळा गझलची रचनाच फसवी, शेवटच्या पंक्तीत गुगली टाकणारी असते. अहो, मरणाची बात करता करता सहजीवनाची आंस व्यक्तविणारी असते. तेच पाटणकर येथे कौशल्याने साधतात. ऊर्दू शायरांच्या शायरीतील ‘जनाजा, जहन्नुम, कयामत ते इश्क’ची यात्रा ते भारतीय परंपरेशी हुबेहुब जुळवत नेतात. त्यांची गझल मरण संकल्पनेतून शाश्वत जीवन तत्त्वज्ञानाची वीण गुंफत जाते सगेसंबंधी, मित्र नि शत्रू यांचा देहाभाव व्यक्तवित उंच उड्डाण घेते तेव्हा सुज्ञ रसिक उत्सुकतेने कवीचे धाराप्रवाही शब्द मनात साठवत जातो नि ‘केस माझा, वेश माझा.... ओळखीचा सापडे’ पावेतो कवी येतो तेव्हा वाटू लागते कवी रहस्यदर्शी गुर्जिएफशीचेच तत्त्वज्ञान स्वतंत्रपणे व्यक्तवितो की काय? पण अचानक आलेल्या शेवटच्या दोन ओळी कवीची तारुण्यसुलभ विरहवेदना अधोरेखित करुन हलकासा धक्का देत, रसिकाला, ‘मी एवढे सारे भोगले आता तरी तिला माझे मन, माझा मनोभाव कळेल का?’ या प्रश्नाशी आणून सोडतात. येथे हेही सांगणे गरजेचे आहे, की कवितेत कवीला मरणभावच अधोरेखित करावयाचा असता तर शेवटच्या दोन ओळी,

होतो मी कोण अन काय, हे कोणा ना कळे
बोचते हे शल्य मजला, देह जरी माझा गळे

अशा प्रकारचा अर्थ दाखवणाऱ्या असल्या असत्या पण त्या मित्र प्रेम उद्धृत करीत प्रेमिकेची अनभिज्ञता नि प्रियकराची तगमग दाखवणाऱ्या आहेत.
व्यवस्थित पाहिले तर प्रस्तुत गझल विरहाची मरणप्राय यातना मूकपणाने भोगताना जी तगमग होते, ती व्यक्तविणारी आहे. पण यातील शेवटच्या दोनवेळी लक्षात न घेतल्याने अनेकांना ती मरणावरची गझल वाटते. अनेकांचे कशाला कवीने केलेली ही गुंफण शांताबाईंसारख्या सुजाण नि ज्येष्ठ कवयित्रीलाही ‘मरणावर केलेली गझल’ व त्यावरून अल्पायुषी ठरलेला ‘हा कवी भविष्यदर्शी प्रतिभेचा असावा की काय’ या भुलभुलैयात अडकवावयास कारण ठरली असावी. अर्थात, ही बाब कवीची उत्तुंग प्रतिभा नि त्याला असलेली गझल प्रकाराची विलक्षण जाणच दाखविते.

Book & Pen
इच्छामरण मागणाऱ्या गोखले पुलाची चित्तरकथा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com