सह्याद्रीचा माथा : लोकनेता बहुजनांचा, लोकनेता बहुगुणांचा!! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chhagan Bhujbal Birthday Celebration

सह्याद्रीचा माथा : लोकनेता बहुजनांचा, लोकनेता बहुगुणांचा!!

ज्येष्ठ नेते आणि उत्साहाचा सळसळता झरा असलेले छगन भुजबळ यांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण केली. या अमृतमहोत्सवानिमित्त हजारो, लाखो लोकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. सोशल मीडियाचे सगळे हॅन्डल्स शुभेच्छांनी भरभरून वाहत होते. दुसरीकडे ऑफलाइन शुभेच्छा देणाऱ्यांची अलोट गर्दी त्यांना भेटण्यासाठी आतुर होती. गुरुवारी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात राज्यातील, तसेच देशातील मान्यवरांच्या उपस्थितीत शुभचिंतन सोहळा झाला.

तर शनिवारी भुजबळ फार्मवर शेकडो सर्वसामान्य कार्यकर्त्यांसह हजारो सामान्य लोकांच्या उपस्थितीत भुजबळ यांचा वाढदिवसाचा साजरा झाला. एवढं भरभरून प्रेम एखाद्या लोकनेत्यालाच मिळू शकतं. छगन भुजबळ यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्तानं ते लोकोत्तर लोकनेते असल्याचं पुन्हा एकदा प्रकर्षानं जाणवलं. (Saptarang Latest Marathi Article sahyadricha matha by dr rahul rahalkar on chhagan bhujbal birthday Nashik News)

हेही वाचा: कोरोनाने जोपासलेलं माणूसपण!

भुजबळ यांची मिश्कील हास्याची मुद्रा अनेकांना ठाऊक आहे. मात्र, वाढदिवशी स्मित हास्याची लकेर चेहऱ्यावर कायम ठेवत त्यांनी सलग १४ तास शुभेच्छांचा स्वीकार केला. अशा लोकनेते असलेल्या व्यक्तिमत्त्वाचं एकच टॉनिक असतं आणि ते म्हणजे विपुल लोकसंग्रह. लोकनेते ही बिरुदावली देखील काही मोजक्याच राजकीय व्यक्तित्त्वांना लावता येऊ शकते, त्यात छगन भुजबळ हे अग्रणी नेते आहेत. लोकनेत्यांची परंपरा आता खंडित होत चालली आहे. तरुण पिढीमध्ये तर लोकनेत्यांची मोठी वानवा आहे.

राज्यात पाचहून अधिक तरुण लोकनेते सापडणार नाहीत, अशी स्थिती आहे. सर्व जाती, धर्मांच्या लोकांचा मोठा समूह ज्यांच्या मागे सातत्यानं असतो, असे लोकनेते आता दुर्मिळ झाले आहेत. नव्या पिढीच्या नेत्यांनी छगन भुजबळ यांच्यासारख्या लोकनेत्यांच्या कार्यशैलीचा अभ्यास यासाठी करायला हवा. अनेक चढउतारांमधून जराही संयम ढळू न देता सतत कार्यप्रवण राहणं हे या लोकनेत्याकडून शिकण्यासारखं आहे.

प्रदेशाच्या विकासासाठी दीर्घकालीन विकासाच्या योजना राबवत आणि त्यासाठी अखंड पाठपुरावा करणाऱ्या नेतृत्त्वांना लोकनेता म्हटलं जातं. मोठ्या जनसमूहावर अशा नेत्यांनी जणू गारुड केलेलं असतं. वास्तविक, मुंबईतून नाशिकमध्ये छगन भुजबळ यांचा पुनर्प्रवेश झाला तेव्हा देखील अनेक धुरंधर नेते होते. त्यात मालोजीराव मोगल, ए. टी. पवार, वनाधिपती विनायकदादा पाटील, प्रशांत हिरे, तुकाराम दिघोळे, डॉ. दौलतराव आहेर, डॉ. वसंतराव पवार राजकीय पटलावरील दमदार नेत्यांचा समावेश होता.

हेही वाचा: परिवर्तनाच्या बीजांची रुजवात

भुजबळ यांनी या नेत्यांमध्ये आपले राजकीय स्थान निर्माण केले. किंबहुना ते अनेक अर्थाने जिल्ह्याचे नेते नव्हे तर खऱ्याअर्थाने लोकनेतेही झाले. भुजबळांनी मुंबईतून नाशिकमध्ये यावं, यासाठी अनेक लोक त्यांना सतत भेटायचे, प्रसंगी आंदोलन करायचे, निवेदनं द्यायचे. खुद्द ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांना जुन्नरमधून निवडणूक लढविण्याची सूचना केली होती. मात्र, येवल्याची निवड करत शरद पवार यांचीही साथ मिळविली. येवल्याच्या निवडीचा भुजबळ यांनी तेव्हा घेतलेला निर्णय हा किती दूरदृष्टीपणाचा होता, हे आता स्पष्ट होते.

छगन भुजबळ यांनी नाशिकसाठी अनेक प्रकल्प आणले, यशस्वीपणे राबविले. पण एका माईलस्टोन प्रकल्पाची आठवण इथं मांडणं गरजेचं आहे. मांजरपाडा प्रकल्प गोदावरी खोऱ्यात आणून छगन भुजबळ यांनी गेली कित्येक वर्षे दुष्काळाच्या खाईत व उजाड माळरान असलेला चांदवडचा काही भाग, संपूर्ण येवला तालुका, मनमाड परिसर आणि नांदगावच्या काही भागात नंदनवन फुलवले.

भुजबळांच्या आत्तापर्यंतच्या राजकीय- सामाजिक कारकिर्दीतील हा मैलाचा टप्पा आहे. दुष्काळग्रस्त येवल्याला संजीवनी प्राप्त करून देण्याची आस घेऊन त्यांनी या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली, यात त्यांचं द्रष्टेपण दिसून येतं. निधीपासून ते तांत्रिक मंजुरी मिळविणे, ही अत्यंत किचकट बाब होती. त्या सगळ्यावर मात करण्याचं धारिष्ट्य भुजबळ यांनी दाखविलं. एखाद्या लोकनेत्याला हे शक्य आहे.

दुष्काळी परिसर सुजलाम सुफलाम होणार

येवला परिसर हा कायमस्वरूपी दुष्काळी आणि केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून होता. बागायती शेती दूरदूरपर्यंत इथे नजरेस पडत नव्हती. या प्रकल्पामुळे दुष्काळी परिसर सुजलाम सुफलाम होणार आहे. पुढच्या कित्येक पिढ्यांना या प्रकल्पामुळे समृद्धीची फळं चाखायला मिळणार आहेत. भुजबळांनी सगळ्या क्षमता या प्रकल्पासाठी वापरल्या. हल्ली एवढा पाठपुरावा करणाऱ्या नेत्यांची संख्या दुर्मिळ आहे. अशा लोकनेत्यांची समाजाला मोठी गरज आहे. नव्या पिढीतील नेत्यांनी हे नेतृत्व गुण जरूर आत्मसात करायला हवेत...

हेही वाचा: ‘अष्ट’पैलू महानायक