...अखेर नाशिकला रुजू झालो! (महेश झगडे)

mahesh zagade
mahesh zagade

माझ्या बदलीची गोष्ट : ३
पुढं जे काही घडलं त्याची सुरुवात त्या स्टेजवरच झाली होती आणि माझ्या कार्यपद्धतीच्या ढाच्यामुळे माझी तिथूनही लवकरच बदली होऊ शकते याचीही पाल माझ्या मनात चुकचुकली. मात्र, आता विनाकारण आणि अकाली बदलीला बळी पडायचं नाही असं मनाशी ठरवून, त्यासंदर्भात काय करता येईल, याचाही विचार मी मनातल्या मनात करू लागलो. ...आणि एका अत्यंत वादळी अध्यायाला सुरुवात झाली.

मी आणि ते पत्रकार यांच्यातलं ते संभाषण उपमुख्यमंत्री ऐकत होते. माझं वाक्‍य संपता संपताच उपमुख्यमंत्र्यांनी ऑपरेटरद्वारा मुख्यमंत्र्यांशी फोनवरून संपर्क साधला व नाशिकला झालेल्या माझ्या बदलीवर जी स्थगिती होती ती उठवण्याविषयी त्यांंना सुचवलं. आम्ही तिघं इतर बाबींवर चर्चा करत असतानाच मोबाईलवर माझ्या पीएचा लगेचच फोनही आला : ‘बदलीवरची स्थगिती उठवण्याविषयीचं पत्र मंत्रालयातील आपल्या कार्यालयाला मिळालं आहे!’ हे सगळं इतकं वेगानं घडत होतं की त्यावर विचार करायला वेळच नव्हता. सायंकाळी घरी गेल्यानंतर कुटुंबीयांना मी ही घडामोड सांगितली व सुरुवातीला नाशिकला एकट्यानंच जाण्याचं नियोजन केलं. उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात कामाचा व्याप, तणाव प्रचंड असला तरी उपमुख्यमंत्र्यांचा स्वभाव हा त्यांच्या सार्वजनिक प्रतिमेपेक्षा वेगळा आणि अतिशय शार्प, विनोदी, संवेदनक्षम असल्यानं हा कार्यकाळ तसा बरा गेला.
दुसऱ्या दिवशी मंत्रालयातील कार्यालयात जाऊन कार्यभार इतर अधिकाऱ्यांवर सोपवून मी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात गेलो व तिथल्या सचिवांचा आणि इतर स्टाफचा निरोप घेतला.

आधी वेळ ठरवून घेतल्याशिवाय अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना शक्‍यतो भेटू नये असा प्रघात होता; पण कुंभमेळ्याच्या पार्श्‍वभूमीवर, त्यांची भेट होते का, याचा मी कानोसा घेतला. ते बैठकांसाठीच्या सभागृहात होते. मी त्यांना जाऊन भेटलो आणि ‘कुंभमेळ्यासाठी काही सूचना आहेत का,’ असं औपचारिकपणे विचारलं. त्यावर ‘तुम्ही तुमच्या मनाविरुद्ध जात असलात तरी ही एक संधी आहे आणि या बदलीकडे त्या दृष्टिकोनातून बघा, नकारात्मकतेनं जाऊ नका’ असं त्यांनी मला सांगितलं आणि नेहमीच्या मिश्‍किल शैलीद्वारे सकारात्मक ऊर्जा ते मला देऊन गेले. एक उमदं व्यक्तिमत्त्व होतं ते!

उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील; पण नाशिकची सर्व माहिती असलेल्या एका परिचितांबरोबर मी शासकीय मोटारीनं दुसऱ्या दिवशी नाशिकला निघालो. तसा माझा आणि नाशिकचा पूर्वी फार काही संबंध नव्हता. तिथं यापूर्वी माझं कधी पोस्टिंगही झालं नव्हतं आणि तिथं माझे कुणी नातेवाईकही नव्हते. शासकीय कामानिमित्त फार तर दोन-तीन वेळा जाणं झालं असेल. मात्र, मुंबई ते नाशिक मार्गानं प्रवास करणं हा एक विलक्षण विरंगुळा वाटायचा. तसंही मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचण्यापेक्षा प्रवासाचाच जास्त आनंद घेणाऱ्यांपैकी मी एक होतो. प्रवास करताना एक प्रकारचं नवचैतन्य येतं; विशेषतः स्वतः गाडी चालवण्याची संधी असेल तर! प्रशासकीय सेवेत येण्यापूर्वी मी जेव्हा खासगी क्षेत्रात होतो तेव्हा ठाणे ते प्रवरानगर व्हाया नाशिक-संगमनेर हा प्रवास स्कूटरनं किंवा मोटारसायकलनं दिवसा आणि रात्री अनेक वेळा केलेला होता. त्यामुळे कुणी अपरिचित भेटून जो आनंद होत असतो तो या प्रवासादरम्यान होताच. कसारा घाट सुरू होताना तिथं २५-३० वर्षांपूर्वी काही धाबे होते, त्यांपैकी एका धाब्यावर मी माझी टू व्हीलर थांबवून भाजलेल्या कारल्याच्या भरताचा आस्वाद जरूर घेत असे. गाडी थांबवून चौकशी केली असता तिथं आता तसं काहीच नव्हतं. सर्व काही बदललेलं होतं! धाबे जाऊन तिथं आता रेस्टॉरंट्स आलेली दिसत होती.

‘तपोवन’ नावाच्या मुख्य विश्रामगृहावर आम्ही सायंकाळी पोचलो. उशीर झाला होता. मावळत्या जिल्हाधिकाऱ्यांना निरोप आणि माझ्या स्वागताचा कार्यक्रम ठेवण्यात आला असल्याचं समजलं. कार्यभार स्वीकारण्याची औपचारिकता संपवून नियोजित सभागृहात कार्यक्रमाच्या ठिकाणी आम्ही दोघं गेलो. अशा कार्यक्रमांमध्ये मी अवघडून जातो; पण एक जाणवलं की मावळते जिल्हाधिकारी हे पूर्वी तिथं जिल्हा परिषदेचेही मुख्य कार्यकारी अधिकारी होते आणि त्यांच्या लाघवी स्वभावामुळे ते प्रशासनात आणि नेतेमंडळींमध्ये खूप आवडते होते. सर्वच अधिकाऱ्यांनी भाषणात त्यांची वाहवा केली. माझ्या बाबतीत जरा हातचं राखूनच बोललं जात होतं. कारण, सोलापूरचे आणि सिंधुदुर्गचे माझे काही ‘प्रताप’ तसे त्या वेळी सर्वश्रुत होते. अर्थात्, ही बाब काही लक्ष देण्यासारखी नव्हती. माझ्या मनात दुसरंच वादळ सुरू होतं. एक तर मला उपचारांसाठी प्रदीर्घ काळ रुग्णालयात राहावं लागलं होतं, त्या पार्श्वभूमीवर माझ्या प्रकृतीचा प्रश्‍न होताच...दुसरं म्हणजे, केवळ एका वर्षावर आलेला कुंभमेळा आणि साधूसमाज कुंभमेळ्याच्या तयारीबाबत अगोदरच नाराज असल्याची प्रसारमाध्यमांंमधून आलेली वृत्तं...आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, जिल्हाधिकारी या पदावर भरपूर प्रकारच्या जबाबदाऱ्या (काहींनी त्यांची यादी केली तेव्हा ७४ वेगवेगळे विषय निष्पन्न झाले होते) असल्या तरी मूळ काम आणि प्रमुख काम महसूल हेच असतं. त्यात पाच-सहा प्रकारचे कायदे, त्यांच्या अंतर्गतचे नियम असं एक ‘प्रशासकीय घनदाट जंगल’ असतं! अर्थात सर्वसाधारणतः जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्वी उपजिल्हाधिकारी किंवा सहायक जिल्हाधिकारी म्हणून काम केलेलं असतं आणि महसूल आणि महसुलाशी निगडित सर्व कायद्यांची विभागीय परीक्षा दिलेल्या असतात व त्यामुळे ते त्यात अनुभवी आणि पारंगत असतात. मी मात्र उपजिल्हाधिकारी किंवा सहाय्यक जिल्हाधिकारी या पदांवर काम न करताच आणि महसूलविषयक कायद्यांची विभागीय परीक्षा न देताच जिल्हाधिकारीपद धारण करणारा होतो. अर्थात्, मी इतर विषयांच्या विभागीय परीक्षा दिलेल्या होत्या आणि इतर पदंही धारण केलेली होती. मात्र, तरीसुद्धा मी इतरांप्रमाणे या कायद्यात औपचारिकपणे ‘निष्णात’ नव्हतो. त्यामुळे साहजिकच माझ्या अंतर्गत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना - माझ्या या पार्श्वभूमीमुळे मी तसा अनभिज्ञ असल्यानं - मला ‘सल्ला’ द्यायला अधिक ‘संधी’ मिळणार होती आणि ही ‘संधी’ आपोआपच चालून आलेली होती. अर्थात्, या कायद्यांतर्गत मी पूर्वी काम केलेलं नव्हतं हीच माझी सर्वात मोठी ताकद आहे याची मला केवळ खात्रीच नव्हती तर दृढ विश्र्वासही होता. पूर्वी मी कनिष्ठ स्तरावर ‘महसूल’मध्ये काम केलेलं नसल्यानं मी त्या व्यवस्थेचा गुलाम नव्हतो किंवा ‘महसूल’चे क्‍लिष्ट झालेले कायदे, अनाठायी पद्धती, अगणित तरतुदींचं जाळं, त्यामुळे यंत्रणेनं त्यात बेमालूमपणे आणलेली आणि सर्वसामान्यांनाच नव्हे तर, वकिलांनाही कधी कधी अगम्य वाटणारी गूढता, विनाकारण (खरं तर सकारण!) विलंब... या अशा जंजाळात मी गुरफटलेला नव्हतो आणि हीच माझी ताकद होती! माझं मन याबाबतीत अप्रदूषित होतंं, ताजं होतं. त्यामुळे निरोपाच्या आणि स्वागताच्या कार्यक्रमादरम्यान स्टेजवर जे काही चाललं होतं त्याला मी मनातल्या मनात हसत होतो आणि माझे आराखडे आपोआप तयार होत होते. पुढं जे काही घडलं त्याची सुरुवात या स्टेजवरच झाली होती आणि माझ्या या कार्यपद्धतीच्या ढाच्यामुळे माझी तिथूनही लवकरच बदली होऊ शकते याचीही पाल माझ्या मनात चुकचुकली. मात्र, आता विनाकारण आणि अकाली बदलीला बळी पडायचं नाही असं मनाशी ठरवून, त्यासंदर्भात काय करता येईल, याचाही विचार मी मनातल्या मनात करू लागलो.
...आणि एका अत्यंत वादळी अध्यायाला सुरुवात झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com