शिक्षण, राजकारण व समाजकार्यात भाऊसाहेब हिरे यांचे योगदान

Bhausaheb hiray
Bhausaheb hirayesakal

''१ डिसेंबर १९१४ ला झालेल्या मराठा शिक्षण परिषदेस कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्यासह शिक्षणतज्ज्ञ समाजसेवक बाबूराव दरकही उपस्थित होते. कर्मवीर थोरातांनी पुढे आपल्या मित्रांना बरोबर घेत १९१४ मध्ये मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेची स्थापना केली. मराठा समाजातर्फे पहिले उदोजी मराठा वसतिगृह हे फक्त तीन विद्यार्थ्यांपासून सुरू झाले होते. त्यात, कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यार्थी म्हणून घडत गेले अन्‌ येथेच त्यांच्या समाजसेवेची जडणघडण झाली.''
- जयश्री बागूल

कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांचा जन्म १ मार्च १९०५ ला निमगाव (ता. मालेगाव) येथे शेतकरी कुटुंबात झाला. वडिलांचे नाव सखाराम कृष्णा हिरे व आईचे नाव झेलाबाई सखाराम हिरे. मुलाने शिक्षण घ्यावे, असे त्यांच्या आई-वडिलांना नेहमी वाटत असे. त्यामुळे भाऊसाहेबांचे प्राथमिक शिक्षण निमगाव येथे झाले. पुढील शिक्षणासाठी शाळेचा शोध सुरू झाला. त्या वेळी भाऊंचे वडील सखाराम हिरे हे कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या भेटीला नाशिकला आले. त्यांच्याशी उदोजी बोर्डिंग येथे मुलाला दाखल करण्यासाठी चर्चा झाली. कर्मवीर थोरात स्वत: बोर्डिंगचे रेक्टर आणि शिक्षकही होते. त्यांच्या शिस्तप्रियतेचा पगडा विद्यार्थ्यांवर होता. घरात आई, आजींनी भाऊंना बाहेरगावी पाठविण्यास नकार दिला. तरीदेखील त्यांना नाशिकला बोर्डिंगमध्ये दाखल केले गेले. वडिलांनी भाऊंना शाळेत आणले. मुलाला शिस्त व शिक्षणाची गोडी लागावी म्हणून वडिलांनी थोरातांना सांगितले, की माझा मुलगा बेशिस्त वागल्यास त्याला शिक्षा दिली तरी चालेल.

Bhausaheb hiray
हे माझे भाग्य बघून, जळफळतील देव ते!

बोर्डिंगमध्ये राहून भाऊसाहेबांचे सहावीचे शिक्षण सुरू झाले. ते अतिशय हुशार, शिस्तप्रिय होते. स्वत:चे काम स्वतः करायचे. कामाची त्यांना आवड होती. रोज सकाळी व्यायाम करायचे. लहानापासूनच तल्लख बुद्धी असणारे भाऊसाहेब अभ्यासातही प्रावीण्य मिळवत. आठवीला असताना शिक्षकांनी आपली तक्रार केली, असे त्यांना वाटले. त्यामुळे आता गुरुवर्य थोरात आपल्याला शिक्षा देतील, या कारणाने ते निमगावला निघून गेले. मात्र, परत येण्याचे कारण वडिलांना काय सांगावे, हे समजेना. पुढे मालेगाव येथील परिषदेत थोरातांनी सखाराम हिरे यांना सांगितले, की भाऊसाहेब हुशार आहेत. त्यांना पुन्हा शाळेत टाका. त्यावेळी जुन्या मॅट्रिकपर्यंत शिक्षणासाठी ‘उदोजी बोर्डिंग’मध्ये वडिलांनी दाखल केले. मॅट्रिकनंतर उच्च शिक्षणासाठी विचार सुरू झाला. तेव्हा ते बडोदा संस्थानातील महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या संस्थानात दाखल झाले. तेथे बी. ए. चे शिक्षण घेऊन परत आले. त्यानंतर पुणे येथून लॉचे शिक्षण पूर्ण करून परत नाशिकला आले. या संपूर्ण शिक्षणाचा फायदा बहुजन वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी व्हावा, हाच उद्देश घेऊन त्यांनी शैक्षणिक कार्यास सुरवात केली.
ब्रिटिश काळात भारताच्या गुलामगिरीचे मूळ अज्ञानाच्या अंधारात दडलेले आहे, हे ओळखून तत्कालीन समाजसुधारक राष्ट्रीय नेत्यांनी देशात शिक्षण प्रसाराचा विडा उचलला होता. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रात ज्या शैक्षणिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली, त्यात कर्मवीर भाऊसाहेब अग्रस्थानी होते. शिक्षण पूर्ण होताच त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात वाटचाल करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले.

मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचा शैक्षणिक विस्तार, प्रगती आणि विकास यासाठी आपण योगदान देऊ शकू, असेही त्यांच्या मनात होते. सत्यशोधक चळवळीच्या पायाभरणीतून त्याच्या विचारांचा प्रवास सुरू झाला. १९१७ ते १९३७ या वीस वर्षांच्या काळात त्यांनी स्वयंस्फूर्तीने शिक्षणाची मोफत सोय उपलब्ध करून देण्याचं काम केलं होतं. शिक्षणाचे संस्कार मिळण्यातून सामाजिक, शैक्षणिक विकास झाला म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षणाचा फायदा होईल, याबाबत त्यांना प्रचंड विश्‍वास होता.
मराठा शिक्षण परिषदेचे अधिवेशन वेळोवेळी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये होत असे. मे १९४८ मध्ये नाशिकला अधिवेशन झाले. या अधिवेशनाच्या यशामागे कर्मवीर रावसाहेब थोरात, कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांचे परिश्रम होते. त्या काळात मराठा समाजाचे काही सदस्य नांदगाव येथे ‘छत्रपती शिवाजी वसतिगृह’ ही बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठीची एक स्थानिक संस्था चालवत होते. पुढे हे वसतिगृह आर्थिक स्थितीअभावी बंद पडले. तेव्हा नांदगाव तालुक्यातील प्रमुख लोकांनी आणि संस्थाचालकांनी आपसांत विचारविनिमय करून ‘छत्रपती शिवाजी वसतिगृह’ आपल्या संस्थेच्या ताब्यात घेण्याचा व शाळा सुरू करण्याचा आग्रह भाऊसाहेबांना केला. त्यानुसार १४ जून १९४५ ला या संस्थेची इमारत व काही शेती ‘मविप्र’ संस्थेला दिली. ‘मविप्र’ने नांदगावला त्याच जागेवर नवे वसतिगृह बांधून दिले. तेथेच एक ‘प्रायमरी ट्रेनिंग कॉलेज’ सुरू करण्याची योजना आखून दिली. १९५० मध्ये हे प्रायमरी ट्रेनिंग कॉलेज सुरू झाले. त्या वेळी कर्मवीर भाऊसाहेब हिरे राज्य मंत्रिमंडळात मंत्री होते. त्यांनी या संस्थेच्या विकासाकडे पूर्ण लक्ष दिलं होतं. दरम्यान, भाऊसाहेब राजकारणात गेले. काही वर्षांतच, म्हणजे १९५१ मध्ये त्यांची मुंबई राज्याचे महसूल व शेती, जंगल खात्याचे मंत्री म्हणून निवड झाली. संस्थेच्या अध्यक्षपदीही त्यांची निवड झाली होती. नांदगावला दोन मैलावर शासनाची ६० एकर जागा रिकामी असल्याने ती जागा भाऊसाहेबांच्या प्रयत्नातून संस्थेस कराराने मिळाली. संस्थांच्या कामापेक्षा १९४५ ते ५० या काळात बहुजनांच्या मुलांना शिक्षणासाठी इमारत खुली करून देणं, शिक्षकांसाठी प्रायमरी ट्रेनिंग सुरू करणं आणि ६० एकर जमिनीवर शेतकी शाळा सुरू करून शेती कशी करावी, याचे प्रशिक्षण देणारे केंद्र त्यांनी बनविले. नवनिर्मितीच्या दृष्टिकोनातून राबविलेल्या या शैक्षणिक पद्धतीचा फायदा इतरांनाही झाला. १९५६ मध्ये भाऊसाहेबांच्या नेतृत्वाखाली संस्थेने शेतकी प्रधान विविध उद्देशीय माध्यमिक शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव आणला. ग्रामीण भागात ही इंग्लिश स्कूल १९५६ ला सुरू झाली. त्यामुळे भाऊसाहेबांकडे एक द्रष्टा व्यक्ती, गुणवंत शिक्षणासाठी नेहमीच पुढे असलेला माणूस म्हणून बघितलं जात होतं.

Bhausaheb hiray
काळ आला होता, पण वेळ आलेली नव्हती!

गरिबांना मात्र पैसा देऊन शिक्षण घेता येत नसल्याने त्यांना मुख्य प्रवाहात आणायचे होते. विनोबा भावे यांच्या विचारांचाही पगडा भाऊसाहेबांच्या मनावर होताच. त्यामुळे त्यांनी शिक्षणाचा उपयोग त्या पद्धतीने केला. म्हणूनच चार-पाच महाविद्यालये सुरू करावीत, वसतिगृह सुरू करण्यास मुभा हवी, बोर्डिंग सुरू केली पाहिजे, ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे आणि विद्यार्थी-विद्यार्थिनिंना शेतीतून पैसा मिळाला पाहिजे, अशा पद्धतीने त्यांनी काम केले. कर्मवीर भाऊसाहेब हिरे १९५० मध्ये महसूलमंत्री असताना त्यांनी ‘मराठा हायस्कूल’ या दगडी इमारतीचे काम पूर्णत्वास नेले. त्यांच्याच हस्ते मराठा हायस्कूलच्या इमारतीचे उद्‌घाटन झाले. १९५० ते १९५६ या काळात उदोजी बोर्डिंगमध्ये शिक्षकांना विविध व्यावसायिक शिक्षण विद्यार्थ्यांसाठी देण्याचे ते सांगत असत. त्यातून विद्यार्थ्यांना पैसे मिळण्यास मदत होईल. बोर्डिंग आणि संस्था चालवण्यासाठी सर्व सदस्य त्या काळी श्रीमंत शेतकरी, उद्योजक यांच्याकडून पैसे व धान्य गोळा करत असत. संस्थेचा व्याप जिल्हाभर वाढला पाहिजे, यासाठी ते कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्याबरोबर नेहमीच अग्रेसर होते. पुढे कर्मवीर थोरात यांच्या निधनानंतर संस्थेची धुरा कर्मवीर भाऊसाहेबांनी यशस्वीरीत्या सांभाळली. महाराष्ट्रातील अनेक शाळा, महाविद्यालये, संस्थांनाही भाऊसाहेबांनी मदतीचा हात दिला, हे नाकारून चालणार नाही. शहरांमध्ये बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण मिळण्याची सोय असली पाहिजे, असा विचार कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बोलून दाखवला होता. परिषदेचे पदाधिकारी असताना त्यांनी ही मागणी उचलून धरली. पुढे १९६० मध्ये पुणे येथे शाहू मंदिर महाविद्यालय स्थापन करण्याचं काम भाऊसाहेबांनी केले व त्यानंतर माध्यमिक शाळांची जबाबदारी भाऊसाहेबांनी घेतली. १९५२ मध्ये ते संस्थेचे अध्यक्ष झाले.

संस्था चालवण्यासाठी श्रीमंत शेतकरी आणि राजघराण्यांकडून निधी आणि धान्य मिळाल्यास ही मदत संस्थेसाठी वापरली जात होती. १९३७ मध्ये मुंबईत काँग्रेस विधिमंडळ सत्तेत आले. तत्कालीन मुख्यमंत्री श्री. खेर व तत्कालीन शिक्षणमंत्र्यांकडे कर्मवीर भाऊसाहेबांनी इंग्रज सरकारच्या काळात बंद झालेल्या व्हालेंटरी प्राथमिक शाळा पुन्हा सुरू करण्याची परवानगी मागितली. त्यास मान्यता मिळाल्याने पुढे दीड हजार व्हॉलेंटरी शाळा संस्थेने चालवण्यास घेतल्या. सुरगाणा, पेठ व डांग अशा अदिवासी भागात शाळा सुरू करून आदिवासींना समानतेचे पाठबळ दिले. १९५२ मध्ये निमगाव येथे महात्मा गांधी विद्यामंदिराची स्थापना करण्यात आली. निमगाव शिक्षणप्रसारक मंडळ, सटाणा येथील सरस्वती मंदिर या शाखा गांधी विद्यामंदिरमध्ये विलीन करण्यात आल्या. मालेगाव शिक्षणप्रसारक मंडळ आदींद्वारे शिक्षणप्रसारचे कार्य आजतागायत सुरू आहे. विशेष म्हणजे, संस्थेने उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना सुरू केली. आपल्या स्वतःच्या वाढदिवसाला मिळालेल्या निधीतून ते विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देत. याशिवाय वकिलीच्या कामातून मिळणारा आर्थिक मोबदलाही समाज कार्यासाठी वापरत. काही सामान्य शेतकरी वकिलीची फी त्यांना धान्याच्या रूपात देत. या कारणास्तव लोक त्यांना ‘धान्य गोळा करणारे वकील ’म्हणून हिणवत. मात्र, त्यांना कधीही वाईट वाटले नाही. हा पैसादेखील शाळा, आश्रमशाळांसाठी वापरला जात होता. राजकारण, समाजकारण, कृषी, पर्यावरण, विद्युत आदी सर्वच क्षेत्रांची त्यांना आवड होती. मालेगावमध्ये त्यांनी महाराजा सयाजीराव गायकवाड कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाची स्थापना केली. भाऊसाहेबांपुढे त्या काळातदेखील अनेक अडचणी होत्या. बागलाण तालुक्यातून शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या शेतकरी व मध्यमवर्गीय मुलांसाठीही ते प्रयत्नांची पराकाष्ठा करत. त्यातूनच त्यांनी मालेगावला महाविद्यालय स्थापन करण्याचा अट्टहास पूर्ण केला. त्या काळात महाराष्ट्रात नाशिक व अमळनेर येथे महाविद्यालय सुरू झाले होते. धुळे जिल्ह्यात एकही महाविद्यालय नव्हते. तेथील थोर कार्यकर्ते डॉ. घोगरे यांनीदेखील भाऊसाहेबांना धुळे महाविद्यालय स्थापन करण्याबाबत पत्र पाठवले होते. १९५४ मध्ये भाऊसाहेबांनी प्रथम मालेगावमध्ये महाविद्यालय स्थापन करण्याचा करण्याचा निर्णय घेतला. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते या महाविद्यालयाची कोनशिला बसवण्यात आली. त्या वेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे गीत स्वागतासाठी म्हणण्यात आले होते. ‘सबके लिए खुला है मंदिर हमारा है’ हे गीत सुमारे एक हजार विद्यार्थ्यांनी एक सुरात गाऊन मान्यवरांचे स्वागत केले होते. प्राचार्य म्हणून भाऊसाहेबांनी त्या वेळचे थोर साहित्यिक पु. ल. देशपांडे आणि त्यांच्या पत्नी सुनीता देशपांडे यांना विशेषत्वाने बोलावून घेतले होते. नंतर १९७९ मध्ये महाविद्यालय स्थापन करून त्याचे ‘सयाजीराव गायकवाड महाविद्यालय’ असे नामकरण करण्यात आले. त्यानंतरच्या शिक्षण प्रवासात महसूलमंत्री असताना भाऊसाहेबांनी १९५६ मध्ये त्र्यंबकेश्‍वर येथील विद्यार्थी वसतिगृहाचे भूमिपूजन केले.

Bhausaheb hiray
नाव शेतकऱ्याचे; भले धन-दांडग्यांचे!

१९६० चा कूळकायदा ऐतिहासिक करार करून ‘कसेल त्याची जमीन’ असा कायदा पास केला. या कराराचे संपूर्ण श्रेय भाऊसाहेबांकडे जाते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही भाऊसाहेबांनी पुढाकार घेतला होता. सरकार तडजोड करत नाही म्हणून त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. भाऊसाहेब महात्मा गांधींना देवस्थानीच मानत. गांधीजींच्या तत्त्वज्ञानावर त्यांची अविचल निष्ठा होती. त्याच तत्त्वावर ते अविरत काम करत राहिले. आजमितीस शिक्षण संस्थांचा वटवृक्ष झाला आहे. सर्वच शिक्षण संस्था त्यांच्या जिव्हाळ्याच्या राहिल्या. त्यातूनच ग्रामीण व शहरी भागातून आदिवासी, गरीब शेतकरी, बहुजन वर्ग शिक्षण घेऊन जगाला गवसणी घालत आहे, हेच त्यांच्या कार्याचे फलित आहे. मौल्यवान पैलू असणाऱ्या या हिऱ्याने अखेर ६ नोव्हेंबर १९६१ ला अंतिम श्‍वास घेऊन विचारांच्या माध्यमातून ते अजरामर राहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com