आखीव, रेखीव, प्रमाणबद्ध तारापूरचा रणसंग्राम | latest Marathi article | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

poet madhav

आखीव, रेखीव, प्रमाणबद्ध तारापूरचा रणसंग्राम

ग. त्र्यं. माडखोलकर यांनी कवीस ऐतिहासिक काव्यरचनेस (Historical poetry) प्रोत्साहन देत कान्होजी आंग्रेचा इतिहास काव्यबद्ध करण्याची विनंती केली. त्याचेच फलस्वरूप म्हणजे कवीची हिरवे तळकोकण ही कविता (Poetry) होय. ती सलग इतिहासातील पहिली माळ होती.

प्रस्तुत कविता ऐतिहासिक असूनही निसर्ग वर्णनपर आहे. कवीने मराठ्यांच्या जवळपास तीन-चार पिढ्यांचा इतिहास काव्यबद्ध केलेला आहे. (saptarang Marathi article on marathi poetry by dr neeraj dev on Battle of Tarapur nashik latest Marathi article)

क वी माधवांचे (१८९२-१९५८) पूर्ण नाव माधव केशव काटदरे होते. त्यांनी ‘एक खेळगडी’, ‘एम के के’, ‘जामदग्न्य’, ‘बाळू’, ‘यशवंताग्रज’, ‘रमाकांत’ अशा अनेक टोपणनावाने लिखाण केल्याचे आढळते.

मात्र यातील कवी माधव हे त्यांचे टोपणनाव अधिक विख्यात झाले. गुहागर तालुक्यातील शीर हे त्यांचे मूळ गाव. त्यांचा जन्म आजोळी मलकापूर (जि. कोल्हापूर) येथे झाला. त्यांचे शिक्षण गुहागर आणि रत्नागिरीस झाले. त्यांनी ब्रिटिशांच्या कस्टम खात्यात नोकरी केली. निवृत्तीनंतर ते चिपळूणला स्थायिक झाले.

विद्यार्थिदशेपासून त्यांना कवितेची गोडी होती. निसर्ग कविता हा त्यांचा मूळ पिंड होता. पण वाल्टर स्कॉटचे काव्य वाचून त्यांना ऐतिहासिक काव्यलेखनाची स्फूर्ती मिळाली. त्यातच ग. त्र्यं. माडखोलकर यांनी कवीस ऐतिहासिक काव्यरचनेस प्रोत्साहन देत कान्होजी आंग्रेचा इतिहास काव्यबद्ध करण्याची विनंती केली.

त्याचेच फलस्वरूप म्हणजे कवीची हिरवे तळकोकण ही कविता होय. ती सलग इतिहासातील पहिली माळ होती. प्रस्तुत कविता ऐतिहासिक असूनही निसर्ग वर्णनपर आहे. कवीने शिवकालीन रायगड ते रावबाजींचे राज्यदान असा मराठ्यांच्या जवळपास तीन-चार पिढ्यांचा इतिहास काव्यबद्ध केलेला आहे. त्यातील ‘तारापूरचा रणसंग्राम’ ही अतिशय आखीव, रेखीव कविता आज आपण पाहणार आहोत.

पोर्तुगीजांनी गोव्यापासून कोकणचा सर्व सागरीपट्टा व्यापून टाकला होता. त्यांच्या आधिपत्याखालील भाग जिंकण्याचे अवघड काम चिमाजी अप्पांनी अत्यंत तडफेने नि हिकमतीने करून दाखविले होते. त्यातील एक लढाई होती तारापूरची. १७३९ मध्ये झालेल्या मराठा पोर्तुगीज संग्रामाच्या रोमांचक इतिहासाचे वर्णन करताना कवी गर्जतो,

तुडुम् तुडुम् हा झडे फरारा । एल्गाराचा देत इशारा ।
भगवा झेडा उडे फरारा । एल्गाराचा देत इशारा ।
मर्द मराठे ! उठा ! उठा तर! गर्जत हर ! हर !
चला करा सर बुलंद बाका गढ तारापूर ! ।।

कवीच्या या पंक्ती वाचल्यानंतर कोणाही भारतीयाचे बाहू फुरफुरू लागतील यात शंकाच नाही. आरंभीच कवी संपूर्ण ताकदीनिशी जोमदार चढाई करणाऱ्या मराठी लष्कराचे वर्णन करतो. तारापूरचा दुर्ग जिंकायला किती अभेद्य नि अजिंक्य आहे, याचे वर्णन कवी ‘बुलंद बांका गढ तारापूर।’ या रचनेतून करतो.

पुढे तो सांगतो, ‘तारापुरच्या दुर्गाच्या तिन्ही बाजूस खोल खंदक असून, चवथ्या बाजूस पाणी आहे. शिवाय आकाशातून बरसणारे लोखंडी गोळे ही आहेत. पण मराठ्यांनो, भय बाळगू नका. कारण तुम्ही आदिशक्ती भवानीचे भक्त आहात.

महाराष्ट्राची धर्मरक्षिका भवानी तुम्हाला प्रसन्न आहे, शिवरायाची पुण्याई तुमच्या पाठीशी आहे. मग भयंकर कहर करणाऱ्या फिरंग्यांची भीती तुम्ही कसली बाळगता? तडफेने त्यांचा गढ तारापूर सर करत अन् त्याच सुरात लढणाऱ्या मर्द मराठ्यांना चेतवित तो म्हणतो,

अर्यस्त्रांची तमा कुणाला । कचदिल पापी नादानाला ।
अर्यस्त्रांची तमा कशाला । शिवशाहीच्या रणमर्दाला ।

अस्त्रा-शस्त्राची पर्वा करायला तुम्ही कचदिल, पापी, नादान थोडीच आहात. तुम्ही तर शिवशाहीचे रणमर्द आहात. ज्यांना तुमचा धर्म, देश मान्य नाही. त्यांचे गुलाम चराचरा चिरा. महाराष्ट्र धर्माचे रक्षण करण्यासाठी जे तन, मन, वाणी वेचून गेलेत ते तुमचे पूर्वज स्वर्गातून पाहताहेत. इतकेच कशाला तुमचा पुरुषार्थ पाहायला तो सूर्यही वरवर चढतोय.

तरी मर्द मराठ्यांनो उठा, उठा तर. तिकडे पाहा समुद्रातल्या खाडीमधे माडी बांधून राहणारा तुमचा सूत्रधार चिमाजी सांगतोय, की ‘मी शत्रूंची भाजी करणार’ पवार, शिंदे, होळकर सारे सरदार एल्गाराला तयार झाले. एकामागून एक सुरुंग उडू लागले, तरीही गडाची दोन्ही दारे बंदच होती. पण मराठ्यांच्या सेनासागर हर हर गर्जत, गढाला सुरुंग लावून गडाच्या तटातटाला दारं पाडू लागला.

त्या दारादारातून घुसायला मराठी सेना उत्साहाने निघाली. पण गनिमांचा प्रतिकार भयंकर होता. त्याने थबकून मराठी लष्कर बोलू लागले ‘अजिंक्य बांका गढ तारापूर.’ त्याबरोबर एल्गाराचा इशारा देत नगारा झडू लागला नि भगवा झेडा उडू लागला.

त्यामुळे स्फुरण चढून मराठी सेना तारापूरचा गढ जिंकायला निघाली. खंदकावर सांकू पाडून त्यावरून रणधीर धावू लागले. धावता धावता काही पडू लागले. पडता पडता ‘गर्जत हर हर ! जय जय शंकर’ सावरून गड सर करायला धावू लागले. बिनीचे हिंमतदार शिपाई क्षणांत खंदकपार झाले. पण किल्ल्यावरून अपार गोळ्या वर्षू लागल्या, आग ओकत होके कोसळू लागले.

पण त्या गोळ्यांची पर्वा करायला मराठी सेना कचदिल, पापी, नादान थोडीच आहे आणि होकयांना घाबरायला गुलाम थोडीच आहे. त्यामुळे ते त्यांची तमा न बाळगता खिंडारावर चढले. पण एक फिरंगी नंगी तरवार घेऊन खिंड लढवू लागला. त्याला पाहून वाटले तारापूरचा गड अजिंक्य आहे. तरीही तुडुम् तुडुम् चा नाद करीत नगारा झडत होता नि एल्गार करण्याचा इशारा देत भगवा झेंडा उडत होता. या मातबर झुंजीचे वर्णन करताना कवी सांगतो,

फिरंगियाचा नुतरे ताठा । हटे न मागे मर्द मराठा ।
असेल ज्याचा संत करंटा । अपेश त्याचा ठरला वाटा ।
रणांत पडले किती वीरवर । खिंडारी तरि झुंज मातबर ।
बुलंद बाका गढ तारापूर ।।

सारे उपाय अपायच ठरतात, हे ध्यानात आल्यावरही गडाला भगवी दीक्षा देण्याच्या इरेस मराठी लष्कर पेटले. गोळ्यांच्या नि होकयांच्या माराचा विचार न करता तटाला शिड्या लावून मराठी लष्कर चढू लागले.

पण गनिमांनी त्या शिड्याच लोटून देत त्यांची हिंमत खचवायचा प्रयास लावला. विजयवंत नित संत झेविअरची गर्जना करीत ते लढू लागले. तरीही

तुडुम् तुडुम् तरि झडे फरारा । एल्गाराचा देत इशारा ।
भगवा झेडा उडे फरारा । एल्गाराचा देत इशारा ।

त्यामुळे चेव चढून बेडर होत मराठी लष्कर लढू लागले. त्यांचा तो विजयी आवेश पाहून कवी गर्जू लागला

समर्थ गुरूचे समर्थ चेले । एल्गाराला तयार झाले ।
बर्कंदाजी दुरुस्त चाले । फिरंगीयाचे फिरले ताले ।
रक्षु सकेना संत झेवियर । धुतोड दुस्मन मरुनि भराभर ।
शिडी लागली पुनरपि सत्वर ।।

अन् शिडीवरून भरभर धावत, हाती भगवा ध्वज घेऊन एक जण चढला. पण तत्काळ गोळी लागून तो खाली पडला. त्याबरोबर तो ध्वज तोलत दुसरा चढला, तो ही पडला, मग तिसरा, चवथा, पाचवा चढतच गेले; पडतच गेले. क्षणभर शिडी रिकामी पडली. पण अंती एकाने गडावर भगवे निशाण फडकावलेच. ते पाहताच चेव येऊन मराठी सेना चपळाईने नि मर्दुमकीने घुसली त्याचे वर्णन करताना कवी

ढालेवरती झेलित गोळी । काबिज केली प्रथम सफेली ।
ढालेवरती झेलित गोळी । गडात शिरले उतरुनी खाली ।

हे वर्णन करताना कवी गनिमांकडे असणाऱ्या अत्याधुनिक हत्याराचा उल्लेख तर करतोच पण सोबतच परंपरागत नि जुनाट साधने असूनही मराठे कसे जवांमदीने लढत होते ते ही अचूक दाखवतो. मराठ्यांपुढे पोर्तुगीजांचा पडाव लागला नाही. तारापूरचा गड मराठ्यांच्या ताब्यात आला. आता मोर्चा शत्रूच्या अधिक बलस्थानावर वसईकडे वळणार असल्याचे लष्कर गर्जून सांगू लागले.

हेही वाचा: युद्ध-शतक

कवीची ही कविता वाचताना तिची आखीव, रेखीव नि सुरेख घडण लक्षात येते. कवीने त्यात योजलेले वेचक नि वेधक शब्दप्रयोग नि अखंड स्फूर्तिचा साठा करणारी संततधार गुंगवून ठेवते. त्या जोडीला असलेली तिची विलक्षण वेगवान नि चपळ रचना मराठ्यांच्या चपळ नि वेगवान हालचालीचे अचूक दर्शनच घडविते.

खरेतर मराठ्यांच्या दिग्विजयी इतिहास भारतीय भूगोलातील सुवर्णाध्याय आहे. ज्यावर महाकाव्ये रचली जावीत अशा तेजस्वी पराक्रमाचा मूर्तिमंत पोवाडा आहे. पण आमच्या संकुचित नि जातीय दृष्टीला त्याचा विशालतम आत्मा आकळत नाही. अशा महान इतिहासातील एक अध्याय कवीने रोमांचकरीतीने काव्यबद्ध केल्याचे पाहून सुजाण वाचक कळत-नकळत कवीला धन्यवाद देत राहतो.

जाता जाता हे ही दुःख व्यक्त केल्याविना राहवत नाही, की स्वातंत्र्याला ७५ वर्षे उलटल्यानंतरही तारापूरचा हा बलाढ्य गढ सामान्य माणसांना पाहता येत नाही. मराठ्यांच्या पराक्रमाची मूर्तिमंत साक्ष असलेला हा गड खासगी मालकीत आहे. खरेतर १०० वर्षांच्या कराराने दिलेला हा गड दोनशे वर्षे उलटून गेली तरी बंदिस्त आहे. तो लवकरात लवकर मुक्त व्हावा अन् त्याचे दर्शन घेता घेता कवी माधवाचे हे गीत मराठी रसिकास उच्च रवाने गाता यावे, हीच इच्छा!

हेही वाचा: आता माझी पाळी

Web Title: Saptarang Marathi Article On Marathi Poetry By Dr Neeraj Dev On Battle Of Tarapur Nashik Latest Marathi Article

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..