निर्भीड, अभ्यासू कायदेपंडित अण्णासाहेब मुरकुटे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Annasaheb murkute

निर्भीड, अभ्यासू कायदेपंडित अण्णासाहेब मुरकुटे

''नाशिक जिल्ह्यात शैक्षणिक क्रांती घडवून आणण्यात मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचा मोठा वाटा आहे. १९व्या शतकात महाराष्ट्रात शैक्षणिक क्रांतीला सुरवात झाली. १८७३ ला महात्मा जोतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यांच्या निधनानंतर शाहू महाराजांनी रयतेसाठी शिक्षण सुरू केले. १९०७ मध्ये धारवाडच्या अखिल भारतीय शिक्षण परिषदेत मराठा शिक्षणप्रसारक समाज संस्थेच्या स्थापनेचा ठराव संमत झाला. महात्मा फुलेंनी पेटवलेली शिक्षण प्रसाराची व समाज जागृतीची मशाल पुढे तळागाळातील लोकांपर्यंत पोचवण्यासाठी याच परंपरेतील थोर कर्मवीरांनी प्रयत्न केले. समाजात शिक्षणाविषयी जागृती, शिक्षणाचा प्रसार व उत्तम नागरिक घडवण्याच्या हेतूने १९१४ मध्ये नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज या संस्थेची स्थापन झाली. अशा या संस्थेतील एक निर्भीड, शिस्तप्रिय, अभ्यासू, तत्त्वनिष्ठ, कायदेपंडित म्हणून ॲड. अण्णासाहेब मुरकुटे या कर्मवीरांचे संस्थेप्रति असलेले योगदान जाणून घेऊ या...'' - प्रा. एस. पी. जाधव

विसाव्या शतकाच्या सुरवातीला, स्वातंत्र्य लढ्याच्या सुरवातीच्या काळात सत्यशोधक समाजाच्या विचारांची धुरा हाती घेऊन ॲड. अण्णासाहेब मुरकुटे समाजाच्या विकासासाठी झटले. समाजातील बहुजनांच्या विकासासाठी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाच्या प्रसाराचे कार्य करणाऱ्या अण्णासाहेब मुरकुटे यांचा जन्म १२ फेब्रुवारी १९०६ ला सिन्नर येथे बेताची आर्थिक परिस्थिती असलेल्या शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे नाव पांडुरंग, वडील महादेव संतूजी मुरकुटे. ते सिन्नरला शेतीबरोबरच विड्यांच्या पानांची वाहतूक करून उदरनिर्वाह करत. अण्णासाहेबांचे प्राथमिक शिक्षण सिन्नर येथे, तर त्यानंतर नाशिकच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. आर्थिक अडचणींमुळे शालेय शिक्षणानंतर पुढे काय? हा प्रश्‍न त्यांना होता. पण, स्वभावत:च ते जिद्दी व करारी होते. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी त्या वेळचे समाजसेवक विठ्ठलराव गाढवे, बापूसाहेब मुरकुटे, रावसाहेब थोरात, गणपतदादा मोरे यांच्या मार्गदर्शनाने व सहाय्याने ते बडोदा येथे गेले. ज्ञानसाधनेबरोबरच विविध छंद व उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन त्यांनी व्यक्तिमत्त्व विकासाकडे आवर्जून लक्ष दिले. बी. ए. पास झाल्यानंतर पुणे येथे वकिलीचा अभ्यासक्रम पूर्ण करून सनद मिळवली. वयाच्या २२ व्या वर्षी म्हणजे १९२८ मध्ये त्यांनी सिन्नर येथे वकिलीचा व्यवसाय सुरू केला.

हेही वाचा: नाशिकसाठी व्हावे स्वतंत्र विद्यापीठ !

वकिली व्यवसायाबरोबरच सामाजिक बाबींकडे लक्ष पुरवून सामाजिक कार्याचा व्याप त्यांनी वाढवला. अभ्यासूवृत्ती, स्पष्ट वक्तेपणामुळे तरुण वयात लौकिक वाढून अल्पावधीतच नाशिक बार असोसिएशन व नाशिक जिल्ह्यात ते निष्णात कायदेपंडित म्हणून प्रसिद्ध झाले. नाशिक न्यायालयात नव्याने आलेले तरुण वकील ॲड. बाबूराव ठाकरे, ॲड. विठ्ठलराव हांडे, ॲड. भोईटे, ॲड. नारायणराव बस्ते अशा नवोदितांचे मार्गदर्शक बनले. अभ्यासूवृत्ती, निर्भीड, व्यासंगी, शिस्तप्रिय व्यक्तिमत्त्वामुळे तसेच वकिली व्यवसायातील कामामुळे १९४८ मध्ये सरकारी वकील म्हणून त्यांची नियुक्ती झाली. अण्णासाहेबांनी ‘सरकारी वकील’ या पदाची शान वाढवली. त्यांनी ठरवले असते, तर बडोदा, ग्वाल्हेरसारख्या संस्थांच्या दरबारात ते न्यायाधीश म्हणून रुजू होऊ शकले असते. पण, त्यांनी जनसेवा हीच मोठी सेवा म्हणून आपली जन्मभूमी हीच कर्मभूमी मानली.
सामाजिक कार्य करत असताना त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्व ओळखले होते. त्यामुळे तळागळातील होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणात येणाऱ्या आर्थिक व इतर अडचणींची त्यांना जाणीव होती. कारण त्यांनीही त्याचप्रकारच्या अडचणींना सामोरे जाऊन उच्चशिक्षण घेतले होते. नवोदित शिक्षण संस्थांचा कारभार आदर्श व्हावा, अशी त्यांची तळमळ होती. शैक्षणिक कार्यात आपण चांगले योगदान द्यावे. या उद्देशाने ते मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेत १९३४-३५ पासून कार्यरत होते.

अण्णासाहेब जावळे संस्थेत आले तो काळ म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतरचा, भारत स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर उभा असतानाचा काळ. त्यावेळी मराठा विद्याप्रसारक समाज संस्था राजकीय, सामाजिक व आर्थिक अडचणीच्या वादळात होती. त्यामुळे समाजात प्रबोधन व शिक्षणप्रसाराचे काम थंडावले होते. संस्थेचा खर्च वाढत होता. परंतु, पुरेसे अनुदान मिळत नव्हते. संस्थेची प्रिंटिंग प्रेस तोट्यात, तसेच शेतीही आतबट्ट्याची, म्हणजेच त्यात नफा नव्हता. वसतिगृहात विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने खर्च वाढला होता. हुशार, होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना सहाय्य म्हणून फ्री शीप व अर्ध फ्री शीप देण्याचे प्रमाण वाढले होते. उच्च शिक्षणासाठी कर्जाऊ शिष्यवृत्त्या मोठ्या प्रमाणात दिल्या गेल्या होत्या. परंतु या शिष्यवृत्तीद्वारे शिक्षण पूर्ण झालेले, तसेच व्यवसायात स्थिरावलेल्या या माजी विद्यार्थ्यांकडून जीवनात प्रतिष्ठा व ऐहिक संपन्नता येऊनही कर्जाऊ रकमा परत मिळत नव्हत्या. त्यामुळे संस्थेची परिस्थिती खालावत चालली होती. संस्थाने खालसा झाल्यामुळे संस्थानिकांकडून मिळणाऱ्या देणग्या, वर्षासने बंद होती. धारचे महाराज श्रीमंत आनंदराव पवार यांच्याकडून मिळणारे वर्षासन १९४८ पासून बंद झाले. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सुराज्य, रामराज्य आले. या भावनेने शिक्षणप्रेमी जनसामान्यांनीही शिक्षण संस्थांना आर्थिक योगदान देणे बंद केले. अशा बिकट अवस्थेत मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे पदाधिकारी व कार्यकारी मंडळात अण्णासाहेब मुरकुटे यांची खजिनदारपदी निवड झाली. त्या वेळी संस्थेच्या घटनेप्रमाणे खजिनदार हे पद महत्त्वपूर्ण होते. अण्णासाहेबांनी संस्थेच्या आर्थिक बाबतीत जातीने लक्ष घातले. खर्चावर नियंत्रण आणले, संस्थेची आय वाढवण्याच्या दृष्टीने निर्णय घेऊन पावले उचलली. कर्जाऊ शिष्यवृत्तीची परतफेड करण्याबाबत कार्यवाही केली. संस्थेच्या शाखांच्या खर्चावर बंधने आणली, शाखांच्या अंदाजपत्रकाची आवश्‍यकता, खर्च मंजुरीची पूर्वपरवानगी, विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या गरजा व गुणवत्ता यांचा फेरविचार केला. संस्थेची प्रेस व शेती यांच्या जमा व खर्चाचा मेळ घालताना तोटा सहन करून संस्था चालवता कामा नाही, ही आग्रही भूमिका घेतली. शाखेचा काही प्रमाणात द्रव्यनिधी उभा करण्याची जबाबदारी शाखाप्रमुखांवर टाकली. त्यामुळे संस्थेचे आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक घसरण सावरण्यास मदत झाली. अवघ्या दोन ते तीन वर्षांत अण्णासाहेबांनी संस्थेची आर्थिक स्थिती सुधारून संस्थेच्या आर्थिक व्यवहारात शिस्त व काटकसर आणली. अण्णासाहेबांनी संस्थेचा पाया भक्कम करण्याचे धोरण स्वीकारून आर्थिक मदतीच्या व निधी उभारण्याच्या विविध योजना कार्यान्वित केल्या. यातून त्यांचा कणखरपणा, जिद्द, निर्णयक्षमता, कार्यक्षमता, नि:स्पृहता व निर्भीडता यांचा सर्वांवर प्रभाव पडून पुढे १९५० मध्ये संस्थेचे सरचिटणीस म्हणून त्यांची निवड झाली.

या वेळचे संस्थेचे अध्यक्ष (कै.) भाऊसाहेब हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अण्णासाहेब ध्येयनिष्ठेने, तत्त्वनिष्ठेने, चोख व लोकशाही पद्धतीने कामकाज पाहू लागले. ग्रामीण जनतेच्या विकासाला दिशा त्यांनी दिली. तसेच, शिक्षणाचे महत्त्व ग्रामीण जनतेला पटवून दिले. संस्थेच्या कामकाजात सामान्यांचा सक्रिय सहभाग करून घेण्यास अण्णासाहेबांनी सुरवात केली. त्यांच्या काळात संस्थेला स्थैर्य प्राप्त झाले. त्यामुळे संस्थेचे प्रशासन कार्यक्षम बनून गतिमान झाले. सेवकांबरोबरच संस्थेविषयी जिव्हाळा असणाऱ्या प्रत्येकामध्ये अण्णासाहेबांबद्दल दरारा व वचक निर्माण झाला. संस्थेच्या धोरणांचे निर्णय, कार्यवाही, नियोजन, त्यांची अंमलबजावणी याकडे त्यांचे बारकाईने लक्ष असायचे. नवीन शाखा उघडणे, जादा तुकडी वा वरचे वर्ग सुरू करणे, अभ्यासक्रम, उपक्रम राबवणे यासाठी लागणारे द्रव्यबळ व इतर सुविधा यासाठी शासकीय अनुदान तुटपुंजे असल्याने त्यासाठी स्थानिक जनतेमध्ये जागृती करून घेणे आवश्यक मानल होते.

हेही वाचा: ...साक्षात सरस्वतीच !

नियम, न्याय, निर्णय, तत्त्व याबाबत कोणतीही तडजोड करत नसत. संस्थेचा विस्तार व प्रगती यास खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीत अधिक गती मिळाली. संस्थेच्या प्रत्येक सेवकाविषयी त्यांना सहानुभूती व जिव्हाळा वाटत असे. शाखाविस्तारामुळे संस्थेतील जुन्या सेवकांची बदली दूरच्या ठिकाणी करताना सेवकांना विश्‍वासात घेऊन त्यांच्या परवानगीने बदली करत. त्यांना माणसांची अचूक पारख होती. प्रामाणिक व ध्येयवादी सेवकांविषयी त्यांना आदर होता. पुढे नाशिक जिल्हा स्कूल बोर्डाचे सदस्य व नंतर अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. प्राथमिक शिक्षणाचा प्रसार व्हावा, शाळा व शिक्षणाचा दर्जा उंचावावा, शिक्षकांनी वक्तशीर व्हावे, आपले काम चोख करावे, याकडे अण्णासाहेबांनी लक्ष दिले.

स्कूल बोर्डाचे अध्यक्ष असताना सेवाभावी वृत्तीने प्रेरित होऊन निःस्वार्थीपणे समाजाची सेवा केली. कोणतेही मानधन व प्रवासभत्ता न घेता काम करणारे एकमेव पदाधिकारी अण्णासाहेब होते. ते ग्रामीण गैरसोयीच्या भागातील छोट्या-मोठ्या पाड्यांना, शाळांना दौरे काढून भेटी देत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही माहिती नसे, अशा शाळांची पाहणी त्यांनी आधीच केलेली असे. वशिलेबाजी व लाचलुचपतीची त्यांना चीड होती. सर्वांना न्याय व समानतेने वागवत असत.
राजर्षी शाहू महाराज व श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्या पाऊलखुणावर चालणाऱ्या अण्णासाहेबांना प्रतिकूल परिस्थितीची जाण असल्याने गरीब-दुबळ्यांच्या दुःखाची जाण होती. त्यामुळे अण्णासाहेब दर वर्षी एक-दोन गरजू, हुशार व होतकरू मुलांना मदत करून स्वतःच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे त्यांचा सांभाळ करत. म्हणूनच बहुजन समाजासाठी ते निष्ठेने निरलसपणे व निर्भयपणे प्रसंगी विरोधाला न जुमानता आयुष्यभर कार्य करत राहिले. समाजधुरीण, कार्यकर्ते, शिक्षक इत्यादी सर्वांनीच आदर्श व तत्त्वनिष्ठ व्हायला पाहिजे, असे त्यांना वाटे. कारण जीवनमूल्य ही शिकवून रुजत नाहीत; तर ती प्रत्यक्षात दिसावी लागतात, असे त्यांना वाटत होते. नव्या पिढीला संस्कारित करण्याची व निकोप बनविण्याची जबाबदारी सर्वांची असावी, असा त्यांचा आग्रह असे.
अण्णासाहेब मितभाषी असले, तरी समाजातील सर्व क्षेत्रात व स्तरावर त्यांचा मित्रपरिवार होता. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्वामुळे व विविध स्वरूपाच्या सामाजिक कामामुळे जनसामान्यांत त्यांना मान होता. ग्रामीण-शहरी भाग, सुशिक्षित-अशिक्षित वर्ग, शेतकरी, मजूर व उपेक्षित अशा सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोचले होते. काँग्रेस अध्यक्ष व जिल्ह्याचे नेते भाऊसाहेब हिरे यांनी अण्णासाहेबांना काँग्रेसमध्ये आणले. स्वातंत्र्योत्तर काळात बदल घडवून आणायचे असेल, तर अपेक्षित सामाजिक व आर्थिक परिवर्तन आणि समृद्धी उभारणी ही काँग्रेसद्वारेच होऊ शकते. या जाणिवेने त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. सामाजिक व शैक्षणिक कार्य, तसेच पक्षातील कामाचा सहभाग व प्रभाव यामुळे पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रचंड बहुमताने आमदार म्हणून निवडून आले. अभ्यासूवृत्ती, कायद्यांचा अभ्यास, शेतकरी, कामगार, मागासवर्गीयांचे कल्याण, राज्याच्या धोरणाचे विवेचन, विविध प्रश्‍नांच्या चर्चेतील योगदान यामुळे अण्णासाहेब चांगले संसदपटू व व्यासंगी आमदार म्हणून सर्वपरिचित झाले होते.

शेतकऱ्यांच्या मालाला (भाताला) योग्य भाव मिळावा, नाशिक शहरात पाणीपुरवठा व्हावा, नाशिक-त्र्यंबकेश्‍वर, नाशिक-गंगापूर रस्त्याचे डांबरीकरण हे व असे अनेक प्रश्‍न त्यांनी राजकारण व हितसंबंधांचा बाऊ न करता विधानसभेत प्रभावीपणे मांडले. एवढेच नव्हे, तर संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्‍न तीव्र बनल्यावर लोकमताची कदर करून आमदारकीचा राजीनामा देणारे एकमेव काँग्रेस सदस्य अण्णासाहेब होते. त्यांच्या या बाणेदार निर्णयाचे लोकांनी स्वागत व कौतुक केले. त्यांनी राजीनामा दिलेल्या जागेची पुन्हा निवडणूक जाहीर झाल्यावर अपक्ष म्हणून अण्णासाहेबांनी निवडणूक लढवली. कोणत्याही प्रकारे प्रचारसभा, दौरे, भेटी-गाठी, कोणतेही खर्च न करता ते प्रचंड बहुमताने निवडून आले. यावरून त्यांचे लोकमानसातील स्थान किती प्रभावी होते हेच लक्षात येते.

हेही वाचा: हलके फुलके क्षण अन् आनंदाचा ''बॅलन्स''

लोकशाहीत लोकमत प्रभावी असते. लोकभावना महत्त्वाच्या असतात. त्यांच्याशी एकनिष्ठ राहिले पाहिजे. बांधिलकी मानली पाहिजे. हे अण्णासाहेब विचाराने व आचरणानेही जगले. अशावेळी अण्णासाहेबांचे व्यक्तिमत्त्व पूर्ण बहरत असताना, त्यांच्या कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारत असतानाच, प्रामाणिक व सेवामय कार्याद्वारे लोकांच्या त्यांच्याविषयी आशा-आकांक्षा उंचावत असताना, त्या थोरतत्त्वनिष्ठ कर्मवीरांची २० ऑक्टोबर १९५६ ला अकाली प्राणज्योत मालवली. त्यांचे खासगी जीवन सुसंस्कृत, चरित्रसंपन्न आणि पारदर्शक होते. त्यांचा तो कोरडेपणा, करारी मुद्रा, पाणीदार डोळे, सुदृढ व आकर्षक व्यक्तिमत्त्व आणि त्यांना शोभेल असा पांढराशुभ्र पोशाख यामुळे त्यांच्याविषयी प्रत्येकाला दरारा व आदरयुक्त भीती वाटत असे. काटेकोरपणा, शिस्त व वक्तशीरपणा हा त्यांचा स्थायीभावच होता. अशा प्रकारे जीवनमूल्य मानणाऱ्या, जोपासणाऱ्या व आचारणाऱ्या या तत्त्वनिष्ठ, कर्मवीराला लाख लाख वंदना!!!
- (गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे
वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सिन्नर)

Web Title: Saptarang Marathi Article On Studious Jurist Annasaheb Murkute

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top