पंख सकारात्मकतेचे : ‘फिअरलेस स्टडी’ हाच यशस्वी शिक्षणाचा कानमंत्र

आजच्या शिक्षण पद्धतीचा आणि शिक्षणाच्या सध्याच्या जीवघेण्या स्पर्धेमध्ये काय परिस्थिती होते.
Study
StudySakalलेखक - डॉ. हेमंत ओस्तवाल
दहावी-बारावीला टॉपर येणारी मुले डॉक्टर-इंजिनिअर बनतात. त्यांच्यानंतरची रेग्युलर ग्रॅज्युएट होऊन यूपीएससी, एमपीएससी परीक्षा देऊन आयएएस, आयपीएस किंवा कुठलेही क्लास वन अधिकारी बनतात. त्याखालोखालची शिक्षक, प्रोफेसर, कारकून होत असतात, अगदीच काठावर पास होणारी कुठेतरी शिपाई, सेल्समन अशा जागांवर काम करीत असतात. नापास होणारे छानपैकी राजकारणामध्ये जाऊन ग्रामपंचायत सदस्य ते खासदार आणि त्यातली सगळ्यात खोडकर मंडळी कितीतरी वेळेला मंत्री वगैरेदेखील बनतात. शाळा-महाविद्यालयात शिक्षण तर सर्वांना सारखेच दिले जाते, मग असे का घडते?


आजच्या शिक्षण पद्धतीचा आणि शिक्षणाच्या सध्याच्या जीवघेण्या स्पर्धेमध्ये काय परिस्थिती होते. आजकालच्या मुला-मुलींची अक्षरशः दया येते. ही पिढी अतिशय मानसिक ताणतणावात असते. पालकांच्या अपेक्षादेखील खूपच जास्त असतात. यशासाठी विद्यार्थ्यांवर सर्व बाजूंनी दबाव असतो. आशा-अपेक्षा जास्त असतात, तेव्हाच अपेक्षाभंगाची तीव्रताही अधिक असते. निसर्गाचा नियमही असेच सांगतो, की ज्यावेळी आपण कुठल्याही गोष्टीची खूप जास्त अपेक्षा ठेवतो, त्यावेळी आपल्या मनामध्ये नैसर्गिकरीत्या तेवढीच भीतीही आपोआपच येत असते, वाटत असते. या सर्व आशा-अपेक्षांच्या जंजाळामध्ये आपण आपल्याच नव्या पिढीला लोटत असतो. यासाठी ‘भीतीमुक्त शिक्षण’ म्हणजेच ‘फिअरलेस स्टडी’ हा विषय समजून घ्यायला हवा. या सर्व विषयाच्या मुळाशी सकारात्मकता कशी आहे, सकारात्मकतेमुळेच फक्त फिअरलेस स्टडी, भीतीमुक्त शिक्षण कसे शक्य आहे हे समजून घ्यायचे आहे.

Study
चरित्राने घडते चरित्र...

लहान बाळांना अगदी नर्सरी, ज्युनिअर केजी, सीनिअर केजी म्हणजेच बालवाडीपासूनच आपण जवळपास सर्व नकारात्मकरीत्या अभ्यास करण्यास सांगत असतो. नकारात्मकरीत्या म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये ‘तू असं कर, तू तसं कर, तू असा अभ्यास कर, तू इतका अभ्यास कर आणि असं नाही केलं तर तसं’ अशी भीती घालत असतो. पुस्तकी ज्ञानाचा, त्यावर अवलंबून असणाऱ्या मार्कांचा बालकांवर अवास्तव दबाव आपण टाकत असतो. आपला पाल्य अगदी दहावी, बारावी, कॉलेजमध्ये कुठेही असला, तरी आपला धोशा हाच असतो. ‘अभ्यास कर, अभ्यास केला म्हणजे असे होईल, तसे होईल, चांगल्या ठिकाणी प्रवेश मिळेल, चांगल्या कोर्सला प्रवेश मिळेल. शेजारच्या निखिलला इतके मार्क मिळाले, पलीकडल्या संजनाला इतके मार्क मिळाले, आत्याच्या मुलाला असा प्रवेश मिळाला, मावशीच्या मुलाला असे झाले, मित्राच्या मुलाला इतके मार्क मिळाले...’ सारखे सारखे बालकांवर, विद्यार्थ्यांवर आपण वारंवार बिंबवीत असतो. एवढे करूनही मार्क कमी मिळालेच तर मात्र विचारूच नका.

पालक स्वतः तर प्रचंड ताणतणावात येतातच, बरोबरच आपल्या मुलाला, मुलीला तेवढेच ताणतणावात आणतात. त्यानंतर त्या घरामधील परिस्थिती अजूनच बिकट बनते. चांगले मार्क मिळविणे, सीईटी प्रवेश परीक्षा हा मुद्दा अत्यंत वॉर फ्रंटवर परंतु नकारात्मकरीत्या घेतला जातो. मग मुलांच्या शिक्षणासाठी आपले घर सोडून दुसऱ्या शहरांमध्येदेखील रूम भाड्याने घेतली जाते. कुटुंबातील सदस्यांची यामुळे ताटातूट होते. कोणी इकडे, कोणी तिकडे अशी विचित्र परिस्थिती निर्माण होते आणि कित्येक वेळा याचे सकारात्मक परिणाम होण्यापेक्षाही नकारात्मक जास्त होतात. मुले आपला सर्वोत्तम परफॉर्मन्स देऊ शकत नाहीत. अर्थातच त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स मिळू शकत नाहीत. कित्येक वेळा याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या स्वतःच्या तब्येतीवर तर होतोच होतो, त्या बरोबरीने घरातील इतर सदस्यांच्या तब्येतीवरदेखील परिणाम होतो. पुढच्या वेळी तब्येत खराब म्हणून परफॉर्मन्स अजूनच खराब हे चक्रच जणू सुरू होते. याउलट आपण आपल्या मुला-मुलींमध्ये फिअरलेस स्टडी म्हणजे भीतीविना शिक्षण या संकल्पनेतून अभ्यास करायला लावला तर? सगळ्यात पहिले, आपणास स्वतःलाच हे समजून घ्यावे लागेल, की प्रत्येक मुलाचा मेंदू वेगळ्या क्षमतेचा आहे. प्रत्येक मुलाचा आयक्यू हा वेगळा आहे. जरुरी नाही की प्रत्येक मुलगा हा अभ्यासात हुशार असेलच. याचा अर्थ तो मुलगा हुशार नाही असा कधीच होत नाही.

Study
दुनियादारी : काय प्लॅन आहे?

दहावी-बारावीला टॉपर येणारी मुले डॉक्टर-इंजिनिअर बनतात. त्यांच्यानंतरची मुले रेग्युलर ग्रॅज्युएट होऊन यूपीएससी, एमपीएससी परीक्षा देऊन आयएएस आयपीएस किंवा कुठलेही क्लास वन म्हणजेच प्रथम वर्ग अधिकारी होत असतात. त्याखालोखालची मुले शिक्षक, प्रोफेसर, कारकून होत असतात, अगदीच काठावर पास होणारी मुले ही कुठेतरी शिपाई, सेल्समन इत्यादी जागांवर काम करीत असतात आणि नापास होणारी मंडळी ही छानपैकी राजकारणामध्ये जाऊन ग्रामपंचायत सदस्य ते खासदार आणि त्यातली सगळ्यात खोडकर मंडळी कितीतरी वेळेला मंत्री वगैरेदेखील बनतात. अशा कुठल्याही पोस्टवर जातात आणि विद्यार्थिदशेमध्ये, अभ्यासामध्ये याच विद्यार्थ्यांच्या पुढे असणाऱ्या विद्यार्थ्यांवर ती राज करतात जी की अभ्यासामध्ये अगदीच ‘ढ’ असतात आणि कित्येक वेळेला हे सर्व बघून या टॉपर विद्यार्थ्यांना अक्षरशः फ्रस्ट्रेशन येत असते. असेही कित्येक वेळा आढळते, की शिक्षणात मागे असणारी मुले उद्योगधंद्यांमध्ये, कारखानदारीमध्ये खूप पुढे असतात. आयुष्यात यशस्वी असतात. अभ्यासात हुशार म्हणजेच यशस्वी असे कधीच नसते. वर्गामध्ये शिक्षक पन्नास-साठ विद्यार्थ्यांना एकच प्रकारचे शिक्षण देत असतात. क्लासेसमध्ये तीच परिस्थिती असते. मग असे असूनही का बरे एखादाच विद्यार्थी पहिला येतो, दुसरा येतो, दहावा येतो...आणि शेवटी येतो? असे का? त्याचे कारण अगदी सरळ स्वच्छ आहे. वर सांगितल्याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याच्या मेंदूची क्षमता ही वेगवेगळी आहे. हे समजून घेण्यासाठी आपण एक छोटेसे उदाहरण बघू या.

शेतकरी जेव्हा शेतात कुठलेही पीक लावत असतो, झाडे लावत असतो, तेव्हा सगळी बीजे सारखीच असतात. सर्व झाडांना, पिकाला शेतकरी सर्व प्रकारचे खतपाणी सारखे देत असतो. कुठल्याही गोष्टीमध्ये फरक नसतो. तरीदेखील प्रत्येक झाडाला सारखीच फळे येतात का? पिकाला, प्रत्येक कणसाला सारखेच दाणे येतात का? नाही ना! हाच निसर्गाचा नियम मानवालादेखील लागू असतोच ना! त्याच न्यायाने गरज असते ती आपला मुलगा-मुलगी कुठल्या विषयांमध्ये हुशार आहे, त्याची कुठल्या विषयामध्ये रुची आहे हे समजून घेण्याची. आपण हे डोळसपणे स्वीकारले, तर आपण बरोबर आपल्या मुलांना, मुलींना त्याच प्रकारच्या शिक्षणामध्ये टाकतो आणि त्यातच मुला-मुलींचेही आणि घरच्यांचेही कल्याण चांगले होत असते. अगदी त्यांची आवडनिवड बघून टाकल्यानंतरही जरुरी नाही की मुले त्यात १०० टक्के यश मिळवतीलच. कारण एवढे करूनही कधी-कधी मुले अपयशी ठरतात. कित्येक वेळा यापाठी आपल्या असलेल्या अपेक्षांचा रेटादेखील कारणीभूत असतो. जसजसा अपेक्षांचा रेटा वाढत असतो, तसतशी नकारात्मकतादेखील आपोआपच वाढत असते.

याउलट आपण आपल्या मुला-मुलींना एका वेगळ्याच पद्धतीने घडविले, शिकविले तर नक्कीच याचा परिणाम वेगळा होत असतो. कसे हे आपण आता समजावून घेऊ या. आपण सुरवातीपासूनच मुला-मुलींच्या मनावर बिंबवायचे, की कुठल्याही प्रकारच्या मार्कांचे किंवा इतर कुठलीही चिंता न करता अभ्यास करावयाचा आहे. अभ्यास करताना फक्त तुमच्यातील १०० टक्के तुम्ही द्यायला शिका. एकदा तुम्ही १०० टक्के दिले की मग निकाल काहीही येऊ देत, त्याची अजिबात चिंता करायची नाही. अगदी नापास झालात तरीही घाबरायचे काम नाही. या प्रकारे या गोष्टी पाल्यांच्या मनावर जर आपण यशस्वीरीत्या बिंबवू शकलो तर आपणास आश्चर्य वाटेल इतके चांगले निकाल, कुठल्याही ताणतणावविरहित पाल्यांचे लागत असतात.
मी स्वतः माझ्या दोन्ही लेकींबाबत अगदी असेच केले आहे. मी स्वतः याहीपुढे जाऊन अगदी इथपर्यंत सांगायचो, की बेटा, तुम्ही नापास झालात तर आपण तो दिवस खरोखर मनापासून पार्टी करून साजरा करू या. मात्र माझ्या दोन्ही लेकींनी मला पार्टी करण्याची संधी दिली नाही! याउलट मोठी डॉक्टर पूजा ही मुंबईतील नामवंत केईएम हॉस्पिटलमधून स्त्रीरोगतज्ज्ञ झाली आहे, तर दुसरी शलाका फ्रेंच भाषेमध्ये, फ्रेंच युनिव्हर्सिटीमधून पीएच.डी. झाली आहे. दोन्ही अतिशय चांगल्या पद्धतीने शिकून, त्यांच्या आयुष्यामध्ये अत्यंत निर्भयपणे सकारात्मकतेने स्थिरावून आपले आयुष्य आनंदाने जगत आहेत. याचे कारण म्हणजेच भीतीमुक्त शिक्षण.

Study
सोनेरी स्वप्नं : डोळ्यांत दाटलेलं आभाळ

शलाका आणि पूजा मला नेहमी त्यांच्या मैत्रिणींच्या घरचे उदाहरण द्यायच्या. त्यांना कसे प्रेशराइज केले जायचे, एकेक एक मार्कावरून त्यांना धारेवर धरले जायचे. जसजसा निकाल लागायची वेळ जवळ यायची, तसतशी पूजा आणि शलाकाच्या मैत्रिणींच्या आणि त्यांच्या पालकांच्या मनामधली घालमेल वाढायची. त्यांचे टेन्शन वाढायचे, निव्वळ त्यांचाच नव्हे तर त्यांच्या सर्व घरच्यांचे टेन्शन वाढायचे. अगदी याउलट पूजा, शलाका आणि आम्ही सर्व अगदी रिलॅक्स, तणावमुक्त आनंदात असायचो. कारण आम्हाला खात्री असायची की दोघींनीही आपली शंभर टक्के मेहनत केलेली आहे, त्यांनी स्वतःवर न्याय केलेला आहे, मग टेन्शन कशासाठी?
याच कारणासाठी मला ‘३ इडियट्स’ हा सिनेमा आजही खूप आवडतो. रेंचो आणि चतुर यांच्यामधील शिक्षण घेण्याची पद्धत बघितली तर आपल्याला सर्व काही लक्षात येते. रेंचो शिक्षणातून आनंद घ्यायला सांगतोय, आपल्याला जे आवडते त्या विषयाचे शिक्षण घ्यायला सांगतोय आणि त्यानंतर ‘सक्सेस तो झक मार के तेरे पिछे आयेगी’ असे सांगतोय. हे नक्कीच शंभर टक्के सत्य आहे. जर आपण आपल्या आवडत्या विषयात, ज्यात आपल्याला खरोखर मनापासून आनंद मिळतो, त्या विषयात शिक्षण घेतले तर पुढे आपण जेव्हा आयुष्यात त्याच विषयांमध्ये काम करीत असतो त्या वेळी ते काम काम राहत नाही, त्या प्रत्येक गोष्टीतून, प्रत्येक कामातून आपल्याला आनंद मिळत असतो. अर्थातच पैसा आणि बरोबर यशही मिळत असते आणि मग जगणे नुसतेच जगणे न राहता एक आनंदोत्सव होऊन जातो. आपण आपल्या पाल्याला भीतीमुक्त शिक्षण देऊन आयुष्यभर सुखी करायचे, सकारात्मक करायचे की आयुष्यभर ताणतणावात ठेवून नकारात्मक करायचे हे आपल्याला ठरवायचे आहे. मला खात्री आहे, आपण सर्व नक्कीच सकारात्मकतेची कास धरून पाल्यांना ‘भीतीमुक्त शिक्षण, फिअरलेस स्टडी’ द्याल.
(लेखक सुयश या प्रथितयश हॉस्पिटलचे संचालक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com