रेषा...पाण्यावरच्या, व्यवहारातल्या! (हेमंत जोशी)

Saptarang Marathi features
Saptarang Marathi features

आजच्या भागातही रेषेचे आणखी काही दृश्‍यानुभव मांडणार आहे. कदाचित ते तुम्हालाही जाणवले असतील! एका तळ्याकाठी लहान मुलं खेळत होती, त्यांचा खेळ होता आजूबाजूच्या दगडांमधले चपटे दगड शोधायचे आणि ते त्या संथ पाण्यावर आडव्या रेषेत मारायचे. पाण्याला स्पर्श करत जास्तीत जास्त टप्पे पाण्यावर मिळवायचे! त्या मुलांचा हा खेळ पाहून मला माझ्या लहानपणची आठवण झाली. मात्र, आज तो अनुभव वेगळा होता. दगडाच्या स्पर्शानं पाण्याच्या पृष्ठभागावर छान तरंग, रेषांचे वक्राकार फेर उमटत होते आणि विरून जात होते. दगड आणि पाणी या दोहोंच्या स्पर्शातून घडणारा हा रेषाविभ्रम... या रेषांना काय म्हणावं...? रेषातरंग! 

हाच अनुभव संथ जलाशयात पावसाचे थेंब सतत पडत असतानासुद्धा येतो. क्षणाक्षणाला उमटणारे रेषातरंग... वरच्या दोन्ही दृश्‍यांत अवकाश जलरूप आणि एकात साधन दगड, तर दुसऱ्यात पाण्याचेच थेंब...तरीही दृश्‍यानुभव सारखाच! 
प्रसिद्ध 'झेन गार्डन'मध्ये हेच तरंग वाळूत गोठवण्याची किमया वालुकाशिल्प-कलाकारांनी केली आहे.

पाण्यावर दगडाच्या स्पर्शानं तरंग उमटण्याचा क्षण जर कॅमेऱ्यानं टिपला तर जी स्थिर प्रतिमा मिळेल, ती वाळूच्या माध्यमातून वालुकाशिल्पात उतरवण्यात आली आहे. कलाकारांच्या/शिल्पकारांच्या दृश्‍यसृष्टीत साठलेले अनुभव असे दृश्‍यसंकल्पनेचे सुंदर प्रत्यय घडवतात. 

कित्येकदा प्रत्यक्षात रेषेचं अस्तित्व नसूनसुद्धा तिचा आभास मात्र होत असतो. उंच आकाशात पक्ष्यांचा थवा उडताना आपण बऱ्याचदा पाहतो. उडताना त्यातले काही पक्षी त्यांच्या जागा बदलत राहतात. त्यांच्या या हालचालींमुळं कधी सरळ, कधी गोलाकार, तर कधी त्रिकोणाकृती रेषेचा आभास होत राहतो. पक्ष्यांच्या या विहरण्यातून येणारा अनुभव विलोभनीय! 

मग वा. रा. कांत यांच्यासारख्या प्रतिभासंपन्न कवीच्या शब्दांत ही माळ अंबरात अलगद गुंफली जाते... सांडलेल्या एखाद्या खाद्यपदार्थाभोवती काही क्षणात मुंग्या घुटमळायला लागतात...पाहता पाहता हळू हळू कुठून तरी शेकडो मुंग्या रांगेनं एकापाठोपाठ यायला लागतात...त्यांची विशिष्ट गती आणि हालचाल 
यामुळं सतत हलत राहणाऱ्या रेषेचा एक वेगळा दृश्‍यानुभव पाहायला मिळतो. ती मुंग्यांची रेष त्या खाद्यपदार्थाच्या भोवती एक विशिष्ट आकार तयार करते आणि काही वेळानं पुन्हा रेषेत विलीन होऊन जाते. हळूहळू ती रेषही अदृश्‍य होऊन जाते. जणू एखाद्या नृत्यपथकानं रंगमंचकावर येत बहारदार सादरीकरण करावं आणि एकेक करत रंगमंच रिकामा करून जावा, इतकं सुंदर! 

अनेकदा प्रत्यक्षात रेषेचं अस्तित्व असूनही आपण ती नजरेआड करतो, तेही आपल्या रोजच्या व्यवहारात. आपल्या आयुष्यात, दैनंदिन घडामोडींत अनेक वस्तूंचा उपयोग होत असतो, ज्यात रेषेचं अस्तित्व असतं आणि तिला अनन्यसाधारण महत्त्व असतं. इथं रेष तीच असली तरी रेषेची गुणात्मक मूल्यं बदलत असतात. 

आपण आपल्या घरातून बाहेर पडतो...डोक्‍यात अनेक कामं असतात...गाडीत बसता बसता कामांची उजळणी करतो...गाडी सुरू होताच पेट्रोलचा काटा पेट्रोल भरण्याची आठवण करून देतो... 

ब्रेक दाबून सिग्नलजवळ गाडी थांबवतो...समोर झेब्रा क्रॉसिंग वरून माणसं हळूहळू दुसऱ्या फुटपाथवर जातात...पुन्हा कामांची उजळणी.....गाडीच्या डिकीतले काल राहून गेलेले गठ्ठे रद्दीवाल्याकडं द्यायचे आहेत...टेलरकडं शर्ट शिवायला टाकायचे आहेत...संध्याकाळी डाएटिशिअनची अपॉइंटमेंट आहे... हिरवा सिग्नल मिळतो. आपण सहजच घड्याळात पाहतो...लक्षात येतं की गाडीचा वेग थोडा वाढवायला हवाय...गाडीचा वेग 60 च्या पुढं सरकतो. पेट्रोल पंपावर गाड्यांची लाईन...आपला

नंबर येतो ः ''साहेब, किती भरू?'' आपण म्हणतो ः ''10 लिटर'' 
समोरच्या मशिनवर आपण एअरप्रेशरही तपासून घेतो. 

ऑफिस सुटल्यानंतर संध्याकाळी डाएटिशिअनकडं पोचतो...समोर भिंतीवर मोठा तापमापक 20 दाखवतोय. बाहेर खूप उकडत होतं. वजनाच्या काट्यावर उभे राहतो... 
''वा...चांगला वेटकंट्रोल आहे'' 

डाएटिशिअन म्हणते ः ''कूल'' 

आता आपण थेट रद्दीवाल्याकडं. गठ्ठे काट्यावर ठेवत.''साहेब, आठ किलो'' 
चला, कामं तर सुरळीत पार पडताहेत... टेलरकडचंही काम उरकून घेऊ या! 

मेजरटेप पोटाभोवती आवळत टेलर विचारतो ः ''किती ठेवू साहेब...? डाएट चांगलाच लागू पडलेला दिसतोय. मागच्यापेक्षा चक्क एका इंचाचा फरक!'' 

घरी पोचताच आपण सोफ्यावर पसरतो. समोर लाकडाच्या कापलेल्या ओंडक्‍याच्या टी पॉयवर मुलांच्या 

अभ्यासाचा पसारा...कंपासबॉक्‍समधलं कोनमापक, पट्टी, पेन्सिली, वह्या...''चहा दे'' असं बायकोला सांगत आपण पसारा आवरायला लागतो. 

आता गंमत पाहा ः सहजपणे आपण या व्यवहारचक्रात रेषेच्या अनेक संदर्भांना स्पर्श करत जातो. 

नकळतपणे रेषेचा दृश्‍यानुभव घेत जातो. मात्र, रेषेच्या अस्तित्वाची आपली जाणीव त्या वेळी आपल्या नजरेआड असते...!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com