घरच्या स्त्रीशक्तीचा आदर करा (संदीप वासलेकर)

संदीप वासलेकर
रविवार, 11 मार्च 2018

आपली आई, आत्या, मैत्रिणी इत्यादींनी आपल्याला घडवण्यासाठी जे काही योगदान दिलं असेल, त्याचा आदर करा. आपण सगळ्यांनी वैयक्तिक जीवनातल्या व राष्ट्रीय जीवनातल्या महिलांविषयी आदरभाव ठेवला तर भारत एक सुसंस्कृत देश म्हणून नक्कीच ओळखला जाईल. 

दरवर्षी ता. आठ मार्चला 'आंतरराष्ट्रीय महिलादिन' साजरा केला जातो, म्हणून मी या सदरात मार्च महिन्यातल्या दोन लेखांपैकी एका लेखात एखाद्या प्रतिभाशाली महिलेची ओळख करून देतो. या वेळी मात्र कला, विज्ञान, राजकारण या क्षेत्रांत यश मिळवलेल्या महिलांपेक्षा स्वत:च्या जीवनातल्या महिलांच्या योगदानाची नोंद घ्यावी असं वाटलं. 

आपली आई, आत्या, मैत्रिणी इत्यादींनी आपल्याला घडवण्यासाठी जे काही योगदान दिलं असेल, त्याचा आदर करा. आपण सगळ्यांनी वैयक्तिक जीवनातल्या व राष्ट्रीय जीवनातल्या महिलांविषयी आदरभाव ठेवला तर भारत एक सुसंस्कृत देश म्हणून नक्कीच ओळखला जाईल. 

दरवर्षी ता. आठ मार्चला 'आंतरराष्ट्रीय महिलादिन' साजरा केला जातो, म्हणून मी या सदरात मार्च महिन्यातल्या दोन लेखांपैकी एका लेखात एखाद्या प्रतिभाशाली महिलेची ओळख करून देतो. या वेळी मात्र कला, विज्ञान, राजकारण या क्षेत्रांत यश मिळवलेल्या महिलांपेक्षा स्वत:च्या जीवनातल्या महिलांच्या योगदानाची नोंद घ्यावी असं वाटलं. 

प्रत्येकाच्या आयुष्यातली सगळ्यात प्रमुख महिला म्हणजे आई. मी सहा वर्षांचा असताना माझ्या आईचं निधन झालं. माझं व माझी बहीण अर्चना हिचं संगोपन आजीनं केलं. आम्ही आजीलाच 'आई' म्हणत असू. वडिलांनी त्या वेळी लहान वय असूनही दुसरा विवाह केला नाही. त्यामुळं त्यांची आई हीच आम्हा सगळ्यांची आई झाली आणि तिनं लावलेल्या शिस्तीमुळं आयुष्याचा पाया भक्कम झाला. 

आमच्या लहानपणी 'आई' या कल्पनेसंबंधी सामाजिक चर्चा होत असे. 'श्‍यामची आई' हे सानेगुरुजींचं पुस्तक सर्वजण वाचत असू. जिजामातांनी बालपणी शिवरायांवर कसे संस्कार केले, याची व्याख्यानं शिवजयंतीच्या दिवशी आम्ही ऐकत असू. 

ज्यांना आईचे संस्कार महत्त्वाचे वाटतात, ते नेहमी स्वत:च्या व इतरांच्या मातांना आदरपूर्वक वागवतात व स्वत: कितीही मोठे झाले तरी आईला विसरत नाहीत. ज्ञानेश्‍वर मुळे हे परराष्ट्र मंत्रालयात सचिव आहेत. त्यांनी अनेक देशांत भारताचे राजदूत म्हणून काम केलेलं आहे. लेखक म्हणूनही त्यांचा परिचय आहे. एकदा आम्ही दोघं साहित्यसंमेलनातल्या एका कार्यक्रमात सहभागी होतो. सुमारे पाच हजार श्रोते समोर होते. त्या गर्दीतून मुळे यांनी त्यांच्या आईला व्यासपीठावर बोलावलं. त्याच क्षणी नेमकी वीज गेली; पण सर्व लोक स्तब्ध होते. मुळे यांनी मोठ्या आवाजात आपल्या आईची ओळख करून दिली. मला त्यांच्याबद्दल अत्यंत आदर वाटला; पण दु:खही झालं...कारण, माझी आई, म्हणजे आजी आणि जन्मदात्री आई, या दोघींपैकी कुणीही व्यासपीठावर बोलावण्यासाठी हयात नव्हत्या. 

मी सातवी-आठवीत गेल्यावर आत्यामुळं माझी दृष्टी अधिक व्यापक झाली. आम्हाला दिवाळीत आत्या फटाके आणून द्यायची. एके वर्षी फटाक्‍यांऐवजी तिनं मला प्रा. नरेंद्र ताम्हाणे यांचं 'हिमफुलांच्या देशात' हे पुस्तक दिलं. त्यात अमेरिकेचं वर्णन होतं. ते पुस्तक मी चार-पाच वेळा वाचलं. मग मला तिनं आचार्य अत्रे यांचं 'केल्याने देशाटन' व पु. ल. देशपांडे यांची 'अपूर्वाई' व 'पूर्वरंग' ही पुस्तकं आणून दिली. या पुस्तकांतून माझा 'जगप्रवास' झाला व माझा वैश्विक दृष्टिकोन तयार होण्यास सुरवात झाली. जर ही पुस्तकं देण्याऐवजी आत्या फक्त फटाकेच आणत राहिली असती, तर मी आज कदाचित कुठंतरी कारकून अथवा त्याहून थोड्याशा मोठ्या पदावर एखादा अधिकारी झालो असतो. 

मी कॉलेजमध्ये असताना नीतू परांजपे नावाच्या एका मुलीशी माझी मैत्री झाली. ती मला माझ्या आंतरराष्ट्रीय चळवळी करण्यासाठी प्रोत्साहन देत असे. माझी बीकॉमची अंतिम परीक्षा जवळ आली होती. 12 दिवस बाकी होते. वर्षभर उचापती करून अभ्यास शेवटच्या 10-15 दिवसांत करायचा हे माझं धोरण होतं, म्हणजे परीक्षेच्या 12 दिवस आधी माझा अभ्यास झालेला नव्हता. 

त्या दिवशी मला जे. आर. डी. टाटांकडून एक अनपेक्षित पत्र आलं. 

'आंतरराष्ट्रीय आर्थिक घडामोडींविषयीच्या एका चर्चासत्रात भारतातून 35 वर्षांच्या आतला एक प्रतिनिधी पाठवायचा आहे व ज्यांची इच्छा असेल त्यांनी एक शोधनिबंध लिहून 10 दिवसांच्या आत सुपूर्द करावा,' असं माहितीवजा आमंत्रण त्या पत्रात होतं. 

काय करावं असा विचार मी दिवसभर करत होतो. संध्याकाळी अचानक नीतू आली. माझ्या डोक्‍यात विचारांचं जे काहूर माजलं होतं, ते मी तिला सांगितलं. 

ती म्हणाली : ''यात विचार करण्यासारखं काहीच नाही. बीकॉमच्या परीक्षेत प्रथम श्रेणी मिळवून कोणत्या तरी बॅंकेत तू अधिकारी होशील. टाटांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तू दहा दिवसांत निबंध लिहिलास तर तुझं आयुष्य तर बदलेलच; शिवाय जगात बदल घडवून आणण्यासाठी तू हातभारही लावशील.'' 

त्या दोन वाक्‍यांनी माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. सुमारे दीड वर्षापूर्वी युनोचं सुरक्षा मंडळ - म्हणजे जगातील राजकीय निर्णय घ्यायची सर्वात उच्च बैठक - इथं मला तेव्हाचे महासचिव बान की मून यांच्या बरोबरीनं सुरक्षा मंडळाचा काही बाबतींत येत्या काही वर्षांतला अजेंडा ठरवण्यासाठी बोलावण्यात आलं. तिथं 69 सरकारांचे राजदूत विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते व सर्व 69 सरकारांनी माझ्या योजनांना सकारात्मक प्रतिसाद दिला. हा जगातला एक ऐतिहासिक क्षण होता. हा क्षण माझ्या आयुष्यात आला तो नीतूनं सांगितलेल्या त्या दोन वाक्‍यामुळंच. शिवाय, सध्या मी महिन्यातून 15-20 दिवस भारताबाहेर असतो. अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख भेटतात व माझ्या सूचनांप्रमाणे धोरणात कधी कधी बदल करतात, हेही घडतं ते त्या दोन वाक्‍यांमुळं. 

वास्तविक माझी आई, आत्या, मुळे यांची आई यांपैकी कुणाचंही शालेय शिक्षणापलीकडं काही विशेष शिक्षण झालेलं नव्हतं. नीतू पदवीधर होती; पण त्या दिवशी तिचं वय होतं केवळ बावीस. म्हणजे फार काही ज्ञान अथवा अनुभव तिच्याही गाठीला नव्हता. असं असताना महिला एखाद्याचं जीवन कसं घडवू शकतात? तर महिलांची मानसिकता ही संवर्धनाची असते. बहुतांश महिला दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून पाहत असतात. सर्वप्रथम आपल्या घरातल्या व्यक्तींचा त्या विचार करतात. संधी मिळेल तेव्हा समाजाचा विचार करतात. ज्या पंचायतीमध्ये महिलांची सत्ता आहे व जर महिला पंच केवळ एखाद्या राजकीय नेत्याची पत्नी म्हणून नव्हे, तर स्वत:च्या कर्तृत्वामुळं निवडून आल्या असतील तर अशा पंचायतीमध्ये पाणीपुरवठा, अंगणवाडी, शाळा अशा सामाजिक उपयोग असलेल्या योजनांना प्राधान्य दिलं जातं. 'मनुष्यविकास निर्देशांक' तसंच 'भ्रष्टाचारमुक्त देश निर्देशांक' अशा निर्देशांकांत ज्या देशात महिलांना राजकारणात प्राधान्य आहे, ते देश वरचा क्रमांक अनेक वर्षं टिकवून धरताना दिसतात. 

भारतीय समाजाच्या पायाभरणीसाठी अनेक महिलांनी प्रयत्न केले आहेत; पण झाशीची राणी व सावित्रीबाई फुले यांचा अपवाद सोडला तर आपल्याला इतर जणींची फारशी आठवण येत नाही. 

ईस्ट इंडिया कंपनीच्या मनात दरारा निर्माण करणाऱ्या कित्तूर चिन्नम्मा, युनोच्या आमसभेच्या प्रथम अध्यक्षा विजयालक्ष्मी पंडित, महात्मा गांधींच्या लढ्यातल्या अग्रगण्य नेत्या कमलादेवी चट्टोपाध्याय, प्रशासक व कवयित्री सरोजिनी नायडू, भारतीय राज्यघटनेच्या निर्मितिप्रक्रियेत असलेल्या सुचेता कृपलानी, रसायनशास्त्रज्ञ असीमा चटर्जी यांच्या कार्यापासून स्फूर्ती घेण्यासाठी आपण किती अभ्यास व चर्चा करतो? 

विमानाचा शोध सन 1905 मध्ये लागला व सन 1936 मध्ये सरला ठकराल या वैमानिक झाल्या. आता सगळ्या भारतीय विमान कंपन्यांमध्ये महिला पायलट आहेत. 

अनेक शतकांपूर्वी महिलांनी भारतात सुराज्य प्रस्थापित करण्यासाठी हातभार लावला होता. दुसऱ्या चंद्रगुप्त राजाचा कारभार कन्या प्रभावती पाहत असे. सातवाहनयुगात राणी नयनिका केवळ राज्यकर्ती नव्हती तर सरसेनापतीदेखील होती. 12 व्या शतकात मेवाडची राणी कुमारदेवीदेखील सेनापती होती, तर सन 1000 च्या आसपास दीद्दा या राणीनं काश्‍मीरवर 22 वर्षं राज्य केलं. 

माझं युवकांना आवाहन आहे, की हा नेता मोठा होता की तो नेता मोठा होता, असल्या व्यर्थ चर्चांकडं दुर्लक्ष करा व आपलं राष्ट्र घडवण्यासाठी पुरुष व महिलानेत्यांनी अनेक शतकं प्रयत्न केले होते, हे लक्षात ठेवा. काहींचे विचार तुम्हाला पटतील, काहींचे विचार पटणार नाहीत; पण राष्ट्रबांधणी करणाऱ्या सर्वच नेत्यांचा आदर करा. आपण सहसा पुरुषनेत्यांचा अभ्यास करतो, मात्र राणी नयनिका, राणी दीद्दा, आधुनिक काळातल्या कमलादेवी चट्टोपाध्याय व सरोजिनी नायडू या सगळ्यांपासून प्रेरणा घ्या. 

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली आई, आत्या, मैत्रिणी यांनी आपल्याला घडवण्यासाठी जे काही योगदान दिलं असेल, त्याचा आदर करा. आपण सगळ्यांनी वैयक्तिक जीवनातल्या व राष्ट्रीय जीवनातल्या महिलांविषयी आदरभाव ठेवला तर भारत एक सुसंस्कृत देश म्हणून नक्कीच ओळखला जाईल. 

'सप्तरंग'मधील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: Saptarang Marathi features Sundeep Waslekar marathi articles