शिदोरीची पिशवी परत मिळालीच नाही... (प्रभावती सागडे)

शिदोरीची पिशवी परत मिळालीच नाही... (प्रभावती सागडे)

कुणी एखादी महिला लहान मुलांना घेऊन प्रवासात दिसली, की मला हमखास 45 वर्षांपूर्वीची ती घटना आठवते. दिवाळी नुकतीच झाली होती. माझे यजमान मला म्हणाले : ""तुला माहेरी जायचं असेल तर जा आठ-पंधरा दिवस.'' माझं माहेर नगर जिल्ह्यात कान्हेगाव इथं होतं. त्यामुळं सकाळी पुणे-दौंड पॅसेंजरनं दौंडपर्यंत जाऊन दौंडला गाडी बदलून मनमाड पॅसेंजरनं कान्हेगाव इथं उतरावं लागत असे. त्या वेळी माझी दोन्ही मुलं लहान होती. थोरली मुलगी रोहिणी साडेतीन वर्षांची व धाकटा मुलगा संदीप दीड वर्षाचा होता. त्यामुळं यजमान मला दौंडपर्यंत सोडायला आले. मनमाड पॅसेंजरमध्ये त्यांनी आम्हाला बसवून दिलं व ते परत पुण्याला गेले. 

पुढं कान्हेगावला माझे वडील मला नेण्यासाठी स्टेशनवर टांगा घेऊन आले. तेव्हा कंपनीचे (साखर कारखाना) टांगे पाहुण्यांना स्टेशनवरून आणण्याचं व पुन्हा सोडण्याचं काम करत असत. 

आम्ही 15 दिवस माहेरी आनंदात काढले. मुलांनाही आजी, आजोबा, मामा, मावशी यांच्यात करमून गेलं. त्यानंतर माझे धाकटे दीर मला नेण्यासाठी कान्हेगावला आले. दोन दिवसांनी आम्हा सगळ्यांना वडिलांनी सकाळी सहाच्या मनमाड-दौंड पॅसेंजरमध्ये बसवून दिलं. झुकझुक गाडीत बसल्यामुळं मुलं खूप खूष होती. त्यातच त्या दिवशी कार्तिकी एकादशी असल्यानं प्रत्येक स्टेशनवर आळंदीचे वारकरी डब्यात चढत होते. डब्यात वारकऱ्यांची खूप गर्दी झाली होती. टाळ-चिपळ्या वाजवून चाललेलं त्यांचं भजन ऐकण्यात मुलांना मजा वाटत होती. कान्हेगावहून दौंडपर्यंत येण्यासाठी पाच-साडेपाच तास लागत असत. त्यानुसार पुढं दौंड-पुणे पॅसेंजर साडेअकरा ते 12 च्या सुमाराला दौंडहून पुण्याकडं निघत असे. 

वारकऱ्यांच्या भजनाच्या नादात दौंड कधी आलं ते कळलंच नाही. दौंडला आल्यावर गडबडीनं उतरण्याची सगळ्यांची घाई सुरू झाली. आमच्या जवळ दोन पिशव्या होत्या. भाऊजींनी एक पिशवी व दीड वर्षाच्या संदीपला कडेवर घेतलं; पण रोहिणीला हाताशी धरून व एक पिशवी घेऊन मला उतरणं शक्‍य होईना. ते पाहून एक माणूसम्हणाला : ""ताई, माझ्याजवळ दे मुलीला. मी तिला कडेवर घेऊन उतरतो व तू ही पिशवी घेऊन उतर.'' 

""बरं'' म्हणून मी रोहिणीला लगेच त्याच्याजवळ दिलं. आम्ही गर्दीतून कसेबसे दारापर्यंत आलो, तोच माझ्या डोक्‍यात विचार चमकला, की रोहिणीला आपण त्या अनोळखी माणसाकडं दिलं आहे खरं...पण गर्दीत त्याची आणि आपली चुकामूक झाली तर अन्‌ अनोळखी माणूस पाहून ती रडायला लागली तर? किंवा आणखी काही झालं तर? त्या क्षणी मी जोरात ओरडून त्या माणसाला थांबवलं व त्याच्याजवळून रोहिणीला माझ्याकडं घेतलं व त्याऐवजी एक पिशवी त्याच्याकडं दिली. 

तो आमच्या पुढं असल्यानं तो अगोदर खाली उतरला. नंतर आम्ही उतरलो. आम्हाला वाटलं, तो पिशवी घेऊन खाली आमची वाट पाहत थांबला असेल; पण नंतर तो पुन्हा दिसलाच नाही. मला वाटलं, पुणे-पॅसेंजर लगेच सुटणार असल्यानं तो घाईत गेला असेल; त्यामुळं आम्हीही जास्त न थांबता दौंड-पुणे पॅसेंजरकडं गेलो व तो कुठं गर्दीत दिसतोय का हे पाहत आत चढलो. तो कुठं दिसतो का, हे आम्ही प्रत्येक स्टेशन आल्यावर खिडकीतून बाहेर पाहत होतो. कारण, त्या पिशवीत आईनं दिलेले दिवाळीचे पदार्थ व पोळी-भाजीची शिदोरी दौंडमध्ये खाण्यासाठी दिलेली होती. पोरं आणि आम्ही भुकेजलेले होतो; पण पुणं येईपर्यंत तो आम्हाला दिसलाच नाही. भाऊजींनी त्याला शोधलं; पण तो सापडला नाही. आता हे सगळं चुकामुकीमुळं घडलं की कसं, हे मात्र माझ्यासाठी आजही गूढच आहे. ऐनवेळी मुलीला त्या माणसाकडून माझ्याकडं घेण्याची बुद्धी मला झाली, हे खूपच चांगलं झालं म्हणायचं. 

प्रवासात आईनं दिलेल्या शिदोरीनं भूक भागवता आली नाही; पण भ्रमंतीतली ही अनुभवाची शिदोरी मात्र आम्हाला मिळाली. त्या शिदोरीनं आमची शहाणपणाची भूक भागवली! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com