‘सुवर्ण’सिंधू (संजय घारपुरे)

संजय घारपुरे sanjay.gharpure@esakal.com
रविवार, 1 सप्टेंबर 2019

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधूनं अजिंक्यपद मिळवलं. सिंधूनं केलेली ही कामगिरी क्रीडा स्तरावर महत्त्वाची आहेच; पण इतर अनेक प्रकारांत खेळणारे खेळाडू, पालक, भावी खेळाडू या सगळ्यांसाठीही तिची कहाणी प्रेरणादायी आहे. ही कहाणी अखंड धडपड करत राहण्याची आहे, संकटांवर मात करण्याची आहे, योग्य प्रकारे आपलं धोरण बदलण्याची आहे आणि ठोस उद्दिष्टांसाठी प्रसंगी स्वतःच्या वैयक्तिक आवडीनिवडीही बाजूला ठेवण्याची आहे. या सगळ्या ‘सोनेरी’ कहाणीचा वेध.

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधूनं अजिंक्यपद मिळवलं. सिंधूनं केलेली ही कामगिरी क्रीडा स्तरावर महत्त्वाची आहेच; पण इतर अनेक प्रकारांत खेळणारे खेळाडू, पालक, भावी खेळाडू या सगळ्यांसाठीही तिची कहाणी प्रेरणादायी आहे. ही कहाणी अखंड धडपड करत राहण्याची आहे, संकटांवर मात करण्याची आहे, योग्य प्रकारे आपलं धोरण बदलण्याची आहे आणि ठोस उद्दिष्टांसाठी प्रसंगी स्वतःच्या वैयक्तिक आवडीनिवडीही बाजूला ठेवण्याची आहे. या सगळ्या ‘सोनेरी’ कहाणीचा वेध.

सिंधू जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत विजेती झाली, त्यात खरं तर आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. तिनं ही कामगिरी अवघ्या चोविसाव्या वर्षी केली, हेही तसं कमीच धक्कादायक. तिनं जागतिक स्पर्धेत अठराव्या; तसंच एकोणिसाव्या वर्षी उपांत्य फेरी गाठली. एकविसाव्या वर्षी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आणि बाविसाव्या वर्षी जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत. गेल्या वर्षी तिनं या कामगिरीची पुनरावृत्ती केली.

ही अविस्मरणीय कामगिरी पाहिली, तर सिंधू जगज्जेतेपदाचं शिखर कधी सर करणार एवढंच औत्सुक्य होतं. ते यंदा घडलं, राष्ट्रीय क्रीडा दिनापूर्वी काही दिवस. तिनं हे साध्य केलं जागतिक स्पर्धेत तिसऱ्यांदा अंतिम फेरी खेळताना. हे शिखर सर करताना त्या कोर्टवर तिचीच हुकमत असल्याचं दिसत होतं. सहा फूट उंचीची ही सडपातळ मुलगी कदाचित चांगली अॅथलिटही होऊ शकली असती, तिनं कदाचित भारतास चारशे मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकून दिलं असतं, एवढी तिची चपळाई होती. तिचा कोर्टवरचा दबदबाही काही वेळातच जाणवू लागला. हे घडवू शकणारा खेळ तिच्याकडं पूर्वीपासूनच होता. तिला केवळ जास्त आक्रमक मानसिकता हवी होती. त्यासाठी तिनं कसून तयारी केली. तिनं त्यासाठी जोरदार हुंकार आणला; पण यावेळच्या जागतिक स्पर्धेत जरा जास्तच वेगळं दिसलं.

जागतिक स्पर्धेत सिंधू यावेळी अधिक जास्त आत्मविश्वासानं उतरली होती. जणू तिला उपविजेतेपदाचं विजेतेपद करण्यासाठी काय करावं लागतं याची किल्ली गवसली होती. कोणतीही परिस्थिती असो, त्यातून सच्चा विजेताच तावून सुलाखून बाहेर पडतो, हेच सिंधू दाखवत होती. अंतिम लढतीत सिंधूच्या खेळात क्वचितच दिसणारी पूर्ण आक्रमकता दिसली. तिनं ताशी ३५० किलोमीटर वेगानं मारलेल्या स्मॅशनं अंतिम फेरीत जपानच्या नोझोमी ओकुहाराला जबरदस्त धक्का बसला. त्यातून ती शेवटपर्यंत सावरू शकली नाही. त्यापेक्षाही आपल्याला हुकमी ठरतील असे वाटणारे बॅकहँड बचावात्मक फटके सिंधू अगदी लीलया खेळत होती. या लढतीत क्वचितच दीर्घ रॅली झाल्या, अगदी ओकुहाराला हवेहवेसे वाटणाऱ्या; पण त्यावेळीही सिंधूचीच हुकमत होती. ही रॅली सुरू असतानाही सिंधू त्याचा वेग ठरवत होती; तसंच फटक्यांची पेरणीही अचूक करत होती. ड्रॉप शॉट खेळतानाही ती ओकुहारास गोंधळात टाकत होती. प्रतिस्पर्धीच्या सर्व्हिसवर मनगटास काहीसा झटका देत शटल अचूक परतवत होती.
हे सर्व घडत असताना बॅडमिंटन रसिक दोन वर्षांपूर्वीची, जवळपास दोन तास चाललेली, ७३ शॉट्सची मॅरेथॉन रॅली असलेली लढत विसरले नव्हते. त्यावेळी रॅलीवर ओकुहारा वर्चस्व गाजवत होती. सिंधू शटल परतवण्यासाठी झगडत होती. उंचापुऱ्या सिंधूचा प्रतिकार अखेर यशस्वी ठरला होता. ओकुहारा शटल परतवण्यात त्यावेळी थोडक्यात चुकली होती. आता दोन वर्षांनी सिंधू प्रत्येक रॅलीवर वर्चस्व राखत होती. यावेळी दुसऱ्या गेममध्ये सुरवातीच्या पिछाडीनंतर ओकुहारानं खेळाचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला; पण रॅलीच्या वेगात जास्तीत जास्त वैविध्य आणत सिंधूनं २८ शॉट्समध्येच रॅली संपवली. त्यावेळी ओकुहारानं अक्षरशः गुडघे टेकले आणि सिंधू आत्मविश्वासपूर्वक कोर्टवर फिरत होती. विजेती आणि अन्य खेळाडू यातला फरक त्यावेळी स्पष्ट दिसत होता.

सिंधूला रॅली झटपट संपवणं, त्यासाठी ताकदवान आक्रमक खेळ करणं खूपच आवडतं; पण तिनं त्याची मर्यादा स्वतःला घालून घेतलेली नाही. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत तिच्या संयमाचा पूर्ण कस लागला. त्यावेळी आक्रमकतेपेक्षा शटलचं प्लेसिंग महत्त्वाचं ठरत होतं. हे आव्हानही तिनं सुरवातीच्या पिछाडीनंतर पार केलं. यात यशस्वी झाल्यानंतरही ती उपांत्य; तसंच अंतिम लढतीत नॉकआऊट पंच देत होती. त्यावेळी तिला कधीही आपल्या यशाबाबत तिळमात्रही शंका नव्हती.

दोन वर्षांपूर्वी ओकुहाराविरुद्ध सिंधू हरली होती, त्यावेळच्या तुलनेत यावेळी ती कोर्टवर कमी वेळ होती. त्यामुळे जास्त फ्रेश होती; पण हे तिनं घडवून आणलं होतं. तिची लढतीवरची एकतर्फी हुकमत पाहून प्रतिस्पर्धी हादरली होती. प्रतिस्पर्धी कोर्टवर स्थिरावण्यापूर्वीही तुफानी आक्रमण करण्यास सिंधू तयार होती. उपांत्यपूर्व फेरीतल्या ताई झु यिंगविरुद्धचा पहिला गेम सोडल्यास सिंधूचा दबदबा बासेलच्या सेंट जाकोबशॅली एरिनावर जाणवत होता. प्रत्येक रॅली, प्रत्येक गुण, प्रत्येक गेम, प्रत्येक लढतीवर तिच्या आक्रमकतेची छाप होती, त्याचबरोबर कोर्टवर सातत्यानं आगळं करण्यास तयार होती. ताई झुचे स्मॅश दुसऱ्या गेममध्ये परतवताना तिनं तिच्या हाफ स्मॅशमध्ये वैविध्य आणलं. त्याचवेळी नेटजवळ नाजूक टच करीत होती, छोटीशी उडी मारून स्मॅश खेळत त्याच ओघात नेटजवळ जात होती.

किम (जी ह्यून मार) मार्गदर्शक आल्यापासून सिंधूच्या खेळात बदल झाला आहे. आपल्या नव्या मार्गदर्शकांना अपेक्षित असलेले बदल खेळात होत असल्याचं सिंधूनं इंडोनेशियन ओपनमध्ये उपविजेतेपद जिंकताना दाखवलं होतं; पण अंतिम फेरीत तिला अकेन यामागुचीनं संधी दिली नव्हती. मात्र, जागतिक स्पर्धेच्या वेळी सिंधू जास्त सकारात्मक होती; तसंच जास्त ताकदवान आणि कमालीची आक्रमकही. कोर्टवरचा आत्मविश्वासही जबरदस्त होता. त्यावरचा वावर तिचं वर्चस्व दाखवत होता. कोर्टच्या लाईन्स कुठं आहेत हे ती जास्त चांगल्या प्रकारे जाणून होती, त्यामुळे शटल बाहेर जाणार की आत याबाबत तिचा अंदाज क्वचितच चुकत होता. या वर्षाच्या सुरवातीस झालेल्या इंडिया ओपनमध्ये तिला याच प्रश्नानं जास्त सतावलं होतं. इंडिया ओपनमध्ये दिसलेला तो काहीसा डळमळीतपणा आणि जागतिक स्पर्धेतला कमालीचा आत्मविश्वास यातला फरकच यशापयशातला फरक होता.
सिंधू आता खऱ्या अर्थानं परिपूर्ण खेळाडू झाली आहे. कोणत्याही आव्हानास सामोरी जाणारी चांगली लढवय्यी झाली आहे. ऑलिंपिक एका वर्षावर असताना यापेक्षा चांगली बातमी काय असू शकते? रिओ ऑलिंपिकचं रौप्य टोकियो ऑलिंपिकमध्ये सुवर्ण होऊ शकते हा विश्वास नक्कीच बासेलमधल्या जगज्जेतेपदानं उंचावला आहे. एक लक्ष्य साधलं आहे, आता दुसरं लक्ष्य दिसत आहे. त्यासाठी आता कसून तयारी करावी लागणार आहे, हा सिंधूचा विश्वास प्रत्यक्षात येईल अशी आशा तिनं नक्कीच निर्माण केली आहे.

ब्रँडचंही वाढतं मूल्य
जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्यापूर्वीच सिंधू नावाचा ब्रँड सोनेरी झाला आहे. ती श्रीमंत महिला क्रीडापटूंच्या यादीत तेरावी आहे. आता सिंधू सध्या चौदा ब्रँडचा प्रसार करत आहे. या क्रमवारीत केवळ भारतीय कर्णधार विराट कोहलीच तिला मागं टाकत होता. आता जागतिक विजेतेपदानंतर सिंधूच्या ब्रँडमध्ये नक्कीच वाढ होईल. तिला आपली ब्रँड अॅम्बॅसॅडर बनवण्यासाठी अनेक कंपन्या उत्सुक आहेत, असं सिंधूचे व्यवस्थापन करणाऱ्या बेसलाईनचे व्यवस्थापकीय संचालक तुरिन मिश्रा यांनी सांगितलं आहे. सिंधू ब्रँडचं मूल्य वाढत आहे आणि ते देण्यास ब्रँड तयार आहेत. एकंदरीत सर्वाधिक ब्रँडच्या स्पर्धेत विराट आणि सिंधू यांच्यात आगळी स्पर्धा दिसणार आहे.

वाढती तंदुरुस्ती, वाढता आत्मविश्वास
दोन गुणांच्या मध्ये असणाऱ्या काही सेकदांत किंबहुना काही क्षणांत त्याच जोषात पुन्हा तयार होणं जास्त महत्त्वाचं असतं. सिंधूला ही नैसर्गिक देणगी लाभली आहे. त्यास जास्त तंदुरुस्तीची जोड लाभली आहे. त्यामुळंच तर सिंधू क्रॉस कोर्ट स्मॅश जास्त ताकदीनं करत होती आणि प्रतिस्पर्धी खेळाडूनं तो स्मॅश परतवलाच, तर नेटजवळ जात शटल अचूकपणे टॅप करत होती. दोन वर्षांपासून सिंधू ही श्रीकांत वर्मा मादापल्ली यांच्याकडे ट्रेनिंग घेत आहे. ‘‘कोर्टाच्या पुढच्या भागातल्या सिंधूच्या हालचालीवर शरीररचनेमुळं परिणाम होत होता. आता त्याकडे लक्ष दिल्याचा फायदा तिला होत आहे,’’ असं श्रीकांत यांनी सांगितलं.

आशियाई कुमार विजेती ते ऑलिंपिक विजेती?
गेल्या सहा वर्षांत सिंधूनं आशियाई कुमार विजेती ते जागतिक विजेती हा प्रवास पूर्ण केला आहे. या दरम्यान तिनं ऑलिंपिक रौप्यपदक, दोन जागतिक उपविजेतेपदं, दोन जागतिक ब्राँझपदकं, राष्ट्रकुल; तसंच आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक ही कामगिरी केली आहे. आता एका वर्षानं होणाऱ्या टोकियो ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतलं सुवर्णपदक तिच्या नक्कीच आवाक्यात आहे.

आक्रमकता दाखवण्यासाठी
प्रतिस्पर्धी खेळाडूला आक्रमकता दाखवण्यासाठी सिंधूनं हुंकार द्यावेत, अशी गोपीचंद यांची अपेक्षा होती. सिंधूच्या खेळातला आत्मविश्वास यामुळे वाढेल, असाही त्यांना विश्वास होता. त्यासाठी त्यांनी हैदराबादला सराव करताना मध्यास असलेल्या कोर्टवरून सिंधूला आपल्याशी संवाद साधायला सांगितला. गोपीचंद यांनी सिंधूला हे सर्व समजावलं आणि मग सिंधूची आक्रमकता दिसू लागली.

मोबाईलबंदी
रिओ ऑलिंपिक जेमतेम काही महिन्यांवर आलं होतं. सिंधूला यश मिळत नव्हतं. ऑस्ट्रेलियन स्पर्धेत सिंधू सुरवातीलाच पराजित झाली. सिंधू त्यावेळी कुटुंबीयांसमवेत ऑस्ट्रेलियास गेली होती. भारतात परतल्यावर गोपीचंद यांनी तिला काय करायचं आणि काय नाही हे लेखी स्वरूपात सांगितले. त्यात सिंधूवर मोबाईलबंदीही होती. सिंधूनं फारसं काही न वाचता त्यावर स्वाक्षरी केली होती. मात्र, काही वेळातच आपला मोबाईल गोपीचंद यांच्या ताब्यात जाणार हे तिला कळलं; पण तिनं सरावात पू्र्ण झोकून दिलं आणि ऑलिंपिक रौप्यपदक जिंकता आलं. आत्ताही जागतिक स्पर्धेच्यावेळी हे घडलं.

सिंधूनंतर पुढं कोण?
पी. व्ही. सिंधूच्या विजेतेपदाचा जल्लोष कमी झाल्यावर भविष्यात काय हा प्रश्न भेडसावू लागला आहे. साईना नेहवालची जोशाची अखेरची काही वर्षं राहिली आहेत. सिंधू साईनापेक्षा काही वर्षं जास्त असेल; पण त्यानंतर काय हा प्रश्न आहेच. सिंधू, साईना निवृत्त होतील, त्यावेळी त्यांची जागा नक्की घेतली जाईल हा काही भारतीय बॅडमिंटन पदाधिकाऱ्यांचा विश्वास आहे; पण नजीकच्या भविष्यात तरी कोणी खेळाडू दिसत नाही. आसामचे हिमंता बिश्वशर्मा यांनी भारतीय बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष झाल्यावर विभागीय अकादमी सुरू होतील असं सांगितलं होतं; पण याबाबत काहीही घडलेलं नाही. गोपीचंद गेल्या कित्येक वर्षांपासून माजी खेळाडूंनी मार्गदर्शक व्हावं असं आवाहन करत आहेत; पण त्यालाही फारसा प्रतिसाद लाभत नाही. सिंधू जगज्जेती होत असताना बी. साई प्रणीतनं ब्राँझ जिंकलं; पण प्रणीत, श्रीकांत, एच. एस. प्रणॉय यांची जागा घेणाऱ्यांत सध्या तरी लक्ष्य सेनव्यतिरीक्त जास्त पर्याय दिसत नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang p v sindhu article write by sanjay gharpure