‘मुलांना गॅजेट्सची सवय नाही’ (प्रसाद ओक)

prasad oak
prasad oak

सध्याचा काळ कितीही आधुनिक, प्रलोभनांचा असला तरी माझ्या मुलांना आधुनिक गॅजेट्सची अजिबात सवय नाही. त्यांच्याकडे स्मार्टफोन नाहीत हे सांगताना मला अभिमान वाटतो. गरजेसाठी आम्ही त्यांना अत्यंत साधा फोन दिलेला आहे. माझा मोठा मुलगा दहावीपर्यंत कोणत्याही सोशल मीडियावर नव्हता. तेच धोरण आम्ही लहान मुलाच्या बाबतीत पाळत आहोत. मोठ्या भावाकडे बघून तो हे आपोआपच शिकला. याचं संपूर्ण श्रेय माझ्या पत्नीला जातं. तुम्हाला इंटरनेटची गरजच नाही हे; तसंच सोशल मीडियाचे धोके तिनं मुलांना समजावून सांगितले. हे त्या दोघांना पटलं.

माझी आई संगीत शिक्षिका होती. मी शास्त्रीय संगीत शिकावं, अशी तिची इच्छा होती; पण मला शास्त्रीय संगीतात रस नव्हता. असं असलं, तरी माझ्या अंगात गाण्याचा जो काही थोडाफार गुण आला आहे, तो तिच्यामुळंच आला आहे. ती शिक्षिका होती, मात्र तिची आणि माझी शाळा वेगळी होती. लहानपणापासून काही मूलभूत शिस्त असायल हवी, याबाबत आई नेहमीच आग्रही होती. उदाहरणार्थ, अभ्यास वेळच्या वेळी झालाच पाहिजे यासारख्या सवयी मी तेव्हापासून पाळत आलो आहे. माझे वडील अत्यंत साधे, सरळ. त्यांनी कधी माझ्या अभ्यासात लक्ष घातलं नाही. या गोष्टीचं मी आतापर्यंत अनुकरण करत आलो आहे. मीही माझ्या मुलांच्या अभ्यासात कधी लक्ष घातलं नाही. माझी बायकोच मुलांचं सगळं बघते.

लहानपणापासून आईनं एक गोष्ट मला अट्टहासानं करायला लावली, ती म्हणजे दर वर्षी स्नेहसंमेलनामध्ये आवर्जून सहभाग घ्यायचा. त्यामुळे शाळेपासून कॉलेज संपेपर्यंत प्रत्येक वर्षी माझा स्नेहसंमेलनामध्ये सहभाग असायचाच. परिणामी माझ्याकडून नकळतपणे कलागुण जोपासले गेले, सभाधीटपणा आला. पुढच्या वाटचालीसाठी याचा मला नक्कीच फायदा होत गेला. अर्थात काळ बदलत चालला आहे, तसतसा पालकत्वाच्या जबाबदारीत बराच बदल झाला आहे आणि होत आहे. कारण माझी आई पालकत्व निभावत होती, तेव्हाच्या जबाबदाऱ्या आणि आता माझी बायको पालकत्व निभावत आहे तेव्हाच्या जबाबदाऱ्या यांच्यामध्ये खूप फरक पडला आहे. समाजव्यवस्था, शिक्षणव्यवस्था बदलली आहे. शिक्षण थोडं अवघड झालं आहे, स्पर्धा वाढली, एसएससी, सीबीएससी, आयसीएससी असे वेगवेगळे बोर्ड झालेत. शिक्षणाच्या वेगवेगळ्या पद्धती आल्या. मी शिकत होतो त्यावेळी आईवडील सल्ले देत असत, अमुक शाखेला जा, हे कॉलेज निवड वगैरे; पण माझ्या मुलानं मात्र स्वतःच इंटरनॅशनल मार्केटिंग मॕनेजमेंट करण्याचा निर्णय घेतला. जर्मनीमध्ये जाऊन शिकायचं आहे हे त्यानंच ठरवलं. स्वतःच त्या संदर्भातली माहिती शोधून काढली. हे सर्व पालकांचा भार एक प्रकारे हलका करण्यासारखं आहे. ही शोधक वृत्ती मी त्याच्या वयाचा होतो, तेव्हा माझ्यात नव्हती.

मुलांना आता भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. आधुनिक साधनसंपदाही उपलब्ध आहे. शिवाय सध्याची पिढी खूप स्मार्ट आहे. अर्थात काळ कोणताही असो- पालकत्व निभावणं ही प्रत्येक काळात खूप महत्त्वाची आणि अवघड गोष्ट असते. मी पूर्णवेळ व्यावसायिक अभिनेता आणि दिग्दर्शक व्हायचं ठरवलं, तेव्हा मी आणि माझ्या बायकोनं पूर्णपणे ओळखलं होतं, की कौटुंबिक, प्रापंचिक जबाबदाऱ्या घेण्याइतका वेळ मला मिळणार नाही. त्यामुळे पहिला मुलगा झाल्यावर आम्ही ठरवलं होतं, की मुलांकडे पूर्ण वेळ लक्ष देण्याची जबाबदारी बायकोकडे राहील. कारण मी महिन्यातले २०-२५ दिवस कामानिमित्त बाहेर असतो. मुलांच्या लहानपणी त्यांचा हवा तेवढा सहवास त्यामुळे मला मिळाला नाही. असं असलं, तरी लक्ष ठेवण्याचं काम मी नक्कीच केलं. ते आईचं ऐकत आहेत ना, हे काळजीपूर्वक बघत होतो. कारण प्राप्त परिस्थितीत मला तेवढंच करणं शक्य होतं. मुलं लहान होती, तेव्हा पावणेचार वर्षं ‘भांडा सौख्यभरे’ हे नाटक मी करत होतो. त्याचे संपूर्ण महाराष्ट्रात दौरे सुरू होते; तसंच ‘अवघाची संसार’ ही मालिका सुरू होती. त्याचं महिन्यातून २५ दिवस चित्रीकरण असायचं. त्यामुळे या काळात मला मुलांकडे वैयक्तिकरित्या लक्ष देता आलं नाही; पण बायकोवर माझा ठाम विश्वास होता, ती योग्य पद्धतीनं जबाबदारी निभावणारच याची खात्री होती आणि तिनं ती निभावली देखील. सध्या माझा लहान मुलगा दहावीत आहे आणि मोठा मुलगा जर्मनीमध्ये इंटरनॅशनल मार्केटिंग मॕनेजमेंट करतो आहे.

पालक म्हणून भूमिका निभावताना किमान ‘स्वतःचे निर्णय घेण्याची क्षमता मुलांमध्ये आली पाहिजे’ या गोष्टीकडे पालकांनी बघितलं पाहिजे. आमचा मोठा मुलगा ज्याप्रमाणं त्याच्या करिअरच्या बाबतीत आमच्यावर अवलंबून राहिला नाही, तीच गोष्ट आम्ही धाकट्याच्या बाबतीतही कटाक्षानं पाळू. त्यानं स्वतःच त्याचा निर्णय घेतला पाहिजे, याचा आग्रह धरू. त्यासाठी आपली काहीतरी आवड निर्माण झाली पाहिजे, एवढे संस्कार मी आणि पत्नीनं मुलांवर नक्कीच केले आहेत. निदान आपल्याला सायन्स, कॉमर्स, आर्टस‍पैकी नेमकी कशाची आवड आहे हे मुलांना समजलं पाहिजे.

बरेचदा मुलंही त्यांच्या कृतीतून आपल्याला खूप काही शिकवून जातात. दोन वर्षांपूर्वी माझ्या धाकट्या मुलाला अपघात झाला होता. त्याच्या दोन्ही हातांच्या मनगटांची हाडं मोडली होती. दोन्ही हातांना प्लॕस्टर होतं. त्यावेळी तो खूपच ट्रॉमामध्ये होता. दोन महिने शाळा, क्लास, खेळणं सर्वच बंद होतं. त्यातून त्याला बाहेर कसं काढावं, हे आम्हाला त्यावेळी कळत नव्हतं. आम्ही दोघांनी त्याला सांगितलं, की तू टीव्हीवरच्या वेगवेगळ्या डॉक्युमेंट्रीज, चित्रपट, यूट्युबवरचे चांगले व्हिडिओ बघ. त्यातून त्याला वेगवेगळ्या पाककृती बघण्याचा छंद लागला. तो वेगवेगळे कुकरी शो बघू लागला. दोन महिन्यांत त्यानं याविषयी भरपूर व्हिडिओ पाहिले. प्लॕस्टर निघाल्यानंतर जोपर्यंत शाळेत जाता येत नव्हतं, त्या काळात त्यानं विरंगुळा म्हणून घरच्या घरी छोट्या छोट्या रेसिपी बनवायला सुरुवात केली. आता तो जवळपास अप्रतिम कुक झाला आहे, असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये. तो उत्तम चिकन, फिश, केक, पेस्ट्री, फिरनी इत्यादी अनेक पदार्थ बनवतो. इतक्या चांगल्या पद्धतीनं तो पदार्थ बनवतो, की अलीकडं आमच्याकडे येणारी मित्रमंडळी विचारू लागली आहेत, की ‘मयंक आज काय बनवणार आहे?’ या प्रसंगातून मला त्याच्याकडून महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळाली. फावल्या वेळात; तसंच एखादा वाईट प्रसंग घडला, तरी आपण त्याचा सकारात्मक उपयोग करून घेऊ शकतो. त्यातून आपण काहीतरी नवीन शिकून वेळ सार्थकी लावू शकतो.

त्याचा हा अपघात सायकलवरून जाताना घडला होता. त्यामुळे त्याची भीती त्याला बसली होती. ती भीती त्यानं स्वतःहून काढली. हळूहळू सायकल चालवायला सुरुवात केली. कठीण परिस्थितीतून स्वतःच बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करणं आणि कोणत्याही प्रसंगी न डगमगता काहीतरी शिकत राहणं, या त्याच्या दोन गोष्टी मला खूपच कौतुकास्पद वाटतात. अर्थात त्याच्यावर संस्कार आम्ही दोघांनीच केलेत; पण ते त्यानं सार्थकी लावले.

मोठ्या मुलानंदेखील सतराव्या वर्षी करिअरसंदर्भात निर्णय घेऊन त्यासंबंधी माहिती काढायला सुरुवात केली होती. जगभरात कोणती चांगली विद्यापीठं आहेत, केवळ चांगलीच नाहीत तर ती आई-वडिलांना परवडू शकणारी आहेत का? हेदेखील त्यानं पाहिलं. त्यानुसार त्यानं दर्जेदार आणि आम्हाला परवडू शकणारं विद्यापीठ शोधून काढलं आणि तिथं तो गेला. यावरून मी एक महत्त्वाची गोष्ट शिकलो, की मला जर एखादी गोष्ट करायची असेल, तर त्यासाठी मला किती आधीपासून विचार करणं गरजेचं आहे.

पालक म्हणून माझ्यासाठी काही क्षण नक्कीच संस्मरणीय आहेत. मी कॉलेजला असताना शेवटच्या वर्षी मला खूप मोठं पारितोषिक मिळालं होते. सुरुवातीपासून माझं एक स्वप्न होतं, की आपल्याला एक दिवस पारितोषिक देण्यासाठी बोलावलं पाहिजे. योगायोगानं मी २००७ साली सारेगमप हा रिअॕलिटी शो जिंकलो. त्याचवेळी माझा मुलगा शाळेत पहिला आला होता. मला ‘सारेगमप अजिंक्यतारा’ म्हणून त्याच वर्षी त्याच्या शाळेत प्रमुख पाहुणा म्हणून बोलावलं होतं आणि तेव्हा मी मुलाला पारितोषिक देऊन प्रमुख पाहुणा या नात्यानं गौरवलं. ही नक्कीच वडील म्हणून आनंदाची गोष्ट होती.

कामाच्या व्यग्र वेळापत्रकात मी मुलांसाठी अवश्य वेळ काढतो. माझी पत्नी सिल्व्हर ज्वेलरी डिझाईन करते. या कामासंदर्भात तिला वेगवेगळ्या गावी जावं लागतं. अशा वेळी दोन महिने आधीच कामाचं नियोजन करून मी सुट्टी काढतो. मुलांबरोबर पूर्ण वेळ राहतो. त्यावेळी मुलंही भरपूर खूश असतात.

सध्याचा काळ कितीही आधुनिक, प्रलोभनांचा असला तरी माझ्या मुलांना आधुनिक गॅजेट्सची अजिबात सवय नाही. मला सांगायला अभिमान वाटतो, की त्यांच्याकडे स्मार्टफोन नाहीत. गरजेसाठी आम्ही त्यांना अत्यंत साधा फोन दिलेला आहे. माझा मोठा मुलगा दहावीपर्यंत कोणत्याही सोशल मीडियावर नव्हता. तेच धोरण आम्ही लहान मुलाच्या बाबतीत पाळत आहोत. मोठ्या भावाकडे बघून तो हे आपोआपच शिकला. याचं संपूर्ण श्रेय माझ्या पत्नीला जातं. तुम्हाला इंटरनेटची गरजच नाही हे; तसंच सोशल मीडियाचे धोके तिनं मुलांना समजावून सांगितले. हे त्या दोघांना पटलं. सोबतच्या मित्रांकडे अत्याधुनिक फोन आहेत, ती सर्व प्रकारची सोशल मीडिया वापरतात; पण आमची मुलं मात्र त्यासाठी हट्ट धरत नाहीत. त्यांना त्याची लाज वाटत नाही आणि न्यूनगंडही वाटत नाही, याचा मला नक्कीच अभिमान वाटतो.
मी लहान होतो तेव्हा आणि आता पालक झालो आहे या काळात, संस्कारांमध्ये, समाजव्यवस्थेमध्ये, शिक्षणव्यवस्थेत बराच फरक पडला आहे. त्यामुळे पालकत्वातही बदल होणारच. माझ्या मते पालकांनी मुलांना काय द्यायचं आणि काय नाही, हे ओळखलं पाहिजे. ‘मुलं चुकतात ती फक्त पालकांमुळे’ असं माझं ठाम मत आहे. मुलं उत्तम असली, तर त्याला कारण त्यांचे उत्तम पालक असतात. तेच बिघडण्याच्या बाबतीतही म्हणता येईल. तेव्हा मुलांच्या नेमक्या गरजा काय आहेत आणि कुठल्या मर्यादेपर्यंत त्या पुरवल्या पाहिजे याचा अंदाज पालकांना आलाच पाहिजे, असं मला वाटतं.
(शब्दांकन : मोना भावसार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com