सिमरनचं स्वातंत्र्य (रवि आमले)

रवि आमले ravi.amale@esakal.com
Sunday, 25 October 2020

‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ आला तो काळ होता आर्थिक उदारीकरणाचा. खास ‘एनआरआय’ मंडळींना डोळ्यांसमोर ठेवून तयार केलेल्या या चित्रपटानं प्रेमकथेच्या माध्यमातून घोळवली ती तत्कालीन सामाजिक - सांस्कृतिक मानसिकता. आज २५ वर्षांनंतर तिचं नेमकं काय झालं? काळ बदलला, तशी ती मानसिकताही बदलली का? की या चित्रपटानं भारावलेली ती पिढी आजही तिथंच थिजलेली आहे? या प्रश्नांच्या उत्तराचा हा शोध…

‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ आला तो काळ होता आर्थिक उदारीकरणाचा. खास ‘एनआरआय’ मंडळींना डोळ्यांसमोर ठेवून तयार केलेल्या या चित्रपटानं प्रेमकथेच्या माध्यमातून घोळवली ती तत्कालीन सामाजिक - सांस्कृतिक मानसिकता. आज २५ वर्षांनंतर तिचं नेमकं काय झालं? काळ बदलला, तशी ती मानसिकताही बदलली का? की या चित्रपटानं भारावलेली ती पिढी आजही तिथंच थिजलेली आहे? या प्रश्नांच्या उत्तराचा हा शोध…

'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ २५ वर्षांचा झाला. त्याचा सोहळा माध्यमांतून साजरा झाला. अनेकांनी त्यांच्या हुळहुळत्या आठवणींना कढ काढला. त्याच्या बातम्या झाल्या. तिकडं लंडनच्या एका चौकात दिलवालेतील नायक-नायिकांचा - राज आणि सिमरन यांचा - पुतळा उभारला जाणार आहे. त्याच्याही बातम्या ठळकपणे प्रसिद्ध झाल्या. ‘द इमेज’ या पुस्तकाचे लेखक, ख्यातनाम राजकीय विश्लेषक डॅनिएल बूरस्टीन यांच्या शब्दांत सांगायचं, तर हे सगळे स्यूडो इव्हेन्ट - छद्म कार्यक्रम. म्हणजे खास घडविलेले, जाणीवपूर्वक आखलेले कार्यक्रम. प्रतिमासंवर्धन, प्रसिद्धी, प्रोपगंडा असे विविध हेतू असतात या छद्म कार्यक्रमांमागं. तर, या चित्रपटाच्या निमित्तानं ते साग्रसंगीत झालं.
आता यातून असा प्रश्न निर्माण होतो, की या चित्रपटाचे एवढे पोवाडे गाण्याचं काय कारण? २५ वर्षं पूर्ण करणारा तो काही पहिलाच चित्रपट नाही. त्या काळात तो प्रचंड लोकप्रिय होता. मुंबईतील मराठा मंदिर या चित्रपटगृहात तो सलग २५ वर्षं चालला, हेही काही त्यासाठी कारण होऊ शकत नाही. मुळात गेल्या कित्येक वर्षांपासून मराठा मंदिरमध्ये हा चित्रपट रेटला जात आहे. अनेकदा तर मुंबई सेंट्रल स्थानक परिसरातील लोक तिथं झोपण्यासाठी जातात. तीन तास ‘वातानुकूलित’ झोप. हा चित्रपट छान रोमँटिक होता म्हणून त्याची पंचविशी साजरी झाली म्हणावं, तर हिंदीत असे रोमँटिक चित्रपट पायलीला पन्नास मिळतील; आणि आजच्या पिढीनं - जिला जेन झेड म्हणतात तिनं - तो पाहिला, तर ते त्या ‘बूमर्स’ आणि ‘मिलेनियल्स’चा - सत्तरोत्तरी पिढीच्या - रोमँटिकतेच्या कल्पनांचा उद्धारच करतील. जग फार पुढं गेलं आहे. पण मग हेच तर कारण नाही, दिलवालेबद्दलच्या गहिवराचं? तसंही आपल्याला जुनं ते सारंच सोनं वाटत असतं. नीतिशतकात भर्तृहरीनं ‘कालाय तस्मै नमः’ म्हणताना 'सा रम्या नगरी’च्या आठवणींना उजाळा दिला होता. तेव्हापासून पिढी दर पिढी हा ‘गेले ते दिन गेले’चा स्मृतिशोक सुरूच आहे. ‘दिलवाले' हाही त्याच प्रकारच्या स्मरणरंजनाचा भाग बनलेला आहे. पण, हे एवढंच नाही. एखादा चित्रपट समाजस्मृतीत कोरला जातो, ते केवळ त्यातल्या मनोरंजन मूल्यांमुळं घडत नसतं.

कोणतीही कला हा समाजाचा आरसा असतो. त्यातही चित्रपट नावाची लोककला तर अधिकच. शिवाय, त्यात केवळ समाजाचंच प्रतिबिंब उमटतं असं नाही, तर चित्रपटांचं प्रतिबिंबही समाजात पडत असतं. सेन्सॉरविरोधात भूमिका घेणाऱ्या काही मंडळींचा हा नेहमीचा युक्तिवाद असतो, की चित्रपटांचा समाजावर काहीही परिणाम होत नाही. झालाच तर तो केवळ फॅशनपुरता असतो. मोठा गैरसमज आहे हा. चित्रपट व्यक्तीच्या मानसिकतेवर नक्कीच परिणाम करीत असतात. त्याचवेळी समाजाची तत्कालीन सांस्कृतिक - सामाजिक मूल्यंही चित्रपटांतून डोकावत असतात. किंबहुना एखाद्या पिढीला कोणता चित्रपट आवडतो, यावरून त्या पिढीची संस्कृती आपल्याला ओळखता येऊ शकते. ‘दिलवाले’कडं पाहायचं आहे ते यासाठीच.

‘दिलवाले’ आला तो काळ लक्षात घेण्यासारखा आहे. डॉ. मनमोहनसिंग यांनी भारतीय अर्थव्यवस्थेत क्रांतिकारी बदल घडवून आणले, त्याला नुकतीच चार वर्षं झाली होती. १९८६ मध्ये आलेल्या ‘नाम’मधल्या ‘चिठ्ठी आयी है’ या गाण्यानं डोळे पुसणाऱ्या अनिवासी भारतीयांना - ‘एनआरआय’ना - भारतात काही तरी घडत आहे याची चाहूल लागली होती. युरोप - अमेरिकेत आता सुस्थितीत असलेल्या या ‘प्रवासी भारतीयां’ना ‘मिट्टी की खुशबू’ साद घालू लागली होती आणि त्यात हिंदी चित्रपटसृष्टीला आपली बाजारपेठ दिसू लागली होती. १९९७ च्या ‘परदेस’मधील ‘आय लव्ह माय इंडिया’ किंवा १९९८ मधील ‘परदेसी बाबू’ या टुकार गोविंदापटातल्या ‘इट हॅपन्स ओन्ली इन इंडिया’ अशा गाण्यांतून देशप्रेमाची विक्री सुरू झाली होती. दिलवाले हा त्याआधीचा, १९९५चा. खास एनआरआय बाजारपेठ नजरेसमोर ठेवून काढलेला, त्यांच्या मनातील भावनांना जोजविणारा. पुरुषप्रधान अधिकारशाही, ‘मिट्टी की खुशबू’त घोळलेलं, मोहरीच्या पिवळ्या पिवळ्या फुलांतलं देशप्रेम हा हिंदी चित्रपटांच्या टेम्प्लेटचा महत्त्वाचा भाग, त्याबरहुकूम काढलेला.

या चित्रपटाचा नायक - राज, नायिका - सिमरन आणि त्यांची कुटुंबं हे सारे एनआरआय. त्याचा प्रारंभीचा बराचसा भाग परदेशात घडतो. नायिकेचे बावूजी हे एवढी वर्षं लंडनमध्ये राहूनही ‘भारतीय’ परंपरा आणि संस्कृती पाळणारे असं चित्रपट सांगतो. ही संस्कृती कोणती, तर खास पुरुषप्रधान. पुरुषानं बाहेर जाऊन कमवायचं. बाईनं घरकाम सांभाळत मुलांना वाढवायचं. मुलांनी थोरामोठ्यांच्या आज्ञेत, मानमर्यादेत राहायचं. तर, एनआरआयमधील हा एक भाग झाला; पण सगळेच तसे नसतात. पटकथाकारानं त्याचं छान संतुलन राखलं आहे. नायकाचं कुटुंब हे बावूजींच्या नेमकं उलट आहे. बाप उदारमतवादी. सुपुत्र जरा आगाऊ, किंचित मवाली, बापाबरोबर मस्ती करणारा; पण अंतिमतः ‘भारतीय’च. मनानं चांगला, थोरामोठ्यांच्या आशीर्वादाशिवाय लग्नास तयार नसलेला. तर, एकीकडं तो आणि दुसरीकडं मुलींनी कसं मानमर्यादेच्या पडद्यात राहावं असं मानणारे बावूजी आणि स्वातंत्र्याची स्वप्नं पाहणारी; पण बावूजींची आज्ञा शिरसावंद्य मानून बोहल्यावर उभी राहण्यास तयार असलेली सिमरन. यातून निर्माण झालेली कृतक संघर्षमय प्रेमकथा म्हणजे हा चित्रपट. मनोजकुमारच्या ‘पूरब और पश्चिम’मधलं संस्कृतीद्वंद्व नव्या रूपात रेखाटणारा हा चित्रपट. यात तो बटबटीतपणा नाही; पण एक खरं, की यात दिसतो तो एकंदरच भारतीयांच्या मनातील सांस्कृतिक गोंधळ. सुटाबुटातल्या सोवळ्याचा गोंधळ. सारी भौतिकता उपभोगत सतत अधिभौतिकतेचं गुणगान करण्याची एक खोड भारतीय मनाला लागलेली आहे, त्यात या गोंधळाचं बीज आहे. आणि हे केवळ एनआरआयपुरतंच मर्यादित नाही, आज चाळिशीच्या पुढं असलेल्या पिढीतल्या अनेकांना याची बाधा झालेली आहे. ‘दिलवाले’च्या दिग्दर्शकानं, पटकथाकारानं ती नेमकी टिपली आहे. या पिढीला तो आपला वाटला, याचं कारण त्यात दडलेलं आहे.

पण या चित्रपटाच्या यशाची मर्यादा तेवढीच आहे. तो लोकप्रिय भलेही झाला; पण लोकांना तो किती झेपला, याबाबत शंकाच आहे. २५ वर्षं झाली या चित्रपटाला; पण या अवधीत आपलं सांस्कृतिक अवकाश तिथंच थिजलेलं दिसत आहे. या चित्रपटातील सर्वात गरीब पात्र आहे ते सिमरनचं. ती स्वप्नं पाहू शकते; पण ती वास्तवात उतरतील असं समजू नकोस, असं सांगणारी तिची आई आहे. ती जरासं ‘झूम ले’ वगैरे करू शकते; पण तेही घराबाहेर. अखेर तिला पिंजऱ्यातच परतायचं आहे. तिला वडिलांनी आधीच वचन देऊन नक्की केलेल्या पुरुषाशी लग्न करावं लागणार आहे. वडिलांच्या दृष्टीनं ती त्यांची ‘इज्जत’ आहे... आणि प्रियकरही तिला तिच्या वडिलांची ‘अमानत’च समजतो. एका क्षणी ती पळून जाऊन लग्न करण्यास तयार आहे; पण प्रियकर त्याला विरोध करतो. त्याला त्याच्या ताकदीवर मोठा विश्वास आहे. शेवटी ते दोघं एकत्र येतात. पण तेही ती बावूजींची करुणा भाकते तेव्हा; बावूजी ‘जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी’ असं परवानगीपत्र देतात तेव्हा. लंडनमध्ये वाढलेल्या त्या तरुणीला एक व्यक्ती म्हणून कोणताही निर्णय अधिकार नाही आणि ही आपल्याला यशस्वी प्रेमकथा वाटते... आणि विशेष हेच, की आजही त्यात फारसा बदल झालेला नाही. सिमरनला आजही स्वातंत्र्य नाही. आजही ‘पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने’ हेच अनेक सिमरनचं भागधेय आहे. ‘खानदान की इज्जत’ आणि ‘ऑनर किलिंग’ हे सामाजिक वास्तव आहे.
मग ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटानं आपल्याला काय दिलं? त्यानं वा तत्सम अन्य चित्रपटांनी आज चाळिशीपार गेलेल्या पिढीच्या मानसिकतेत काय बदल केला? तसं करण्यात तो अपयशी ठरला असेल - आणि तसा तो ठरलाच आहे - तर मग त्याचं कौतुक तरी कशासाठी? तसं मनोरंजन करणारे सतराशे साठ चित्रपट तर आपल्या अवतीभोवती पडलेलेच आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang ravi amale write ddlj 25 years article