‘मंड’चं रहस्य आणि दहशतवाद (एस. एस. विर्क)

s s virk
s s virk

माझी जालंधरहून अमृतसरला वरिष्ठ पोलिस अधीक्षक म्हणून बदली झाली होती. म्हणजे मी आता मंडच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे आलो होतो. ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात मी नवा पदभार स्वीकारला. नव्या जिल्ह्यातल्या सगळ्या पोलिस ठाण्यांना भेटी देताना मी हरिकेमध्ये आलो आणि मंडबरोबरच्या माझ्या जुन्या ओळखीला उजाळा मिळाला. निवडणुकांच्या काळात बऱ्याचशा दहशतवाद्यांनी सुरक्षित जागा म्हणून मंडवर मुक्काम हलवला होता, असं तिथल्या ठाणेदारांकडून समजलं. जणू काही पुन्हा सक्रिय होण्यासाठीच मंड माझी वाट पाहत होतं...

एकंदरच मंडचं भौगोलिक स्थान, त्या बेटाची रचना, अस्ताव्यस्त वाढलेली झाडंझुडपं, जंगली प्राण्यांचा वावर आणि मधूनच दिसणारी हिरवीगार शेती या सगळ्यांची मला मोहिनी पडल्यासारखी झाली होती. मंडला मी वेगवेगळ्या वेळी जाऊन आलो होतो. तिथली भाताची, गव्हाची, मक्‍याची शेती आणि भाजीपाल्याची लागवड बघितली होती. मंडची जमीनच अत्यंत सुपीक होती. आणखी एकदा तिथं जाऊन यावं, असं मला वाटत होतं. सन १९८५च्या उन्हाळ्यात एक दिवस जालंधरच्या माझ्या ऑफिसमध्ये हरिकेजवळच्या एका गावातले करमसिंग मला भेटायला आल्याचा निरोप मिळाला. अमृतसर जिल्ह्यात बियास आणि सतलजचा संगम होतो तिथंच जवळ त्यांचं गाव होतं. माझ्या वडिलांच्या एका जुन्या सहकाऱ्याचा जावई अशी करमसिंग यांनी स्वतःची ओळख करून दिली. माझा त्या कुटुंबाशी चाळीस वर्षांचा परिचय होता. करमसिंगच्या सासऱ्यांनी- केहरसिंग यांनी मी अगदी लहान असताना मला खरंच अंगाखांद्यावर खेळवलं होतं.

‘‘साहेब, तुम्ही आमच्या भागात नदीच्या बाजूला पिकनिकसाठी येऊन गेलात असं समजलं. मला तिथल्या ठाणेदारानी सांगितलं. तुम्ही मंडवर पण जाऊन आलात, असंही ते म्हणत होते. त्या भागातला मच्छिमारीचा ठेका माझ्याकडे आहे. माझ्या मोटरबोटीही आहेत. तुम्ही येऊन गेल्याचं कळल्यानं मी आज स्वतःच तुम्हाला येऊन भेटायचं ठरवलं,’’ करमसिंग म्हणाले. ते भेटल्यानं मलाही बरं वाटलं. पोलिसांच्या नेहमीच्या स्रोतांपेक्षा माहिती मिळवण्याचा एखादा वेगळा मार्ग मला हवाच होता. मला मंडवर अगदी आतल्या भागात पायी फिरायचं आहे, असं सांगितल्यावर त्यांनी जरा आढेवेढे घेतले. ते फारसे उत्सुक दिसले नाहीत. दहशतवाद्यांना मंड सुरक्षित वाटत असल्यानं आता त्यांचा तिथला वावर वाढला आहे, त्यामुळे पुरेसं संरक्षण न घेता मी तिथं जाऊ नये, असं करमसिंग यांचं मत होतं. ‘‘मंड परिसरात नेहमी फिरणाऱ्या आमच्या मच्छिमारांकडूनही ‘खाडकूं’बद्दल माहिती मिळू शकेल,’’ ते म्हणाले. अमृतसरच्या बाजूनं जाण्यापेक्षा ‘रियासतच्या’ म्हणजे कपूरथळाच्या बाजूनं मंडवर जाणं कमी धोकादायक असेल- कारण दहशतवाद्यांची बरीचशी ये-जा अमृतसरच्या बाजूनं होत असते, असंही त्यांचं मत होतं.

आम्ही मग एक दिवस ठरवला. खाण्यासाठी बरोबर काहीतरी घेऊन यायला मात्र त्यांनी जोरदार हरकत घेतली. ‘‘साहेब, तुम्ही आमचे पाहुणे असणार आहात. आणि ताज्या माशांपुढे बाकी पदार्थांचं काय घेऊन बसलात? आमच्याकडे गावाकडचा एक चांगला खानसामा आहे. त्यानं बनवलेलं जेवण तुम्हाला आवडेल. आपण बापू केहरसिंगनाही बोलावू. त्यांनाही तुम्हाला भेटायला आवडेल,’’ ते म्हणाले. आमचे त्यांच्या कुटुंबाशी जुने संबंध होते. त्यांच्या पुढच्या पिढीचा प्रतिनिधी असणाऱ्या केहरसिंगचं म्हणणं मला टाळता आलं नाही.

ठरलेल्या दिवशी सकाळी आठ वाजता आम्ही भेटलो. चहा घेऊन लगेचच आम्ही बोटीनं मंडच्या कपूरथळा बाजूकडे कूच केलं. नदीच्या प्रवाहाच्या उलट्या दिशेनं आमचा प्रवास सुरू होता. थोडी कमी झाडी असलेली जागा पाहून आम्ही तिथं उतरलो. नदीकिनारी तितर आणि बदकांचे थवे दिसत होते. एवढ्या प्रचंड संख्येनं हे पक्षी याआधी कधीच पाहिले नव्हते. आणखी पुढे गेल्यावर शेतांचे तुकडे लागले. पेरणी होऊन गेली होती. जंगली जनावरांनी नुकसान करू नये म्हणून प्रत्येक शेतावर एकेक बंदूकधारी लक्ष ठेवून होता. आमच्याबरोबरही काही सशस्त्र पोलिस होते; त्यामुळे कोणीच कोणाची दखल घेतली नाही. ‘‘बारशिंगे, हरणं, रानडुकरं शेताची फार नासाडी करतात,’’ राखणीवरच्या एकानं खुलासा केला. आम्हीही रानडुकराची शिकार करावी, असा त्याचा आग्रह होता. एक-दोन ससे, तितर आणि बदकांची शिकार केल्यानं करमसिंग फारच खूष झाले होते : ‘‘साहेब, आपल्याला आज चांगलीच मेजवानी मिळणार. मी हे सगळं मी दुपारच्या जेवणासाठी पाठवून देतो. शिवाय आपल्याला ‘बचुआ’ किंवा ‘तरकंडी’ मासेही मिळतील; पण मला ‘सोल’ मासे जास्त आवडतात, असं सांगितल्यावर करमसिंग जरा खट्टू झालेले दिसले. कारण त्यांच्या मते ‘सोल’ म्हणजे फारच कॉमन होते. आम्ही जवळपास तीन तास फिरत होतो. चहाचं सामान बरोबर असल्यानं चालून चालून दमल्यावर आम्ही चहा करून घेतला. उकाडा फार नव्हता; पण हवा खूपच दमट होती. आम्ही केलेली शिकार करमसिंग यांनी पुढे पाठवली होती. दुपारी एकच्या सुमारास आम्हीही परत फिरलो आणि हरिके गावात नदीकाठी असलेल्या कॅनॉल रेस्टहाऊसला पोचलो.

करमसिंग यांचा त्या भागात बराच दबदबा होता, असं दिसत होतं. त्यांनी जेवणाचा मोठाच बेत केला होता आणि त्यांच्या काही स्थानिक सहकाऱ्यांनाही आमंत्रित केले होते. बाबा केहरसिंग यांनाही मी भेटलो. जवळपास वीस वर्षांनी मी त्यांना पाहत होतो. मी लगेच निघायचं म्हणत होतो; पण माझी गाडी जिथं पार्क केली होती तिथपर्यंत करमसिंग आग्रहानं मला सोडायला आले. बोटीतून परत जाताना मी त्यांना ‘खाडकूं’बद्दल विचारलं. ‘‘ते सहसा आम्हाला त्रास देत नाहीत. काही वेळा त्यांच्याकडून स्वयंपाकासाठी काही सामानाची मागणी होते. आम्ही देतो ते त्यांना,’’ करमसिंग म्हणाले. अमृतसरच्या बाजूलाही काही मच्छिमार त्यांच्यासाठी काम करत असत. मग स्वतःहूनच त्यांनी मला मंडच्या अमृतसर बाजूची माहिती हवी असल्यास देण्याची तयारीही दर्शवली.

मंडवर राहणाऱ्या मच्छिमारांबद्दल मलाही उत्सुकता होती. त्यातले बरेच जण पूर्व उत्तर प्रदेशातून किंवा बिहारमधून आलेले होते. गळ टाकून, जाळी किंवा भाले वापरून मासे पकडण्यात त्यांचा हातखंडा असायचा. बोटीतूनच करमसिंग यांनी मला या मच्छिमारांची नदीकाठावरची किंवा अगदी मंडवरही बांधलेली, सरकंडा गवतानं शाकारलेली कच्ची-पक्की घरंही दाखवली. गटागटांनी राहून ते दिवसा आणि रात्री शिफ्टमध्ये मासेमारी करायचे. त्यात त्यांना बऱ्यापैकी पैसाही मिळायचा. त्यांचं सुट्यांचं वेळापत्रकही ठरलेलं असायचं. प्रत्येकाला विशिष्ट दिवस घरी जाऊन येता येत असे. आणखी थोडी चौकशी केल्यावर दहशतवादी काही वेळा त्यांच्या बोटीही वापरतात, असंही त्यांनी मला सांगितलं. त्या दिवशी मला मंडमध्ये आणखी आत शिरण्यात यश मिळालं होतं.

दरम्यान, पंजाबमध्ये प्रचंड हिंसाचार सुरू असतानाच काही राजकीय घडामोडींनाही वेग आला होता. मार्च १९८५मध्ये अर्जुनसिंह यांची पंजाबचे राज्यपाल म्हणून नेमणूक झाली. पंजाब प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढून राज्यात स्थिती पूर्ववत करण्याची आणि निवडणुका घेऊन सरकार स्थापन करण्याच्या दिशेनं प्रयत्न करण्याची जबाबजारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. त्याच महिन्यात स्थानबद्ध असलेल्या सगळ्या अकाली नेत्यांची अचानक सुटका करण्यात आली. जून १९८४पासून या नेत्यांना स्थानबद्ध करून ठेवले होते. त्यापाठोपाठ स्थानबद्ध केलेल्या आणखीही काही लोकांची सुटका करण्यात आली. आमचं ‘लक्ष्य’ अचानक ‘दहशतवाद मोडून काढण्या’ऐवजी ‘पंजाबमध्ये शांतता आणि सुव्यवस्था आणणं’ असं झाल्यानं आम्हीही अचंबित झालो होतो. हिंसाचार मात्र सुरूच होता. अकाली कार्यकर्ते सक्रिय होत होते; त्यांनी सभा घ्यायला सुरवात केली होती. सभांमधून ते केंद्र सरकार पंजाबला सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप करीत होते. या सगळ्या घडामोडींमधून आम्हाला बदलत्या वाऱ्यांचा अंदाज येत होता.

राजकीय घडामोडींसाठी एक पृष्ठभूमी तयार करावी लागते. ज्या मुद्द्यांना लोकांनी मान्यता द्यावी असं आपल्याला वाटतं तो प्रत्येक मुद्दा परिपक्व आणि स्वीकारार्ह होत जाणं श्रेयस्कर असतं. ऑपरेशन ब्ल्यू स्टारनंतर लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी घाईघाईत केलेल्या या प्रयत्नाचं पुरेसं स्वागत झालं नाही. सर्व अकाली नेत्यांनी त्यांच्या राजकीय पदांचे राजीनामे दिले होते, आणि नंतर मागं घेतले. ते केंद्र सरकारवर सडकून टीका करायचे आणि शांततेसाठीही प्रयत्नही चालू ठेवायचे. विचित्र भाग म्हणजे दहशतवादी गटांनी स्वतःला या सगळ्यापासून लांब ठेवलं होतं. त्यांच्या कारवाया सुरूच होत्या. जून १९८५पासून दोन्ही पक्षांनी सद्‌भावना दाखवायला सुरवात केली होती. आम्ही जणू काही ठरवून अनिर्णित राहणारा मैत्रीपूर्ण सामना पाहत होतो. या सद्‌भावपूर्ण वातावरणात मंडचा विषय मागं पडला होता.

एरवी कार्यालयांमध्ये न फिरकणारे अकाली नेते एकदम राजकीय घडामोडींमध्ये व्यग्र झाले. जुलैच्या २३ तारखेला झालेल्या शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष संत हरचंदसिंग लोंगोवाल आणि पंतप्रधानांच्या बैठकीत पंजाबमध्ये शांतता आणण्याचा निर्धार व्यक्त झाला. जवळपास एक दशक दहशतवादाच्या वणव्यात होरपळत असलेल्या पंजाबमध्ये शांतता आणण्याचं आणि विकासाला चालना देण्याचं सूत्र देणाऱ्या पंजाब करारावर दोन्ही पक्षांच्या सर्वोच्च नेत्यांनी दुसऱ्या दिवशी स्वाक्षऱ्या केल्या. त्याला भरपूर प्रसिद्धी देण्यात आली. आनंदपूर साहब इथं झालेल्या एका सभेत अकाली कार्यकर्त्यांनीही सर्वमान्यतेनं या कराराला पाठिंबा दिला. प्रत्यक्ष फिल्डमध्ये फिरणारा अधिकारी म्हणून या घटनांकडे पाहताना हा पंजाब नावाच्या प्रयोगशाळेत होत असलेला आणखी एक राजकीय प्रयोग आहे, असं मला वाटत होतं. लोकांना हा विषय समजावून देऊन मग त्यांना त्यावर निर्णय घेण्यासाठी वेळ द्यायला हवा, असं मला वाटत होतं. आर्थिक आणि अन्य पॅकेजेस बरोबरच करारात पंजाबमध्ये सप्टेंबर १९८५च्या शेवटच्या आठवड्यात निवडणुका घेण्याचंही ठरलं होतं. आम्हीही आता दहशतवादाशी लढण्यावरून आमचं लक्ष निवडणुकांवर केंद्रित केलं होतं.
राजकीय पक्ष उत्साहात असले तरी करार थोडा घाईत, पुरेसे नियोजन न करता आणि जराशा उतावीळपणेच झाला, असं मला वाटत होतं.

आपल्या व्यवस्थेत आम्ही शासनाच्या आदेशावर प्रश्न उभे करणं अपेक्षित नाही. शासनाचे आदेश अधिकाधिक चांगल्या रितीनं कसे अंमलात येतील हेच आम्ही पाहतो. त्यामुळे मंड आता माझ्या मनातून हद्दपार झाले होते आणि निवडणूक सगळ्यात महत्त्वाची बनली होती. आमचे महासंचालक (डीजीपी) एस. डी. पांडे परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले होते. जालंधरमध्ये त्यांनी जिल्ह्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. आम्ही निवडणुकांसाठी पूर्णपणे तयार आहोत याची ग्वाही आम्ही त्यांना दिली. ‘‘हे योग्य दिशेनं उचललेलं पाऊल आहे, असं वाटतं का तुम्हाला?,’’ त्यांनी बोलता बोलता अचानक मला विचारलं. इतक्‍या घाईत घेतलेला निवडणुकांचा निर्णय उद्दिष्टप्राप्तीत अडथळा ठरू शकतो, असं मला वाटतं; पण आता निवडणुका जाहीर झाल्या आहेत, त्यामुळे आपल्याला आता त्या घ्याव्याच लागतील, असं मी त्यांना अत्यंत अदबीनं सांगितलं.

मी आधीच सांगितल्याप्रमाणे हिंसाचार सुरूच होता. निवडणुकांच्या तयारीत बरोबर आम्ही दहशतवादालाही तोंड देत होतो. पंजाबमधला अनेक वर्षांचा दहशतवाद आणि हिंसाचार संपवू पाहणारा ऐतिहासिक करार करण्यात रस घेणाऱ्या तरुण पंतप्रधानांसाठीही ती एकप्रकारे अग्निपरीक्षाच होती. माझी भीती खरी ठरली. कराराचे एक मुख्य प्रणेते असणाऱ्या संत लोंगोवाल यांची दहशतवाद्यांनी २० ऑगस्टला संगरूर इथं गोळ्या घालून हत्या केली. निवडणुका अजून बऱ्याच पुढे होत्या; पण सरकार निवडणुका लांबवण्याच्या किंवा पुढे ढकलण्याच्या मनस्थितीत नव्हतं. दुसरीकडे, निवडणुका कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, सगळ्या कॉंग्रेस आणि अकाली नेत्यांना गोळ्या घालू, अशा धमक्‍या अतिरेक्‍यांकडून मिळत होत्या.
निवडणुका शांततापूर्ण वातावरणात होणं आणि उमेदवारांची सुरक्षा दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या होत्या. दहशतवाद्यांना कोणतीही संधी न देणारी योजना आम्हाला आखायची होती. हिट-लिस्टवर असणारे तीन महत्त्वाचे नेते जालंधरमधून निवडणुकीच्या रिंगणात होते. मी त्या जिल्ह्याचा वरिष्ठ पोलिस अधीक्षक होतो. या तिघांच्याही सुरक्षेसाठी आम्हाला फूलप्रूफ प्लॅन करायचा होता. मतदारसंघातल्या त्यांच्या सभा, त्यांचे जाण्यायेण्याचे मार्ग, त्यांच्या मुक्कामाच्या जागा अशा सगळ्या ठिकाणी आम्हाला पुरेशी सुरक्षा द्यायची होती. त्याशिवाय त्यांच्या प्रचारासाठी येणाऱ्या अन्य महत्त्वाच्या व्यक्ती आणि त्यांच्या सभाही होत्या. पंतप्रधानांच्या दोन सभा माझ्या जिल्ह्यात झाल्या.

निवडणुका शांततेत पार पडल्या. निकाल जाहीर झाले आणि शिरोमणी अकाली दल- भारतीय जनता पक्षाच्या आघाडीनं बहुमत मिळवून सप्टेंबरच्या ३० तारखेला पंजाबमध्ये सरकार स्थापन केलं. या सगळ्या राजकीय घडामोडीमध्ये मंडकडे कोणाचंच लक्ष नव्हतं.

नवं सरकार आल्यानंतर साधारणतः बदल्यांचा धडाका उडतो. नव्या सरकारनं काढलेल्या बदल्यांच्या पहिल्याच आदेशात माझंही नाव होतं. माझी जालंधरहून अमृतसरला वरिष्ठ पोलिस अधीक्षक म्हणून बदली झाली होती. म्हणजे मी आता मंडच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे आलो होतो. ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात मी नवा पदभार स्वीकारला. नव्या जिल्ह्यातल्या सगळ्या पोलिस ठाण्यांना भेटी देताना मी हरिकेमध्ये आलो आणि मंडबरोबरच्या माझ्या जुन्या ओळखीला उजाळा मिळाला. निवडणुकांच्या काळात बऱ्याचशा दहशतवाद्यांनी सुरक्षित जागा म्हणून मंडवर मुक्काम हलवला होता, असं तिथल्या ठाणेदारांकडून समजलं. जणू काही पुन्हा सक्रिय होण्यासाठीच मंड माझी वाट पाहत होतं. आता मी अमृतसरचा वरिष्ठ पोलिस अधीक्षक होतो आणि अमृतसरच्या बाजूनंही मंडवर होणाऱ्या दहशतवाद्यांच्या हालचालींना पायबंद घालणं ही माझीच जबाबदारी होती. मी आता त्या दिशेनं योजना आखायला सुरवात केली आणि सर्वांत आधी फोन करून मी करमसिंग यांना भेटायला बोलावलं.
(क्रमशः)
(या लेखातील काही स्थळांची आणि व्यक्तिंची नावे बदलली आहेत.)
(या लेखाचे बौद्धिक संपदा हक्क लेखकाकडे आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com