
भारतीय शास्त्रीय संगीतात ज्यांना 'संगीतमार्तंड' अशा सार्थ बिरुदानं संबोधलं जातं ते पंडित जसराज, यांचं नुकतंच (ता. १७ ऑगस्ट) निधन झालं. त्यानिमित्त त्यांच्या शिष्येनं गुरुजींच्या अर्थात जसराजजींच्या जागवलेल्या या आठवणी...
गुरुजींबद्दल अर्थात पंडित जसराजजींबद्दल खरंतर मी काय सांगणार? त्यांनी शिकवलेल्या मार्गानं आम्ही शिष्यांनी चालणं हेच त्यांच्याविषयी आदर व्यक्त करणं आहे. त्यांनी आम्हा शिष्यांचं आयुष्य उजळून टाकलं. आपल्या शिष्यांमध्ये त्यांनी कधीच भेदभाव केला नाही. सगळ्यांना सतत प्रेम दिलं. त्यांच्याकडून आम्हाला सतत सकारात्मक ऊर्जा मिळत असे.
शास्त्रीय संगीतात चांगला गुरू मिळणं ही खूप मोठी बाब असते. गुरुजींसारखा गुरू मिळणं हे माझं खरोखरच भाग्य आहे असं मला नेहमी वाटतं. शास्त्रीय गायनाच्या क्षेत्राबद्दलचे लेख आपण जेव्हा वाचतो किंवा किस्से ऐकतो तेव्हा त्यातून गुरूंबद्दलच्या वेगवेगळ्या प्रतिमा आपल्या मनात उभ्या राहतात, काही गुरू तापट, कठोर, अतिशय कडक असल्याचं वाचायला मिळतं; पण इथं तर सगळा वेगळाच प्रकार होता. आमचे गुरुजी अत्यंत प्रेमळ आणि शिष्यांना सतत प्रोसाहन देणारे होते. त्यांना तंबोऱ्याची साथ करताना आपण योग्य जागा घेतली तर, एखादी तान चांगली घेतली तर, मुखडा नेमकेपणानं म्हटला तर अथवा समेवर बरोबर येत पुढचं गाण म्हटलं तर आनंदानं ते म्हणत : 'जियो बेटा'. मंचावर साथीच्या वेळी आपण चांगलं काही केलं तर माग वळून ते त्याबद्दल दाद देत. "जियो बेटा" हे त्यांचे शब्द कुठल्याही पुरस्कारापेक्षा मोठे वाटत, आपण बरोबर करतोय असा आत्मविश्वास येई व बळ मिळे.
मला ते गुरू म्हणून लाभले ते मी अगदी लहान असतानाच. माझी आई नीला घाणेकर ही माझी पहिली गुरू. तिच्याकडे मी शास्त्रीय गायनाचे धडे गिरवत असताना मला संगीतशिक्षणासाठी केंद्र सरकारकडून शिष्यवृती मिळाली. ही शिष्यवृती मिळवण्यासाठी आपल्या गायनाची तयारी किती आहे ते संबंधित लाभार्थींना परीक्षकांपुढं सादर करावं लागतं. माझी जी परीक्षा झाली गुरुजींसमोर. तेच परीक्षक होते. त्यांची पसंती मिळाली.
मी लहान असल्यानं मला गुरुजींची कीर्ती आणि त्यांचं संगीतक्षेत्रातलं स्थान माहीत नव्हतं. मात्र,
आपल्या मुलीला गुरुजींनी शिक्षण द्यावं असा माझ्या आईला फार वाटत असे. आम्ही या परीक्षेनंतर गुरुजींना विचारलं व त्यांनी मला शिकवायचं कबूल केलं. मी गुरुजींकडे शिकायला जाऊ लागले. गुरुजी तेव्हा मुंबईत दादरमध्ये शिवाजी पार्कला राहत असत. मी त्यांच्याकडं शिकायला जाऊ लागले. पहिला दिवस आजही माझ्या लक्षात आहे. मी त्यांच्याकडं दुपारी शिकायला गेले होते, त्या वेळी रागांच्या वेळेनुसार त्यांनी मला पहिल्यांदा मुलतानी राग शिकवला.
गुरुजींनी इतक्या प्रदीर्घ कालावधीत शिष्यांच्या अनेक पिढ्या घडवल्या. आम्ही शिष्य जेव्हा एकमेकांना भेटतो तेव्हा, गुरुजींनी काय शिकवलं, याचीच चर्चा होते. आपल्याकडचं अक्षय्य ज्ञान सतत देत राहायचं हा त्यांचा वसा होता. ते अत्यंत मनमोकळ्या स्वभावाचे होते. त्यांच्या शिकवण्यात अगदी सहजता होती.
शिकवत असताना आपल्या आयुष्यातले वेगवेगळे अनुभव, वेगवेगळे किस्से ते आम्हाला सांगत. त्यांनी संगीतात कुठली बाब कमी प्रतीची कधी मानली नाही किंवा चित्रपटसंगीत, सुगम संगीत हे दुय्यम संगीत आहे अशी त्यांची धारणा नव्हती. मी चित्रपटक्षेत्रात गाऊ लागले तेव्हा माझ्या त्या गायनाचंही त्यांना कौतुक होतं. मी एकदा दिल्लीत मैफल केली. तीत मी सादर केलेला बिहाग राग आणि टप्पा याचं त्यांनी आवर्जून कौतुक केलं होतं. त्यापूर्वी, त्यांनी परवानगी दिल्यावर मी पुण्यात सवाई गंधर्व महोत्सवात सहभागी झाले होते. त्या वेळी पूरिया धनाश्री हा राग मी सादर केला होता. त्याचंही त्यांनी खूप कौतुक केलं होतं. शिष्यांनी केलेल्या छोट्या छोट्या गोष्टींनी त्यांना आनंद होत असे. मला त्यांचा खूप सहवास मिळाला नाही; पण सहा-सात वर्षं मी शिवाजी पार्कच्या त्यांच्या घरी जात असे. तिथं त्यांच्या पत्नी मधुरा, मुलगी दुर्गा, मुलगा शारंगदेव यांची भेट होत असे. मधुराताईंना आम्ही वहिनी म्हणत असू, या तिघांचंही मला खूप प्रेम मिळालं. काही वेळा मी त्यांच्याकडे जेवायलाही थांबलेली आहे. गुरुजींकडून आणि त्यांच्या घरातल्यांकडून मला सदैव प्रेमच मिळाले आहे.
गुरुजींना त्यांच्या थोरल्या बंधूंबद्दल खूप आदर होता. हे त्यांचे थोरले बंधू हेच त्यांचे गुरू होते. गुरूंचा आदर कसा ठेवायचा हे त्यांनी आपल्या कृतीतून आम्हाला दाखवून दिलं. माणूस म्हणून ते त्यांच्या गायकीइतकेच मोठे होते. ज्यांना ते मदत करत त्या मदतीचा उच्चारही ते नंतर कधी करत नसत. त्यांनी अनेकांना मदत केली, ती आम्हाला इतरांकडून किंवा वर्तमानपत्रांतल्या लेखनामधून कळत असे. गुरुजींना अनेक मानाचे पुरस्कार मिळाले. हे सगळे पुरस्कार त्यांच्याकडे चालत आले. त्यांना 'भारतरत्न' हा सन्मानही मिळायला हवा होता असं मला वाटतं.
संगीताकडं ते कसं पाहत किंवा त्यांच्या गायनाबद्दल काही मत व्यक्त करावं इतकी मोठी मी मुळीच नाही; पण त्यांचं गायन हे आध्यात्मिक आनंद देणारं होतं, त्याचबरोबर त्यांच्या गायनातून दैवी अनुभूती मिळत असे. त्यांची मैफल सुरू झाल्यावर एक वेगळं वातावरण तयार होई. भैरवीच्या वेळी तर अनेकांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत असत. गुरुजींची अनेक भजनं श्रोत्यांनासुद्धा पाठ आहेत. त्यांच्या प्रत्येक भजनाच्या वेळी वातावरण भारल्यासारखं होई. 'गोविंद दामोदर माधव... 'किंवा 'माता कालिकादेवी' ही भजनं जेव्हा गुरुजी गात असत तेव्हा सारं वातावरण भक्तिरसानं भरलेलं असे.
गुरुजींनी शास्त्रीय संगीतात दिलेलं योगदान अमूल्य आहे. त्यांनी बांधलेल्या बंदिशी, रागांचा विस्तार हे सारं अभूतपूर्व आहे. राग सादर करताना त्यांनी शब्दाला जे महत्त्व दिलं ते वेगळंच होतं. भाव, रस आणि शब्द यांच्या समन्वयातून रंजन करताना ते आपल्या गायनातून दैवी अनुभूती देत. ते गात असताना जे पावित्र्य जाणवत असे ते अलौकिक असायचं...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.