शेतकऱ्यांच्या लेकींसाठी... (संदीप काळे)

शेतकऱ्यांच्या लेकींसाठी... (संदीप काळे)

रूढी -परंपरांना गच्च धरून बसलेला समाज म्हणून ज्या मराठा समाजावर शिक्का बसलेला आहे. तो मराठा समाज या वसतिगृहाच्या निमित्तानं काही तरी वेगळं करतोय; मुलींच्या शिक्षणासाठी तन, मन, धनानं पुढाकार घेतो हे ऐकून मला खूप चांगलं वाटलं. त्या वसतिगृहाच्या निर्मितीमागं किती खाचखळगे होते, कसे कसे किस्से घडले, कसा निधी जमा होत गेला, मुलींचं एक मोठं वसतिगृह आज कसं उभं राहलं हे सगळं मामा मला सांगत होते. मामाच्या मराठा सेवासंघात काम करणाऱ्या मित्रांनी या वसतिगृहाच्या निर्मितीबाबतचा सर्व इतिहास मामांना सांगितला होता, तोच आता मामा मला सांगत होते. रस्त्यानं चालत असताना एक तासभर गप्पांच्या ओघात कसा गेला हे आम्हाला कळलेच नाही.

मी त्या दिवशी लातूरचा दौरा करून नांदेडला निघालो. रस्त्यानं निघताना पत्रकार शिवाजी कांबळे यांचा चेहरा माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हता. राज्यातल्या नव्हे देशात असणाऱ्या शिवाजीसारख्या पत्रकारांसाठी आपण काही तरी करायचंच ही भावना मनात घर करून होती. पत्रकारांच्या बाबतीत असणारी माझी अस्वस्थता मला चिंतेच्या खाईत लोटत होती. लातूरहून नांदेडला पोहोचेपर्यंत पाठीची हाडं अगदी खिळखिळी होऊन गेली होती. या वाईट असणाऱ्या रस्त्याला आशीर्वाद कुणाचा समजायचा? पिढ्यान्‌ पिढ्या एकच घराणं नेतृत्व करत असलं म्हणून साधा दोन जिल्ह्यांना जोडणारा चांगला रस्ता जमला नसेल काय, असा प्रश्‍न माझ्या मनात पडला होता. या भागात असणाऱ्या रस्ते आणि एकूण भकास परिस्थती याची कोणतीही उत्तरे मला मिळत नव्हती. जसजसं नांदेड जवळ येत होतं, तसे रस्ते, पाणी यांसारखे गंभीर प्रश्‍न मला अधिक दिसत होते. शहरात आल्यावर मी, माझे मामा भागवतराव निरगुडे यांना फोन केला. मी नांदेडला पोहोचलो असा निरोप मामांना दिला. मामा आणि माझा एक कॉमन मित्र आहे. श्‍याम व्यंकटराव देशमुख असं त्याचं नाव. धनेगावात राहणाऱ्या श्‍यामची आजी कोंडाबाई देशमुख यांचं निधन झालं होतं. श्‍यामला भेटायला मी आणि मामा दोघंही जाणार होतो. मी मामाला निरोप दिल्यावर थोड्या वेळात मामा आले. आम्ही दोघेही मिळून धनेगावकडं निघालो. रस्त्यानं जाताना आम्ही दोघांनी श्‍यामच्या आजीविषयी चर्चा केली. मामांनी अनेक सामाजिक उपक्रम, टेंट हाउसचा व्यवसाय नांदेड आर्धापूरमध्ये सुरू केलेले आहेत. त्यावरही आम्ही मोकळेपणानं चर्चा करत होतो. धनेगावला पोहोचलो. श्‍याम आणि घरातल्या सगळ्या माणसांशी भेटलो. श्‍यामचं आम्ही सांत्वन केलं. निघताना मी श्‍यामला म्हणालो, आता तेरवीला काही येणं होणार नाही. त्यामुळं माझी वाट पाहू नकोस. थोडं शांत होऊन श्‍याम म्हणाला, नाही आम्ही तेरवी करणारच नाही. तेरवीसाठी जो खर्च आम्ही करणार होतो, तो माझ्या काही मित्रांनी सुचवल्याप्रमाणे आम्ही नांदेडमध्ये होत असलेल्या शेतकऱ्यांच्या मुलींच्या वसतिगृहाला देऊन टाकला. मी शांत झालो आणि श्‍यामकडं बघत म्हणालो, हे करण्यासाठी तुला घरच्यांनी परवानगी दिली कशी? म्हणजे तेरवीसारखी परंपरा मोडून कुठल्या तरी सामाजिक कामासाठी पैसे द्यायचे, यासाठी जरा हिंमत लागतेच. श्‍याम म्हणाला, घरच्यांना सगळं समजावून सांगितलं. त्यांनाही ते पटलं, त्यामुळं त्यांनी होकार दिला असावा. श्‍याम मला जे काही सांगत होता, ते माझ्यासाठी धक्कादायक होतं. एखाद्या सर्वसामान्य किंवा इतर कुटुंबातल्या बाबतीमध्ये असणारी परंपरा मोडायची आहे असं ठरवलं तर ते सहज शक्‍य झालं असतं, पण एखाद्या देशमुख कुटुंबीयांमध्ये असणारी परंपरा मोडायची म्हणजे ते नक्कीच सोपं नव्हतंच. थोडं पुढं आलो आणि गाडी थांबवून मी मामांना म्हणालो, थोडं पायी फिरूया. आम्ही गाडीतून उतरलो. रस्त्यानं चालत आसताना मी मामांना शेतकऱ्यांच्या मुलीबद्दल करण्यात येत असलेल्या वसतिगृहाचा विषय काढून बोलत होतो. खरं तर माझ्यासाठी हा वसतिगृहाचा विषय म्हणजे समाजपरिवर्तनाचं एक मोठे मॉडेल होतं. जे मॉडेल प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणीच नव्हे, तर तालुक्‍याच्या ठिकाणी उभं राहणं गरजेचं होतं. मी वेगवेगळे पैलू मामांना या वसतिगृहाबाबत विचारत होतो. मामा मला सांगत होते, खरं तर या कामासाठी कुणा एका व्यक्तीचं नाव नाही. कोणीच मी अध्यक्ष आहे, मी पुढाकार घेतला आहे, म्हणून या वसतिगृहाच्या निर्मितीच्या अनुषंगानं स्वतःचं नाव लावत नाही. हे वसतिगृह उभारण्यासाठी शेकडो हात एकत्र आले आहेत. ज्यांना वाटतं गरीब अल्पभूधारक शेतकऱ्यांची मुलगी शिकली पाहिजे. मामांच्या सांगण्यावरून अनेक पैलू माझ्या समोर येत होते. जे ऐकून मी आश्‍चर्यचकित होत होतो. म्हणजे हे वसतिगृह उभं करण्यासाठी अनेकांनी आपले वाढदिवस, लग्न, तेरवी, वास्तुशांती यांसारखे अनेक समारंभ रद्द करून त्यासाठी येणारा पूर्ण खर्च ते वसतिगृह उभं करण्यासाठी दिला होता. मग त्यामध्ये असणारी रक्कम ही पाचशे रुपयांपासून ते पाच लाख रुपयांपर्यंत होती. मागच्या पाच वर्षांत एक दोन हजार नव्हे, तर ही जमा झालेली रक्कम दीड कोटी रुपये झालेली होती. या दीड कोटी रुपयाचं बांधकामही झालंय. लोक कसे पुढाकार घेतात, कमाल आहे ना? एक मुलगी शिकली तर ती सावित्री-जिजाऊ कशी निर्माण होऊ शकते, हा परिवर्तनवादी विचार लोकांच्या मनात येऊ शकतो, याचं हे वसतिगृह उत्तम उदाहरण होतं. जी माणसं या वसतिगृहासाठी काम करतात, त्यांचं नाव कोणालाही माहीत नाही याची मला कमाल वाटत होती. आपल्याकडं छोटासा जरी काही उपक्रम राबवत असेल, तर त्याचं श्रेय घेण्यासाठी लोकांच्या उड्या पडलेल्या असतात. मामा मला बोलताना सांगत होते, या मी कुठलाही आमदार, खासदार निधी यांसारखी मदत घ्यायची नाही. एवढ्या पवित्र कामासाठी राजकारण पुढं नाही आलं पाहिजे, ही भूमिका त्यामागं होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून, शिवजयंती, जिजाऊ जयंती, बाबासाहेबांची जयंती अशा उपक्रमांतून माध्यमातून लोकांपर्यंत हा निधी गोळा करायचा विषय सर्वांनी मिळून पोहोचवला. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. भागवत मामा मला हे सर्व सांगत होते आणि मी ऐकत होतो.

रूढी -परंपरांना गच्च धरून बसलेला समाज म्हणून ज्या मराठा समाजावर शिक्का बसलेला आहे. तो मराठा समाज या वसतिगृहाच्या निमित्तानं काही तरी वेगळं करतोय; मुलींच्या शिक्षणासाठी तन, मन, धनानं पुढाकार घेतो हे ऐकून मला खूप चांगलं वाटलं. त्या वसतिगृहाच्या निर्मितीमागं किती खाचखळगे होते, कसे कसे किस्से घडले, कसा निधी जमा होत गेला, मुलींचं एक मोठं वसतिगृह आज कसं उभं राहलं हे सगळं मामा मला सांगत होते. मामाच्या मराठा सेवासंघात काम करणाऱ्या मित्रांनी या वसतिगृहाच्या निर्मितीबाबतचा सर्व इतिहास मामांना सांगितला होता, तोच आता मामा मला सांगत होते. रस्त्याने चालत असताना एक तासभर गप्पांच्या ओघात कसा गेला हे आम्हाला कळलंच नाही. आम्ही गाडीत बसलो तेव्हा मी मामांना म्हणालो, मामा, आपल्याला पहिल्यांदा मला त्या वसतिगृहामध्ये जायचं आहे आणि नंतर मग पुन्हा बाकीच्यांच्या भेटीगाठी करू. आम्ही वसतिगृहाच्या दिशेनं निघालो.

नांदेडच्या नवा मोंढा भागात एस.बी.आय. बॅंकेच्या मागं या मुलींच्या वसतिगृहाची चार मजली इमारत उभी झाली आहे. आम्ही तिथं गेलो. त्या वसतिगृहासाठी पुढाकार घेऊन काम करणारे काही जण मी जाण्यापूर्वीच तिथं होते. त्या सर्वांशी मी बोलत होतो. प्रत्येक जण आमचं नाव छापून आलं नाही पाहिजे असं आवर्जून सांगत होते. मामाही तिथं पहिल्यांदा आले होते. एक जण आम्हाला बोलताना सांगत होता. आज या इमारतीचं पुढचं काम थांबलं आहे. सध्या पैशांची आवक कमी झाली. अजून चाळीस लाख उभे करून हे काम पूर्ण करायचं आहे. कंपाऊंड वॉल, दरवाजे, लिफ्ट, पंखे, बाथरूमचं काम असं काम अजून शिल्लक आहे. अजून काही लोकांचे हात या शिल्लक राहिलेल्या कामासाठी लागले, तर हेही काम मार्गी लागेल. मी त्या बोलणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींना बोलताना म्हणालो, ही सगळी कल्पना सुचली कशी? अशा पद्धतीचं वसतिगृह उभं राहिलं पाहिजे, ते ग्रामीण भागातल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मुलींसाठी असलं पाहिजे, यामागं कोणतं गणित होतं. ती व्यक्ती म्हणाली, या वस्तीत वसतिगृहाच्या बाजूला यशवंतराव चव्हाण हे एक शेतकऱ्यांच्या मुलांचं वसतिगृह आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मुलांना या वसतिगृहात प्रवेश दिला जातो. म्हणजे माजी खासदार केशवराव धोंडगे यांच्यापासून अनेक व्यक्ती या वसतिगृहामध्ये शिकलेल्या आहेत. अनेक वर्षांपासून जसं मुलांचं वसतिगृह आहे, तसेच मुलींचं असावं ही मागणी सातत्यानं पुढं येत होती. जेव्हा मुलांच्या वसतिगृहात प्रवेश सुरू असायचे, तेव्हा अनेक मुली, त्यांचे पालक या वसतिगृहात आम्हाला प्रवेश द्या असे म्हणायचे. या मुली बिचाऱ्या घरच्या इतक्‍या गरीब असायच्या की विचारू नका. इथं प्रवेश नाही मिळाला म्हणजे त्यांना शिक्षणावाचून घरी राहिल्याशिवाय पर्यायच नव्हता. ग्रामीण भागातील गरीब मुलींची होणारी सगळी कुचंबणा लक्षात घेऊन हा विषय पुढे आला. मग सर्वांनी हे करायचंच असं ठरवलं आणि ते आता पूर्णत्वाकडं जात आहे. चिंतेचा सूर काढत तीच व्यक्ती मला सांगत होती, खरं तर याच वर्षी या वसतिगृहामध्ये मुली प्रवेश घेणार होत्या, पण निधीअभावी बांधकाम थांबलं आहे. अजून ४० लाख रुपयांची व्यवस्था झाली, तर हे बांधकाम पूर्णत्वास येईल. मीही एकदम विचारात पडलो, हे चाळीस लाख जमतील कसे. एकदोन नाही तर तब्बल २७ खोल्यांचं बांधकाम या ठिकाणी करण्यात आलं आहे. एका खोलीमध्ये सहा ते आठ मुली राहू शकतात. ज्या मुली कधीच शहराचं तोंडही पाहू शकत नाहीत, कॉलेजची पायरी चढू शकत नाहीत, अशा २०० होतकरू मुली येथे राहून शिकणार आहेत. विचार करा, दोनशे सावित्री जर शिकल्या तर समाजपरिवर्तनाचं केवढं मोठं काम उभं राहील? म्हणजे जेव्हा मी हे सगळं वसतिगृह बारकाईनं बघत होतो, तेव्हा कुठेही वाटत नव्हतं, हे कुठलं तरी वसतिगृह आहे इतकं छान अगदी तारांकित हॉटेलसारखं. सगळ्या प्रकारच्या सुविधा या वसतिगृहामध्ये मला पाहायला मिळत होत्या. मी त्या व्यक्तीला म्हणालो, जर कुणी एकदोन अशा व्यक्ती पुढे नसतील, तर मग पैसे देणं-घेणं सगळा व्यवहार हे कसं बघता. तुम्ही तर म्हणताय, कोणा एका व्यक्तीचा पुढाकार नाही, पण आर्थिक व्यवहार बॅंकेमध्ये तर करावाच लागेल ना? ती व्यक्ती मला म्हणाली, यशवंतराव चव्हाण या मुलांच्या वसतिगृहाचं काम पाहणारे, ज्यांनी अनेक वेळा आपल्या घरातला पैसा लावून ते वसतिगृह चालवलं ते मधुकरराव देशमुख (८३९०६४४६६८), शेरा पाटील (९४२२१७०६२०), आणि सोपान क्षीरसागर हे वसतिगृह उभारणीच्या कामाचं अर्थशास्त्र सांभाळतात. 

आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या तिघांच्या सहीने इथलं काम चालतं. त्या तिघांनीही आपलं कधीही नाव पुढे येऊ दिलं नाही.

आपण ठरवलं तर समाजाच्या वेगवेगळ्या प्रथा मोडून चांगलं काम उभं करू शकतो याचं नांदेडमध्ये उभारलेलं हे मुलींचं वसतिगृह उत्तम उदाहरण होतं. सरकार म्हणजे काय? तर तुम्हीआम्हीच ना? सरकारचा निधी येईल तेव्हा एखादं काम करू. ही वाट कशाला बघायची, नाही का? चांगल्या लोकांनी ठरवलं तर लोकसहभागातून कुठलंही काम जबरदस्तपणे उभं राहू शकतं. ते काम समाजामध्ये चिरंतन टिकणारं होऊ शकतं. याचं हे वसतिगृह उत्तम उदाहरण होतं. येथे अनेक लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं मदत केली होती. म्हणजे निधी एवढाच भाग नव्हता. कोणी कामासाठी ट्रॅक्‍टर दिलं. कोणी पाण्यासाठी टॅंकर दिले. कोणी सिमेंट, कोणी लोखंड दिलं. वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांचे हात या कामासाठी लागले होते. आता तरीही या कामाला अजून लोकांचा हातभार लागणं गरजेचं आहे. राज्यातल्या कानाकोपऱ्यातून लोकांनी या कामासाठी निधी दिला आहे. मी विचार करत होतो, हे एवढं मोठं काम नांदेडमध्ये उभं राहू शकतं, तर मग प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी का उभं राहू शकत नाही. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी भूमिगत होऊन काम करणारे अनेक जण एकत्र येऊन या प्रकारचं काम हाती का घेऊ शकत नाहीत? शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर जेव्हा मी पीएच.डी. करत होतो, तेव्हा लग्नाच्या मुली, त्यांचा होणारा खर्च, त्यांचा अशिक्षितपणा याचं करायचं काय, हा प्रश्‍न डोक्‍यात घेऊन अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या मी पाहिल्या, अभ्यासल्या आहेत. प्रत्येक शहराच्या ठिकाणी अशा वसतिगृहाच्या माध्यमातून जर दोनशे मुली शिकणार असतील, तर या आत्महत्या होणारच नाहीत. कारण या मुली भविष्यात आपल्या त्रस्त शेतकरी बापाला शिक्षणामुळं चालना देण्याचं काम करतील. केवळ आत्महत्या हाच विषय नाही, तर मुलींच्या शिक्षणाचा आलेखही खूप मोठ्या प्रमाणात वाढेल नाही का? असे प्रश्‍न माझे मलाच मी विचारत होतो. सर्व वसतिगृह पाहणं झाल्यावर मी बाहेर आलो.

माझ्यासोबत असणाऱ्या दोन्ही व्यक्तींना मी म्हणालो, या मोठ्या कामासाठी पुढाकार कोणी घेतला, कारण या कामासाठी पुढाकार घ्यायला तशी हिंमतच लागेल. ते दोघेही म्हणाले, मराठा सेवा संघानं या कामी पुढाकार घेतला होता. त्यांनी सुरुवात करून दिली आणि मग बघता बघता हे छोटंसं काम खूप मोठ्या प्रमाणात उभं राहिलं. केवळ मराठा, शेतकरी असा कुठलाही भेदभाव न करता, सर्व जाती-धर्मांच्या लोकांनी या उपक्रमासाठी भरभरून मदत दिली आहे. मी त्या दोन्ही व्यक्तींना म्हणालो, जेव्हा तुम्ही या वसतिगृहामध्ये मुलींचे प्रवेश सुरू कराल, तेव्हा तुमचे निकष काय असतील. ते म्हणाले, मुलगी अल्पभूधारक शेतकऱ्याची असावी. गरीब असावी. तिचे मार्क बघितले जातील. मेरीट असणाऱ्या मुलींना प्राधान्य दिले जाईल. असं इथल्या प्रमुख असणाऱ्या काही लोकांनी ठरवलं आहे. मी आणि मामा वसतिगृहाच्या बाहेर आलो. त्या वसतिगृहाला अगदी डोळे भरून पाहत मी उभा राहिलो. मला ते वसतिगृह म्हणजे एक पवित्र मंदिर वाटत होतं. ज्या मंदिराच्या माध्यमातून एक मोठं काम उभं राहिलेलं आहे. मी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या भागांत भेटी देतो. वेगळ्या लोकांशी बोलतो. वेगळ्या ठिकाणचे काम पाहतो, पण हे वसतिगृहाचं काम मला त्या सगळ्या कामांमध्ये पवित्र वाटत होतं. या कामातून जिजाऊ, सावित्री, रमाई घडणार आहेत. या कामातून स्त्रीशिक्षणाची एक चळवळ उभी केली जाणार आहे. खरं तर एक नांदेड नाही तर राज्यातल्या प्रत्येक जिल्हा आणि तालुक्‍याच्या ठिकाणी अशा लोकसहभागातून वसतिगृहांची निर्मिती होणं खूप गरजेचं आहे नाही का? गरिबांच्या मुली मग त्या कोणत्याही जाती- धर्माच्या असोत त्या शिकल्या पाहिजेत. तुम्ही-आम्ही यासाठी पुढाकार घेणार आहोत ना? घ्यायलाच हवा ! न्यू नॉर्मल जगण्यातलं ते आपलं कर्तव्य आहे !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com