कळसूबाईच्या लेकी... (संदीप काळे)

sandip kale
sandip kale

आपल्या घरात कुणी कर्ता पुरुष नाही म्हणून कुणाची तरी मदत घेत राहावी हे स्वाभिमानी आजींना, त्यांच्या सुनेला आणि नातीलाही मान्य नव्हतं. आजींचा तो सगळा खमका‍ बाणा सुनेकडे आणि नातीकडेही झिरपत चालला होता...

ठिकाण : कळसूबाईचा पायथा. वेळ सकाळी सहाची. राज्यातल्या काना-कोपऱ्यामधून अनेक जण कळसूबाईचं शिखर चढण्यासाठी आलेले होते. प्रा. राम भिसे आणि मी गप्पा मारत शिखर चढायला सुरुवात केली. अवतीभोवती असणारे सगळे जण ‘हर हर महादेव’च्या घोषणा देत कळसूबाईची एकेक पायरी चढत होते. सभोवतालचं वातावरण नयनमनोहर होतं. वेगवेगळ्या प्रकारची झाडं-झुडपं, डोंगराचं सौंदर्य नजर खिळवून ठेवत होतं. कड्या-कपाऱ्या चढत असताना शिवकालीन इतिहास आणि त्या काळच्या लढाया डोळ्यांपुढे येत होत्या.

कळसूबाईची आख्यायिकाही श्रीकांत कासट यांनी सांगितली. एक स्वाभिमानी मुलगी जग सोडून तिथं येते आणि कळसूबाईदेवी होऊन जाते. तशी ती आख्यायिका खूप मोठी होती. या गडाला स्त्रीशक्तीचं नावं होतं ते यानिमित्तानं समजलं. आमच्याबरोबरचे सगळे जण गडभ्रमंती करणारे जुने खेळाडू होते. मी, भिसे सर त्या सगळ्यांच्या वेगापुढं मागं पडलो आणि एका ठिकाणी थांबलो. शिखर चढताना सुरुवातीपासून ते शेवटच्या ठिकाणापर्यंत प्रत्येक ठिकाणी छोटे छोटे विक्रेते आहेत. खाद्यपदार्थविक्रेते व इतरही काही विक्रेते. चहापाणी, न्याहारी, जेवण यांपासून ते पूजेच्या सामग्रीपर्यंत सर्व काही या विक्रेत्यांकडे मिळतं. हे विक्रेते आसपासच्या गावांतले आहेत. आम्ही ज्या छोट्याशा झोपडीवजा हॉटेलसमोर खाट टाकून बसलो होतो ते हॉटेल चालवणारेसुद्धा आसपासच्याच गावातले असतील असा आमचा अंदाज होता.

खाटेवरून पाठीमागं नजर वळवली तर चहूबाजूंनी छोटी छोटी खेडी दिसत होती. बारी, जहागीरदारी अशी गावं. काही खेडी तर सात-आठ घरांचीच होती. शिखर चढत असताना नेमका टप्पा त्या छोटेखानी झोपडीवजा हॉटेलपासूनच सुरू झालाय असं वाटत होतं. मी पाणी पिऊन ग्लास खाली ठेवत असताना माझी नजर सहज पुढं गेली आणि डोक्‍यात काहीसं चमकल्यासारखं झालं. अर्धा-पाऊण तास चढल्यावर उंच ठिकाण आल्यामुळे भिसे सरांच्या मोबाईलला रेंज आली होती. ‘मोबाईलला रेंज नाही, मोबाईलला रेंज नाही’ असं भिसे सर मला सकाळपासून म्हणत होते. माझी नजर ज्या हॉटेलवजा झोपडीकडे होती तिथं मला तिथं दोन महिला दिसल्या. त्यांच्या कपाळावर कुंकू नव्हतं. बाजूला एक मुलगी कांदे कापत बसली होती. तिच्याही चेहऱ्याचा नूर काहीतरी हरवल्यासारखा होता. थोडंसं पुढं गेलो आणि झोपडीच्या दाराशी जाऊन त्या आजींना विचारलं : ‘‘लिंबू-पाणी आणि फराळाला काही मिळेल का?’’
आजी म्हणाल्या : ‘‘हो. लिंबू-पाणी तुम्हाला लगेच देते. फराळाला थोडासा वेळ लागेल.’’

एका माठात हिरवीगार, टपोरी लिंबं होती. त्यातलं एक लिंबू आजीबाईंनी कापलं. बराचसं रस कापतानाच खाली पडत होता. आजींनी जेव्हा त्या पातेल्यात लिंबू पिळलं तेव्हा लक्षात आलं की लिंबात रस भरपूर प्रमाणात होता. अवघ्या काही मिनिटांत आजींनी
सरबत तयार केलं आणि दोन ग्लास आम्हाला दिले.
सरबत प्यायल्यावर मी म्हणालो : ‘‘आजी, लिंबाला खूपच चांगली चव आहे. कुठून आणलीत ही लिंबं?’’
आजी पलीकडे हात करत म्हणाल्या : ‘‘इथं खालीच एका शेतात
लिंबाची छोटीशी बाग आहे. तिथून सकाळीच आणलीत. ताजी असल्यामुळे लिंबाला चव आहे.’’
खरंतर त्या लिंबू-पाण्याला, सरबताला अशी काय चव असणार? पण
तहानेलेल्या आम्हाला ते साधंसं सरबतही चवदार लागलं. आजींनी प्रेमळपणे आणि मन लावून ते सरबत केल्यानं ही चव आणखी वाढली असणार असं आपलं मला वाटलं.
भिसे सरांनी अजून मोबाईलमधून डोकं बाहेर काढलंच नव्हतं. भेळ-मुरमुऱ्यांच्या फराळाच्या तयारीला आजी लागल्या. मी त्यांच्यासमोर बसलो. आजींना बोलतं केलं. बोलण्यात आजी चतुर होत्या, हे लक्षात आलं. ‘तुमच्याशी जे बोलत आहेत ते पत्रकार आहेत’ असा माझा परिचय भिसे सरांनी आजींना करून दिला. आजी काहीशा गोंधळून गेल्या. पत्रकार वगैरे असलं काही त्यांना माहीत असण्याचं काहीच कारण नव्हतं. गोंधळलेल्या आजींना मी पुन्हा बोलतं केलं.
दरम्यान, आजींनी त्यांची सून सविता हिचा परिचय करून दिला.
आजींशी गप्पांमधून बऱ्याच गोष्टी उलगडल्या.

नियती कुणावर कसा घाव घालेल आणि त्याचे परिणाम कसे होतील हे सांगता येत नाही. या आजी म्हणजे त्याचंच उदाहरण होतं. आजींचं कुटुंब खूप मोठं होतं. गप्पांची सांगता होत असताना आजी म्हणाल्या : मी हे सगळं तुम्हाला सहजच सांगितलं आहे. ते इतर कुणालाही सांगायची गरज नाही. माझ्या पाचवीला जे पूजलंय ते होत राहील. मला त्याचं भांडवल करून कुणाची मदत घ्यायची नाही. जोपर्यंत माझ्या जिवात जीव आहे, तोपर्यंत मी माझं कुटुंब वाऱ्यावर पडू देणार नाही. मला सहानुभूती मिळावी किंवा मदत मिळावी असं मी माझ्या आयुष्यात कधी वागत नाही आणि वागणारही नाही.’’
आजींच्या बोलण्या-वागण्यात कमालीचा स्वाभिमान होता. खूप खस्ता खाल्ल्यावर आणि खूप काळ बरंच काही सोसल्यावर आजींमध्ये एवढी मोठी ताकद आली होती हे दिसतच होतं.

आजींनी जे काही सांगितलं ते ऐकून, मी काळाचा महिमा कसा अजब असतो, या विचारात मी बुडून गेलो.
या आजीबाईंचं नाव शेवंता सखाराम मापणे. वय ८२ वर्षं. कळसूबाईच्या शिखराच्या खालीच एका वाडीत त्यांचं छोटंसं घर. त्यांच्या नवऱ्याचं नाव सखाराम मापणे. गावातल्या एका शेतकऱ्याकडे ते सालगडी म्हणून काम करायचे. काही वर्षांपूर्वी पावसाळ्यात आलेल्या पुरात सखाराम वाहून गेले. चार दिवसांनंतर पूर कमी झाला आणि एका मोठ्या झाड-झडोऱ्यात सखाराम यांचा मृतदेह शेवंताबाईंना आढळला. एक तर पुराचं पाणी आणि मृत्यू होऊन चार दिवसही उलटून गेलेले असल्यामुळे तो मृतदेह नीट अवस्थेत नव्हता.
त्या वेळी शेवंताबाई यांचा मुलगा रामा याचं लग्न झालं होतं.

मघाशी सून म्हणून ज्या सविताची ओळख आजींनी करून दिली होती ती या रामाची बायको. तिचं वय ३१. रामाचंही काही वर्षांपूर्वी निधन झालं. कळसूबाईच्या शिखरावर रामा सामान-सामग्री पोचवण्याचं काम करायचा. रात्रीच्या वेळी धाडसानं काम करणारा तरुण अशी रामाची ओळख होती. एकदा रामा रात्रीच्या वेळी शिखरावर सामान घेऊन जात होता. धो धो पाऊस सुरू झाल्यामुळे एका झाडाखाली तो थांबला. त्या झाडावर वीज कोसळली आणि त्यातच रामा जागेवरच मरण पावला.
एव्हाना भेळ तयार झाली होती. भेळ-मुरमुऱ्यांची प्लेट आजीबाईंनी आमच्या हाती दिली. सरबतापेक्षाही भेळ चवदार होती.
कांद्याचा भाव एवढा वाढलेला असतानाही लसलशीत कांद्याच्या पातीसह दोन मोठे कापलेले कांदे त्यांनी आमच्यासमोर आजींनी ठेवले.
भिसे सरांनी मध्येच विचारलं : ‘‘तुम्हाला असं कांदे देणं परवडतं का?’’
‘‘परवडणं, न परवडणं सोडून द्या. माणसाला खाताना समाधान वाटलं पाहिजे,’’ आजींनी करारीपणे; पण तितक्याच प्रेमळ शब्दांत उत्तर दिलं.
‘‘या भागातली माणसं खूप प्रेमळ आहेत, इमानदार आहेत,’’ असं गड चढताना मला डॉ. शिवरत्न शेटे यांनी सांगितलं होतं. त्याची प्रचीती येत होती. थोड्या वेळापूर्वीच माझी भाची धनिशा हिची एक वस्तू खालीच विसरून राहिली होती, ती एकानं आणून दिली. आमची भेळ खाऊन झाली. आमच्यासोबत असणारी जवळजवळ सगळी मंडळी पुढं गेली होती.
मी आजींना म्हणालो : ‘‘ही मुलगी कुणाची आहे?’’
आजी म्हणाल्या : ‘‘माझी नात आहे.’’
मी त्या मुलीला नाव विचारलं.
तिचं नाव कविता होतं.
‘‘काय करतेस?’’
‘‘काही नाही, दिवसभर इथंच असते.’’

कविताविषयी आजी म्हणाल्या : ‘‘वडील गेल्यानंतर काही दिवसांतच तिचं आम्ही लग्न केलं. तेव्हा ती जेमतेम बारा-तेरा वर्षांची असावी. अवघ्या दोन वर्षांत तिचा नवरा संतूका तिरके हाही मरण पावला. या परिसरात मोठ्या प्रमाणात गावठी दारू तयार केली जाते. त्याला गावठी दारू प्यायची सवय होती. आसपासच्या गावातले पाच-सहा तरुण ही दारू प्यायल्यामुळे एकाच वेळी मृत्युमुखी पडले. त्यात संतूका हाही होता.’’
आजी तिच्याविषयी आम्हाला सांगत असताना मी त्या मुलीकडे पाहत होतो. त्या मुलीच्या चेहऱ्यावर कसलेही हावभाव नव्हते. एवढ्या कोवळ्या वयात ती कशी काय संपून गेली असं वाटून गेलं. तिच्या आईच्या आणि आजीच्या आयुष्यासंदर्भात नाना प्रकारचे प्रश्न होते आणि ते प्रश्न गरिबीभोवती, रूढी-परंपरांभोवती, पोटाच्या खळगीभोवती फिरत होते. आजी नेटानं उभ्या होत्या म्हणून हे कुटुंब तग धरून आहे. आजी खचल्या असत्या तर या कुटुंबाची वाताहत झाली असती. जवळचे कुणी नातेवाईक नाहीत किंवा कुणी या सगळ्यांना परिस्थितीच्या कचाट्यातून बाहेर काढणारी मंडळी नाहीत. कुणी कधी मदतीच्या दृष्टीनं जरी पुढं आलं तरी उसनवारीपर्यंतच ठीक अशी आजींची भूमिका. मात्र, आपल्या घरात कुणी कर्ता पुरुष नाही म्हणून कुणाची तरी मदत घेत राहावी हे स्वाभिमानी आजींना, त्यांच्या सुनेला आणि नातीलाही मान्य नव्हतं. आजींचा तो सगळा खमका‍ बाणा सुनेकडे आणि नातीकडेही झिरपत चालला होता.

आजींची ती सगळी कैफियत ऐकल्यावर कळसूबाईचं शिखर चढण्याचा जोम काहीसा ओसरूनच गेला. खिशात हात घातला. जेवढे पैसे होते तेवढे आजींच्या हातात ठेवले. पायावर डोकं ठेवलं. त्या पैसे अजिबात घेत नव्हत्या.

या तिन्ही महिलांशी बोलत असल्यामुळे माझं आणि भिसे सरांचं बोलणं तेवढ्या काळापुरतं झालं नव्हतं. कळसूबाईचं शिखर चढून आम्ही वर गेलो. कळसूबाईची पायरी चढत असताना त्या तिन्ही महिलांचे चेहरे डोळ्यापुढे येत होते. तिघींचं आयुष्य व्यवस्थित चालावं यासाठी कधी कळसूबाईच्या परिसरात, कधी गावात, तर कधी कुठल्या जत्रेमध्ये आजी पाल लावायच्या. तिथं चहापाणी, खाण्याचे पदार्थ मिळायचे. तिघीही मग हाताला येईल ते काम करायच्या. त्या छोट्याशा पालाशिवाय आणि दोन्ही गावांतल्या छोट्याशा झोपडीशिवाय त्या तिघींकडे अन्य कुठलीही मालमत्ता नव्हती. त्यांच्याकडे प्रॉपर्टी होती ती स्वाभिमानाची आणि आनंदानं जगण्याची.
‘तुम्हाला भेटायला परत येईन’ असं म्हटल्यावर ‘मी इथं असेन की नाही हे माहीत नाही,’ असं उत्तर आजींनी दिलं.

काळाचा घाला माणसावर कितीही आघात करून गेला तरी माणसानं स्वाभिमान आणि बाणेदारपणा कायम ठेवला पाहिजे हे मी आजींकडून व त्यांच्या कुटुंबीयांकडून शिकलो. अनेक कुटुंबांमध्ये कर्ता माणूस गेला की बायका खचतात, संपतात. इथं मात्र ‘हिमतीनं उभे राहा’ असंच आपल्या कृतीतून या तिघीजणी सांगत होत्या.
कळसूबाईच्या या तिन्ही लेकी एकीकडे जगण्यासाठी धडपड करत आहेत आणि दुसरीकडं, परिस्थितीनं खचून जाऊ नये असं आपल्या कृतीतून सांगत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com