दोन पांडुरंग... (संदीप काळे)

sandip kale
sandip kale

काका निघून गेले होते. त्यांच्या मार्गाला लागले होते; पण मी मात्र आपला रस्ता कापण्याच्या कामाला धजत नव्हतो. काकांकडून मी हेच शिकलो, की भक्ती आणि आत्मविश्वास हे खूप महत्त्वाचे आहेत, त्याचबरोबर काळाप्रमाणं तुम्ही पावलं नाही टाकली, तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. संकटं येऊन तुमचं हसतंखेळतं असणारं सगळं आयुष्य नेस्तनाबूत होऊ शकतं. कितीतरी गोष्टी काका माझ्या पदरात टाकून पुढे गेले होते. आजपर्यंत या दोन्ही पांडुरंगांचा महिमा मी ऐकला होता. आज प्रत्यक्षात अनुभवायला मिळाला. याला कोण कसं घेतो हे त्याच्या-त्याच्या भावनेप्रमाणं असेल; पण मला मात्र काकांच्या नजरेत त्या दोन्ही पांडुरंगांचं दर्शन झालं होतं एवढं मात्र खरं!

वाहनांची वाऱ्यासारखी ये-जा असणारा सोलापूर ते पुणे रस्ता. दिवस हिवाळ्याचे; पण रखरखतं ऊन, अगदी उन्हाळ्यासारखं. रात्री खूप थंडी आणि सकाळी नंतर परत उकाडा, असं कमालीचं बदलतं वातावरण. मी माझी गाडी घेऊन इंदुरीकर महाराज यांचं कीर्तन ऐकत मजल दरमजल चाललो होतो. लोणी आणि इंदापूरच्या मध्ये मी गाडी थांबवली. सोलापूरहून पुण्याकडे जात असताना खास मेनू असणारं हॉटेल कोणते, याची माझ्याकडे नावं होतीच, त्यामध्ये मी ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो, त्या हॉटेलचं नाव माझ्या यादीत सर्वात पहिलं होतं. गाडी थांबवल्या थांबवल्या हॉटेलचा धोतरावर असणारा साधा, सरळ शेतकरी मालक पळत आला. ‘‘साहेब, किती दिवसांनी आलात,’’ म्हणत त्यांनी स्वागत करून आतमध्ये नेलं. हॉटेल म्हणजे काय, छोट्याशा झोपडीमध्ये तीन-चार खुर्च्या, पाण्याचा एक रांजण आणि अवतीभोवती सगळीकडून उसाचा मळा. भाकरी, पिठलं, दही आणि नाचणी-पापडाचा तिथला ठरलेला मेन्यू, जो मला हवा होता आणि तो त्यांना म्हणजे त्या हॉटेलमालकालाही माहीत होता. खुर्चीवर बसून मोबाईलमध्ये डोकावत बसलो होतो. एकदम कानावर आवाज पडला : ‘‘माऊली, चहा पाजवता काय?’’ समोर बघतो तर एक ज्येष्ठ व्यक्ती. अष्टगंध, अबीरबुक्का कपाळावर लावलेला, डोक्‍यावर टोपी, गळ्यामध्ये टाळ आणि मळके फाटके कपडे, खांद्यावर थैली. पायात चपलाही नव्हत्या. ‘‘या, बसा काका...’’ मी त्यांना म्हणालो. त्यांनी मागं वळून पाहिलं. त्यांना वाटलं, की मागं कोणाला तरी म्हणालो. मी म्हणाले : ‘‘तुम्हालाच बसा म्हणालोय मी.’’ एका बाजूनं तुटलेल्या खुर्चीवर त्या छोट्या हॉटेलमध्ये काका बसले. समोरच्या पाण्याच्या बाटलीचं झाकण उघडलं. ग्लासमध्ये पाणी ओतत मी त्यांना म्हणालो : ‘‘कुठून आलात?’’ अत्यंत तहानलेले ते काका बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतेच. जेव्हा ग्लासभर पाणी त्यांच्या पोटात गेलं, तेव्हा कुठं काका बोलायला लागले.

जेवणाचं टेबल लावलं. एका ताटाऐवजी दोन ताटं. काका आणि मी दोघं जण जेवत होतो. काकांच्या चेहऱ्यावरचं तेज, डोळ्यांमध्ये असलेली प्रामाणिकपणाची आग आणि सदा हसरा चेहरा. एक कप चहाही स्वतःच्या पैशानं पिऊ शकत नाही, अशी परिस्थिती असलेल्या या काकांच्या चेहऱ्यावर असणारे भाव, प्रसन्नता, एखाद्या राजाला लाजवेल अशी होती. माझ्याअगोदर काकांच्या ताटामधली भाकरी संपली. मी हॉटेलमध्ये असणाऱ्या मुलाला आवाज देऊन भाकरी आणायला सांगितली. तेवढ्यात काका म्हणाले : ‘‘भाकरी अजून भाजायची आहे.’’ जेवण करत असताना, माझ्यावर लक्ष, चुलीवरच्या भाकरीकडं लक्ष, रस्त्यावर ये-जा करणाऱ्या लोकांकडं लक्ष, आपल्या बाजूला असलेल्या थैलीकडं लक्ष आणि सगळ्यांत महत्त्वाचं माझ्या बोलण्याकडंही लक्ष. जेवण झालं आणि काकांनी आनंदाचा ढेकर दिला.

मला काकांना बोलतं करायचं होतं, त्यांच्याशी चर्चा करायची होती; पण कळत नव्हतं, सुरुवात कुठून करावी. एकतर त्यांना वाटेल जेवू घातलं म्हणून इतके प्रश्न विचारतो आणि दुसरं म्हणजे नाही बोललो तर ‘नुसतं जेवूच घातलं, माझ्याशी काही बोलला नाही, मी काही भिकारी आहे का?’ असंही वाटेल. हॉटेलमालक काकाजवळ आले आणि त्या काकांना म्हणाले : ‘‘माऊली, या तुम्ही आता.’’ कारण काकांना उठवून त्या हॉटेलमालकांना माझ्याशी काही बोलायचं होतं. मी ‘‘थांबा थोडा वेळ. आम्हाला बोलायचं आहे,’’ असं म्हणून हॉटेलमालकांना तिथंच रोखलं. तुम्ही कुठून आलात, कुठं जाणार आहात, इथपासून ते त्यांच्या सर्व परिवाराबद्दलची माहिती मी त्यांना विचारली. आपण ज्यांना जेवू घातलं, तो माणूस या प्रकारचा वेगळा भक्त असेल आणि गेल्या अनेक वर्षांपासून त्यानं आपल्या भक्तीमध्ये सातत्य टिकवलं असेल, असं माझ्या ध्यानीमनीही नव्हतं.

मी ज्या काकांशी बोलत होतो. त्या काकांचं नाव सदाशिव जाधव होतं. जामखेडजवळच्या शेलगावचे ते राहणारे. घरी शेतीवाडी, सगळं काही सधन. जमीन होती. कुस्त्या खेळायचा नाद. त्यामुळे दूध-दुभत्यांनी घराचं वैभव अगदी संपन्न होतं. ही गोष्टी दहा-पंधरा वर्षांपूर्वीची. त्यांनी खूप ठिाकणी कुस्त्या खेळल्या, पहिली कुस्ती खेळण्याचा मानही त्यांनी काही ठिकाणी पटकावला. एवढंच नाही, तर गावात आणि पंचक्रोशीमध्ये वेगळं आणि समाजशील व्यक्तिमत्त्व म्हणून सदाशिवरावांचा आदर होता. जेव्हा त्यांच्या पोराकडं कारभार गेला, तेव्हा सदाशिवरावांची गाडी रुळावरून खाली घसरायला लागली. पोरगा दारूडा निघाला. हळूहळू त्यानं आपल्या वडिलांनी कुस्तीच्या कलाकारीतून कमावलेली जमीन विकायला सुरुवात केली. सततच्या दारू पिण्यामुळं नाना आजारांनी सदाशिवरावांच्या रामेश्वर नावाच्या पोराला ग्रासलं. पोरगा दवाखान्यात असताना सदाशिवरावांही दोन एकर जमीन विकावी लागली. पोरगा दवाखान्यातून बरा होऊन आला, आता पाच एक्कर जमीन शिल्लक राहिली होती. तो बरा झाल्यावर पुन्हा प्यायला लागला. सदाशिवरावांनी एका मित्राच्या मदतीनं आपली राहिलेली पाच एकर जमीन लग्न झालेल्या पंचफुला नावाच्या आपल्या मुलीला देऊन टाकली. पोराला पुन्हा आजार सुरू झाला आणि त्यातच तो मरणही पावला. वर्षभरानंतर सदाशिवची पत्नी गीताबाई यांचंही निधन झालं. सदाशिव आपल्या मुलीकडं राहायला गेले. हसत्या-खेळत्या भरलेल्या घराला कुलूप लागलं.

वयाच्या तेविसाव्या वर्षांपासून सदाशिवराव आणि त्यांच्या पत्नी गीताबाई या दोघांनी एक व्रत हाती घेतलं होतं. आपल्या गावापासून ते पंढरपूला पायी दर्शनाला जायचं आणि पांडुरंगाच्या दर्शनानंतर बारामतीला जाऊन शरद पवारांच्या घराच्या चौकटीचं दर्शन घ्यायचं. आता वयाची त्र्याऐंशी आली, तरी सदाशिवरावांचं हे व्रत कायम आहे. मी त्यांना मध्येच विचारलं : ‘‘तुमचं गाव ते पंढरपूर, हे तुम्ही वारकरी आहात म्हणून ठीक आहे, तुम्ही पांडुरंगाच्या दर्शनाला जाता हेही ठीक आहे; पण पंढरपूरहून बारामतीला का जायचं?’’ आपल्या कुटुंबीयांच्या आठवणीनं व्याकुळ झालेल्या सदाशिवरावांच्या चेहऱ्यावर एकदम चैतन्य आलं. त्याचं कारण होतं, बारामती आणि शरद पवार यांचं काढलेलं नाव. सदाशिवराव सांगत होते : ‘‘पुण्यामध्ये एकदा कुस्त्यांचा डाव भरलेला होता, शेवटची कुस्ती मी जिंकलो, तेव्हा पारितोषिक शरद पवार यांच्या हस्ते मिळालं. पवार यांनी बक्षीस देऊन खांद्यावर हात ठेवला. ‘कुठल्या गावचं’ असं आदरानं विचारलं. त्यांनी ठेवलेल्या खांद्यावरच्या हातानं आणि त्या स्पर्शानं मी भारावून गेलो होतो. त्यांच्याविषयी मी खूप ऐकलं होतं. कोणी ‘जाणता राजा’ म्हणायचे, कोणी राजकारणातली ‘चतुर व्यक्ती’ म्हणायचे. दुष्काळ पडला असताना शेतीसाठी त्यांनी घेतलेले निर्णय आणि त्यातून सावरलेले माझ्यासारखे अनेक कुटुंबीय यामुळं ते पांडुरंगापेक्षा कमी नव्हते.’’ बारामतीमध्ये शरद पवार यांच्या झालेल्या भेटीचा प्रसंग डोळ्यात जीव ओतून ते मला सांगत होते : ‘‘मी शेवटची कुस्ती जिंकली. पवारसाहेबांनी बक्षीस देताना नावासह मला हाक मारली. ‘अरे सदाशिव, इथंपण तुम्हीच?’ मी चमकलो, मला आश्‍चर्य वाटलं. सहा वर्षांनंतर त्यांनी मला नावासह हाक मारली होती. त्यामुळं पवारसाहेब मला श्रेष्ठ वाटू लागले. त्या दोन्ही भेटीनंतर मी त्यांना कधी भेटायचा प्रयत्न केला नाही; पण आपण ज्या देवाला मानतो, त्याच्या गाभाऱ्यात जाऊन नतमस्तक व्हावं, ही धारणा मी काही सोडली नाही. सुरुवातीची अनेक वर्षं माझी बायको माझ्यासोबत असायची, आता ती नाहीये; पण जीवात जीव जोपर्यंत आहे, तोपर्यंत माझी ही वारी आणि माझे हे दोन देव कायम माझ्या स्मरणामध्ये असतील. वर्षातून एकदा मस्तक टेकवायला मी त्यांच्याकडे नक्की जाणार.’’ काका सांगत होते, मी ऐकत होतो, बाजूला असलेली तिसरी तुटकी खुर्ची घेऊन हॉटेलचे मालकही केव्हा आमच्या बाजूला बसले होते, हे मला कळलंच नाही. ‘‘आपल्या परिसरामध्ये असणाऱ्या अनेक ठिकाणी शरद पवार कार्यक्रमाला येणार आहेत, म्हणून कळलं असतं तरी मी पहिल्या रांगेमध्ये बसलो असतो; पण त्यांना प्रत्यक्षात जाऊन भेटायची कधी हिंमत झाली नाही. किंबहुना तशी गरजही वाटली नाही. आपला पांडुरंग आपल्या मनामध्ये असताना त्याला भेटायची गरज काय?’’ असं काकाच मला विचारायला लागले. हॉटेलमालकानं चहाचा कप आमच्यासमोर ठेवला. काका एकेक घोट पीत आपला वस्ताद मारुती शिनगाडे यांच्याविषयी सांगत होते. गावातल्या वातावरणाविषयी ते मला सांगत होते. पंचक्रोशीमध्ये असलेल्या त्या काळच्या परस्थितीविषयी आणि आताच्या असलेल्या परिस्थितीविषयी मला ते सांगत होते.

शेलगाव ते जामखेड अंतर पंधरा किलोमीटर, जामखेड ते पंढरपूर १३४ किलोमीटर, पंढरपूर ते बारामती १२८ किलोमीटर, बारामती ते जामखेड १०९ किलोमीटर आणि पुन्हा शेलगावला पोचेपर्यंत लागणारे १५ किलोमीटर असा चारशेहून अधिक किलोमीटरचा पल्ला काका पायी करायचे. मग खिशामध्ये दमडी असो की नसो. कोणाच्या तरी घरासमोर जाऊन चार विठ्ठलाचे अभंग म्हणायचे. त्याचबरोबर पवार यांच्यावर केलेलेही अभंग सदाशिवराव मला म्हणून दाखवत होते. सदाशिवरावांना या जगात या दोन पांडुरंगांशिवाय दुसरं कोणी नाही. आपल्या मुलीला जमीन देऊन म्हातारपणाची कवचकुंडलंही त्यांनी जावयाच्या हाती दिली होती. तिथं सन्मानाची वागणूक मिळत नाही, म्हणून मंदिरामध्ये झोपणारे काका, वारकऱ्यांच्या प्रत्येक उपक्रमामध्ये सहभाग नोंदवणारे काका आजही तितक्‍याच स्वाभिमानाने जगत आहेत. वयाची ८३ वर्षं ओलांडली; पण त्यांच्यामध्ये असलेला स्वाभिमानाचा ताठरपणा अजून गळून पडला नाहीये. आपल्या बायकोच्या आठवणीनं अश्रूंना वाट मोकळी करून देणारे काका इतरांचा समाचारही घेत होते.

‘‘आता निघतो,’’ असे म्हणत ते जायला निघाले. हॉटेलमालकांनी दोन भाकऱ्या आणि भाजी बांधून आणून दिलेलं एक पार्सल काकांच्या हाती दिलं. मी खिशामध्ये हात घालून काही पैसे काढले आणि काकांच्या हातावर ठेवले. काकांनी आमच्या दोघांच्याही भेटी नाकारल्या. ते म्हणाले : ‘‘मी ज्या ठिकाणी जातो, तिथलं फक्त खातो, बांधून काही घेत नाही. तुम्ही वाईट नका वाटून घेऊ. मी ज्या पुढच्या गावात थांबणार आहे, तिथं संध्याकाळपर्यंत पोचेनच. त्यामुळं हे अन्न वाया जाईल. हे कुण्यातरी भुकेलेल्या गरिबाला खाऊ घाला.’’

आपली काठी टेकत टेकत काका निघाले. त्यांना रस्त्यापर्यंत मी सोडायला आलो. परत काका मागे वळले. ‘‘येतो पांडुरंगा,’’ म्हणून त्यांनी मला हात जोडले. एका तरुणाला लाजवतील अशा वेगाने रस्त्याने चालायला लागले. मी मात्र पुन्हा हॉटेलमध्ये जाऊन त्याच खुर्चीवर बसून विचार करायला लागलो. एखाद्याच्या भक्तीमध्ये माणसं एवढी तल्लीन होतील याचं काकांसारखं दुसरं उदाहरण माझ्यासमोर नव्हतं. काका गेल्यानंतर मी आणि हॉटेलमालक बराच वेळ काकांच्या त्या सगळ्या प्रवासाची पुन्हा उजळणी करत होतो. हॉटेलमालकाचा निरोप घेतला आणि रस्त्यावर पुन्हा काकांकडं येऊन पाहतो, तर दहा-पंधरा मिनिटांच्या अंतरामध्ये काकांनी बरंच अंतर कापलं होतं. इतक्‍या कमी वेळात ते अंतर कसं कापलं गेलं? तर त्यामागे त्यांचा असलेला आत्मविश्वास आणि भक्ती ही दोनच कारणं होती.

मी तिथून निघालो; पण काका आणि त्यांच्या भक्तीबाबत माझ्या मनामध्ये खूप प्रश्न पडले होते. काकांकडून त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी निरागसपणे आणि सच्चाईनं मला मिळाली होती. तरी का कुणास ठाऊक; असे अनेक प्रश्न होते, जे मला काकांना विचारायचे होते. त्यांच्या आत्मविश्वासाबद्दल, त्यांच्या भक्तीबद्दल, त्यांच्या प्रसन्नतेबद्दल; पण ते मला विचारता आले नाहीत.

काका निघून गेले होते. त्यांच्या मार्गाला लागले होते; पण मी मात्र आपला रस्ता कापण्याच्या कामाला धजत नव्हतो. काकांकडून मी हेच शिकलो, की भक्ती आणि आत्मविश्वास हे खूप महत्त्वाचे आहेत, त्याचबरोबर काळाप्रमाणं तुम्ही पावलं नाही टाकली, तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. संकटं येऊन तुमचं हसतंखेळतं असणारं सगळं आयुष्य नेस्तनाबूत होऊ शकतं. कितीतरी गोष्टी काका माझ्या पदरात टाकून पुढे गेले होते. आजपर्यंत या दोन्ही पांडुरंगांचा महिमा मी ऐकला होता. आज प्रत्यक्षात अनुभवायला मिळाला. याला कोण कसं घेतो हे त्याच्या-त्याच्या भावनेप्रमाणं असेल; पण मला मात्र काकांच्या नजरेत त्या दोन्ही पांडुरंगांचं दर्शन झालं होतं एवढं मात्र खरं!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com