झोपेची सोंगं (संजय कळमकर)

संजय कळमकर sanjaykalmakar009@gmail.com
रविवार, 22 सप्टेंबर 2019

कुंभकर्ण समस्त झोपाळू लोकांचा देव असावा, असा माझा आध्यात्मिक समज आहे. त्याचं कुठं मंदिर असल्याचं ऐकीवात नाही; परंतु गावोगावी ते असण्याची गरज आहे. ज्यांना झोपा येत नाहीत त्यांनी मंदिरात जाऊन अभिषेक तरी केले असते.

कुंभकर्ण समस्त झोपाळू लोकांचा देव असावा, असा माझा आध्यात्मिक समज आहे. त्याचं कुठं मंदिर असल्याचं ऐकीवात नाही; परंतु गावोगावी ते असण्याची गरज आहे. ज्यांना झोपा येत नाहीत त्यांनी मंदिरात जाऊन अभिषेक तरी केले असते.

कुंभकर्णाला झोपेतून उठवायला मोठ-मोठी वाद्यं वाजवली जात. त्या वेळेस डीजे नावाचा प्रकार अस्तित्वात नव्हता, हे त्याचं भाग्य समजावं लागेल. नाहीतर त्याच्या दणदणाटानं तो पहिल्याच सेकंदात उठून बसला असता आणि त्याची छाती त्या अतोनात आवाजानं दडपून गेली असती. असं काही भयाण ऐकण्यापेक्षा कायमचं झोपून घेतलेलं बरं असाही विचार त्याच्या मनात आला असता. आज कुंभकर्ण नसला, तरी त्याचे वंशज मात्र जगभर पसरलेले आहेत. कुणालाही हेवा वाटावा इतक्या वेगानं ते झोपी जातात. ‘चांगलं काम करा म्हणजे झोप लवकर लागते,’ हे सुविचारांपुरतं ठीक आहे; परंतु वाईट कामं करणारीही डाराडूर झोपलेली दिसतात. स्वतःचं दुकान नीट चालत नाही म्हणून तळमळत पडणारा एखादा दुकानदार पुढच्याच्या दुकानाचं दिवाळं निघेल त्या दिवशी निवांत झोपू शकतो. ही मानवी प्रवृत्ती आहे. दुसऱ्याच्या दुखाःत सुख शोधून निवांत झोपणारी माणसंही आहेत. काहींना चिंतेमुळे झोप येत नाही, तर काहींना झोप येत नाही याचीच चिंता असते. एखाद्याला काळजीपोटी लवकर झोप लागत नाही; पण बऱ्याचदा ज्याच्या काळजीनं आपली झोप उडते तो सद्‍गृहस्थ मात्र निवांत झोपलेला असतो. काहीजण झोपेचं सोंग घेतात, तर काही सोंगं जास्त काळ झोपलेली समाजाच्या हिताची असतात. काही माणसं तर गप्पा मारता मारता घोरू लागतात. शिक्षण खात्यातल्या आमच्या ओळखीच्या एका अधिकाऱ्यावर निद्रादेवी बेहद्द खूष होती. ते शाळा तपासणीला गेल्यावर शिक्षक कसे शिकवतात म्हणून वर्गात मागं बसून पाठ-निरीक्षण करायचे आणि तसंच बसल्या जागी डुलक्या मारायचे. ते थेट तास संपल्याची घंटा होऊन मुलांनी गिल्ला केल्यावर भानावर यायचे. हे साहेब खूप शिक्षकप्रिय होते. कारण व्यापाऱ्यावर जीएसटी बसावा तसी झोप कायम त्यांच्या डोळ्यावर बसलेली असायची. असे अनेक झोपनमुने आपल्याला जागोजागी पाहायला मिळतात. एक शिस्तीचे गृहस्थ सावधान अवस्थेत रात्रभर झोपून, एकदाही विश्राम न करता पुन्हा त्याच अवस्थेत उठलेले माझ्या पाहण्यात आहेत. काही यानात बसल्याप्रमाणं पाय दुमडून झोपतात, तर काही खुर्चीवर बसल्याप्रमाणं पायाची आढी मारून झोपलेले दिसतात. काहींचं पांघरुण रात्र सरत जाईल तसं अंगाखाली येऊन अंथरूण होतं, तर काहींचं अंथरुण त्यांनी सकाळपर्यंत पांघरूण म्हणून घेतलेलं दिसतं. काही माणसं घोरण्यासाठी विशेष प्रसिद्ध असतात. ते गायन केल्याप्रमाणं निरनिराळ्या स्वरांत घोरतात. त्यांचं ते संगीतमय झोपणं मात्र इतरांची झोप उडवतं. त्यांना डिवचलं, तर त्यांच्या घोरण्याची तार थोडा वेळ खंडित होते. परंतु थोड्याच वेळात ते सूर बदलून नव्या जोमानं घोरू लागतात. कुटुंबात असा एखादा घोरणारा असला, तरी त्यानं साऱ्यांच्या जीवाला ‘घोर’ लावलेला असतो. त्यांनी नाकाच्या तारा आवळून ‘घोर’मैफलीची तयारी करण्याआधी पटकन झोपून घेणं हाच एकमेव सोपा उपाय इतरांच्या हाती असतो. झोपेत माणसाचं व्यक्तिमत्व पालटून जातं. काही प्रेमळ माणसं झोपेत क्रूर दिसतात, तर काही माणसं जागेपणी बेरकी दिसत असली, तरी झोपेत कशी अजाण बालकासारखी वाटतात.

झोपेनं चेहऱ्यावर पांघरलेलं असं साजिरं रूप स्वतःला पाहायला मिळत नाही एवढंच. कुणी ‘माझा झोपेतला फोटो काढून मी कसा दिसतो ते सांगा,’ असं म्हणू नये. आजकाल कसलाही फोटो काढला, तर तो समाजमाध्यमांवर टाकण्याची प्रथा रुढ आहे. चुकून आपला झोपेतला असा एखादा फोटो टाकला गेला, तर ग्रुपवरची बरीच माणसं श्रद्धांजली वाहायला टपून बसलेली असतात. त्यांच्याकडं विविध प्रकारचे गुच्छ तयार असतात. असा एखादा फोटो पडला, तर आपल्याला ओळखी-अनोळखी नेटकरी इतक्या प्रमाणात श्रद्धांजली वाहतील, की जिवंत असूनही आपल्याला नसल्यासारखं वाटेल. अर्थात झोप ही मृत्यूची धाकटी बहीण असते असं म्हटलं जातं ते खोटं नाही. गाढ झोपलेली माणसं ‘अगदी मेल्यासारखे झोपलो बुवा’ असं म्हणतात, तर कधीतरी खरोखर मृत्यू पावलेल्याचा चेहराही नुकताच झोपी गेल्यासारखा दिसतो. आमचा एक मित्र म्हणाला : ‘‘नवीन बंगल्यात आम्ही चार माणसं आहोत; पण सहा बेडरूम्स काढल्या आहेत.’’ त्याचं मला हसू आलं. जमिनीचा आपल्या मापाचा कुठलाही तुकडा झोपेला पुरेसा असतो. रात्री अकराला एका बेडरूममध्ये, पुन्हा जाग आली, तर बारा वाजता दुसऱ्या, मग दोन वाजता तिसऱ्या असं कधी होत नाही. बालकं मात्र गाढ झोपतात- कारण त्यांच्या मनाची पाटी कोरी असते. माणूस मोठा होत जातो तशी मनाच्या पाटीवरची गिचमिड वाढत जाते. म्हातारपणाशी तर झोपेचं जणू हाडवैर असतं. तरी शरीराला आवश्यक वाटतं, तेव्हा कुठल्याही अवस्थेत ते झोप घेतंच. झोपेची वाट पाहू नये. काहीतरी वाचावं, ऐकावं, पाहावं. डोळे जड करून घ्यावेत. आपण झोपेकडे जाण्यापेक्षा झोपेला आपल्याकडे येऊ द्यावं. शरीर आणि मन थकलं, की गाढ झोप लागते. दिवसभर कष्ट केलेला माणूस शांत झोपतो. वस्तू, पैसे, सत्ता, माणसं यांच्यात नको तितका जीव गुंतवलेली माणसं शांत झोपू शकत नाहीत. चोराच्या मनात चांदणं असतं, तसं भ्रष्ट माणसाच्या मनात कायम चोरांची भीती असते, त्यामुळं त्यांना नीटशी झोप लागत नाही. काहींना खडबडीत जमिनीवर सुखानं झोप लागते, तर काही लोक फुटभर फोम असलेल्या गादीवरही तळमळत पडून राहतात. यावरून झोप कुठल्याही स्थळावर, वातावरणावर, भौतिक सुविधांवर अवलंबून नसते. ती मनात असावी लागते. असो... हे वाचताना तुम्हाला झोप येण्याआधी थांबतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang sanjay kalamkar write halaka fulaka article