सामाजिक शिस्त शिकवावी.... (संजय मोने)

sanjay mone
sanjay mone

मुलांचं संगोपन करताना त्यांच्यावर सामाजिक शिस्तीचे संस्कार पालकांनी केले पाहिजेत, कारण घरातील शिस्त आपोआप लागते; पण सिग्नल सुरू असताना गाडी थांबवायची, यासारख्या गोष्टी मुलांना शिकवल्याच पाहिजेत. नागरिकशास्त्राचे धडे मुलांना घरातूनच दिले पाहिजेत. केवळ मुलांनीच नाही, तर सगळ्यांनी नागरिकशास्त्र व त्याचे नियम शिकून पाळले पाहिजेत. आज त्याची फार गरज आहे.

माझे आई-वडील दोघं नोकरी करायचे, त्यामुळं ते फारसं घरात नसायचे; परंतु मी अत्यंत महत्त्वाची गोष्ट त्यांच्याकडून शिकलो ती म्हणजे, आहे त्या पैशांतून थोडेसे पैसे नेहमी वाचवत राहायचं, कारण ते कधीही उपयोगात येतात. तेव्हा शिकलेली ही गोष्ट सध्याच्या कोरोनाच्या काळात मला अधिक ठळकपणे समजत आहे. मी जेव्हा अभिनय, नाटकाच्या क्षेत्रात यायचं ठरवलं, तेव्हा आताच्या सारखे अनेक मार्ग व पर्याय नसायचे. पण, या क्षेत्रात मर्यादित मार्ग असूनही कधीही मला माझ्या पालकांनी त्यापासून परावृत्त करायचा प्रयत्न केला नाही. " तुला जे करायचं आहे ते तू कर; पण लक्षात ठेव, की त्याचं पुढंमागं जे काही बरं-वाईट भोगायचं आहे, तेही तुलाच भोगायचं आहे," ही त्यांची स्पष्ट भूमिका होती. त्या काळात नाटकात पूर्णवेळ काम करणं हे कोणाला पटायचं नाही. चरितार्थासाठी पूर्णवेळ नाटक करता येतं, ही मानसिकता तेव्हा समाजात रुजली नव्हती. मी नाटकात काम करणं सुरू केल्यानंतर बरेच जण विचारायचे, "नाटक करता ते ठीक आहे; पण पोटापाण्यासाठी काय करता?" पण आई-वडिलांनी मात्र मला कधीच विरोध केला नाही, कायम पाठिंबाच दिला.

मी कॉलेजमध्ये असताना अतिशय लाजाळू होतो, मला कुणाशी बोलायलाही संकोच वाटायचा. मात्र कसा कोणास ठाऊक, शिक्षण झाल्यानंतर मी या क्षेत्रात आलो. मला हे करायचं होतं; पण काही कारणामुळं कॉलेजात असताना ते झालं नाही. माझे वडील आणि आई दोघं नाटकात काम करायचे. पण काही काळ हौस म्हणून नाटक केल्यानंतर ते त्यांच्या करिअरमध्ये व्यग्र झाले. पुढं मला ज्या वेळी नाटकात काम करण्याची इच्छा झाली, तेव्हा त्यांनी कधीही अडवलं नाही. या वाटचालीत अनेक चढ -उतार आले, काही वेळा आपले दिवस बरे नसतात, प्रत्येकाच्या आयुष्यात ही वेळ येते. पण त्या वेळी त्यांनी मला कधीही न्यूनत्वाची जाणीव करून दिली नाही. ते त्या वेळी मला म्हणाले, "सगळे दिवस येतात आणि सगळे दिवस जातात, तुला काय करायचं आहे, त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे." मला वाटतं, कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाताना, एवढे धीराचे शब्द भरपूर होतात. माणूस त्या शब्दांच्या आधारे परिस्थितीला तोंड देण्याची ताकद मिळवतो आणि त्यातून बाहेरही पडतो. या सगळ्या परिस्थितीमुळं पुढं बरे दिवस आल्यानंतरही आलेला पैसा सांभाळून वापरायचा हे कायमचं माझ्या मनावर कोरलं गेलं आणि ती माझी सवय बनली. त्या काळात अतिशय कष्ट केले, भरपूर अपमान पचवले, ते प्रत्येकालाच पचवावे लागतात. ज्या दिवशी अपमान झाला नाही, त्या दिवशी, 'अरे! असं कसं झालं?' असा प्रश्न पडायचा. यातील गमतीचा भाग सोडला, तर त्या काळी मला सुधीर जोशी, रिमा यांच्यासारखे सहकारी, मित्र लाभले, ज्यांनी मला कधीच त्यांचा मोठेपणा जाणवू दिला नाही, कायम बरोबरीच्या नात्यानं वागवलं. त्यामुळं मी एक गोष्ट शिकलो, की आपल्यासमोर कोणताही तरुण मुलगा नव्यानं या क्षेत्रात आला, तर त्याच्याशी आपण कायम मित्रत्वाच्या नात्यानं वागायचं. आपल्याला जे सहन करावं लागलं, ते त्याला सहन करावं लागता कामा नये. आजही मी ही गोष्ट पाळतो.

नाटकात काम सुरू केल्यानंतर पुढं आम्ही नाट्यसंस्थेची स्थापना केली आणि त्यातून हळूहळू नाटक करू लागलो. त्यामध्ये राजीव नाईक, दामू केंकरे असे मोठे मोठे लोक होते. त्यांच्यामुळं या व्यवसायात मला यावंसं वाटू लागलं. मी पालक झाल्यानंतरचा काळ आणि मी पाल्य असल्याचा काळ यांत मला भरपूर फरक जाणवतो. अगदी स्पष्ट सांगायचं, तर आम्ही जेवढे मूर्ख होतो, तेवढी हल्लीची मुलं नाहीत. ती फार हुशार आहेत, त्यांना आधुनिक तंत्रज्ञान, जगात काय सुरू आहे, हे सगळं माहीत असतं, येत असतं. कारण ही पिढी मुळात तंत्रज्ञानाच्या काळातच जन्माला आली आहे, त्यामुळं सगळ्या तांत्रिक वस्तू ती सहज हाताळू शकते. मी स्वतः या गोष्टी माझी मुलगी ज्युलिया हिच्याकडून समजून घेतो किंवा गरजेनुसार तिची मदत घेतो. खरंतर मी या गोष्टी शिकण्यासाठी फारसा उत्सुक नसतो, कारण याशिवायही आपण आतापर्यंत जगलोच, मग पुढेही जगू, असा माझा दृष्टिकोन आहे. अर्थात, माझा कोणत्याही तंत्रज्ञानाला विरोध नाही. मी ज्युलियाचा बाबा असलो, तरी पालकत्वाची प्रमुख जबाबदारी आणि निर्णय माझी पत्नी सुकन्या हीच घेत असते. एका माणसाच्या मताप्रमाणे घर चाललं पाहिजे, असं मला वाटतं. आपण दोघं वेगवेगळं बोलणार, त्यात मुलगी गोंधळून जाणार, हे मला योग्य वाटत नाही. त्यापेक्षा तिला एकाकडूनच सगळ्या गोष्टी कळाव्यात, ही माझी त्यामागची भूमिका आहे. सुकन्या अत्यंत उत्तमपणे ही सर्व जबाबदारी सांभाळून घेते, याचं मला विशेष कौतुकही वाटतं.

ज्युलिया अजिबात खर्चीक नाही. तिचे खर्च अगदी मर्यादित आहेत. तिला मी कधी कपड्यांची खरेदी करायला चल म्हटलं तर, "बाबा कशाला हवेत आता कपडे?" असं तिचं उत्तर असतं. तिला रोज पॉकेटमनी द्यावा लागत नाही. तिला लागतात तेव्हाच ती पैसे मागते. आम्हाला काही वेळा, हिला पैसे कसे लागत नाहीत, याचं आश्चर्य वाटतं. मग आम्हीच तिला स्वतःहून पैसे देतो; पण तेही ती फारसे खर्च करत नाही. घरात एखादेवेळी बिल देताना ती स्वतःहून पैसे काढून देते. "तुझ्याकडं कुठून आले पैसे," असं विचारलं तर म्हणते, "तुम्हीच दिले होते की!" ज्युलियाच्या जन्माआधीपासूनच मला मुलगीच व्हावी अशी माझी इच्छा होती. कारण मुलींना खूप माया असते, त्या अतिशय प्रेमळ असतात. जेव्हा कधी काम आटोपून घरी यायला मला उशीर होतो, तेव्हा ज्युलिया माझ्यासाठी जागी असते. मी आल्यावर पटकन उठून येणार व विचारणार, "बाबा तू जेवलास का?" नसेल जेवलो तर मला वाढणार. जेवायचं नसेल तर 'दूध तरी घे' असा प्रेमळ आग्रह करून, मला ते गरम करून आणून देणार. हे सगळं अनुभवणं खरोखरच खूप सुखद असतं.

पालकांनी मुलांना सामाजिक शिस्त शिकवली पाहिजे. कारण घरातील शिस्त आपोआप लागते; पण सिग्नल सुरू असताना गाडी थांबवायची, यासारख्या गोष्टी मुलांना शिकवल्याच पाहिजेत. नागरिकशास्त्राचे धडे मुलांना घरातूनच दिले पाहिजेत. केवळ मुलांनीच नाही, तर सगळ्यांनी नागरिकशास्त्र व त्याचे नियम शिकून पाळले पाहिजेत. एक मिनीट सिग्नल पाळतानाही अनेकांना, 'उशीर होतोय' असं वाटतं, याचं आश्चर्य वाटतं ! अगदी आताचं, कोरोनाच्या काळातील उदाहरण सांगतो. लॉकडाउनमध्ये लोक सोशल डिस्टन्सिंग व्यवस्थित पाळत होते ; पण लॉकडाउन उठल्यानंतर या गोष्टी जवळपास विसरलेच. रांगेत अंतर ठेव, असं एकाला म्हटलं तर, "अंकल देर हो रही है" असं उत्तर आलं. मग मी जरा वैतागून म्हटलं, "अरे इधर लाइन में खडा नही हुआ, तो उधर शिवाजी पार्क पर क्रेमेटोरियममे लाइन लगाना पडेगा." आपल्या हिताचंच लोकांना कळत नाही, तेव्हा खरंच राग येतो. ज्युलियाला या सर्व गोष्टी आम्ही लहानपणापासून सांगत आलो आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे, तिला ते लवकर कळलं. यातील काही गोष्टी ती आमच्या ड्रायव्हरकडूनही शिकली. तो बावीस वर्षांपासून आमच्याकडं आहे. तो माणूस रात्री दोन वाजताही नो एंट्रीमध्ये गाडी घालत नाही. हे सगळं ती बघत आलेली आहे. त्याचा संस्कार होतोच.

ज्युलिया खूप शांत आणि विचारी मुलगी आहे. तिनं मला शांत राहायचं शिकवलं. माझ्याकडं वाट बघणं, संयम या गोष्टी नाहीत, त्या मला ज्युलियानं शिकवल्या. एखादी गोष्ट होत नसेल आणि मी अस्वस्थ झालो, की ती म्हणते, "बाबा होईल, थांब ना जरा!" आम्ही सांगितलं आणि ज्युलियानं ते केलं नाही, असं शक्यतो कधी होत नाही. त्यामुळं तिला रागावण्याचे प्रसंग फारसे येतच नाहीत. एकदा तिला घराबाहेर जाताना मोबाईल खिशात ठेवून जा, असं मी सांगितलं होतं; पण कोणाचा फोन येणार म्हणून तिनं तो हातात ठेवला होता आणि हातातून तो कोणीतरी उडवला. तिथं माझ्या ओळखीचे काही जण होते, दादांची मुलगी म्हणून ते पुढं धावले आणि त्या माणसाला धरून चांगला चोप देऊ लागले. ते बघून ज्युलिया म्हणाली, "थांबा, मारू नका! त्यानं काही छंद म्हणून फोन चोरला नसेल ना, त्याची काहीतरी गरज असेल!" अशा मुलीला खरंच फार रागवावं लागलं आहे, असं फारसं कधी झालं नाही. उलट या प्रसंगातून मी तिच्याकडून संयम आणि घटनेच्या दुसऱ्या बाजूनं विचार करणं शिकलो. आम्ही तिघं घरात खूपच साधं, सरळ आणि सामान्य वागतो. प्रत्येकजण आपआपले निर्णय स्वतःच घेतो. मी आणि सुकन्या दोघं अभिनय करतो, एकाच क्षेत्रात काम करतो; पण मी इथं काम करू का? वगैरे आम्ही एकमेकांना विचारत नाही. आम्ही स्वतः निर्णय घेऊन काम करतो. आम्ही दोघांनी ठरवलं आहे, की आपण एकत्र काम नाही करायचं. कारण सलग पंधरा-वीस दिवस शूटिंग असेल, तर ज्युलिया एकटी घरी राहते. यावर उपाय म्हणून आम्ही सतत एक गोष्ट केली, की दोघांपैकी एकानं कायम तिच्याजवळ राहायचं. ज्युलियाला ज्या ज्या वेळी आमची गरज होती, त्या प्रत्येक वेळी आम्ही तिच्याबरोबर होतो. तेवढ्यासाठीच आम्ही एकत्र काम नाही करत. मुलांबरोबर आई-वडिलांपैकी एकानं असायलाच हवं, असं माझं ठाम मत आहे. हल्ली फोन, व्हिडीओ कॉल यासारखे पर्याय आहेत; पण या व्हर्च्युअल पर्यायानं आई-वडिलांची जागा भरून निघत नाही.

ज्युलिया सध्या सोफिया कॉलेजात सायकॉलॉजीमध्ये बीए करत आहे. तिला अॕनिमल सायकॉलॉजीमध्ये स्पेशलायजेशन करायचं आहे. तिची एक गोष्ट सांगतो, दहावी पास झाल्यानंतर तू घराजवळ असलेल्या रुईया कॉलेजात प्रवेश घे, असं मी तिला सुचवलं. कारण माझे बरेच मित्र तिथं होते, शिवाय अगदी चालत जाण्याचा रस्ता होता. त्यावर ती म्हणाली, "बाबा, आपल्याकडं सगळीकडं घेऊन जाण्यासाठी ड्रायव्हर आहे. त्यात मी याच कॉलेजला प्रवेश घेतला, तर जगात मी एकटी कधी फिरणार? माझी परीक्षा कधी होणार? त्यामुळं प्रवेशप्रक्रियेतून मला जे कॉलेज मिळालं आहे, ते पेडर रोडला आहे, मी बस अथवा लोकलनं जाईन. तू शिफारस केलेल्या कॉलेजला जाणार नाही, मला जे कॉलेज मिळालं आहे, तिथंच जाईन." या निर्णयाचा तिला खूपच फायदा झाला. तिची निर्णयक्षमता वाढली. तिनं घेतलेला निर्णय योग्य ठरला आणि मी सांगितलेला रुईया कॉलेजात प्रवेश घेण्याचा निर्णय चुकीचा ठरला; पण तरीही मला त्याचा आनंद आहे. कारण त्यानंतर ज्युलियाचा आत्मविश्वास खूप वाढला. ती स्वतंत्रपणे आधी कधी कुठं गेली नव्हती; पण नंतर अगदी अमेरिकेलासुद्धा एकटी जाऊन आली. अडीच महिन्यांच्या या टूरनंतर तिच्यात खूपच बदल झाला. ज्युलियानं शाळेत असताना कधी मोबाईल मागितला नाही. तिच्या मैत्रिणींकडं असला तरी तिनं स्वतःहून आम्हाला सांगितलं होतं की, "मला आता मोबाईल नको, कॉलेजला गेल्यावर द्या, तेसुद्धा मी सांगेन तेव्हा द्या." तिच्या विचारांमध्ये खूप सुस्पष्टता आहे. एकदा मी अमेरिकेत गेलो होतो. तिथं माझा एक मित्र अॕपलमध्ये काम करतो. त्यानं मला सांगितलं की, "मी तुला अॕपलच्या फोनवर चाळीस टक्के डिस्काउंट देतो." मी ज्युलियाला फोन करून तुला फोन हवा आहे का विचारलं, तर तिनं, "एवढा महागडा फोन मला नको, तुला हवा असेल तर घे," असं सांगितलं. खरंतर तरुण मुलामुलींना स्मार्ट फोनचं किती आकर्षण असतं; पण ज्युलियाचे विचारच वेगळे आहेत. माझ्या मुलीचा आम्हाला कुठल्याही बाबतीत कधीच त्रास नसतो, पालक म्हणून मी हे अभिमानानं सांगू शकतो.

पालक म्हणजे जो मुलांच्या बरोबरीनं जातो, जो विचारानं मुलांच्या पुढं असतो, कारण ते विचार त्याच्या अनुभवांवरून आलेले असतात; पण त्या अनुभवांतून आलेल्या विचारांचा सार, ज्यांना तो अनुभव कमी आहे, त्यांच्यावर त्यानं तो लादू नये. आपल्याला आलेले अनुभव मुलांना सांगावेत. त्याला समांतर असणारे अनुभव मुलांना आले असतील आणि त्यांनी विचारलं, तरच आपण त्यांना सल्ला द्यावा. पालक मुलांच्या पुढं चालणारे नको; पण मागं चालणारे असतील तर सगळ्यात उत्तम! थोडक्यात, पालकांनी प्रत्येक चांगल्या-वाईट प्रसंगात मुलांबरोबर राहावं.

(शब्दांकन - मोना भावसार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com