कसं ऐकावं अभिजात संगीत...? (सायली पानसे-शेल्लीकेरी)

sayali panse
sayali panse

कलांमध्ये संगीत ही सर्वश्रेष्ठ कला मानली गेली आहे. असं असलं तरी शास्त्रीय संगीत हे कायमच एका ठराविक श्रेणीपुरतंच मर्यादित राहिलं. शास्त्रीय संगीताच्या तुलनेत उपशास्त्रीय संगीत, सुगम संगीत, नाट्यसंगीत, लोकसंगीत यांसारखे प्रकार श्रोत्यांना अधिक रुचले. हे असं का झालं असावं?

अभिजात संगीताची अर्थात शास्त्रीय संगीताची मैफल ऐकून निनादची अवस्था अगदी भारावल्यासारखी झाली होती. गवयाचे ते धीरगंभीर, तेजस्वी स्वर, लडिवाळ हरकती आणि धबधब्यासारख्या खळाळणाऱ्या तानांनी तो नि:शब्द झाला होता. रोजच्या धावपळीतून आज खऱ्या अर्थानं तो रिलॅक्स झाला, या मैफलीतून त्याला आनंद मिळाला; पण त्यातून आकलन काहीच झालं नव्हतं. त्या कलेचा जास्तीत जास्त आनंद मिळवण्यासाठी त्याचं त्या कलेविषयीचं ज्ञान अपुरं होतं.
ज्या कलेचं, कलापरंपरेचं जगभरात कौतुक होत असतं, ते समजून घेण्याची इच्छा असूनही त्याला त्याबद्दल काही करता येत नव्हतं.
खरंच, निनादसारखे अनेक रसिक आज शास्त्रीय संगीताच्या निर्भेळ आनंदापासून वंचित आहेत.
***

भारतीय संस्कृतीला संगीताची खूप मोठी परंपरा लाभलेली आहे. अगदी वैदिक ग्रंथसंपदेतही संगीताचा उल्लेख आढळतो. त्यानुसार,
नारदमुनींना ब्रह्माकडून संगीताचं वरदान मिळालं, तेव्हापासून संगीत
हा सर्वसामान्य लोकांच्या भावजीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. तसं पाहिलं तर, माणसाचं अगदी लहानपणापासूनच संगीताशी अतूट नातं निर्माण होतं. जन्मतःच बाळ टाहो फोडतं आणि तिथंच स्वरांशी त्याची नाळ जोडली जाते. हृदयाच्या स्पंदनांमधून लय निर्माण होते. मनुष्यप्राण्याची चालही अतिशय तालबद्ध. ही लय चुकली की पाय अडखळलाच म्हणून समजा!
आपल्या आजूबाजूला असलेल्या निसर्गातदेखील स्वर आणि लय भरून राहिलेली आहे. पावसाची संततधार, शांत वाहणारी नदी, खळाळणारा धबधबा, पक्ष्यांचा चिवचिवाट, कोकिळाचं कूजन
यांमधून निर्माण होणारं संगीत सगळ्यांना कायमच मोहिनी घालत आलेलं आहे. लहानपणी चाल लावून म्हटलेल्या कविता आणि श्लोक, अनेक वेळा घोकलेले पाढे, जात्यावरच्या ओव्या, मनोभावे म्हटलेल्या आरत्या... हे सगळं संगीतच! संगीताची आवड असो वा नसो, आपल्या प्रत्येकाचं संगीताशी अत्यंत जवळचं नातं आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
***

पूर्वी संगीत ही आत्मरंजनाची कला समजली जायची. गायक केवळ परमेश्वरासाठी किंवा स्वतःच्या आनंदासाठी गायचे. त्यानंतर संगीताला राजाश्रय मिळाला. चांगला कलावंत कुणाच्या दरबारी असावा याविषयीची चढाओढ सुरू झाली आणि हळूहळू आत्मरंजनाची जागा मनोरंजनानं घेतली. याच्याशी निगडित एक आख्यायिका प्रसिद्ध आहे.
तानसेन हा अकबराच्या दरबारातल्या नवरत्नांपैकी एक होता. अत्यंत तयारीचा हा राजगायक अकबराला आपल्या स्वरांनी नेहमीच मोहिनी घालत असे. एके दिवशी अकबराला प्रश्न पडला, ‘जर तानसेनाचं गाणं ऐकून देहभान हरपून जातं, तर त्याच्या गुरूंचं गाणं ऐकलं तर काय होईल?’ तसं त्यानं तानसेनाला बोलून दाखवलं. जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी तानसेन अकबराला घेऊन वनात गेला आणि गुरू हरिदासांचं गाणं त्यानं अकबराला ऐकवलं. गाणं ऐकून अकबर अत्यंत प्रभावित झाला. दरबारात गेल्यावर त्यानं तानसेनाला विचारलं : ‘‘तुझ्या गुरूंनी शिकवलेलंच तू गातोस, तरी तुझ्या आणि तुझ्या गुरूंच्या गाण्यात जमीन-आसमानाचा फरक कसा?’’
तानसेन नम्रपणे म्हणाला : ‘‘मी पृथ्वीवरच्या बादशहासाठी गातो आणि माझे गुरू ब्रह्मांडाच्या बादशहासाठी गातात, तेव्हा दोन्ही गाण्यांमध्ये फरक तर असणारच!’
राजाश्रयाचा काळ संपला आणि सर्वसामान्य लोकांसाठी
संगीतमैफलींचा खरा प्रारंभ झाला. आत्मरंजनापासून सुरुवात झालेली ही कला फारच थोड्या अवधीत लोकरंजनासाठी विशेष स्थान मिळवू लागली. मनाला प्रसन्नता देणाऱ्या या कलेनं अनेक रसिक निर्माण केले. काही श्रोत्यांनी समजून-उमजून कलेचा आनंद घेतला तर काही श्रोते
काही न समजताही त्या महासागरात आनंदानं विहार करू लागले. संगीतकलेला रसिकांचं कायमच उदंड प्रेम मिळत आलं आहे. चौसष्ट कलांमध्ये संगीत ही सर्वश्रेष्ठ कला मानली गेली आहे. असं असलं तरी शास्त्रीय संगीत हे कायमच एका ठराविक श्रेणीपुरतंच मर्यादित राहिलं. शास्त्रीय संगीताच्या तुलनेत उपशास्त्रीय संगीत, सुगम संगीत, नाट्यसंगीत, लोकसंगीत यांसारखे प्रकार श्रोत्यांना अधिक रुचले.
यामागं अनेक कारणं असली तरी मुख्य कारण असं, ‘शास्त्रीय संगीत हे सर्वसामान्य लोकांच्या आकलनाबाहेरचं आहे, शास्त्रीय संगीत हे अत्यंत क्लिष्ट, अवघड आणि समजायला कठीण आहे’ असा श्रोत्यांमध्ये असलेला समज. प्रसंगी काही गानकलाकारही या प्रकाराची महती पटवून देण्यासाठी तसं बिंबवताना दिसतात! प्रत्यक्षात, कुठल्याही कलेत शरणागतता, समर्पण हे गृहीतच आहे. एखादी कला आपल्या अंगी भिनवायला कलाकारांनी आपलं संपूर्ण आयुष्य खर्च केलेलं आपण बघतो.
आज भारतात आणि भारताबाहेर संगीताच्या अनेक मैफली होत असतात. देशाबाहेर आपल्या शास्त्रीय संगीताबद्दल खूप कुतूहल दिसून येतं. भाषा न समजणारे श्रोतेही शास्त्रीय संगीताचा आनंद लुटताना दिसतात. कारण, कला समजून न घेताही तिचा आनंद घेता येतोच.
***

आजकाल संगीतमहोत्सवांना अभूतपूर्व गर्दी होत असते; पण येणाऱ्या बहुतेक श्रोत्यांना त्या कलेबद्दल फारसं ज्ञान असतंच असं नाही.
त्या कलेच्या केवळ प्रेमापोटी ते आलेले दिसतात. मैफलीत सादर होणारा राग, त्याची साधारण माहिती याबद्दल श्रोत्यांना उत्सुकता असते; पण त्याबद्दलची चौफेर माहिती मिळवणं अनेक कारणांमुळे त्यांना शक्य नसतं. कलाकार प्रत्यक्ष भेटला तरी त्याबद्दल जाणून घेणंही प्रत्यक्षात शक्य असतंच असं नाही. अनेक वेळा संगीत शिकायची इच्छा असूनही वेळ मिळत नसतो आणि केवळ समजून घ्यायचं तर नक्की कुठून आणि कशी सुरवात करावी हे कळत नसतं.
शास्त्रीय गायन ही ‘गुरुमुखी विद्या’ असल्यानं ती पुस्तक वाचून येत नाही. आजकालच्या तांत्रिक युगात अनेक माध्यमं उपलब्ध असली तरी त्यांमधून मिळणारी माहिती इतकी विस्तृत आणि तांत्रिक असते की श्रोत्यांना त्या माहितीचा नेमका उलगडा होत नाही आणि श्रोत्यांची जिज्ञासा तशीच राहून जाते.
***

शास्त्रीय संगीताचं स्वरूप काळानुरूप बदलत आहे. रात्र रात्र रंगणाऱ्या मैफली आता लुप्त झाल्या आहेत. तासन्‌तास रंगणारी मैफल आता वेळेच्या बंधनात अडकली आहे. गायकांना मनसोक्त गायची मुभा मिळेनाशी झाली; शिवाय एकाच कलाकाराचं गायन-वादन तीन तास ऐकण्याची श्रोत्यांची सवयही आता कमी होत आहे. हे असंच होत गेलं तर शास्त्रीय संगीतात दिवसेन्‌दिवस आमूलाग्र बदल होत राहतील आणि त्याचं मूळ स्वरूप हरवून जाईल. असं होऊ नये म्हणून शास्त्रीय संगीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणं महत्त्वाचं आहे. त्यातून मिळणारा आनंद प्रत्येकानं अनुभवणं गरजेचं आहे. कुठलीही गोष्ट शिकण्यासाठी वयोमर्यादा नसते. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे जुन्‍या पिढीतले प्रसिद्ध साहित्यिक-पत्रकार न. चिं. केळकर.
निवृत्तीनंतर गाणं शिकण्याच्या हेतूनं केळकर हे एका
संगीतशिक्षकाकडे गेले. केळकरांचं वय बघता शिक्षक थोडे नाराज झाले आणि त्यांनी केळकरांना विचारलं : ‘‘इतक्या उशिरा गाणं शिकून तुम्ही करणार तरी काय?’’ यावर केळकर म्हणाले : ‘‘मला गाणं शिकायला उशीर झाला खरा; पण मी या जन्माची नव्हे, तर पुढच्या जन्माची तरतूद करत आहे!’’

आज अनेक शाळांमधे शास्त्रीय संगीताची ओळख करून दिली जाते, त्याची गोडी निर्माण केली जाते व पहिल्या दोन परीक्षांचीही सोय असते. यातला प्रत्येकजणच भविष्यकाळात गायक होऊ शकेल असं नाही. मात्र, या उपक्रमाकून एक सच्चा रसिक नक्कीच तयार होईल आणि त्याचा शारीरिक आणि मानसिक पातळीवर निश्चितच फायदा मिळेल. संगीताचा परिणाम केवळ माणसांवरच नव्हे, तर वनस्पतींवर आणि प्राण्यांवरसुद्धा होत असतो.
***

शास्त्रीय संगीताला जास्तीत जास्त रसिक मिळवून देणं ही जबाबदारी जशी ऐकणाऱ्यांची आहे तशीच ती गायकांचीदेखील आहे. आपण गातो ते अत्यंत अवघड, श्रोत्याच्या आकलनाबाहेरचं किंवा क्लिष्ट आहे असा आभास निर्माण करणं म्हणजे रसिकांना आपल्या कलेपासून दूर जायला भाग पाडणं आहे. आपण गातो ते लोकांना न समजणं म्हणजे त्यांना त्या कलेचा आनंद न मिळू देणं होय! तसंच श्रोत्यांच्या आवडीनुसार आपल्या रागप्रस्तुतीकरणाचं स्वरूप बदलणं हेही
त्याच्या मूळ स्वरूपाशी प्रतारणा करणं आहे.

शास्त्रीय संगीताचा श्रोता टिकून राहणं; किंबहुना तो वाढणं यासंदर्भात गायकांची जबाबदारी मोठी आहे. शास्त्रीय गायन हे अत्यंत सुंदर, मनाला शांतता देणारं आणि प्रफुल्लित करणारं आहे असा अनुभव गायकांनी श्रोत्यांना देणं गरजेचं आहे. आपण अनुभवत असलेला आनंद श्रोत्यांनाही मिळवून देणं हाच खरं तर सादरीकरणाचा उद्देश असायला हवा, तरच शास्त्रीय संगीत सर्व स्तरांतल्या श्रोत्यांच्या मनात रुंजी घालू शकेल.
पु. ल. देशपांडे यांनी म्हटलेलं आहे : ‘उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरूर घ्या; पण एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. कारण, पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल; पण कलेशी केलेली मैत्री तुम्हाला का जगायचं हे सांगून जाईल.’
अशा सर्व कलाप्रेमींसाठी, तसेच शास्त्रीय संगीताचा एक जाणकार श्रोता तयार व्हावा या हेतूनं केलेला हा प्रामाणिक लेखनप्रपंच असेल. रागसंगीताची ओळख करून देणं हा या सदराचा प्रमुख उद्देश आहे.
‘शास्त्रीय संगीत आवडतं; पण कळत नाही’, या वर्गात मोडणाऱ्या सर्व गानरसिकांना या सदरातून शास्त्रीय संगीताविषयीची अधिक माहिती मिळेल. गीतप्रकार, राग, स्वर-ताल, मैफल, काव्य अशा अनेक गोष्टी या सदरातून सविस्तरपणे उलगडल्या जातील. शास्त्रीय संगीताचं पूर्वीचं रूप आणि काळानुरूप होत जाणारे बदल यांविषयीची माहितीही असेल. कलाकार, साथ-संगतकार, त्यांची कलेतली देवाण-घेवाण, कलाकाराचं आयुष्य आणि त्याच्याबद्दल वाटणारी उत्सुकता असेही विषय या सदरात ओघाओघानं येत राहतील.
या सदरातून शास्त्रीय संगीताबद्दलचा प्रत्येक पैलू नव्यानं कळेल आणि गानरसिकांनी यापुढच्या काळात ऐकलेली मैफल अधिक आनंददायी, अधिक समृद्ध करणारी होईल हे नक्की...चला तर, या सांगीतिक सफरीसाठी सज्ज होऊ या!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com