श्रवणसंस्कार फार महत्त्वाचे (सायली पानसे-शेल्लीकेरी)

sayali panse
sayali panse

एका सहश्रोत्यानं त्या गानरसिकाला विचारलं : ‘‘रोजच तुमचा मुलगा इथं येऊन झोपून जातो, तर मग त्याला घरीच का नाही ठेवत? इथं आणायचा एवढा अट्टहास कशाला करता?’’ त्यावर तो गानरसिक म्हणाला : ‘‘अहो, हा मोठा झाल्यावर गाणं शिकेल न शिकेल. ते मी आत्ताच सांगू शकत नाही; पण त्याच्यावर बालपणीच सुरेल संगीताचे संस्कार करणं ही मात्र माझीच जबाबदारी नाही का?’’

‘गीतम्, वाद्यम् तथा नृत्यम् त्रयम् संगीतम्युचते’ अशी उक्ती आहे. गायन, वादन आणि नृत्य या स्वतंत्र कला असल्या तरी ‘संगीत’ या संज्ञेमध्ये या तिन्ही कलांचा समावेश असल्याचं मानलं जातं. कारण, या तिन्ही कला एकमेकींना पूरक आहेत, त्यामुळेच कुठल्याही
संगीतमहोत्सवात कंठसंगीताबरोबर, वाद्यसंगीत आणि नृत्यप्रस्तुतीही पाहायला मिळते.

भारतीय संस्कृतीत संगीताला खूप महत्त्व आहे. प्राचीन काळापासून धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांमध्ये संगीताचा अभ्यास व उपयोग केला गेला आहे. ईश्वराच्या जवळ जाण्याचं एक सोपं साधन म्हणूनही संगीताकडे पाहिलं जातं. संगीतासाठी आयुष्य वेचलेला कलाकार असो किंवा शास्त्रीय संगीताची मैफल ऐकणारा सर्वसामान्य रसिक असो, संगीत ऐकताना प्रत्येकाला सदैव आनंदाचीच अनुभूती येत असते.
शास्त्रीय संगीताच्या इतिहासाचा मागोवा घेताना अगदी सामवेदापर्यंत किंवा गंधर्वगानापर्यंतही तो घेता येऊ शकतो. मात्र, तेवढं मागं न जाता, आजच्या शास्त्रीय संगीताची उत्पत्ती ध्रुपदापासून झाली हे जाणकार गानरसिकांना माहीत असतं. ध्रुपद ही भारताची एक समृद्ध आणि शास्त्रीय संगीताची सर्वात जुनी गानशैली आहे. ध्रुपदाचा शब्दश: अर्थ आहे ध्रुव+पद, अर्थात- ज्याचे नियम निश्चित आहेत आणि जे नियमबद्ध आहेत. आजच्या शास्त्रीय संगीताच्या तुलनेत ध्रुपदगायकी गंभीर प्रकृतीची आहे. या शैलीत पुरुषगायकांचं वर्चस्व अधिक असलं तरी स्त्रियादेखील या गायकीचा अभ्यास करताना दिसतात. ध्रुपदगायन हे शास्त्रीय संगीताचं अधिक शुद्ध रूप आहे आणि म्हणूनच शास्त्रीय संगीतापेक्षा ते समजायला थोडं क्लिष्ट आहे असं म्हणायला हरकत नाही. ध्रुपद, शास्त्रीय संगीताच्या बंदिशी, खयाल वगैरेंचा जन्म ब्रजभूमीत झाल्यामुळे सगळ्या गीतांची भाषा ब्रज किंवा हिंदी असते. या गायकीत वीर, भक्ती, श्रृंगार आणि मुख्यतः भक्तिरस दिसून येतो. ध्रुपदगायकांच्या साथीला स्वरासाठी तानपुरा आणि तालासाठी मृदंग किंवा पखवाजाचा वापर केला जातो.
ज़िया फरिदुद्दीन डागर आणि त्यांचे बंधू ज़िया मोईनुद्दीन डागर हे भारतातले महत्त्वाचे ध्रुपदगायक. ध्रुपदशैली पुनरुज्जीवित करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या अनेक शिष्यांनी ध्रुपदपरंपरा पुढं सुरू ठेवली आहे आणि ध्रुपद जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचवलं आहे. उमाकांत-रमाकांत गुंदेचा, ऋत्विक सान्याल, उदय भवाळकर ही आघाडीच्या गायकांची काही नावं. ध्रुपदाचं शुद्ध रूप, त्यातून अनुभवता येणारी शांतता, त्यातला सच्चेपणा शब्दातीत असून तो अनुभवल्याशिवाय समजणं केवळ अशक्य.

शास्त्रीय संगीत ही ध्रुपदाची पुढची पायरी आहे. त्यात ध्रुपदाचे नियम थोडे शिथिल झालेले दिसतात. आज शास्त्रीय संगीताच्या दोन पद्धती प्रचलित आहेत. पहिली पद्धत म्हणजे कर्नाटक संगीत. हे दक्षिण भारतात लोकप्रिय आहे. दुसरी पद्धत म्हणजे हिंदुस्थानी संगीत. हे उर्वरित भारतात लोकप्रिय आहे. भारतीय संगीत, मग ते दक्षिण भारतीय असो किंवा उत्तर भारतीय, जागतिक संगीतात ते सर्वश्रेष्ठ मानलं जातं. दोन्ही शैली स्वरप्रधान आहेत. त्यात शब्द वापरले गेले तरी स्वराला कायमच वरचं स्थान बहाल केलेलं दिसतं. ते व्यक्तिकेंद्रित आहे. आपापल्या प्रतिभेनुसार कलाकार व्यक्त होत असतो आणि क्षमतेनुसार स्वतः संगीताचा आनंद घेत दुसऱ्यांना देत असतो.
पूर्वीच्या काळी मैफलीला वेळेचं बंधन नसे. गायक देहभान हरपून राग आळवत आणि रात्र कशी आणि कधी सरायची याचा पत्ताही लागत नसे. रसिकश्रोतेही तहान-भूक हरपून मैफलीचा आनंद घेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण श्रवणानंदात डुंबून जात.

आज काळानुसार मैफलींचं स्वरूप पूर्णतः बदललेलं आहे. कलाकाराला घड्याळाचा काटा बघूनच प्रतिभा खुलवावी लागते. दिलेल्या वेळेत शास्त्रीय, उपशास्त्रीय, भैरवी वगैरे गाऊन संपूर्ण मैफलीचं स्वरूप उभं करावं लागतं. त्यातून मैफल खासगी आणि छोटेखानी असेल तर कलाकाराला थोडीफार मुभा असते; पण
मोठमोठ्या मैफली मात्र पूर्णतः व्यावसायिक झालेल्या दिसतात. कमी वेळात अधिक ऐकायला मिळावं या हेतूनं दोन किंवा अधिक कलाकार एका मैफलीत गाताना दिसतात.

एका संगीतमहोत्सवातला असाच हा एक किस्सा. अनेक मोठमोठ्या कलाकारांचं गायन-वादन प्रत्यक्ष ऐकण्याची संधी त्या महोत्सवात मिळणार होती. रसिक-प्रेक्षकांची अगदी रोजच भरभरून गर्दी होत होती. तिथं रोज एक गानरसिक आपल्या लहान मुलाला घेऊन येत. गाणं सुरू होण्याच्या आसपासच ते मूल झोपून जाई. मग रात्रभर ते त्याला मांडीवर घेऊन बसत आणि मैफल संपल्यावर झोपलेल्या अवस्थेत मुलाला कडेवरून घेऊन घरी नेत. सलग दोन-तीन दिवस हे बघितल्यावर एका सहश्रोत्यानं त्यांना विचारलं : ‘‘रोजच तुमचा मुलगा इथं येऊन झोपून जातो, तर मग त्याला घरीच का नाही ठेवत? इथं आणायचा एवढा अट्टहास कशाला करता?’’ त्यावर त्या गानरसिकानं उत्तर दिलं : ‘‘अहो, हा मोठा झाल्यावर गाणं शिकेल न शिकेल. ते मी आत्ताच सांगू शकत नाही; पण त्याच्यावर बालपणीच सुरेल संगीताचे संस्कार करणं ही मात्र माझीच जबाबदारी नाही का? त्यासंदर्भात मी कमी पडायला नको म्हणून प्रयत्न करत आहे...बाकी त्याचं नशीब.’’
खरंच, अशा विचारांचे लोक समाजात असतील तर उद्याची पिढी नक्कीच अधिक सर्जनशील असेल यात शंका नाही.

शास्त्रीय संगीत हे महासागरासारखं विशाल आहे. त्यात कमालीची शिस्त आहे. संगीत हे सात स्वरांत सामावलेलं असलं तरी त्यातले बारकावे समजून घेण्यात संपूर्ण आयुष्य वेचावं लागतं. शास्त्रीय संगीत हे पुरातन असलं तरी त्यात नवनव्या विचारसरणी येत असतात, काळानुसार त्याचं स्वरूप बदलत असतं, तरीसुद्धा भारतीय शास्त्रीय संगीत हे एका ठराविक चौकटीबाहेर नाही. ते नियमाला धरून आहे. उदाहरणार्थ : राग, ताल, रागमांडणी, रागप्रहर इत्यादी. ते समजून घेण्यासाठी मूलभूत संकल्पना जाणून घेणं आवश्यक आहे.
यापुढच्या लेखांमधून त्या संकल्पना जाणून घ्यायचा प्रयत्न आपण करू.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com