मनासारखा लागावा स्वर...! (सायली पानसे-शेल्लीकेरी)

sayali panse
sayali panse

एखाद्या रागातले ठराविक स्वर म्हणजे ठराविक रंग अशी कल्पना आपण केल्यास त्या रंगांच्या साह्यानं प्रत्येक कलाकार स्वतःच्या प्रतिभेप्रमाणे चित्र तयार करत असतो. एका गायकानं हे सात रंग घेऊन रोज एक चित्र काढलं तरी रोज एक नवीन चित्र तयार होऊ शकेल हे वेगळं सांगायला नको. रोज वेगळं चित्र काढण्याची प्रतिभा मात्र हवी!

या सदरातून सध्या आपण संगीताची प्राथमिक माहिती घेत आहोत. यापुढच्या लेखांपासून आपण भारतीय शास्त्रीय संगीताच्या मूलभूत तत्त्वांची तोंडओळख करून घेऊ. संगीतातल्या सौंदर्यस्थळांचा जास्तीत जास्त आनंद घेण्यासाठी त्यातल्या महत्त्वपूर्ण संकल्पना समजून घ्यायला पाहिजेत. अर्थात हे सर्व समजून घेताना मैफल ऐकण्याचाही सराव हवाच.

संगीतातला पहिला स्वर ‘सा’. त्याचं शास्त्रामधलं नाव ‘षड्ज’ असं आहे. षड् म्हणजे संस्कृत भाषेत सहा. मूळ स्वरापासून पुढील स्वरांची निर्मिती होते म्हणून ‘सा’ या स्वराला षड्ज असं म्हटलं आहे. सा, रे, ग, म, प, ध, नी या स्वरांची मूळ नावं अनुक्रमे षड्ज, ऋषभ, गंधार, मध्यम, पंचम, धैवत आणि निषाद अशी आहेत. भारतीय संगीतात सप्त स्वरांचा संबंध निसर्गातल्या ध्वनींशी जोडलेला आहे. उदाहरणार्थ :- षड्ज : मोराचा आवाज, ऋषभ : चातक पक्ष्याचा, आपल्या जोडीदाराला साद घालण्याचा आवाज, गंधार : शेळीच्या ओरडण्याचा आवाज, मध्यम : करकोच्याचा आवाज, पंचम : कोकिळाची कुऽहूऽ, धैवत : घोड्याच्या खिंकाळण्याचा आवाज, निषाद : हत्तीच्या ओरडण्याचा आवाज. म्हणजेच हे सर्व प्राणी अनुक्रमे या स्वरांमध्ये बोलतात. या सात स्वरांच्या समूहाला सप्तक असं म्हणतात. हार्मोनिअमचं चित्र बघितलं तर अशी तीन/साडेतीन सप्तकं त्यावर दिसतात. मानवी गळ्यातही सर्वसाधारणपणे दोन सप्तकांत गाण्याची क्षमता असते. ज्या सप्तकात गायक सहजपणे सा रे ग म प ध नी हे स्वर म्हणतो त्याला ‘मध्य सप्तक’ असं म्हणतात. मध्य सप्तकातल्या ‘सा’च्या खाली गाता येणारे स्वर म्हणजे ‘सा नी ध प म...’ याला ‘मंद्र सप्तक’ असं म्हणतात आणि मध्य सप्तकाच्या वर म्हणजे ‘सा रे ग म प...’ याला ‘तार सप्तक’ असं म्हणतात. काही मोजके कलाकार मंद्र सप्तकाच्याही खाली किंवा तार सप्तकाच्याही वरच्या स्वरात गाऊ शकतात त्याला ‘अतिमंद्र सप्तक’ आणि
‘अतितार सप्तक’ असं म्हणतात. मंद्र आणि तारसप्तकात स्वर लावल्यास रसिकश्रोत्यांची विशेष वाहवा मिळाल्याचं कायमच दिसून येतं.

वर उल्लेखिलेले सात स्वर म्हणजे आपण सात रंग समजू. त्यांना ‘शुद्ध स्वर’ असं म्हणतात. या सात स्वरांपैकी‘ सा’ व ‘प’ हे स्वर अचल आहेत, म्हणजेच त्यांचं स्थान निश्चित आहे. थोडक्यात ‘सा’ व ‘प’ हे रंग कधीच बदलत नाही. त्याउलट रे, ग, ध, नी या स्वरांमध्ये आपलं मूळ स्थान बदलण्याची क्षमता असते. ते आपली मूळ जागा बदलून कमी उंचीचे होऊ शकतात. थोडक्यात, त्यांचा रंग हलका होऊ शकतो. त्यांना ‘कोमल स्वर’ असं संबोधतात आणि ‘म’ हा एकच स्वर आपली मूळ जागा सोडून जास्त उंचीचा होतो, म्हणजे त्याचा रंग गडद होऊ शकतो. त्याला ‘तीव्र’ असं संबोधतात. अशा प्रकारे संगीतात एकूण बारा स्वर असतात.
सा, कोमल रे, शुद्ध रे, कोमल ग, शुद्ध ग, शुद्ध म, तीव्र म, प, कोमल ध, शुद्ध ध, कोमल नी आणि शुद्ध नी.
वादन असो अथवा गायन, शिष्याकडून स्वरांची स्थानं पक्की करून घेण्याची मोठी जबाबदारी गुरूंवर असते. कारण, संपूर्ण संगीत या स्वरांमध्ये सामावलेलं आहे. शिष्यासाठी या स्वरांची स्थानं नेमकी लक्षात ठेवणं आणि त्याबरहुकूम वाद्यातून किंवा गळ्यातून काढणं ही सुरुवातीच्या काळात अत्यंत अवघड गोष्ट असते. ही स्वरस्थानं डोक्यात पक्की होईपर्यंत गुरूंसमोर बसून रियाज करणंच इष्ट असतं आणि म्हणूनच संगीत ही गुरुमुखी विद्या आहे.

राग ही भारतीय शास्त्रीय संगीतातली मौलिक संकल्पना आहे. नियमबद्ध स्वर - ज्यात मनोरंजन आणि रस निर्माण करणाऱ्याची क्षमता असते - त्याला ‘राग’ असं म्हणतात. राग म्हणजे केवळ स्वर नव्हे, तर तो असा एक स्वरसमूह असतो, ज्यात सौंदर्य निर्माण करण्याची व स्वरांचे अनेक आकृतीबंध निर्माण करण्याची क्षमता असते. वर उल्लेखिलेल्या बारा स्वरांपैकी निवडक स्वरांचा एक ‘राग’ तयार होतो. पूर्वीपासून चालत आलेल्या रागसंगीतात बुजुर्गांनी अशा अनेक रागांची निर्मिती केली. त्या रागसंगीतात आजही भर पडत आहे आणि पुढंही पडत राहील. त्यांतले अनेक राग रसिकांवर कायमच मोहिनी घालत आले आहेत. यमन, भूप, बिहाग, बागेश्री, भीमपलास, मारूबिहाग, मधुवंती यांसारखे राग मैफलीत नेहमीच गायले-वाजवले जातात. एखाद्या रागातले ठराविक स्वर म्हणजे ठराविक रंग अशी कल्पना आपण केल्यास त्या रंगांच्या साह्यानं प्रत्येक कलाकार स्वतःच्या प्रतिभेप्रमाणे चित्र तयार करत असतो. एका गायकानं हे सात रंग घेऊन रोज एक चित्र काढलं तरी रोज एक नवीन चित्र तयार होऊ शकेल हे वेगळं सांगायला नको. रोज वेगळं चित्र काढण्याची प्रतिभा मात्र हवी! याच कारणामुळे दोन गायकांनी जरी एकच राग गायला तरी तो श्रोत्यांना वेगळा जाणवतो.

शास्त्रीय संगीत गाताना रागातला एकेक पुढचा स्वर घेत रागस्वरूप उलगडलं जातं. हे स्वर आकारात गायची पद्धत आहे. एखादी अनोळखी लिपी जशी वाचणाऱ्याला सारखीच वाटेल तसंच आकाराचं होतं. सर्वसामान्य रसिकाला सर्व आकार सारखेच वाटतात म्हणून गायक इतका वेळ नक्की काय ‘आ...ऊ...’ करतो आहे याचं आकलन होत नाही. हे स्वर कळले नाहीत तरीसुद्धा त्या स्वरांचा
चढ-उतार त्या आकारातून स्पष्ट कळतो आणि सामान्य श्रोता त्या आकारांमागचा स्वर न कळूनसुद्धा संगीताचा पुरेपूर आनंद लुटू शकतो हे महत्त्वाचं. शास्त्रीय संगीत शिकलेल्या विद्यार्थ्याला मात्र त्या आकारामागचे स्वर समजतात.
रसिकांना शब्दातून, अभिनयातून, काव्यातून, नृत्यातून भाव कळतो; पण केवळ आकार गाऊन रागस्वरूप उभं करायचं, रागभाव निर्माण करायचा आणि त्यातून रसनिष्पत्ती करायची ही अत्यंत अवघड गोष्ट आहे, म्हणूनच सर्व कलांमध्ये कंठसंगीताला सर्वाधिक महत्त्व देण्यात आलं आहे.

गायक मैफल सुरू करतो तेव्हा मनात निश्चित केलेल्या रागातले ठराविक स्वर आपल्या प्रतिभेनं आळवतो, त्या स्वरांचा आनंद श्रोत्यांना देतो. हळूहळू त्या स्वरांची, तालाची गती वाढते. कधी आकारातून, कधी स्वरातून, तर कधी काव्याच्या साह्यानं कलाकार रागाची मांडणी करत असतो. हा उलगडलेला राग कलाकाराला मिळालेल्या तालमीनुसार, बुद्धीनुसार, प्रतिभेनुसार आणि त्या वेळेच्या मनःस्थितीनुसार उभा राहत असतो, म्हणूनच कधी मैफल कलाकाराच्या मनासारखी होते, कधी उत्तरोत्तर रंगत जाते, तर कधी काही केल्या मैफलीत रंगच भरला जात नाही. रागात अभिप्रेत असलेले नेमके स्वर प्रत्येक वेळी तसेच लागणं इथं गायकाचं कौशल्य असतं. स्वर नक्की कसा, कुठं लावायचा हे इतर वाद्यांवर एक वेळ दाखवता येतं; पण गायकाला तो समजून-उमजून लावावा लागतो. मनासारखा स्वर लागेपर्यंत कलाकाराचं उभं आयुष्य वेचलं जातं आणि एकदा त्या स्वराचा आनंद मिळाला की इतर कुठलाही आनंद त्यापुढं दुय्यम असतो.
पुढच्या लेखात आपण बंदिश समजून घ्यायचा प्रयत्न करू.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com