ओळख ‘बंदिशी’ची (सायली पानसे-शेल्लीकेरी)

sayali panse
sayali panse

मनाप्रमाणे स्वरविस्तार झाला की कलाकार पुढच्या टप्प्याकडे वळतो, तो म्हणजे रागाची ‘बंदिश.’ रागाचं अमूर्त रूप सगुण रूपातून दाखवण्याचा प्रयत्न म्हणजे ‘बंदिश’. रागप्रस्तुतीकरणासाठी विशिष्ट रागात आणि तालात बांधलेल्या गीताला ‘बंदिश’ किंवा ‘चीज’ असं म्हटलं जातं.

एखादा राग सादर करायचा, असं ठरलं की सुरवातीला त्या रागातले स्वर आळवले जातात. स्वरांच्या विस्तारातून रागस्वरूप उभं केलं जातं. त्या रागाचा भाव श्रोत्यांपर्यंत पोचवला जातो. हे करत असताना ठराविक गोष्टी या विस्तारात अपेक्षित असतात. रागनियमाप्रमाणे निश्चित स्वरांचा समावेश यात असतो. रागाची सुरुवात संथ लयीत असते. मनाप्रमाणे स्वरविस्तार झाला की कलाकार पुढच्या टप्प्याकडे वळतो, तो म्हणजे रागाची ‘बंदिश.’ रागाचं अमूर्त रूप सगुण रूपातून दाखवण्याचा प्रयत्न म्हणजे ‘बंदिश’. रागप्रस्तुतीकरणासाठी विशिष्ट रागात आणि तालात बांधलेल्या गीताला ‘बंदिश’ किंवा ‘चीज’ असं म्हटलं जातं. वादक वाजवतात ती ‘गत.’
थोडक्यात, बंदिश म्हणजे रागाच्या चौकटीत बसवलेलं काव्य. बंदिश रचणाऱ्यांना ‘वाग्येयकार’ असं म्हणतात. हे काव्य बहुधा हिंदी, ब्रज, मैथिली, अवधी, माळवी, भोजपुरी, डोगरी किंवा पंजाबी भाषेत असतं. या बंदिशी खूप जुन्या काळापासून चालत आलेल्या आहेत.

विद्यार्थिदशेत सांगीतिक अभ्यासाची सुरवात बंदिशीपासून होते. लहानपणी ज्याप्रमाणे पाढे-परवचा घोकून घोकून पाठ केले जातात त्याचप्रमाणे प्रत्येक बंदिश ही गायकानं घोटलेली असते. मोठमोठे कलाकार असोत, उस्ताद असोत, त्यांच्या शिक्षणाची सुरवात बंदिशीपासूनच झालेली असते. बंदिशीच्या माध्यमातून त्या रागातले स्वर, रागचलन, रागस्वरूप, रागभाव, ताल, लय वगैरे सर्व गोष्टींचा उलगडा होत असतो. बंदिशीबाबतीत कुमार गंधर्व म्हणत असत : ‘एखाद्या प्रियकराची प्रेयसीशी पहिली ओळख जशी गोडीची व्हावी लागते तसंच बंदिशीचं असतं. रागाच्या कुलमर्यादेत वाढलेल्या बंदिशीच्या अंतर्मनात जाऊन, तिची ओळख करून घ्यावी लागते, मगच तिचं चालचलन कळतं. सौंदर्याच्या नाना प्रकारांत दडलेल्या स्थानांचा शोध लागतो.’

ते म्हणत : ‘बंदिश हे राग सजवण्याचं एक उपकरण आहे. राग मुळात वस्त्रहीन असतात. जेव्हा बंदिशी वेगवेगळ्या तालात आणि लयीत गायल्या जातात तेव्हा जणू रागच वेगवेगळी वस्त्रं परिधान करून आपल्या समोर येत असतो.’
रागसंगीत हे स्वरप्रधान असल्यामुळे त्यात काव्याला थोडं दुय्यम स्थान असतं. शब्दांचे उच्चार, त्यांचा अर्थ, काव्यातल्या शब्दांचा प्रयोग यांबाबत फार काटेकोरपणा असतोच असं नाही आणि म्हणूनच बऱ्याच वेळा शब्दांचे अपभ्रंशही झालेले दिसतात. पूर्वीच्या काळी आपल्या घराण्यातली बंदिश बाहेर कुणाला मिळू नये म्हणूनसुद्धा बऱ्याच वेळा अनाकलनीय उच्चार केले जात असत. असं असलं तरीसुद्धा संगीत ऐकताना किंवा त्याचा आनंद घेताना कुठलीही बाधा येत नाही.
आज बंदिश शिकली की प्रथम ध्वनिमुद्रित केली जाते, क्वचित लिहून घेतली जाते; पण पूर्वी ‘बंदिश घोकूनच तोंडपाठ झाली पाहिजे’ असा गुरूंचा धाक असायचा. शब्दांचे अपभ्रंश होण्याचं हेही एक महत्त्वाचं कारण होतं. आजकाल कलाकार बंदिशीच्या काव्याबद्दल जागरूक झालेले दिसतात. कारण, शास्त्रीय संगीत स्वरप्रधान असलं तरी बंदिशीचं काव्य समजणं आणि त्याचा आनंद श्रोत्यांना देणं हेही महत्त्वाचंच आहे. ‘भूप’ रागातली ‘सहेला रे’, ‘कलावती’मधली ‘तन मन धन तोपे वारूँ’, ‘बागेश्री’मधली ‘ए री माई साजन नहीं आए’ किंवा ‘जोगकंस’मधली ‘सुघर भर पायो’ अशा अनेक लोकप्रिय बंदिशी रसिकांना तोंडपाठ असतात.

बंदिशीचं काव्य साधारणतः चार-सहा ओळींपुरतं मर्यादित असतं आणि एक ओळ साधारणतः पाच ते सहा शब्दांची असते. पहिल्या दोन ओळींना ‘स्थायी’ आणि पुढच्या ओळींना ‘अंतरा’ असं संबोधलं जातं. उदाहरणार्थ : ‘मारू बिहाग’ रागातल्या प्रसिद्ध बंदिशीत,
जागूँ मैं सारी रैना बलमा
रसिया मन लागेना मोरा...ही ‘स्थायी’ आहे आणि
बहुत रमायो सौतन घरमां
पिया गरवा लगाओ... हा ‘अंतरा’ आहे.
रागस्वरूप उलगडून दाखवताना ‘स्थायी’च्या पहिल्या ओळीतले पहिले मोजके शब्द पुनःपुन्हा गायले जातात. त्याला ‘मुखडा’ असं म्हटलं जातं. या बंदिशीत ‘जागूँ मैं सारी रैना’ हा मुखडा आहे.
एका ठराविक विषयाची जशी अनेक पुस्तकं असू शकतात, त्याच धर्तीवर एका रागात असंख्य बंदिशी बांधल्या जाऊ शकतात. जेवढ्या अधिक बंदिशी कलाकाराला अवगत असतात तेवढा कलाकार अधिक श्रीमंत! कलाकाराचा खजिनाच तो! यामुळेच बुजुर्गांनी बांधून ठेवलेल्या बंदिशी शिकण्यासाठी आणि त्या सादर करण्यासाठी कलाकार कायमच उत्सुक असतात. रागसंगीताच्या अभ्यासात जुन्या बंदिशींचे संस्कार होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या बंदिशी दिसायला लहान असल्या तरी त्यांचा आवाका खूप मोठा असतो. चांगल्या बंदिशींमधला महत्त्वाचा गुणविशेष म्हणजे, रागस्वरूपाबरोबरच,
रागभाव आणि रागप्रकृती त्यातून दिसते. ज्या बंदिशी पारंपरिक आहेत, त्यांचे विषय पूर्वीच्या काळाला अनुसरून असतात. ‘सास-ननंद सताए’ किंवा ‘सौतनसंग करत रंगरलियाँ’ यांसारखे कालबाह्य विषय बंदिशींमधून दिसून येतात. याव्यतिरिक्त प्रेम, विरह, भक्ती, गुरुकृपा, तत्त्वज्ञान, मन, श्रृंगार, रागवर्णन, शरणभावना यांसारख्या अनेक विषयांवर बंदिशी बांधलेल्या असतात. काही बुजुर्गांनी अत्यंत वेगळे विषय निवडून बंदिशी केलेल्या दिसतात. उदाहरणार्थ : दिनकर कायकिणी यांनी स्वातंत्र्यदिनावर बंदिश रचलेली आहे.
स्वतंत्र भयो है देश हमारो
कष्ट किये सब फल पाये।।
मोहनाको तत्त्व धरे लोगवा सब
अहिंसा परमधर्म मुखि मुखि गाये ।।

काही बंदिशींना सुंदर इतिहास असतो व हा इतिहास त्या बंदिशीचं वैशिष्ट्य ठरतो. उदाहरणादाखल वसंतराव देशपांडे आणि कुमार गंधर्व यांनी पत्राच्या माध्यमातून एकत्र बांधलेली ही बंदिश...एक दिवस वसंतरावांनी कुमारांना देवासला पत्र पाठवलं, त्यावर बंदिशीची ‘स्थायी’ लिहिलेली होती.
मैं आऊँ तोरे मंदरवा
पैंया परन देहो मोरे मनबसिया।।

त्यावर कुमारांनी उत्तरात बंदिशीचा अंतरा लिहून पाठवला :
अरे मेरो मढैय्या (घर) तोरा आहे रे
काहे धरो चरन मेरो मनबसिया ।।

अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण बंदिशी असतात; मग ते वैशिष्ट्य प्रसंगाचं असेल, विषयाचं, सांगीतिक, शाब्दिक किंवा भावनांचं असेल. कलाकारांनी रचलेल्या बंदिशींमध्ये त्यांच्या त्या वेळच्या मानसिक आणि भावनिक अवस्थेचं चित्रण दिसून येतं. काळानुरूप बंदिशींच्या स्वरूपात अनेक बदल होत गेले. विषय बदलले, तालवैविध्य आलं, प्रस्तुतीकरण बदललं; पण बंदिशीचं महत्त्व मात्र अजूनही तसंच आहे. आजसुद्धा प्रतिभावंत कलाकार नावीन्यपूर्ण बंदिशींची रचना करत असतात. काळानुसार, नवीन विचार आणि नवीन कल्पना बंदिशीतून समोर येणं हे नवीन पिढीच्या उत्तम प्रतिभेचं लक्षण आहे.
पुढच्या लेखात आपण जाणून घेऊ ताल ही संकल्पना.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com