साथीची वाद्यं (सायली पानसे-शेल्लीकेरी)

sayali
sayali

शास्त्रीय संगीताच्या मैफलीत साथीच्या वाद्यांना आणि साथीदारांना अनन्यसाधारण महत्त्व असतं. दोन तानपुरे, हार्मोनिअम, तबला, कधीतरी स्वरमंडल आणि क्वचितप्रसंगी सारंगी अशी वाद्यं शास्त्रीय संगीताच्या कुठल्याही मैफलीत दिसून येतात. हार्मोनिअम आणि तबला ही दोन्ही वाद्यं मिळून मैफलीचा दर्जा उंचावत असतात.

मैफल कितीही श्रवणीय असली तरी ती देखणी दिसते ती रंगमंचावरच्या गायककलाकारांमुळे, वाद्यांमुळे आणि ती वाद्यं कुशलतेनं वाजवणाऱ्या साथीदारांमुळे-संगतकारांमुळे. त्यांच्या सांगीतिक विचारांची देवाण-घेवाण आणि एकमेकांना दिली जात असलेली दाद या दोन्ही गोष्टी मैफलीला जिवंत करत असतात. तसं नसतं तर आजकालच्या ‘कराओके’प्रमाणे इलेक्ट्रॉनिक तानपुऱ्यावर आणि तबल्यावर कार्यक्रम सर्रास होताना दिसले असते. मैफलीत साथीच्या वाद्यांना आणि साथीदारांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. दोन तानपुरे, हार्मोनिअम, तबला, कधीतरी स्वरमंडल आणि क्वचित्‌प्रसंगी सारंगी अशी वाद्यं कुठल्याही शास्त्रीय संगीताच्या मैफलीत दिसून येतात. आजकाल इलेक्ट्रॉनिक तानपुऱ्यानं एखाद्या पारंपरिक तानपुऱ्याची जागा घेतलेली दिसते; पण मुख्य म्हणजे सोय आणि उत्तम ‘साउंड’ ही दोन कारणं या बदलासाठी पुरेशी आहेत. तरीसुद्धा जुनं ते सोनं म्हणत हा बदल जवळजवळ सर्व प्रथितयश गायकांनी स्वीकारलेला दिसून येतो. आजच्या लेखात आपण याच साथीच्या वाद्यांची माहिती घेणार आहोत.

तंबोरा किंवा तानपुरा हा गायकाचा आधारस्तंभ असतो. ‘तंबरू’ या नावाच्या देवतेच्या खांद्यावर असलेलं वाद्य ‘तंबोरा’ या नावानं ओळखलं जातं. भारतीय संगीतात या वाद्याला अनन्यसाधारण महत्त्व असून त्याला ‘नादब्रह्म’ म्हटलेलं आहे. शांत वातावरणात तंबोऱ्याच्या तारा नुसत्या छेडल्या तरी प्रसन्न वातावरण निर्माण होतं. तंबोरा सुरात मिळवताना ऐकणं हीसुद्धा रसिकांसाठी एक पर्वणी असते. पु. लं. देशपांडे यांनी याचं खूप सुंदर वर्णन केलं आहे. ते लिहितात : ‘‘तंबोरे जुळले जात असताना ऐकणं हे प्रसाधनात गुंग झालेल्या युवतीला पाहण्यासारखं आल्हाददायक आहे. बुच्च्या कानांच्या पाळ्यांवर मोत्याची कुडी चढवल्यावर जसा ट्रान्स्फर सीन होतो, तसाच कुंद बोलणाऱ्या तंबोऱ्याच्या तारांवर जव्हार बोलायला लागली की होतो. तो स्वर आता गायकाच्या गळ्यातून बाहेर केव्हा पडतो याची उत्कंठा श्रोत्यांना लागते. प्रसाधन संपल्यावर ती सौंदर्यवती आता आपल्याकडे पाहून प्रसन्न स्मिताची मेहेरबानी केव्हा करील या उत्कंठेसारखीच ही पहिल्या षड्ज-मीलनाची उत्कंठा असते.’’

विद्यार्थिदशेत अशा सुरेल तानपुऱ्याच्या साह्यानं स्वरांची मेहनत केल्यास स्वरस्थानं डोक्यात अधिक पक्की व्हायला मदत होते. तंबोरा या वाद्यात चार तारांचा समावेश असतो. या चार तारा विशिष्ट सुरात मिळवून फक्त छेडल्या जातात. साधारणतः तंबोऱ्यातली पहिली तार रागातल्या स्वराप्रमाणे पंचमात किंवा मध्यमात लावली जाते. मधल्या दोन तारा मध्य सप्तकातल्या षड्जात लावल्या जातात, तर शेवटची तार मंद्र सप्तकातल्या षड्जात लावली जाते. तंबोऱ्यावर वरकरणी पाहता चार तारा वाजत असल्या तरी तारांच्या कंपनातून संपूर्ण सप्तकातले स्वर निर्माण होत असतात. अभ्यासानं व सरावानंच ते ऐकू येत असले तरी प्रत्येक गायकाला गाताना त्या स्वरांचा भरणा मिळत असतो. तंबोऱ्यातला स्वर पुरेसा ऐकू येईल आणि त्याचा भरणा मिळेल अशा प्रकारे वेगवेगळे गायक आपापली सवय, सोय, गरज, शोभा आणि आवश्यकतेनुसार तंबोरा धरत असतात. अनेक वेळा गायककलाकाराच्या मागं त्याचे शिष्य तंबोरा छेडत असतात आणि गायक स्वतः ‘स्वरमंडल’ घेऊन गाताना दिसतो. स्वरमंडल या वाद्याच्या नावामधूनच त्याचा अर्थ लक्षात येतो. स्वर अर्थात सा, रे, ग, म...आणि मंडल अर्थात गट. थोडक्यात, अनेक स्वरांचा समूह म्हणजे स्वरमंडल. कलाकार गात असलेल्या रागातले स्वर, स्वरमंडलाच्या तारांमधून ‘ट्यून’ केले जातात. यातून कलाकाराला स्वराचा भरणा तर मिळतोच; पण रागाचा एक सुंदर ‘माहौल’ तयार व्हायला मदत होते. तारांवर बोटांचा हळुवार स्पर्श करत स्वरमंडलाच्या तारा छेडल्या जातात.

मैफलीत स्वरसाथ करणारं अजून एक वाद्य म्हणजे ‘हार्मोनिअम’. महाराष्ट्रात या वाद्याला ‘पेटी’देखील म्हटलं जात असलं तरी हे वाद्य हार्मोनिअम या नावानंच सर्वत्र परिचित आहे. सुरांशी संवाद साधणारं वाद्य म्हणून मनोहर चिमोटे गुरुजींनी या वाद्याला ‘संवादिनी’ असं साजेसं नाव बहाल केलं. हिंदुस्थानी संगीतासाठी या वाद्याचा प्रथम प्रयोग मराठी संगीतनाटकांच्या माध्यमातून सुरू झाला तो सन १८८२ मध्ये आणि तेव्हापासून एका स्वतंत्र स्वरवाद्याची देणगी भारतीय संगीताला मिळाली. त्यापूर्वी मैफलीत स्वरासाठी सारंगीचा वापर केला जात असे. मानवी गळ्याच्या अत्यंत जवळ जाणारं वाद्य म्हणून मैफलीत सारंगीला विशेष स्थान होतं. असं असलं तरी हुबेहूब गळ्यासारखं हे वाद्य ऐकू येतं, हेच ते वाद्य मागं पडायचं मुख्य कारण ठरलं! सारंगीच्या तुलनेत हार्मोनिअमचा ‘साऊंड’ हा ‘कॉन्ट्रास्ट’ होता आणि म्हणूनच मानवी गळ्याबरोबर तो अधिक भावला. याच कारणामुळे मैफलीत संवादिनी अधिक प्रचलित झाली. हळूहळू सारंगीचं प्रमाण कमी होत गेलं आणि आज संवादिनी बहुतेक सर्व मैफलींमध्ये आपलं स्थान टिकवून आहे. तंबोरा आणि तबला हे संवादिनीच्या साह्यानं ‘ट्यून’ केले जातात. कलाकाराला स्वरांचा भरणा देण्याच्या बरोबरीनं स्वरसाथ करण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम संवादिनी करत असते. गायकाच्या गळ्यातून बाहेर पडणाऱ्या स्वरांना, संवादिनीमार्फत पूरक स्वरसाथ मिळत असते. प्रसंगी गायकाला विश्रांती देण्याचंही महत्त्वाचं काम संवादिनी करत असते आणि याच वेळी वादकाचं वाद्यावरील कौशल्य आणि प्रभुत्व त्याच्या वादनातून दिसून येते. आजकाल सोईसाठी नेहमीच्या आकारापेक्षा लहान, म्हणजे केवळ अडीच सप्तकाची, हार्मोनिअम तयार केली जाते. स्वरसाथीशिवाय स्वतंत्र वादनासाठीदेखील हार्मोनिअमचा वापर केला जातो.

मैफलीतलं सर्वाधिक लोकप्रिय वाद्य म्हणजे ‘तबला.’ संगीताची आवड निर्माण व्हावी म्हणून बहुतेक पालक आपल्या मुलांना तबल्याच्या क्लासला पाठवतात. तबल्यातून निघणारे वेगवेगळ्या प्रकारचे नाद हे त्याच्या लोकप्रियतेचं मुख्य कारण असावं. भारतीय संगीतात साथसंगतीसाठी आणि स्वतंत्र वादनासाठी हे वाद्य वापरलं जातं. या वाद्याच्या जोडीपैकी उजव्या हातानं वाजवतात त्याला ‘तबला’, तर डाव्या हातानं वाजवतात त्याला ‘डग्गा’ अथवा ‘बायाँ’ असं म्हटलं जातं. डग्ग्याचा उपयोग खर्ज ध्वनी काढण्यासाठी, तर तबल्याचा वापर उच्च ध्वनी काढण्यासाठी केला जातो. तबला हे वाद्य ताल आणि लय दाखवण्यासाठी वापरलं जात असल्यानं मैफलीत चैतन्य निर्माण करतं. रागसंगीतात तबल्यावर एखादा ‘ठेका’ सुरू असला तरी तो कधी आणि किती भरून वाजवायचा हा भाग महत्त्वाचा असतो. तबल्यावर वाजणारा ठेका हा नेहमीच गायकीला पूरक असावा लागतो, नाहीतर तो क्वचित्‌प्रसंगी वरचढ किंवा कधी तरी मिळमिळीत व्हायची शक्यता असते. मैफलीत द्रुत बंदिश सुरू असताना अनेक वेळा तबल्याच्या स्वतंत्र वादनाची झलक ऐकायला मिळते. अशा वादनातून तबलजीची तयारी तर दिसून येतेच; शिवाय मैफलीत अधिक रंग भरण्याचं कामही तबलजीकडून होत असतं.
हार्मोनिअम आणि तबला ही दोन्ही वाद्य मिळून मैफलीचा दर्जा उंचावत असतात. तिन्ही कलाकारांच्या (गायक-तबलजी-हार्मोनिअमवादक) एकत्रित मिलाफामुळे मैफल रंगते. कलाकारांच्या एकत्रित सादरीकरणात रंगमंचावर कधी स्पर्धात्मक, तर कधी खेळीमेळीचं, कधी उत्कट तर कधी आक्रमक, कधी शांत तर कधी संवेदनशील वातावरण निर्माण होत असतं. हा प्रत्येक अनुभव आल्हाददायक आणि शब्दातीत असतो हे मात्र नक्की!

पुढच्या लेखात आपण ‘ख्याल‘ ही संकल्पना जाणून घेऊ.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com