गीतप्रकार...उपशास्त्रीय गायनातले (सायली पानसे-शेल्लीकेरी)

sayali panse
sayali panse

उपशास्त्रीय प्रकारात अनेक प्रकार गायले जातात. शास्त्रीय बाजाची; पण शृंगारिक असते ती ठुमरी. ठुमरीगायकीच्या अंगानंच दादरा, कजरी, चैती, होरी वगैरे संगीतप्रकार गायले जातात. गायकीच्या दृष्टीनं ठुमरी ही अधिक संथ, भारदस्त आणि वजनदार असून त्यामानानं दादरा, कजरी, चैती, होरी वगैरे प्रकार अधिक चंचल प्रकृतीचे आहेत. या गीतप्रकारांव्यतिरिक्त, छोट्या छोट्या हरकतींनी आणि एकत्रित घेतलेल्या जलद स्वरांनी युक्त असलेला गीतप्रकार म्हणजे टप्पा. श्रावणात गातात ती सावनी, चैत्रात गातात ती चैती आणि होळीचं वर्णन असलेली होरी, संतानी लिहिलेला अभंग आणि एका ठराविक तालात गातात तो ‘दादरा’.

जगभरातलं कुठलंही संगीत असो, अगदी वैदिक काळातल्या सामगायनापासून ते आजच्या रिमिक्सपर्यंत आणि जॅझपासून ते सूफी संगीतापर्यंत...संगीत हे सात स्वरांतच सामावलेलं आहे. या सात स्वरांत गुंफलेली एकेक रचना मनासारखी गायला कलाकाराचा जन्म जातो. सांगीतिक कारकीर्दीत कलाकाराला वेगवेगळ्या परिस्थितीला सामोरं जावं लागत असतं. कलाकारांनी अनेक भावना लौकिक आयुष्यात अनुभवलेल्या असतात, मग त्या परमोच्च आनंदाच्या, दुःखाच्या, समाधानाच्या, भीतीच्या, नैराश्याच्या किंवा शरणागतीच्या असतील. भावना कुठल्याही असल्या तरी त्यांत अडकून न राहता फक्त चांगलं ते वेचून रसिकांपुढं सढळ हातानं ठेवायचं असा कलाकाराचा प्रयत्न असतो. कलाकार एवढं भरभरून देत असताना आपण स्वीकारशील मनानं समोर बसायला नको का? तोच आनंद समजून उपभोगण्याचा हा प्रयत्न आहे. ते आनंदाचे क्षण वेचण्यासाठी संगीतातली प्राथमिक माहिती जाणून घेणं आवश्यक आहे. आज आपण गीत या प्रकाराबद्दल जाणून घेऊ.
संगीताचं प्रस्तुतीकरण वेगवेगळ्या गीतप्रकारांतून होत असतं. शास्त्रीय आणि उपशास्त्रीय असेच दोन प्रकार आपण ढोबळमानानं मानत असलो तरी त्यांत अनेक उपप्रकारही अनुस्यूत आहेत. शास्त्रीय संगीतात उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय असे जे दोन प्रकार आहेत त्यात भीमसेन जोशी, किशोरी आमोणकर यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांचं जे गायन आपण ऐकतो ते उत्तर भारतीय संगीत आणि बालमुरलीकृष्णन् आणि एम. एस. सुब्बालक्ष्मींचं जे गायन आहे ते दक्षिण भारतीय संगीत.

उपशास्त्रीय संगीत हा प्रकार सुगम संगीत व शास्त्रीय संगीत यांच्यातले विशिष्ट सौंदर्यगुण घेऊन निर्माण झालेला प्रकार आहे. शास्त्रीय संगीतात स्वर आणि लय यांच्या साह्यानं रागरूप उलगडून दाखवलं जातं, तर सुगम संगीतात स्वर आणि लय यांच्या मदतीनं काव्याचा अर्थ व भाव व्यक्त केला जातो. ध्रुपद-धमार, ख्याल वगैरे शास्त्रीय संगीतातल्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रचनांनंतर टप्पा, ठुमरी, दादरा, कजरी, चैती, होरी, नाट्यगीत वगैरे निरनिराळ्या प्रकारच्या रचना उपशास्त्रीय संगीतात गायल्या जातात. यानंतर सुगम संगीताचा प्रांत सुरू होतो, ज्यात भावगीत, भजन, लोकगीत, भक्तिगीत, चित्रपटगीत वगैरे गायलं जातं.
शास्त्रीय संगीत हे स्वरप्रधान आहे, तर उपशास्त्रीय संगीत हे शब्दप्रधान आहे. हा या दोन गानप्रकारांमधला मुख्य फरक आहे. यामुळेच या दोहोंत आवाज, लगाव, उच्चार, भाव, श्वास वगैरेंचा वेगळा अभ्यास कलाकारानं केलेला असतो. दोन्ही प्रकारचं संगीत गायला विशेष तालीम घ्यावी लागते. बऱ्याच वेळा सुगम संगीतापेक्षा शास्त्रीय संगीताला वरचा दर्जा दिला जातो; पण वास्तवात दोन्ही प्रकार तितकेच अवघड आहेत. श्रोत्यांची मनं जिंकायला शास्त्रीय संगीतात कलाकाराला जास्त अवधी मिळतो, तर सुगम संगीतात त्यासाठी काहीच मिनिटंच असतात.
उपशास्त्रीय प्रकारात अनेक प्रकार गायले जातात. शास्त्रीय बाजाची; पण शृंगारिक असते ती ठुमरी. हा प्रकार अत्यंत लोकप्रिय आहे.

ठुमरीगायकीच्या अंगानंच दादरा, कजरी, चैती, होरी वगैरे संगीतप्रकार गायले जातात. ठुमरी व दादरा वगैरे इतर प्रकारांत तालाचा व विषयांचा फरक असतो. गायकीच्या दृष्टीनं ठुमरी ही अधिक संथ, भारदस्त आणि वजनदार असून त्यामानानं दादरा, कजरी, चैती, होरी वगैरे प्रकार अधिक चंचल प्रकृतीचे आहेत. या गीतप्रकारांव्यतिरिक्त, छोट्या छोट्या हरकतींनी आणि एकत्रित घेतलेल्या जलद स्वरांनी युक्त असलेला गीतप्रकार म्हणजे टप्पा. श्रावणात गातात ती सावनी, चैत्रात गातात ती चैती आणि होळीचं वर्णन असलेली ती होरी. संतांनी लिहिलेला अभंग आणि एका ठराविक तालात गातात तो ‘दादरा’.

मराठी नाट्यसंगीताचीही स्वतःची अशी एक वेगळी गायनशैली आहे. मराठी रसिकांच्या मनात नाट्यसंगीताविषयी कायमच विशेष प्रेम दिसून येतं. गोविंदराव टेंबे, मास्टर कृष्णराव, भास्करबुवा बखले, राम मराठे, जितेंद्र अभिषेकी, छोटा गंधर्व, केशवराव भोळे असे अनेक दिग्गज संगीतकार लाभल्यानं मराठी नाट्यसंगीत समृद्ध झालं. यापैकी प्रत्येक संगीतकार हे स्वतः उत्तम गायक होते. भारतभर भ्रमण करून संगीताचं ज्ञान आणि संस्कार त्यांनी आत्मसात केले होते. त्याचं प्रतिबिंब नाट्यसंगीतात दिसतं. उदाहरणार्थ : ‘मानापमान’ नाटकातल्या अनेक चाली बनारस, लखनौ, तसंच पंजाब इथल्या उपशास्त्रीय गायनप्रकारांवरून घेतलेल्या आहेत. तसंच ‘स्वयंवर’मधली अनेक पदं मूळ बंदिशींवर आधारलेली आहेत. शास्त्रीय संगीत गाणारे अनेक मोठे कलाकार मैफलीत नाट्यसंगीताचा समावेश करत. उस्ताद अब्दुल करीम खाँ, सवाई गंधर्व, भीमसेन जोशी, हिराबाई बडोदेकर, सरस्वती राणे, ज्योत्स्ना भोळे अशी अनेक शास्त्रीय गायकांची नावं सांगता येतील. सवाई गंधर्व आणि बालगंधर्व यांच्यात एकमेकांबद्दल अतिशय प्रेम आणि आदर होता; पण ते ज्या नाटक कंपनीसाठी गात -
‘किर्लोस्कर’ आणि ‘नाट्यकला प्रवर्तक मंडळी’ - यांच्यात कमालीची प्रतिस्पर्धा चालत असे. कोण वरचढ आहे हे बघण्यासाठी पुण्यात एकाच वेळी दोन वेगवेगळ्या नाट्यगृहांत ‘सौभद्र’ चे प्रयोग लावले जायचे. पुण्यातला सुरुचिसंपन्न रसिकही या प्रतिस्पर्धेत मागं नसायचा. नाटकवेडे रसिक पहिले तीन अंक ‘किर्लोस्कर’चे बघायचे आणि पुढचे दोन अंक ‘नाट्यकला प्रवर्तक मंडळी’चे आणि मग कोण वरचढ गायलं याबद्दल अनेक दिवस चर्चा रंगत! आजही नाट्यसंगीताबद्दल गानरसिकांच्या मनात विशेष स्थान आहे.

वर उल्लेखिलेला प्रत्येक गीतप्रकार हा शब्दप्रधान असला तरी त्याचा आत्मा सूर हाच आहे. हे सर्व प्रकार ठराविक एका रागात बांधलेले असले तरी त्यांना रागाच्या चौकटीच्या बाहेर गायची मुभा असते. थोडक्यात, रागाचे नियम उपशास्त्रीय संगीतासाठी शिथिल असतात. कलाकाराला आपल्या प्रतिभेनुसार स्वैर गायची मुभा असते.

इतिहास बघता असं लक्षात येईल की काही गायकांनी एकेका प्रकारात विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे.
ठुमरी म्हटलं की बेगम अख्तर, शोभा गुर्टू, गिरिजादेवी ही नावं डोळ्यांसमोर येतात. टप्पा म्हटलं की मालिनी राजूरकर, दादरा म्हटलं ‘कट्यार काळजात घुसली’ या संगीतनाटकातला डॉ. वसंतराव देशपांडे यांनी गायलेला ‘सावरे ऐजैयो’ हा दादरा आणि सुगम संगीत म्हटलं की लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी गाऊन अजरामर करून ठेवलेली असंख्य गाणी...! या सर्व कलाकारांमुळे आणि त्यांच्या कलेमुळे गानरसिकांना वर्षानुवर्षं असीम आनंद मिळत आला आहे...मिळत आहे.

पुढील लेखात आपण समजून घेऊ या स्वर ही संकल्पना.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com