रागभाव आणि रस (सायली पानसे-शेल्लीकेरी)

सायली पानसे-शेल्लीकेरी
Sunday, 28 June 2020

कुठल्या एका रागात विशिष्ट रस असतो का? गायन-वादनातून प्रत्येक वेळी तोच रस निर्माण होतो का?
आनंद, भीती, विरह, दुःख, वेदना असे भाव संगीतातून दाखवता येतात का? रसनिर्मितीबाबत असे अनेक प्रश्न विचारले जातात, त्यांविषयी...

कुठल्या एका रागात विशिष्ट रस असतो का? गायन-वादनातून प्रत्येक वेळी तोच रस निर्माण होतो का?
आनंद, भीती, विरह, दुःख, वेदना असे भाव संगीतातून दाखवता येतात का? रसनिर्मितीबाबत असे अनेक प्रश्न विचारले जातात, त्यांविषयी...

 

मानवी मनाचा अनेक भावनांशी संबंध असतो. त्या भावनांच्या विविध छटा विविध रसांशी संबंधित असतात. साहित्यात अशा नऊ रसांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे. ते रस म्हणजे श्रृंगार, वीर, करुण, बीभत्स, हास्य, रौद्र, भयानक, अद्भुत आणि शांत. संगीत आणि रस यांचा घनिष्ठ संबंध आहे; किंबहुना रस हा संगीताचा आत्मा आहे. कुठलीच रसनिष्पत्ती न होणारी कला ही अर्थहीन आणि कंटाळवाणी असते. संगीतातून रसनिष्पत्ती होते किंवा व्हायला हवी. असं असलं तरी ती नक्की कशातून होते याबद्दल संगीताचार्यांमध्ये अनेक मतप्रवाह आहेत.
कुठल्या एका रागात विशिष्ट रस असतो का? गायन-वादनातून प्रत्येक वेळी तोच रस निर्माण होतो का?
आनंद, भीती, विरह, दुःख, वेदना असे भाव संगीतातून दाखवता येतात का? रसनिर्मितीबाबत असे अनेक प्रश्न विचारले जातात.
संगीताचा प्रमुख हेतू मनोरंजन करणं हाच आहे. कलेच्या माध्यमातून श्रोत्यांचं मन आकृष्ट करणं, त्यांच्या दुःखांचा, वेदनांचा, नैराश्याचा विसर पाडणं हेच कलेचं उद्दिष्ट आहे. श्रोत्यांचं मन आपल्या कलेशी जो एकरूप करू शकतो तोच खरा कलाकार होय. शास्त्रीय संगीतात केवळ स्वरांमधूनच अभिव्यक्ती होत असते. शब्दांतून भाव पोहोचवणं सोपं आहे; पण अमूर्त स्वरांमधून भाव पोहोचवणं ही अत्यंत अवघड गोष्ट आहे. त्यासंबंधी विविध प्राचीन संगीतग्रंथांमध्ये विविध प्रकारचे उल्लेख आढळतात.

 

काही तज्ज्ञांनी स्वरांचा व रसांचा विशेष संबंध दाखवून दिला आहे. त्यांच्या मते, प्रत्येक स्वर एक भावना निर्माण करत असतो आणि त्या भावनेला योग्य असा रस त्याला नेमण्यात आला आहे.
सा : वीर, रौद्र, अद्भुत
रे : वीर, रौद्र, अद्भुत
ग : करुण
म : हास्य, श्रृंगार
प : हास्य, श्रृंगार
ध : भयानक, बीभत्स
नी : करुण
काही तज्ज्ञांच्या मते, केवळ आनंद आणि दुःख याच भावना प्रकर्षानं संगीतातून प्रकट केल्या जाऊ शकतात. उत्सुकता, भीती, नैराश्य, विरह, वेदना यांसारख्या भावना संगीतातून व्यक्त करता येत नाहीत. त्यामुळे त्यांच्या मते हास्य, भयानक किंवा बीभत्स यांसारखे रस संगीतातून व्यक्त होऊ शकत नाहीत. त्यामधून केवळ शांतीची भावना उत्पन्न होणं महत्त्वाचं आहे. संगीतात ऐहिक, भौतिक विश्वातून निर्गुण निराकार विश्वात घेऊन जाण्याची क्षमता आहे. हाच संगीताचा उद्देशदेखील आहे.
‘नऊ रसांपैकी संगीतासाठी श्रृंगार, करुण, वीर आणि शांत असे केवळ चारच रस उपयुक्त आहेत’ असाही एक मतप्रवाह आहे.
विष्णू नारायण भातखंडे यांनी दहा थाटांचं वर्गीकरण चार रसांमध्ये केलेलं आहे.
कल्याण, बिलावल, खमाज : श्रृंगार
भैरव, पूर्वी, मारवा : करुण व शांत
काफी, भैरवी, आसावरी : वीर
त्यांनी हे वर्गीकरण रागांच्या वेळेनुसार केलेलं आहे.
संधिप्रकाश-राग : शांत व करुणरस
संधिप्रकाशानंतरचा प्रहर : श्रृंगाररस
त्यानंतरचा प्रहर : वीररस

राग व रस यांचे पूर्वीपासून असलेले संबंध जसेच्या तसे मानून रागातल्या स्वरांचा रसांशी संबंध मान्य असणारा एक मतप्रवाह आहे, तर ‘रागांचा व रसाचा काहीही संबंध नाही, कारण स्वर हा रसोत्पादक नसतो,’ असं मानणाराही एक मतप्रवाह आहे. रागाचा रसानुकूल परिणाम हा गायकाच्या कुवतीवर व कल्पनाचातुर्यावर अवलंबून आहे. एकच राग अनेक गायक वेगवेगळ्या पद्धतीनं गातात तेव्हा प्रत्येक वेळी वेगवेगळं वातावरण तयार होत असतं. प्रत्येक कलाकाराची गायकी वेगळी, स्वरलगाव वेगळे, बंदिशी वेगळ्या, शब्द वेगळे, अर्थ वेगळा, लयसुद्धा वेगळी आणि म्हणूनच प्रत्येक कलाकाराकडून होणारी रसनिष्पत्तीही वेगळी होत असते. शिवाय, रागगायन करताना गायकाची मन:स्थिती ही वेगवेगळ्या रसनिष्पत्तीला कारणीभूत ठरू शकते. तेव्हा ‘रागांतर्गत स्वर व रस यांचा काही संबंध नाही,’ हा मतप्रवाहही विचार करण्यासारखा आहे. असं असलं तरीसुद्धा बरेचसे गायक पूर्वपरंपरेनुसार रागरस मानून गातात.
‘शुद्ध, कोमल, तीव्र स्वरांतून वेगवेगळे रस निर्माण होत असतात,’ असंही काही तज्ज्ञ मानतात. रागातल्या मुख्य स्वराचा जो रस, तोच त्या रागाचा रस.

या विषयावर अनेक मतं अनेक संगीताचार्यांनी मांडलेली आहेत व त्यावर अनेक मतभेद आहेत, अनेक निष्कर्ष निघालेले आहेत. आपल्या घराण्याप्रमाणे व गायकीप्रमाणे त्या त्या रसाचा परिपोषही ते करत असतात. संगीतश्रवणात अनुभवता येणारं समाधान व आनंद म्हणजे नादमयतेचा निर्विकल्प आनंद. संगीताचा एक श्रोता म्हणून, रसनिष्पत्ती कशामुळे होते हा मुद्दा दुय्यम ठरतो. मैफलीतून निर्माण झालेल्या रसाचा आनंद घेणं आणि स्वतःला विसरून कलाकाराबरोबर एका वेगळ्या विश्वात सफर करून येणं हे फक्त महत्त्वाचं...!

यापुढच्या लेखात आपण ‘रियाज’ ही संकल्पना जाणून घेऊ.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang sayali panse write gandhar article