आगळीवेगळी परेड (प्रा. शैलजा सांगळे)

shailaja sangle
shailaja sangle

ऑस्ट्रेलियाजवळच्या फिलिप बेटावर आगळीवेगळी पेंग्विन परेड बघायला मिळते. पर्यटकांसाठी हे फार मोठं आकर्षण आहे. अतिशय लहान असे हे पेंग्विन्स समुद्रातून किनाऱ्यावर ये-जा करत असतात. त्यांना कुठलाही त्रास न होता पर्यटनाचाही आनंद मिळावा यासाठी खूप विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. या परेडची माहिती...

ऑस्ट्रेलियातल्या पर्यटकांसाठी फार आगळंवेगळं आकर्षण म्हणजे फिलिप बेटावरची पेंग्विन परेड. ऑस्ट्रेलियाच्या भूभागाच्या आग्नेय दिशेला फिलिप बेट आहे. संध्याकाळी सूर्यास्तानंतर फिलिप बेटाच्या समरलॅन्ड किनाऱ्यावर समुद्रातून येणारे छोटे-छोटे पेंग्विन बघणं हा संपूर्ण ऑस्ट्रेलिया ट्रिपमधला अविस्मरणीय अनुभव आहे. जगातले सर्वांत छोटे म्हणजे केवळ ३३ सेंटिमीटर उंची असणारे पेंग्विन ऑस्ट्रेलियात आहेत. त्यांना ‘क्‍युटेस्ट पेंग्विन’ म्हणतात. फिलिप बेट या लिट्‍ल पेंग्विनचं नैसर्गिक वसतिस्थान. फिलिप बेटाच्या समुद्रकिनारी असणाऱ्या वाळूच्या टेकड्यांमध्ये त्यांनी घरं केली आहेत. त्यांची घरं समुद्रकिनारी असली, तरी दिवसभर ते समुद्रात असतात. समुद्रातलं अन्न शोधण्यासाठी विशेषतः मासे पकडण्यासाठी त्यांना रोज समुद्रात जावंच लागतं.

सूर्यास्त होताच हजारो पेंग्विन्स समरलॅन्ड किनाऱ्यालगतच्या समुद्राच्या पाण्यातून किनाऱ्यावर येतात आणि ग्रुपमध्ये किनाऱ्याच्या दिशेनं चालू लागतात. रोज संध्याकाळी पेंग्विनची मिरवणूकच निघते. पेंग्विन हा सामाजिक प्राणी आहे, त्यामुळे ते मोठ्या ग्रुपनंच वावरतात. त्यांच्या ग्रुपचा एक म्होरक्‍या असतो. तो थांबला, की इतरही पेंग्विन थांबतात. एखाद्या नुकत्याच चालायला शिकलेल्या बालकानं तोल सावरत डुलतडुलत चालावं तसं डुलतडुलत किंवा ठुमकतठुमकत चालणारे हे पेंग्विन बघणं म्हणजे पर्वणीच. डुलतडुलत चालत असताना थोडे दमतात, मध्येच थांबतात, मग आजूबाजूचा परिसर न्याहाळतात, जणू आपण कुठपर्यंत आलो, आपलं घर आता किती लांब राहिलं याचा अंदाज घेतात, कधी मागं वळून आपलं कुटुंब आलं की नाही याचा अंदाज घेतात, आणि परत चालायला सुरवात करतात. काहीजण घराचा रस्ता चुकतात, परत आपल्या मार्गाला लागतात. जवळजवळ एक ते दीड किलोमीटर चालल्यावर त्यांना त्यांची घरं मिळतात. ही पेंग्विन परेड आणि पेंग्विनची गंमत पर्यटकांना पाहता यावी म्हणून पेंग्विनच्या घरांच्या वर लाकडाचे प्लॅटफॉर्म उभारलेत, त्या प्लॅटफॉर्मच्या कठड्याजवळ उभे राहून खालून जाणारी पेंग्विन परेड बघता येते. तासन्‌तास लोक कठड्याजवळ उभे राहून पेंग्विन परेड बघत असतात; पण मन भरत नाही. तिथून जावंसंच वाटत नाही. प्रत्येक जण एकमेकाला म्हणत असतो : ‘चला आता निघायचं का?’ पण कोणीच निघायला तयार नसतं. खरं म्हणजे जो ‘निघायचं का?’ म्हणत असतो ना, त्यालासुद्धा तिथून हलायचं नसतं. सतत पेंग्विन परेड चालू असते आणि ती बघण्यासाठी पर्यटकांचा ओघही चालूच असतो. पेंग्विन रात्री आपल्या घरात जाऊन विश्रांती घेतात, मादी त्यांच्या पिलांची काळजी घेते. सकाळ झाली, की पेंग्विन पुन्हा एवढं अंतर कापून समुद्राच्या पाण्यात प्रवेश करतात. एवढे छोटे जीव दिवसभर समुद्राच्या पाण्यात पोहतात, अन्न मिळवण्यासाठी कष्ट करतात आणि परत एवढे अंतर चालायला एनर्जी कुठून आणत असतील हा प्रश्‍न सर्वांनाच पडतो. एवढ्या छोट्या जीवाची पोटासाठी केवढी ही धडपड! हे सगळं बघून अचंबित व्हायला होतं.

पर्यटकांना पेंग्विन परेड व्यवस्थितपणे, विनासायास बघता यावी म्हणून पर्यटन विभागानं त्या छोट्याशा फिलिप बेटावर जी सोय केली आहे त्याला तोड नाही. पर्यटकांना आवडणारे (Tourist friendly) पर्यटन केंद्र कसं असावं याचं हे उत्तम उदाहरण आहे. देशातल्या पर्यटकांची संख्या वाढवायची असेल तर काय सोयी द्याव्यात याचा वस्तुपाठच त्यंनी घालून दिलाय. एका निर्जन बेटावर जगातल्या दुर्मिळ अशा छोट्या पेंग्विनचं नैसर्गिक वसतिस्थान असताना त्याच्या साह्यानं पर्यटनाभिमुख सोयी करून त्याचं एका जगप्रसिद्ध पर्यटनस्थळात रूपांतर कसं करावं हे आम्हा भारतीयांना त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ऑस्ट्रेलियाचा भूभाग आणि फिलिप बेट यांना जोडणारा समुद्रावरचा उत्तम रस्ता बांधलाय, त्यामुळे बसनं किंवा कारनं आपण पटकन तिथं पोचतो. त्या रस्त्यानं जाताना दोन्ही बाजूचा अथांग निळा सागर बघणं ही आणखी एक पर्वणीच.

पेंग्विन परेड बघण्यासाठी त्यांनी ५-६ पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणं प्रत्येकजण जमेल तो पर्याय निवडून पेंग्विन परेडचा आनंद निश्‍चितच घेतो. समुद्रातून किनारी येणारे पेंग्विन बघण्यासाठी समुद्रकिनारी त्यांनी स्टेडियमला असतात तशा पायऱ्या बांधल्या आहेत. त्या पायऱ्यांवर बसून आपण पेंग्विन बघू शकतो. त्या पायऱ्यांवर अगदी पुढची जागा पटकवल्यास पेंग्विन जवळून बघायला मिळतात- म्हणून पर्यटक सूर्यास्ताच्या दोन तास आधीच तिथं जागा पटकवतात; पण त्यांना अगदीच जवळून बघायचं असेल, तर समुद्रातून बाहेर आल्यावर त्यांचा चालण्याचा मार्ग जिथं सुरू होतो, तिथं एक प्लॅटफॉर्म उभारला आहे, त्यावरून पेंग्विन बघता येतात. त्या प्लॅटफॉर्मवर फक्त तीनशेच्या आसपासच लोकच उभे राहू शकतात आणि त्याचा तिकिटाचा दरही जास्त आहे. किनाऱ्यावरून मग रस्त्यानं जाणारे पेंग्विन बघण्यासाठी लाकडी प्लॅटफॉर्म उभे केलेत- ते रस्त्याच्या बाजूनंच आहेत. त्यावर कठड्याला लागून उभं राहून बघता येतं. त्यांच्या मार्गावर लाईट आहेत, त्यामुळे ते दिसतात. ते आणखी जवळून बघायचे असतील, तर मत्सालयात जसे आपण काचेतले मासे जवळून बघतो, तसे काचेपलीकडचे मोठ्या ग्रुपमध्ये जाणारे पेंग्विन अगदी जवळून बघायला मिळतात. डोळ्याच्या रेषेत (Eye level view) हे बघता येतात. आपल्या आणि त्यांच्यामध्ये फक्त काच असते. त्याशिवाय व्हीआयपी पेंग्विन टूरचीसुद्धा सोय केली आहे. फक्त दहा पर्यटकांची गाइडेड टूर नेतात. त्यांना समुद्रकिनारी उभारलेल्या टॉवरवर नेतात. त्यांच्याबरोबर गाईड असतो, तो सर्व माहिती सांगतो, प्रत्येकाला हेडफोन दिलेला असतो आणि सतत कॉमेट्री चालू असते. त्यांना पेंग्विनची घरं अगदी जवळून दाखवतात, त्यांच्या दिनचर्येबद्दल आणि प्रजननाबद्दल माहिती देतात, त्यामुळे तिथल्या पेंग्विनबद्दल सखोल माहिती मिळते. पर्यटक पायऱ्यांवर बसलेले असतात, तेव्हाही सतत कॉमेट्री चालू असते आणि पेंग्विन परेडबद्दल लोकांना माहिती दिली जाते.

पेंग्विन परेडचा इतिहास
गेली हजारो वर्षं पेंग्विन या फिलिप बेटाच्या किनाऱ्यावर येऊन घरात जात होते आणि सकाळी उठून परत समुद्रात जातच होते. मात्र, पर्यटकांना पेंग्विन परेड बघण्याची सर्व सुविधा सन १९२० पासून सुरू आहे. सन १९२० मध्ये ऑस्ट्रेलियाच्या बर्टवेस्ट डेनहॅम आणि बर्ट वॉचहॉर्न यांना समरलॅन्ड बीचवर पर्यटकांना नेऊन पेंग्विन दाखवण्याची कल्पना सुचली. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा भूभाग आणि फिलिप बेटाला जोडणारा रस्ताही नव्हता. त्यामुळे १०-१५ लोकांचा ग्रुप छोट्या बोटीनं नेऊन ते पेंग्विन दाखवत. अशा प्रकारे पेंग्विन पर्यटनाची सुरुवात झाली. त्यानंतर माऊथ पब्लिसिटी झाली. पर्यटकांची संख्या वाढू लागली. त्यामुळे पर्यटन विभागानं नवीन पर्यटन केंद्र विकसित करण्याची संधी हेरली. सर्वप्रथम फिलिप बेट आणि ऑस्ट्रेलियाचा भूभाग जोडणारा पूल बांधला, त्यामुळे कुटुंबीय कारनं पेंग्विन बघायला जाऊ लागले. जाताना ते खाण्याचं सामान, थंडीसाठी ब्लँकेट घेऊन जात आणि वाळूच्या टेकडीवर बसून पेंग्विन बघत. काही वेळा पेंग्विनची गंमत म्हणून त्यांच्या खोड्या काढू लागले. बरेच लोक आपल्या पाळीव कुत्र्यांना घेऊन जात, ते कुत्रे पेंग्विनची घरं उद्ध्वस्त करू लागले. छोटी मुलं वाळूच्या टेकड्यांवर पळत आणि खेळत. त्याचा परिणाम म्हणजे पेंग्विनच्या वसतिस्थानालाच मोठा धोका निर्माण झाला. पेंग्विनची संख्या घटू लागली. त्यांचं संवर्धन करण्याची गरज निर्माण झाली.

सन १९६० मध्ये पर्यटन विभागानं पर्यटकांना पेंग्विन तर दिसावेत; पण त्यांना नुकसान पोचू नये म्हणून यथायोग्य नियोजन केलं. पेंग्विनच्या घराभोवती कुंपणं केली, त्यांच्या घरांच्या वर १८० अंशांमध्ये लाकडाचे प्लॅटफॉर्म उभे केले, त्याला कठडे बसवले, पेंग्विन जातात त्या रस्त्यावर दिव्यांची सोय केली, समुद्रकिनारी पायऱ्या बांधल्या, समुद्रकिनाऱ्यावर टॉवर उभारले, व्हूइंग बॉक्‍स (viewing box) बनवला, गाइडेड टूर सुरू केली. पूर्वी अनेक लोकांनी बीचच्या जवळ घरं बांधली होती, ती घरं पाडून टाकली. फिलिप बेटाच्या समरलॅन्ड किनाऱ्याच्या जवळचा भाग फिलिप बेट नेचर पार्क म्हणून घोषित केला. हे पर्यटन केंद्र जगातलं सर्वोत्तम इकोटुरिझम असलेलं पर्यटन केंद्र मानलं जातं. पेंग्विनबाबत शास्त्रीय संशोधन, त्यांच्या वाढीचा अभ्यास, त्यांचं संवर्धन, त्यांच्या संवर्धनासाठी पर्यटकांना सूचना इत्यादी प्रयत्न सुरू असल्यानं हजारो पेंग्विनची परेड बघून पर्यटक आनंद घेतात.

एकुणातच फिलिप बेटाचं सौंदर्य वेगळंच आहे. नेत्रदीपक आणि मनावर छाप पाडणारे पांढरेशुभ्र रुपेरी वाळूचे किनारे, दूरवर पसरलेलं स्वच्छ निळंशार आणि शांत पाणी, किनाऱ्यावर लडिवाळपणे अलगद येणाऱ्या समुद्राच्या लाटा, सूर्यास्ताच्या वेळी आकाशात दिसणारी विविध रंगांची उधळण इत्यादींमुळे पर्यटकांची इथं वर्षभर गर्दी असते. फिलिप बेटावरील सर्वांत प्रसिद्ध आणि पर्यटकांना भुरळ पाडणारा बीच म्हणजे वुलमाई बीच. इथल्या सर्वांत लांब म्हणजे ४२ किलोमीटर लांबीच्या या बीचवरच्या सोनेरी वाळूनं त्याची शोभा वाढली आहे. त्या बीचवर एक मोठा कडा आहे. त्यावरून सूर्यास्त बघणं म्हणजे पर्वणीच. तिथून संपूर्ण बेट एकीकडे आणि अथांग सागर दुसरीकडे असा नजारा दिसतो. अशा या फिलिप बेटाला भेट दिल्यावर पर्यटकांना पैसे वसूल झाल्याचा आनंद मिळतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com