मूर्ती घडवणं ही तपस्याच... (शरद पोंक्षे)

शरद पोंक्षे
Sunday, 23 August 2020

पालक या शब्दाची आपण फोड केली, तर " पालन-पोषण करणारा" असा त्याचा अर्थ होतो; पण केवळ पालन-पोषण करणारा पालक नसतो, तर " संस्कार करणारा आणि घडवणारा पालक असतो."

पालक या शब्दाची आपण फोड केली, तर " पालन-पोषण करणारा" असा त्याचा अर्थ होतो; पण केवळ पालन-पोषण करणारा पालक नसतो, तर " संस्कार करणारा आणि घडवणारा पालक असतो." वयानं मोठं झालो तरी आपणही विद्यार्थिदशेतच असतो, हे समजणं फार गरजेचं आहे. त्यासाठी आपल्यातला "मी" काढला पाहिजे, तोच तर आपली वाट लावत असतो. तो काढण्यासाठी वाचन वाढवावं लागतं, विचारांच्या कक्षा रुंदावाव्या लागतात.

"खरं बोल आणि खरं वाग," ही शिकवण माझ्या आई-वडिलांनी मला दिली. बाहेर जे काही करशील, मग ते चुकीचं असलं तरी आम्हाला खरं सांग, हे त्यांनी लहानपणापासून मला सांगितलं, त्यामुळं प्रत्येक गोष्ट घरी येऊन आई-वडिलांना सांगायची, ही चांगली सवय मला लागली. बरेचदा सांगितलेल्या गोष्टीचा परिणाम काय होणार आहे, आपल्याला भरपूर ओरडा बसणार आहे, हे माहीत असायचं; पण तरीसुद्धा ती गोष्ट सांगून मी मोकळा झालो, की माझ्या डोक्यावरचं ओझं कमी व्हायचं. ही सवय मला महत्त्वाची वाटते, त्याचा मला आयुष्यात फायदाही झाला. माझ्या आई-वडिलांनी शिक्षणाबाबत, करिअरबाबत कुठलीही जबरदस्ती कधीच केली नाही. मी दहावी पास झाल्यानंतर मला पुढं शिकायची इच्छा नव्हती. वडील म्हणाले, की अकरावीला प्रवेश घेऊन कॉलेजात जाऊन बघ, त्यामुळं फक्त एक वर्ष कॉलेजचं तोंड पाहिलं. मला तो दिवस आजही आठवतोय, गोरेगावला एकांकिका स्पर्धा होती. तिथं आमच्या एकांकिकेचा प्रयोग होता. आदल्या दिवशी परीक्षेचा निकाल लागलेला होता आणि मी नापास झालो होतो. नापास झाल्यानंतर एकांकिकेच्या ग्रुपमधील मुलं आमच्या चाळीतील घराच्या दारावरून सारख्या फेऱ्या मारू लागली. फेऱ्या मारून ते आमच्या घरातील वातावरणाचा अंदाज घेत होते. चार-पाच फेऱ्या मारल्यानंतर वडिलांनी ते पाहिलं, त्यातील एकाला बोलावलं आणि विचारलं, "काय रे, फेऱ्या का मारत आहात? काही अंदाज घेत आहात का?" असा प्रश्न ऐकल्यावर ती मुलं एकदम गडबडली, तरीही वडिलांनी पुन्हा विचारल्यावर ते घाबरत म्हणाले, "नाही काका, काय आहे, की उद्या आमची एकांकिका आहे आणि आता शरद नापास झाल्यावर आमची स्पर्धा होणार की नाही, तो आता येईल की नाही, याचा अंदाज आम्ही घेत होतो." ते ऐकल्यावर वडील म्हणाले, "तो येणार नाही, असं कोणी सांगितलं? मी तसं काही म्हणालो का? नापास होण्याचा आणि नाटकात काम न करण्याचा काय संबंध?" माझ्याकडे बघून ते म्हणाले, "जा रे, असं बसून काय होणार आहे?" त्यांनी जा म्हटल्यावर मी नापास झालो आहे, याचा काही मागमूसही माझ्या चेहेऱ्यावर राहिला नाही; त्याची लाज, शरम, अब्रू काहीही मला वाटली नाही. अगदी उड्या मारत मी बाहेर गेलो. त्यानंतर आम्ही रात्रभर एकांकिकेची मस्तपैकी तालीम केली आणि दुसऱ्या दिवशी एकांकिका सादर केली.
न बोलता आमच्या घरात ज्या काही गोष्टी त्या वेळी झाल्या, त्या फार महत्त्वाच्या आणि मोठ्या होत्या. अन्यथा दुसऱ्या एखाद्या घरात मुलगा नापास झालाय म्हटल्यावर केवढा गोंधळ माजला असता! नाटक तर दूरच, मित्रही बंद झाले असते. 'आधी अभ्यास करा, पास व्हा आणि मग नाटक वगैरे करा,' असं फर्मान निघालं असतं; पण आमच्याकडे असं नव्हतं. ते जे बाळकडू मिळालं आहे, तेच मी माझ्या मुलांच्या बाबतीत पाळलं.

माझा मुलगा स्नेह याने जेव्हा सांगितलं, की मला शिक्षणात रस नाही, मला कलावंतच व्हायचं आहे, तेव्हा मी त्याला म्हणालो, "तुला जे मनापासून करावंसं वाटतं ते तू कर, तुझ्या जे रक्तात आहे तेच कर. जबरदस्तीने शिकू नकोस." आम्ही हा निर्णय घेतल्यानंतर जवळचे बरेचजण म्हणू लागले, "अहो त्याला किमान पदवी तरी घेऊ द्या, आपल्याला काही आरक्षण नाहीये, पुढं कसं होईल?" वगैरे. पण मी सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलो. 'तुला जे आतून वाटतंय ते तू कर. तुझी आवड हा तुझा व्यवसाय व्हायला पाहिजे, तरच तू त्यात तुझं शंभर टक्के देशील आणि यशस्वी होशील,' हे मी त्याला सांगितलं. कारण आज मी कलावंत म्हणून उभा आहे, जे काही थोडं-फार नाव कमवलं आहे, त्याला कारण म्हणजे आमच्या आई-वडिलांनी कुठलीही जबरदस्ती आमच्यावर केली नाही. पूर्णपणे स्वातंत्र्य दिलं आणि त्या काळात नाटकात करिअर करण्यासाठी मला पूर्ण पाठिंबा दिला. तेच संस्कार मी माझ्या मुलांना दिले. स्नेहनं आताच एक हिंदी वेबसीरिज केली आणि मुलगी सिद्धी आता पायलट होण्यासाठी प्रशिक्षण घेत आहे. तिनं लहानपणापासून मला सांगितलं होतं, की "बाबा मला दुसरं काहीच शिकायचं नाही, मला पायलटच व्हायचं आहे," त्याप्रमाणे ती आता त्या दिशेनं पावलं टाकत आहे. थोडक्यात काय, तर तुम्हाला जे आवडतं आहे ते तुम्ही करा, हेच विचार मी कायम ठेवले आणि मुलांनाही दिले. मुलांना सांगितलेली दुसरी महत्त्वाची गोष्ट, जी मी माझ्या लहानपणी शिकलो, ती म्हणजे खोटं बोलायचं नाही. कितीही लहान-मोठी चूक असो, ती घरी सांगायची, लपवून ठेवायची नाही. त्यामुळं मुलंही लहान-मोठ्या सगळ्या गोष्टी घरी येऊन मला किंवा आईला सांगतात.
आम्हाला लहानपणी शिक्षण, करिअर निवडीबाबत स्वातंत्र्य मिळालं असलं, तरी आमचे फारसे लाड झाले नाहीत. हवी असलेली वस्तू आई-वडिलांनी लगेच आणून दिली आहे, असं कधी झालं नाही. त्या वस्तूची किंमत तुला कळली पाहिजे. अन्न, वस्त्र , निवारा या मूलभूत गरजा आम्ही पुरवू; पण याव्यतिरिक्त जी काही छान-छौकी तुला करायची आहे, ती तुझ्या पैशांतून करायची, ही त्यांची शिकवण होती आणि तत्त्वदेखील होतं. चांगल्या गोष्टींबरोबर जगातील वाईट गोष्टींची ओळखदेखील पालकांनी मुलांना करून दिली पाहिजे. माझ्या वडिलांनी ते केलं होतं. त्यांनी मला मटका कसा खेळतात हे दाखवलं. ते नोकरीला बीएसटीमध्ये होते. बाँबे सेंट्रल डेपोच्या आजूबाजूला मोठा वेश्या व्यवसाय चालतो. तिथं ते मला घेऊन गेले आणि मला तिथं काय चालतं ते सांगितलं. ते म्हणाले, "कदाचित भविष्यात तुझे मित्र तुला इथं आणतील. याचे परिणाम फार भयंकर आहेत, त्यामुळे तू या गोष्टी केल्यास तर त्याचे परिणाम तुलाच भोगायचे आहेत आणि नाही केल्या तरी त्याचे चांगले परिणामही तुलाच भोगायचे आहेत." त्यांनी सर्व वाईट गोष्टींची ओळख करून दिली आणि त्यांचे होणारे परिणामही सांगितले व ते मलाच भोगावे लागतील, तिथं वडील म्हणून मी काही करू शकणार नाही हे सांगितलं. त्याचा माझ्यावर इतका सकारात्मक परिणाम झाला, की मी कित्येक वर्षांपासून सिने-नाट्यसृष्टीत काम करत आहे; पण मला सुपारीच्या खांडाचंही व्यसन नाही.

मला लहानपणी वडील शाखेत पाठवायचे. एक ठाकूर नावाचे डॉक्टर आम्हा मुलांना बोलवायला यायचे. मला तिथं जाणं सुरुवातीला कंटाळवाणं वाटायचं; पण वडील पाठवायचे म्हणून जायचो. त्याचं महत्त्व मला आज समजत आहे. लोक आज काहीही म्हणू दे; पण रा. स्व. संघाच्या शाखेत गेल्यानंतर तिथं एक उत्तम नागरिक घडवण्याची प्रक्रिया घडते, हे नक्की! आज माझ्यामध्ये जे राष्ट्रप्रेम, देशप्रेम जागृत झालेलं आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांवर जी व्याख्यानं मी देत आहे, हिंदुत्वाचा प्रसार करत आहे, खरं हिंदुत्व काय आहे, चातुर्वर्ण्य किंवा जातिपातीचं हिंदुत्व नव्हे, तर राष्ट्रीय हिंदुत्व म्हणजे नेमकं काय, हे सावरकरांचे विचार मांडत मी सर्वत्र हिंडतो आहे, त्याचं कारण लहानपणी बळजबरीनं पाठवलेल्या शाखेत दडलेलं आहे. तिथं दर गुरुवारी विचारवंतांची बौद्धिकं ऐकायला मिळायची. दिवंगत गायक सुधीर फडके, दिवंगत ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांची बौद्धिकं मी समोर बसून ऐकली आहेत. तळजाईच्या शिबिरात अटलजी आणि अडवाणीजी आठ दिवस आमच्याबरोबर होते. गीत आणि संध्याकाळची प्रार्थना सांगायला बाबूजी असायचे. या सगळ्यांचे संस्कार माझ्यावर झाले आहेत. वडिलांना शाखेत जाणं जमायचं नाही, कारण त्यांच्यावर चार बहिणी आणि तीन धाकट्या भावांची जबाबदारी होती. पगार पुरायचा नाही, त्यामुळं ते नोकरीबरोबरच उरलेल्या वेळेत भिक्षुकी करायचे. वेळ मिळायचा नाही; पण मी तिथं जावं, हे त्यांना मनापासून वाटायचं. त्यामुळं आपल्या मुलावर चांगले संस्कार होतील, असं त्यांचं मत होतं. ते संस्कार नक्कीच झाले. माझ्यात ठासून जी राष्ट्रभक्ती भरलेली आहे; ठामपणा, स्पष्टवक्तेपणा आहे, ते वडिलांनी केलेल्या आणि शाखेत झालेल्या संस्कारांमुळेच. तेच संस्कार मी आज माझ्या मुलांवर करतो आहे. त्यांना उत्तम साहित्य वाचायला लावतो, व्याख्यानं ऐकायला लावतो, त्यांच्यासमोर सातत्यानं चांगले विचार बोलत राहातो. त्याचा खूप चांगला परिणाम दिसून येतो.

स्नेह आणि सिद्धी दोघंही खूप खरं बोलणारी आणि वागणारी मुलं आहेत. ती माझ्याशी कधीच खोटं बोलत नाहीत. मला त्यांचा अभिमान आहे. त्यामुळं मुलं वाया जाण्याची काडीचीही भीती मला नाही. सध्या लोकमान्य टिळकांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे, त्यानिमित्तानं मी टिळकांची काही पुस्तकं वाचत आहे. त्यात फार छान म्हटलंय, "मी कोण आणि मला काय करायचंय व देश कोण आणि देशाला काय करायचंय, असं ज्ञान जिथं मिळतं ते राष्ट्रीय शिक्षण." तेच मीपण मुलांना सांगत आलो आहे. आपला देश नेमका काय आहे, आपली संस्कृती काय आहे, धर्म नेमकं काय शिकवतो, जात हा घटक किती घाणेरडा आहे, जातीच्या भिंती कशा मोडल्या पाहिजेत, जातीचा विचारसुद्धा आपल्या मनात नाही आला पाहिजे, आपण सारे मनुष्य जातीचे आहोत, असे सगळे विचार संस्कार मुलांवर करणं सुरू असतं. त्या संदर्भातील पुस्तकं त्यांना वाचायला देणं, व्हिडीओ दाखवणं, बरेचदा मी त्यांना वाचून दाखवणं, हे सगळं मी करत असतो. मुलं ते ऐकतात, त्यांची यावर स्वतःची मतं असतात, ती ऐकायला मला छान वाटतं. आमच्या घरात शिवाजी महाराजांचा, विवेकानंदांचा, ज्ञानेश्वर माउलींचा मोठा फोटो आहे; तर सावरकरांचे दोन मोठे पुतळे आहेत. ते आपल्या घरात का आहेत? ते उगाचंच नाहीत, तर ती खरोखरच आपल्या महाराष्ट्राची दैवतं आहेत, ही माहिती त्यांना आहे. वेळोवेळी मी त्यांना यांच्याबद्दल सांगत आलो आहे.

मी जसं मुलांना शिकवतो, तसंच मुलंही मला खूप शिकवतात. मुळात प्रत्येक व्यक्तीच आपल्याला काही ना काही शिकवत असते, फक्त ते शिकण्याची आपली कुवत पाहिजे आणि त्याच्याकडून शिकण्यासाठी आपण लहान झालं पाहिजे. तो मला काय शिकवणार, असा विचार योग्य नाही. सिद्धी थोडी फटकळ आहे, असं मला काही वेळा वाटायचं; पण ती जे बोलायची, त्यावर विचार केल्यावर मला पटायचं, की ती जे बोलली ते बरोबर आहे. आपल्यालाही असं नेमकं बोलता आलं पाहिजे. मी स्वतःला कितीही स्पष्टवक्ता समजत असलो, तरी सिद्धी त्यामध्ये माझी बाप आहे. तिथल्या तिथं जे असेल ते बोलूनच मोकळं व्हावं, हे तिच्याकडून शिकण्यासारखं आहे. तसंच, आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे, तिने एकदा जे करायचं ठरवलं, ते काहीही झालं तरी ती ते करतेच. जिद्द आणि चिकाटी हे तिचे घेण्यासारखे गुण आहेत. स्नेहचा घेण्यासारखा गुण म्हणजे, तो नितांत प्रेम करणारा आहे. त्याला कष्टकरी माणसांबद्दल अतुलनीय प्रेम वाटतं. एकदा रिक्षातून जात असताना त्यानं उन्हात रस्ता खोदणारी काही माणसं पाहिली. त्याला त्यांची खूप कणव आली. रिक्षा थांबवून तो उतरला, शेजारच्या दुकानातून त्यानं काही शीतपेयाच्या बाटल्या घेतल्या, सामोसे वगैरे खाण्याचे पदार्थ घेतले आणि त्या माणसांना जाऊन देऊन आला. हे त्याला कोणी सांगितलं नाही. अठरा-वीस वर्षांचा तरुण मुलगा स्वप्रेरणेनं हे करतो, ही गोष्ट मलाही शिकण्यासारखीच आहे ना! आपण रस्त्यावर या गोष्टी बघून निघून जातो. पण थोडं थांबून आपल्या आयुष्यातील दहा मिनिटं यासाठी सहज देता येतात, ही गोष्ट नक्कीच आपण शिकली पाहिजे. वयानं मोठं झालो तरी आपणही विद्यार्थिदशेतच असतो, हे समजणं फार गरजेचं आहे, त्यासाठी आपल्यातला "मी" काढला पाहिजे. तोच तर आपली वाट लावत असतो. तो काढण्यासाठी वाचन वाढवावं लागतं, विचारांच्या कक्षा रुंदावाव्या लागतात. पंधरा-वीस वर्षांपूर्वी मी सावरकरांचं साहित्य जसं वाचत गेलो, तसं मी हे बदल सहज स्वीकारत गेलो आणि माझ्यासाठी या गोष्टी खूप सोप्या होत गेल्या.

मुलं लहान होती तेव्हा मी नाटकांसाठी, चित्रीकरणासाठी, व्याख्यानासाठी सतत दौऱ्यावर असायचो, त्यामुळं मुलांसाठी खूप जास्त वेळ मला देता आला नाही. त्यांची सर्व जबाबादारी माझ्या पत्नीनं, सवितानं घेतली होती. एक मात्र नक्की, जेव्हा मी घरी असायचो, तेव्हा मी पूर्ण वेळ मुलांना द्यायचो. त्यांच्याबरोबर भरपूर मस्ती करणं, गप्पा मारणं अशा सगळ्या गोष्टी करायचो. मुलंही खूप धमाल करायची. आमच्यात अतिशय मोकळं असं मित्रत्वाचं नातं आहे. त्यामुळं माझ्याबरोबर मुलं खूप धमाल करतात. मुलं लहान होती तेव्हा त्यांना मोबाईलपासून दूर ठेवायचं असं मी ठरवलं होतं. दहावीपर्यंत दोघांना फोन दिला नव्हता. पुढे कॉलेजला गेल्यावर ते लांब असल्यानं संपर्क साधण्यासाठी फोन घेऊन दिला होता. लहान मुलांना मोबाईल देऊ नये, या मताचा मी आहे.

पालक या शब्दाची आपण फोड केली, तर "पालन पोषण करणारा," असा त्याचा अर्थ होतो; पण केवळ पालन-पोषण करणारा पालक नसतो, तर "संस्कार करणारा आणि घडवणारा पालक असतो." कानेटकरांचं आमच्या नाटकातील वाक्य आहे, "लहान मूल म्हणजे मातीचा गोळा असतो, आकार द्यावा तसं ते घडत जातं." तो आकार कसा द्यायचा हे ठरवणारे जे असतात, ते पालक होय. त्यामुळं घडवणारा कोण आहे हे खूप महत्त्वाचं आहे. "मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्याला उत्तम मूर्त स्वरूप देणं आणि ते जगासमोर ठेवणं ही मूर्तिकाराची भूमिका म्हणजे पालकत्व." ही मूर्ती घडवणं फार महत्त्वाचं असतं. ती संस्कारांनी, वाचनानं, आपल्या वागणुकीतून आणि वेगवेगळ्या प्रयत्नांनी घडवावी लागते. अनेक वर्षांची ती तपस्या असते.
(शब्दांकन : मोना भावसार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang sharad ponkshe write parents guide article