धडा (शशिकांत सांब)

shashikant samb
shashikant samb

मंगल म्हणाली : ‘‘भाभी, आता फार उशीर झाला आहे; पण त्या प्रसंगानं मला अतिशय खंबीर केलं. मी भ्रमाच्या दुनियेतून सत्याच्या दुनियेत आले. त्या रात्री घडलेल्या त्या प्रसंगानं मला खूप मोठा धडा शिकवला आहे. अर्थात्‌ असा धडा मिळाल्यामुळेच पुढच्या आयुष्यात माझी विचारसरणी चांगल्या अर्थानं बदलली. नकळतपणे तुमच्यामुळेच माझ्यात हा बदल घडून आला, त्यामुळे तुमचे खूप खूप आभार!’’

मंगल मूळची ग्रामीण भागातली. घरची आर्थिक परिस्थिती बेताची. त्यामुळे शिक्षणही कमीच. पंचवीशीत तिच्या घरच्यांनी एका नोकरदार मुलांबरोबर तिचं लग्न लावून दिलं. नवऱ्याची खासगी नोकरी व जेमतेम घरखर्च भागेल एवढाच पगार. नवऱ्याची नोकरी शहरात असल्यामुळे मंगल छोट्याशा खेड्यातून शहरात आली. भाड्याची जागा लहान असली तरी वस्ती चांगली होती. शेजारी चांगले होते. मंगलचं शिक्षण कमी होतं. मात्र, राहणी नीटनेटकी होती आणि दिसायलाही ती देखणी होती. शेजारच्या किंवा आसपासच्या बायका तिचं कौतुक करायच्या. तिच्याशी मैत्री असावी असं त्यांना वाटायचं.

वेगवेगळ्या कार्यक्रमांना तिनं आपल्यासोबत यावं असं तिच्या मैत्रिणींना वाटायचं. क्लबमध्ये होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांना अशा मैत्रिणींबरोबर मंगल कधी कधी जायची. तिथंही तिच्या रूपाचं, तिच्या नीटनेटकेपणाचं, टापटिपीनं राहण्याचं खूप कौतुक होई.
मंगलला आधीपासून स्वतःच्या सौंदर्याची जाणीव होतीच. शहरात आल्यावर या जाणिवेत वाढ झाल्यास नवल नव्हतं. या जाणिवेचं रूपांतर पुढं दुरभिमानात होऊ लागलं. नवऱ्याची आर्थिक स्थिती बेताचीच असल्यामुळे उंची कपडे, दागिने, नटणं-मुरडणं यासारख्या गोष्टींवर तिला मनासारखा खर्च करता येत नव्हता. त्यामुळे ती नवऱ्याचा सतत राग राग करत असे. मंगलला यथावकाश अपत्य झालं. मुलीच्या संगोपनात चार-पाच वर्षं भरकन निघून गेली. मंगल आता तिशीची झाली होती.
आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी काही प्रयत्न करावेत असं मंगलला वाटू लागलं. तसे प्रयत्न तिनं सुरू केले. मात्र, जेमतेम शिक्षण आडवं येत होतं. शेजारी राहायला असणाऱ्या भाभींशी मंगलची चांगली मैत्री होती. गावाबाहेरच्या मोठ्या क्‍लबमध्ये दागिने तयार करणाऱ्या एका कंपनीनं सौंदर्यस्पर्धा आयोजिली असल्याची माहिती भाभींनी तिला दिली. ‘या सौंदर्यस्पर्धेत तू भाग घे’ असंही तिला त्यांनी सुचवलं. मात्र, सौंदर्यस्पर्धेत घालण्यासाठीचे सोन्याचे दागिने स्पर्धकानं ज्याचे त्याचे आणायचे अशी अट होती. मंगलला स्पर्धेत भाग घ्यायची तर खूपच इच्छा होती. मात्र, ही अट असल्यामुळे मंगलला ते शक्य होणार नव्हतं. स्पर्धेसाठी सोन्याचे दागिने मिळवण्याचा तिनं खूप प्रयत्न केला. अनेक मैत्रिणींना याबाबत विचारलं; पण आपल्याकडचे सोन्याचे खरे दागिने, काही तासांसाठी का होईना, द्यायला कोण तयार होणार? आणि ते साहजिकच होतं.

दागिन्यांअभावी आपण स्पर्धेत भाग घेऊ शकणार नसल्याचं
मंगलनं भाभींना सांगितलं. त्याही विचारात पडल्या. शेवटी, स्पर्धेपुरते दागिने द्यायला त्या कशाबशा तयार झाल्या. ‘दागिने जपून वापर’ आणि ‘स्पर्धा संपल्या संपल्या लगेचच परत कर’ या दोन अटी घालायला भाभी विसरल्या नाहीत. अटी रास्तच होत्या.
आता स्पर्धेत भाग घ्यायला मिळणार याचा मंगला अतिशय आनंद झाला. स्पर्धेत भाग घेत असल्याचं मंगलनं नवऱ्याला सांगितल्यावर त्यानं नाराजी व्यक्त केली. त्याला तसलं काही आवडत नसे. मात्र, मंगलच्या हट्टापुढं आणि उत्साहापुढं त्याचं काही चाललं नाही.
आता मंगल स्पर्धेसाठी चालणं, बोलणं, वागणं सुधारण्यासाठी तयारी करू लागली. नवऱ्याचं मन वळवून तिनं महागाचे कपडे विकत आणले. तिचा ब्यूटी पार्लरचाही खर्च वाढू लागला. एवढा खर्च करताना नवऱ्याची ओढाताण होत होती; पण मंगलच्या हौसेपुढं त्याचं काही चाललं नाही.
स्पर्धेचा दिवस उगवला. मंगल भाभींकडे दागिने मागायला गेली.
इकडं भाभींचा नवराही मंगलला दागिने द्यायला तितकासा राजी नव्हता; पण भाभींनी त्याचं मन वळवलं होतं. भाभींची आर्थिक परिस्थिती चांगली होती; पण त्यांचा नवरा व्यसनी होता. व्यसनावर पैसे उडवण्याच्या कारणावरून नवऱ्याला त्या वारंवार ओरडायच्या. दोघांमध्ये सतत संघर्ष व्हायचा. आपला नवरा व्यसनी आहे याची वाच्यता त्या कुठं करत नसत. मन मोकळं करायला त्यांना तशी कुठं जागाही नव्हती. सरळ, साध्या, मदतशील स्वभावाच्या भाभी त्यामुळे आतून खूप दुःखी असायच्या.
मंगल आली तेव्हा तिला दागिने द्यायला भाभींचा नवरा पुढं आला.
भाभींच्या नवऱ्यानं सर्व दागिने तिला मोजून दिले व ‘स्पर्धा झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी दागिने लगेचच परत करावेत’ असं बजावलं.

स्पर्धा संध्याकाळनंतर होती. त्यानुसार मंगल आणि तिचा नवरा
स्पर्धेच्या ठिकाणी पोचले. मंगलनं स्पर्धेत कौशल्य दाखवलं. सगळ्यांनी तिला छान प्रतिसाद दिला; पण प्रथम पारितोषिक दुसऱ्याच स्पर्धक महिलेला मिळालं. मंगलला पारितोषिकाची आशा होती. ते न मिळाल्यामुळे ती हिरमुसली. मात्र, तसं न दाखवता स्पर्धेनंतरच्या भोजनाच्या कार्यक्रमात व नंतरच्या मनोरंजनाच्या कार्यक्रमात ती हसतमुखानं सहभागी झाली. हे सगळं संपेपर्यंत रात्रीचा जवळजवळ एक वाजला. त्यानंतर मंगल आणि तिचा नवरा घरी जायला निघाले. त्यांनी भाड्याची टॅक्सी ठरवून ठेवली होती. स्पर्धेचं ठिकाण तसं शहराबाहेर बरंच दूर असल्यानं आणि रात्रीची वेळ असल्यानं रस्त्यावर तुरळकच गर्दी होती. स्पर्धेच्या वातावरणातून मंगल आता बाहेर आली होती. आपल्याकडचे दुसऱ्याचे दागिने ही तिला आता जोखीम वाटू लागली. दोघं टॅक्सीत बसले आणि घराच्या दिशेनं निघाले. काही अंतर गेल्यावर एका अंधाऱ्या वळणावर टॅक्सी अचानकच थांबली. टॅक्सीचालकाला टॅक्सी थांबवणं भाग पडलं होतं. कारण, टॅक्सीला दुसरी एक मोटार आडवी आली होती. त्या मोटारीतून काही गुंड उतरले व त्यांनी शस्त्रांच्या धाकानं मंगलच्या नवऱ्याला व टॅक्सीचालकाला टॅक्सीतून बाहेर काढत मारहाण करायला सुरुवात केली. अचानक उद्भवलेल्या या प्रसंगानं मंगल तर हादरूनच गेली. मंगलच्या अंगावर गुंडांना भरपूर दागिने दिसले आणि त्यातल्या एकानं तिला शस्त्राच्या धाकानं धमकवायला सुरुवात केली. त्यातल्या दुसऱ्या एका गुंडानं मंगलच्या अंगावरचे दागिने ओरबाडून काढले व मोटारीत बसून गुंडांनी पोबारा केला. काही क्षणांतच हे घडलं. टॅक्सीचालकही झाल्या प्रकारानं हादरून गेला. गुंडांच्या मोटारीचा पाठलाग करावा हेही त्याला सुचलं नाही. त्यानं मंगलला आणि तिच्या नवऱ्याला त्यांच्या घरापर्यंत पोचवलं. मंगलची आणि तिच्या नवऱ्याची ती रात्र कशी गेली ते त्या दोघांनाच ठाऊक. आता भाभींना काय सांगायचं आणि जे घडलं ते सगळं खरं असूनही त्यावर भाभींचा विश्वास बसेल का? त्यांच्या दागिन्यांची भरपाई कशी करायची? आपण काय करायला गेलो आणि हे काय होऊन बसलं...मंगलचं विचारचक्र जोरानं फिरत होतं. त्या रात्री तिच्या डोळ्याला डोळा लागला नाही. तिचा पापभीरू नवराही मोठ्याच चिंतेत पडला. एवढं सगळं होऊनही, ‘आपण काहीतरी मार्ग काढू’ अशी भूमिका त्यानं घेतली हाच काय तो त्यातल्या त्यात मंगलला दिलासा होता.
सकाळी मंगल आणि तिचा नवरा विचारविनिमय करू लागले. दागिन्यांची भरपाई करणं मुळीचंच सोपं नव्हतं. इकडं भाभींना चैन पडत नव्हतं. मंगलनं दागिने घेऊन यायची वाट न पाहता त्या स्वतःच दागिने घेऊन येण्यासाठी मंगलच्या घरी गेल्या. त्यांना पाहताच मंगलला मोठ्यानं रडू फुटलं. मंगल अशी एकदम का रडायला लागली हे भाभींना कळेना. मात्र, काहीतरी विपरीत घडलं असल्याचं त्यांनी ताडलं. मंगलनं काल रात्रीचा सगळा प्रकार भाभींना सांगितला.

भाभी साहजिकच खूप चिडल्या व नंतर आता नवऱ्याला काय सांगायचं याची त्यांना धास्ती पडली. अखेरीस, ‘एका महिन्याच्या आत दागिन्यांच्या बदल्यातली सगळी रक्कम परत करा,’ असं दरडावणीच्या सुरात मंगलला सांगून भाभी घरी परतल्या.
दरम्यान, मंगल आणि तिच्या नवऱ्यानं पोलिसांत तक्रार नोंदवून ठेवली. मात्र, गुंडांच्या मोटारीचा नंबर वगैरे तपशील दोघंही सांगू शकले नाहीत. त्यांनी तो पाहिलाच नव्हता. आणि समजा पाहिला असता आणि लक्षात ठेवला असता तरी तो खराच असेल असंही नव्हतं. थोडक्यात, दागिन्यांचा तपास काही लवकर लागेल अशी शक्यता नव्हती.

संध्याकाळी भाभींचा नवरा व्यसनाच्या नशेत मंगलच्या घरी गेला व तिथं त्यानं बराच गोंधळ घातला. ‘तुम्ही काहीतरी बनाव रचला आहे. तुम्हाला आमचे दागिने बळकवायचे आहेत,’ असे आरोप त्यानं मंगलवर आणि तिच्या नवऱ्यावर केले. इमारतीतल्या लोकांनी त्याला कसं तरी आवरलं. कालच्या प्रसंगानं हादरून-भेदरून गेलेली मंगल आजच्या प्रसंगानं आणखीच भेदरून गेली. आता शक्य तितक्या लवकर पैसे उभे करणं अत्यावश्यक होतं. मंगलनं आणि तिच्या नवऱ्यानं सावकाराकडून, मित्र-मैत्रिणींकडून रक्कम उभारण्याचे प्रयत्न सुरू केले. जास्त व्याज द्यायची तयारी मंगलनं आणि तिच्या नवऱ्यानं दाखवल्यामुळे रक्कम जमा झाली. दोघांनी ठरवल्यानुसार भाभींना दागिन्यांची किंमत परत केली; पण आता सावकाराचे व मित्रमंडळींचे पैसे कसे परत करायचे हा प्रश्न होताच. तोच विचार आता दोघं करू लागले.

चांगल्या वस्तीतली जास्त भाड्याची जागा सोडून उपनगरात छोट्या जागेत राहण्याची तयारी मंगलनं दाखवली. कोणतीही लाज न बाळगता जे मिळेल ते काम करण्याची तयारी केली. तिच्या नवऱ्यानंही आणखी एक अर्धवेळ नोकरी स्वीकारली. दोघांचे काबाडकष्ट सुरू झाले. वर्षांमागून वर्षं जात होती. दागिन्यांच्या किमतीची रक्कम दोघांनी आता फेडत आणली होती. अशा परिस्थितीतही मंगलनं मुलीच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ दिलं नाही. वेळप्रसंगी ती अर्धपोटी झोपत असे; पण मुलीच्या शिक्षणासाठी तिनं पैसे कमी पडू दिले नाहीत. मंगलची मुलगीसुद्धा खूप समजूतदार आणि हुशार होती. तिचं कॉलेजचं शिक्षण पूर्ण होऊन तिला आता कॉलेज कॅम्पसतर्फे संगणक अभियंत्याची नोकरी एका मोठ्या कंपनीत मिळाली. सततच्या काबाडकष्टांनी मंगल आता खूप अशक्त झाली होती. मात्र, मानसिकदृष्ट्या ती अतिशय कणखर आणि व्यवहारी झाली होती.

मंगलच्या मुलीनं तिच्याच कंपनीतल्या एका समजूतदार तरुणाबरोबर विवाह केला. दोघंही मंगलची आणि तिच्या नवऱ्याची सतत विचारपूस करत असत. त्यांच्या प्रकृतीची काळजी घेत असत. मंगलचे दिवस आता बदलत चालले होते. मुलीनं आई-वडिलांना एक छोटासा फ्लॅट तिच्याच फ्लॅटजवळ घेऊन दिला. मंगलही आता आजी बनली होती. नातवाच्या संगोपनात ती रमून जाऊ लागली. बाळ एखाद्या वर्षाचं झाल्यावर मंगल त्याला संध्याकाळी जवळच्या बागेत रोज घेऊन जाऊ लागली. तिचाही वेळ चांगला जात होता. बागेत एक बाई मंगलकडे पाहून रोज हसत असे. तिचा चेहरा मंगलला ओळखीचा वाटत असे; पण नेमकं काही आठवत नव्हतं.
एक दिवस ती बाई मंगलजवळ आली व आपुलकीच्या स्वरात तिनं विचारलं : ‘‘मंगल का तू?’’
त्या भाभी होत्या.
दोघींनी एकमेकींना न ओळखणं साहजिकच होतं. कारण, मध्ये बऱ्याच वर्षांचा काळ लोटला होता. खूप खस्ता खाव्या लागल्यामुळे मंगलाच्याही प्रकृतीची हेळसांड झाली होती. नवऱ्याच्या व्यसनामुळे येणाऱ्या रोजच्या ताण-तणावानं भाभींचीही प्रकृती पहिल्यासारखी राहिली नव्हती.
एकंदरीत, दोघींच्या तारुण्याचा रंग आता उतरला होता.

अखेर, या भाभीच असाव्यात हे मंगलनं आवाजावरून ओळखलं. ओळख लागल्यावर दोघीही एकमेकींच्या गळ्यात पडून रडल्या. दोघींनाही खूप बरं वाटलं. एरवीही तशी त्यांची मैत्री होतीच. मात्र, दागिन्यांच्या त्या प्रकरणामुळे भाभींच्या मनात किल्मिष निर्माण झालं होतं. मात्र, आता पुलावरून बरंच पाणी वाहून गेलं होतं.
दागिन्यांचे पैसे परत करण्यासाठी काय काय काबाडकष्ट केले ते मंगलनं भाभींना सविस्तरपणे सांगितलं. मंगलच्या हाल-अपेष्टांविषयी ऐकून भाभींना खूप वाईट वाटलं. मधल्या काळात भाभींच्या नवऱ्याचंही निधन झालं होतं. त्यांच्या मुलाचा फ्लॅट बागेच्या जवळच होता. त्या मुलाकडेच राहत असत. झाल्याप्रकाराबद्दल मंगलनं पुन्हा एकदा भाभींची माफी मागितली. भाभींच्याही मनात आता चलबिचल सुरू झाली. मंगलची भेट झाल्यादिवसापासून त्यांच्या मनात अपराधीपणाची भावना बळावत चालली होती. भाभींच्या वागण्यात विचित्रपणा असल्याचं तिला जाणवत होतं; पण त्याचा उलगडा मात्र होत नव्हता. तिनं एके दिवशी भाभींना स्पष्टच काय ते विचारायचं ठरवलं. भाभींना आता सत्य परिस्थिती सांगणं भागच होतं.

मंगलला एका दिवसापुरते उसने दिलेले दागिने भाडोत्री गुंडांकरवी लुटण्याचं कारस्थान आपल्या व्यसनी नवऱ्यानंच आखलं होतं हे सत्य भाभींनी मंगलला सांगूनच टाकलं. अर्थात, हे भाभींनाही कळलं होतं ते नवऱ्याच्या मृत्यूनंतरच. हे ऐकल्यानंतर मंगल अतिशय व्यथित झाली; पण आता जे घडायचं ते घडून गेलं होतं आणि जे सोसायचं ते सोसून झालं होतं. आता काळ बराच पुढं गेला होता.
पुढं भाभींच्या मुलाची बदली दुसऱ्या राज्यात झाली. त्यामुळे हे शहर आता त्या सोडून जाणार असल्यामुळे त्यांनी मंगलला आणि तिच्या मुलीला जेवायला बोलावलं.‍ मंगलनं हे निमंत्रण अगदी आनंदानं स्वीकारलं. जेवल्यानंतर दोघींच्या पुन्हा एकदा छानपैकी गप्पा झाल्या.
निरोपाची वेळ आली तेव्हा भाभींनी मंगलच्या हाती एक पाकीट दिलं.
त्या मंगलला म्हणाल्या :‘‘मंगल, माझ्या नवऱ्याच्या कृत्यामुळे जे काही घडलं त्याची झळ तुला आणि तुझ्या कुटुंबीयांना मोठ्या प्रमाणावर सोसावी लागली आहे. त्याची ही काही अंशी परतफेड मी करत आहे. त्या पाकिटात एका मोठ्या रकमेचा चेक आहे. तो तू स्वीकारावास असं मला वाटतं.’’
मंगलनं तो चेक सहर्ष स्वीकारला व भाभींचे आभार मानले.

जाता जाता ती एवढंच म्हणाली : ‘‘भाभी, आता फार उशीर झाला आहे; पण त्या प्रसंगानं मला खूप खंबीर केलं. मी भ्रमाच्या दुनियेतून सत्याच्या दुनियेत आले. त्या रात्री घडलेल्या त्या प्रसंगानं मला खूप मोठा धडा शिकवला आहे. अर्थात्‌ असा धडा मिळाल्यामुळेच पुढच्या आयुष्यात माझी विचारसरणी चांगल्या अर्थानं बदलली. नकळतपणे तुमच्यामुळेच माझ्यात हा बदल घडून आला, त्यामुळे तुमची मी खूप आभारी आहे.’’

मंगलनं चेक स्वीकारल्यामुळे भाभींच्या मनावरचं ओझं आता उतरलं होतं. यापुढंही संपर्कात राहण्याचं वचन देऊन दोघींनीही एकमेकींचा हसतमुखानं निरोप घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com