घसरते व्याजदर आणि गुंतवणूक पर्याय (सुहास राजदेरकर)

सुहास राजदेरकर suhas.rajderkar@gmail.com
रविवार, 5 जुलै 2020

वेगवेगळ्या बचत योजनांमधले व्याजदर कमी होत असल्यानं सर्वसामान्य गुंतवणूकदार त्रस्त आहेत. ठेवी आणि बचत योजनांवरचे व्याजदर कमी का होत आहेत, त्यावर मात करण्यासाठी कोणते पर्याय आहेत, कोणती काळजी घेणं आवश्यक आहे आदी गोष्टींबाबत मार्गदर्शन.

वेगवेगळ्या बचत योजनांमधले व्याजदर कमी होत असल्यानं सर्वसामान्य गुंतवणूकदार त्रस्त आहेत. ठेवी आणि बचत योजनांवरचे व्याजदर कमी का होत आहेत, त्यावर मात करण्यासाठी कोणते पर्याय आहेत, कोणती काळजी घेणं आवश्यक आहे आदी गोष्टींबाबत मार्गदर्शन.

एका बाजूला, घसरते व्याजदर, वाढती चलनवाढ, आणि दुसऱ्या बाजूला, कोरोनामुळे उत्पन्नावर होत असलेला परिणाम, अस्थिर नोकऱ्या, जोखीम घेण्याची अत्यंत कमी क्षमता या सर्व गोष्टींमुळे सर्वसामान्य गुंतवणूकदार, विशेषतः ज्येष्ठ नागरिक गुंतवणूकदार मोठ्या अडचणीत आले आहेत. आपल्या देशात प्रगत राष्ट्रांसारखी सोशल सिक्युरिटी नाही, ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची काळजी सरकार घेते. भारतामध्ये नव्या नोकरदार वर्गासाठी, निवृत्तिवेतन हा पर्याय बंद झाला आहे आणि ज्यांना निवृत्तिवेतन मिळत आहे ते अतिशय तुटपुंजं असल्यानं रोजचा घरखर्च चालवणंसुद्धा बहुतेक लोकांसाठी आव्हानात्मक बनलं आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया बॉंड्स जे आरबीआय बॉण्ड्स म्हणून लोकप्रिय आहेत, त्यांच्या व्याजदरांमध्ये नुकतीच कपात करण्यात आल्यामुळे घसरत्या व्याजदराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
काय आहेत व्याजदर घसरण्याची कारणं आणि सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी कुठं आणि कशी गुंतवणूक करावी हे थोडक्यात पाहूया.

सन २००० मध्ये १४.५० असलेला रेपो रेट आज २० वर्षांमध्ये ४ टक्क्यावर आला आहे. सन १९९५ मध्ये बँकांच्या मुदत ठेवींवर १६ टक्के इतका व्याजदर मिळत होता, जो आता ६ टक्के इतका खाली आला आहे- जो बचत खात्यापेक्षा थोडाच वर आहे. चलनवाढ यातून वजा केली, तर खरा (रीअल) व्याजदर हा आता एक टक्क्याच्या खाली आला आहे. ही परिस्थिती फक्त भारतामध्ये नसून सर्व जगामध्ये आहे. सर्वसाधारणपणे आपल्या बँकेमध्ये ठेवलेल्या पैशांवर आपण थोडे का होईना; पण व्याज अपेक्षित करतो. परंतु, विचार करा, की तुम्हाला बँकेत पैसे ठेवल्याबद्दल जर बँकेलाच पैसे द्यायला लागले तर? युरोप आणि जपानमध्ये गेली काही वर्षं ही परिस्थिती आहे- ज्याला आपण निगेटिव्ह व्याजदर असे म्हणतो. अमेरिकेमध्ये हा व्याजदर शून्य आहे.

व्याजदर खाली का जातात?
आपण हे समजून घेऊया, की मध्यवर्ती बँका व्याजदर खाली का आणतात? रेपो दर हा असा व्याजदर आहे, ज्यानुसार रिझर्व्ह इतर बँकांना कर्जे देते. सध्या देशाची अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. उद्योगधंदे बंद पडत आहेत. त्यामुळे उद्योगधंद्यांनी कर्ज घेऊन उद्योग वाढवणं आवश्यक आहे. व्याजदर कमी असेल, तर बँकांना रिझर्व्ह बँकेकडे पैसे ठेवणं कमी फायद्याचं होतं आणि त्यांना उद्योगांना पैसे द्यायला प्रोत्साहन मिळतं. बँकांनी कमी व्याजदरात कर्जं दिल्यामुळे त्यांना त्यांच्या मुदत ठेवींवरसुद्धा व्याजदर कमी करावे लागतात- नाहीतर बँकांना तोटा होईल. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर मोठाच परिणाम झाला असून, मध्यवर्ती बँकांना व्याजदर खाली आणणं आवश्यक होत आहे. कर्जं घेणाऱ्या लोकांकरता व्याजदर खाली जाणं चांगलं असलं, तरीही ठेवींमध्ये गुंतवणूक करणाऱ्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी ते वाईट असतं.

गुंतवणूक कुठं करावी ?
सर्वप्रथम, गुंतवणुकीचा एक नियम लक्षात घेऊया, की इथं, ‘सर्वांत सुरक्षित, सर्वांत जास्त परतावा देणारं, अल्पकालीन आणि ‘लॉक इन’ काळ नसलेलं’ असं काहीही नसतं. तुम्हाला असा गुंतवणूक पर्याय जर कोणी सांगत असेल, की ज्यात हे सर्व येतं- तर त्यावर अजिबात विश्वास ठेऊ नका. एक लक्षात घ्या, की ‘जोखीम आणि परतावा’ एका सरळ रेषेमध्ये असते. जोखीम वाढली, की परतावा वाढतो आणि जोखीम कमी झाली, की परतावा कमी होतो. ज्येष्ठ नागरिकांनी प्रथम, फक्त त्यांच्याकरीता असलेल्या गुंतवणूक पर्यायांना प्राधान्य देणं योग्य वाटतं. उदाहरणार्थ, सिनिअर सिटीझन सेव्हिंग्ज स्कीम (७.४० टक्के), प्रधानमंत्री वयवंदन योजना (७.४० टक्के, वार्षिक व्याज बदल). त्यानंतर इतर सुरक्षित योजनांचा विचार करावा, ज्या सर्वांसाठी खुल्या असतात. उदाहरणार्थ, पोस्ट ऑफीस योजना, बँक योजना, आरडी, सुकन्या समृद्धी योजना, पीपीएफ, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया बॉंड्स (आरबीआय बॉंड्स), टॅक्स फ्री बॉंड्स, म्युच्युअल फंड्स ओव्हरनाईट, लिक्विड व आर्बिट्रेज योजना.
थोडी अधिक जोखीम व त्यामुळे परतावा थोडा अधिक : ज्यांची थोडी जोखीम घायची तयारी आहे आणि थोडा अवधी अधिक आहे त्यांनी खालील पर्यायांचा विचार करणं योग्य होईल.

सोनं आणि चांदी : सोनं आणि चांदी हा एक पारंपरिक गुंतवणुकीचा पर्याय असला, तरीही त्याच्या दरामध्ये चढ-उतार असतात. आपल्या एकूण गुंतवणुकीच्या पाच ते आठ टक्क्यांपर्यंत सोन्यामध्ये गुंतवणूक योग्य वाटते.
रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्टस अर्थात ‘रीट्स’ : ही अशी संकल्पना आहे ज्यामध्ये स्थावर मालमत्ता म्हणजे घर, बंगले किंवा ऑफिसेस प्रत्यक्ष विकत न घेता तुम्ही त्यामध्ये ‘डीमॅट’ स्वरूपात गुंतवणूक करू शकता. शेअर बाजारामध्ये नामांकन होतं.
पर्पेच्युअल बॉंड्स : हे बॉंड्स शक्यतो मोठ्या कंपन्या आणि बँका बाजारात आणतात. या बॉंड्सना मॅच्युरिटी तारीख नसते. कंपन्यांना या बॉंड्सचे पैसे (मूळ मुद्दल) परत करावं लागत नाहीत, त्यामुळे त्यांना इक्विटीसारखं मानलं जातं. परंतु, या बॉंड्सवर निश्चित व्याज दिलं जातं. (७ ते ९ टक्के). काही कंपन्या या बॉंड्ससाठी ‘रिकॉल’ पर्याय ठेवतात ज्यायोगे काही काळानं कंपन्या हे बॉंड्स परत मागवून गुंतवणूकदारांना त्यांचं मूळ मुद्दल परत करतात.

कंपनी डिपॉझिट अथवा बॉंड्स : कंपन्या तीन ते पाच वर्षं कालावधीचे रोखे बाजारामध्ये आणतात- ज्यावर ठराविक सहामाही अथवा वार्षिक व्याज दिलं जातं. (८ ते ११ टक्के) साधारणपणे हे रोखे विनातारण असतात.
डिबेंचर्स : कंपन्या तीन ते ७ वर्षं कालावधीचे डिबेंचर्स जारी करतात- जे तारणासहित अथवा विनातारण असतात. ८ ते ११ टक्के व्याज.
म्युच्युअल फंड्स निश्चित मुदतपूर्ती ठेव योजना : ३ वर्षे आणि अधिक काळासाठी असलेल्या योजनांवर इंडेक्सेशन फायदा.
म्युच्युअल फंड्स बॅलन्सड योजना : यामध्ये रोखे आणि इक्विटीचे मिश्रण असतं.
स्ट्रक्चर्ड प्रॉडक्ट्स : ही एक अशी बास्केट केली जाते ज्यामध्ये रोखे, सोने आणि इक्विटी विभागामधल्या गुंतवणुकीचं मिश्रण असतं.

सर्वांत जास्त जोखीम आणि सर्वांत जास्त परतावा :
ज्यांची सर्वांत अधिक जोखीम घ्यायची तयारी आहे, त्यांना इतर बरेच पर्याय उपलब्ध आहेत जसे की शेअर बाजार, डेरिव्हेटीव्ह, म्युच्युअल फंड्स इक्विटी योजना, बिगर नामांकित शेअर्स, पीएमएस, अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंडस्, पेंटिंग्स अर्थात आर्ट आणि अँटिक्स इत्यादी, ज्यामध्ये जोखीम जास्त असल्यानं जास्त परतावा मिळण्याची शक्यता असते.

गुंतवणूक कशी करावी?
प्रत्येकाची गुंतवणुकीची गरज निराळी असते. कोणाला प्राप्तिकर बचत हवी असते, तर कोणाला दर महिन्याला व्याज हवं असतं. कोणाचा गुंतवणूक काळ फक्त सहा महिने असतो, तर कोणाचा सोळा वर्षं, कोणाला एकरकमी गुंतवणूक करावयाची असते, तर कोणाला महिन्याला थोडी रक्कम गुंतवणं शक्य असतं. त्यामुळे सर्वप्रथम आपली गरज आणि हेतू ओळखणं आवश्यक आहे. यालाच आर्थिक नियोजन असं म्हणतात. गुंतवणूक आणि विमा वेगळे ठेवा. शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करताना (आणि काढतानासुद्धा), शक्यतो एकरकमी गुंतवणूक न करता ती विभागून टप्प्याटप्प्यानं करावी. म्युच्युअल फंडांच्या योजनांमध्ये एसआयपी, एसटीपी आणि एसडब्ल्यूपी यांचा उपयोग करावा. विषयाची आणि योजनांची माहिती नसल्यास योग्य सल्लागाराचा सल्ला घ्यावा.

तात्पर्य : सध्याच्या कठीण परिस्थितीमध्ये, केवळ व्याजदर कमी आहेत म्हणून बँक आणि अल्पबचत योजनांमधली सुरक्षित गुंतवणूक सोडून इतर जोखीम असलेल्या गुंवणुकीकडे वळणं चुकीचं ठरू शकतं- कारण इतर गुंतवणुकीमध्ये व्याजदर तर सोडाच; पण तुमचं मूळ मुद्दलदेखील सुरक्षित नसतं. घटत्या व्याजदरांना पर्याय म्हणून, प्रत्येकाच्या जोखीम स्वीकारण्याच्या क्षमतेप्रमाणं वरील पर्यायांमध्ये तज्ज्ञ सल्लागारांच्या सल्ल्यानं गुंतवणूक करणं योग्य होईल.
(डिस्क्लेमर : लेखातली मतं लेखकाची असून, गुंतवणुकीबाबत निर्णय घेताना तज्ज्ञ मार्गदर्शकाचा सल्ला घ्यावा.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang suhas rajderkar write bank investment and interest article