अष्टगंधी नोट (सुजित कदम)

sujit kadam
sujit kadam

रामराव निघून गेले. त्यांनी माझ्या हातात कोंबलेली दोन हजारांची नोट मी सरळ करून बघितली आणि माझे डोळे भरून आले.
"इच्छा प्रामाणिक असेल तर ती खरी होतेच,' हे वाक्‍य मला पुन्हा आठवलं...!


आज क्‍लिनिकमध्ये आल्यापासून लागोपाठ पाचव्यांदा देविकानं फोन केलाय. प्रसाद हट्टालाच पेटलाय म्हटल्यावर तिनं सूत्रं हातात घेतली होती. निमित्त होतं...प्रसादला बॅट आणि क्रिकेटंच किट आणण्याचं.
नेहमीपेक्षा आज जरा लवकरच पेशंट तपासून झाले होते, त्यामुळे आता फोन उचलायला हरकत नव्हती.
मी फोन उचलला.
""हं...बोल, देविका.''
""काय? तू आणि प्रसाद क्‍लिनिकवर येताय?
बरं. ये, ये. प्रसादला घेऊन ये. अर्ध्या तासात या दोघं. दुपारचं जेवण आपण आपल्या नेहमीच्या हॉटेलातच कर. मग इथूनच तुम्ही खरेदीला जा. प्रसादला हवी तशी बॅट आणि क्रिकेटचं किट घेऊन या.''
आणखी काही सूचना देऊन मी फोन ठेवला.
आता कॉफीची तल्लफ आली होती.
राधा. रिसेप्शनिस्ट. माझी विश्वासू सहकारी. बरीच वर्षं माझ्याबरोबर काम करत होती.
मी तिला हाक मारली.
""राधा''
""येस सर.''
""आज अजून कुणी आहे वेटिंगवर?''
""नेहमीचे एक-दोन पेशंट आहेत, सर. मध्ये अर्धा तास गॅप आहे.''
""ओके राधा, मला कॉफी सांग.''
""ओके सर. ''
कॉफीच्या प्रतीक्षेत असतानाच, क्‍लिनिकमधल्या धन्वंतरीच्या देव्हाऱ्याच्या ड्रॉवरमध्ये असलेली दोन हजारांची ती नोट मी काढली. नोटेकडे पाहता पाहता मी भूतकाळात हरवून गेलो. प्रसाद आता अकरा वर्षांचा झाला होता. मागच्याच वर्षी त्यानं सुगम संगीतात पहिलं बक्षीस मिळवलं होतं. सन्मानचिन्ह आणि दोन हजार रुपये रोख. पारितोषिकात मिळालेली तीच ही नोट!
एका प्रतिभावंत गायकाच्या हस्ते मिळालेला तो सन्मान मी क्‍लिनिकमध्ये जपून ठेवला होता. प्रसादनं मिळवलेलं ते पहिलं बक्षीस देवाजवळ ठेवताना त्यानं नोटेला लावलेलं ओल्या अष्टगंधाचं बोट आजही तो क्षण, ती आठवण सुगंधित करत होतं. त्या नोटेवर अष्टगंध आजही आपलं अस्तित्व टिकवून दरवळत होतं.
क्रिकेटच्या बॅटवर आणि क्रिकेटच्या किटवर फक्त आजच्या दिवसच विशेष सवलत असल्यानं मला आज प्रसादला खरेदीसाठी होकार देणं आणि त्यानं हट्ट करून मागितलेली त्याच्या बक्षिसाची ती नोट देणं भाग होतं. कारण, त्याला मी माझ्याकडचे देऊ केलेले पैसे नको होते. त्याला त्याच्याच बक्षिसाच्या नोटेतून बॅट आणि किट घ्यायचं होतं. त्यामुळे मला ती दोन हजारांची नोट प्रसादला द्यावी लागणार होती.
***

सदू कॉफी घेऊन आला.
कॉफीचा आस्वाद घेत नोटेकडे पाहून मी थोडासा भावनिक झालो. मला ती नोट जपून ठेवायची होती. मुलाचे छंद जोपासताना त्यानं मिळवलेल्या पहिल्या बक्षिसाचे सारेच क्षण
आई-वडिलांना कायम जपून ठेवावेसे वाटतात...पण बक्षिसाच्या त्याच पैशांतून विकत घेतलेल्या बॅटमुळे क्रिकेटमध्येही असंच यश मिळेल असा दृढ विश्वास प्रसादला वाटत होता!आम्हा दोघांच्याही भावना आपापल्या ठिकाणी रास्त होत्या. नोटेवरचा तो अष्टगंधाचा पिवळा ठिपका माझी मनोवस्था अधिकच द्विधा करत होता. अखेर, देविका आणि प्रसाद यांच्या भावनिक संघर्षात मी हार पत्करली होती. माय-लेकांचं एकमत झालं होतं. "इच्छा प्रामाणिक असेल तर ती खरी होतेच,' हे वाक्‍य माझ्याबाबतीत आज खोटं ठरणार होतं. मी ती नोट प्रसादला खर्च करण्यासाठी द्यायचा निर्णय घेतला.
***

""पप्पा...''
प्रसाद आईसोबत आला होता. त्याच्या शब्दांत उत्साह आणि डोळ्यात आनंद जाणवत होता.
""अरे, आलातपण तुम्ही?''
प्रसादपाठोपाठ देविकाही आत आली.
माझ्या हातातली दोन हजारांची नोट पाहताच देविका म्हणाली : ""वाटलंच मला. अरे, किती विचार करशील त्या नोटेचा? प्रसादचं पहिलं बक्षीस आहे ते. त्यालापण तीच नोट हवी आहे. शेवटी, तोही तुझ्यासारखाच... हट्टी!''
""चला, क्रिकेटवीर...मेनू ठरवा. कुठं जायचं ते सांगा. एक-दोन पेशंट आहेत, ते झाले की आपण निघू या...'' मी म्हणालो.
""ओके. चालेल पप्पा,'' प्रसादनं माझ्या प्रस्तावाला अनुमोदन दिलं.
देविकाचं आणि माझं बोलणं सुरू असताना प्रसाद प्रश्नार्थक नजरेनं आमच्याकडे पाहत सारं काही ऐकत होता. जरासं घुटमळत त्यानं पुन्हा एकदा मला विचारलंच : ""पप्पा, तुम्ही नक्की मला ती नोट देणार आहात ना?''
मी 'हो' म्हणताच त्यानं मला कडकडून मिठी मारली. ती क्षणभराची गळामिठी त्याचा आणि माझा आनंद द्विगुणित करून गेली.
आणखी दोन पेशंट मला पाहायचे असल्यानं देविकाला आणि प्रसादला वेटिंग रूममध्ये थांबावं लागणार होतं.
***

माझ्या ओळखीचे रामराव दीक्षित आज बऱ्याच दिवसांनी आले होते. गेल्या कित्येक वर्षांपासून मी त्यांचा फॅमिली डॉक्‍टर आहे. इतक्‍या वर्षांत रामरावांशी माझं मैत्रीचं नातं तयार झालं होतं.
""या रामराव, या '' मी हसून म्हणालो. मागच्या वेळेपेक्षा आज रामराव जरा जास्तच थकल्यासारखे वाटत होते. आवाजात नेहमीचा उत्साह नव्हता. त्यांच्या थकलेल्या स्वरपेटीतून तोच थकलेला सूर बाहेर पडला!
""डॉक्‍टर, वाचवा या दुखण्यातून तुमच्या या रामरावाला. खूपच अशक्त असल्यासारखं वाटतंय. या वयात अशी लांबत जाणारी दुखणी पेलवत नाहीत आणि झेपतही नाहीत. लवकर सुटका झालेली बरी.''
""रामराव, या, टेबलवर या. आधी शांत व्हा. मी तपासतो. मग बोलू.''
मी रामरावांना तपासलं. त्यांना कावीळ असल्याची शंका मला आली. काही दिवसांपूर्वीच मी रामरावांना रक्ताच्या काही तपासण्या करायला सांगितल्या होत्या.
""रामराव, मी मागच्या आठवड्यातच तुम्हाला काही टेस्ट करून घ्यायला सांगितल्या होत्या. त्या केल्यात का तुम्ही? अशीच टाळाटाळ करत राहिलात तर, तुम्हाला नक्की काय झालंय हे मला कसं कळणार? आणि त्याशिवाय मला तुमच्यावर कोणतेच औषधोपचार करता येणार नाहीत,''
मी दटावून म्हणालो; पण रामराव शांतपणे ऐकत होते.
""रामराव, मी दिलेल्या गोळ्यांनी तुम्हाला बरं वाटेल; पण आजार तात्पुरता बरा करायचा असेल तर! मात्र, कायमस्वरूपी बरं व्हायचं असेल तर मी सांगितलेल्या टेस्ट करून घेण्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. तुम्हाला काही आर्थिक अडचण असेल तर तसं सांगा मला. आपण करू काहीतरी,'' मी आपुलकीनं म्हणालो.
रामराव अजूनही शांतच होते.
""अरे संदीप, पैशाची अडचण आहेच रे; पण त्यापेक्षाही मोठी भीती म्हणजे आम्ही दोघंच घरी असतो. तुझ्या काकूचंही आता वय झालंय. मी टेस्ट करून घेतल्या आणि तपासणीत काही निघालं तर कोण उस्तवार करणार या काळजीनं आम्ही दोघंही धास्तावलोय. आता साधं दुखणंसुद्धा आवाक्‍याबाहेरचं वाटायला लागलंय. कसं निभावलं जाणार याचीच सतत काळजी वाटत राहते, '' रामराव हताशपणे म्हणाले.
""पण, रामराव असा विचार करणं हेच तुमच्या जिवावर बेतू शकतं हे तुमच्या लक्षात कसं येत नाही? आता मी तुमचं काहीएक ऐकणार नाही. आजच्या आज या टेस्ट करून घ्या. काही अडचण असल्यास विनासंकोच सांगा. कुणाला मदतीला बोलवायचं आहे का?''
रामरावांना या क्षणी धीर देणं गरजेचं होतं.
इतक्‍यात कॉफीचा कप न्यायला सदू आला. रामरावांना घरी सोडून यायला मी सदूला सांगितलं. आवश्‍यक त्या तपासण्या वेळेवर व्हाव्यात म्हणून डॉ. देवांश यांच्या क्‍लिनिकमध्ये आजच्या आज तपासण्या करून घेण्याविषयी रामरावांना बजावलं. तिथं तपासणीसाठी कोणतीही फी द्यायची गरज नाही हेही स्पष्ट केलं व आवश्‍यक त्या सूचना आणि तपासण्या करून घेण्यासाठीची चिठ्ठी रामरावांच्या हाती दिली. उरलेले दोन पेशंट शिताफीनं तपासत मी राधाचा निरोप घेतला आणि आम्ही तिघं क्‍लिनिकमधून बाहेर पडलो.
नेहमीच्या हॉटेलमध्ये दुपारचं जेवण घेताना देविका व प्रसाद अतिशय आनंदात होते. मी ती दोन हजारांची नोट प्रसादच्या हातात दिली तेव्हा तो कमालीचा खूश झाला. त्यानं लगेच ती नोट आईच्या हातात दिली.
आज सकाळी आलेल्या पेशंट्‌सकडून बऱ्यापैकी कमाई झाली होती. मी प्रसादला त्या कमाईतले दोन हजार रुपये सहज देऊ शकलो असतो...पण काय करणार? प्रसादला तीच अष्टगंधी नोट हवी होती! जेवणानंतर देविका व प्रसाद खरेदीसाठी गेले व मी पुन्हा क्‍लिनिकमध्ये आलो.
ती नोट खर्च केली जाणार याची रुखरुख मनात अजूनही होतीच.
जेवताना देविकानं उपाय सुचवला होता.
""अरे, इतकंच वाटतय ना, तर मग त्या नोटेचा फोटो काढून मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेव की!''
मी तसं केलं; पण तरीही प्रत्यक्ष वस्तू आणि फोटो यांच्यात फरक असतोच ना! मनातली रुखरुख, चुटपुट प्रयत्नपूर्वक विसरत मी पेशंट तपासण्यावर लक्ष केंद्रित केलं.
* * *

गेल्याच आठवड्यात प्रसादची
राज्यपातळीवरच्या क्रिकेटसंघात निवड झाली होती. प्रशिक्षकांनी त्याचं विशेष कौतुक केलं होतं. शाळेतही पहिल्या सहामाहीत प्रसादला सर्व विषयांत उत्तम गुण मिळाले होते...आणि आज त्याच्या मनासारखी बॅट खरेदी करायला मिळतेय म्हटल्यावर स्वारी भलतीच खूश होती. त्या नोटेच्या आठवणीत दिवस कधी संपला कळलंच नाही...
आनंदी वातावरणात दुसरा दिवस उजाडला. मी क्‍लिनिकमध्ये येण्याआधीच रामराव माझी वाट पाहत होते. आज अशक्तपणा असला तरी रामरावांच्या तब्येतीत कालच्यापेक्षा सुधारणा होती. नेहमीचा नमस्कार वगैरे झाल्यावर मी क्‍लिनिक उघडलं आणि रामरावांना आत बोलावलं. रामरावांनी आत येताच माझ्या हातात टेस्टचे रिपोर्ट ठेवले.
""रामराव, मी सांगितलेले सगळे रिपोर्ट पाहिलेत ना तुम्ही?'' बोलता बोलता मी पाकिटातून रिपोर्ट काढून वाचू लागलो आणि माझी शंका खोटी ठरली. आजार गंभीर नाही हे रिपोर्टवरून स्पष्ट झालं. मी रामरावांना तसं सांगताच त्यांचा चेहरा आनंदानं फुलून आला आणि त्यांचं निम्मं दुखणं दूर झालं. रामरावांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून मलाही बरं वाटलं. इतक्‍यात नेहमीप्रमाणे सदू सकाळची कॉफी घेऊन आत आला. रामरावांना बघताच त्यानंही त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. "सगळं काही ठीक आहे' असं सांगताच तो निघून गेला.
पाहून झालेले रिपोर्ट मी रामरावांकडे परत केले. त्यांना काही औषधं लिहून दिली. रामरावांच्या परिस्थितीची मला जाणीव असल्यानं मी त्यांच्याकडून कधीच तपासणी फीची अपेक्षा केली नव्हती, तरीही आज करून घेतलेल्या टेस्टची फी आणि माझीही तपासणी फी त्यांनी नेहमीप्रमाणे विचारलीच.
मी काहीच बोललो नाही. डॉक्‍टर संदीप आपल्याकडून कधीच फी घेत नाही याची त्यांना जाण होती.
रामरावांनी त्यांच्या खिशातून दोन हजार रुपयांची नोट काढली आणि माझ्या हातात आग्रहपूर्वक कोंबली. मी रामरावांना बराच वेळ समजावून सांगत राहिलो; पण आज डॉक्‍टर संदीपचं काही ऐकायचंच नाही असंच जणू ते ठरवून आले होते की काय न कळे.
निरोप घेऊन उठताना ते म्हणाले : ""डॉक्‍टर, कालच माझ्या घराच्या मागची खोली मी भाड्यानं दिली असल्यानं पैशाची काळजी मिटलीय आता. तेव्हा हे पैसे राहू देत. ''
* * *

रामराव निघून गेले. त्यांनी माझ्या हातात कोंबलेली दोन हजारांची नोट मी सरळ करून बघितली आणि माझे डोळे भरून आले.
"इच्छा प्रामाणिक असेल तर ती खरी होतेच," हे वाक्‍य मला पुन्हा आठवलं. कारण, रामरावांनी दिलेल्या त्या दोन हजारांच्या नोटेवर तेच प्रसादनं लावलेलं अष्टगंधाचं बोट दिसलं! आणि तोच अष्टगंधी सुगंधसुद्धा मन हेलावून गेला.
तेव्हा आणखी एक जाणवलं... "आठवणी जपून ठेवता येतात...पैसे जपून ठेवता येत नाहीत! ते भाग्य नशिबातच असावं लागतं.'
रामरावांनी दिलेली ती दोन हजारांची नोट मी धन्वंतरीच्या देव्हाऱ्यातल्या ड्रॉवरमध्ये पुन्हा ठेवून दिली. सुरक्षित.
एका अष्टगंधी आठवणीसोबत...!
आणि, कधी एकदा घरी जाऊन या कमालीच्या योगायोगाविषयी देविकाला आणि प्रसादला सांगतोय असं मला होऊन गेलं...!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com