परदेशवारीचं नवं समीकरण (सुनंदन लेले)

sunandan lele
sunandan lele

परदेशवारीचं समीकरण हल्ली खूप बदललं आहे. आता उतारवयात नव्हे, तर पन्नाशी पार केल्यावर म्हणजे सरासरी पंचावन्नाव्या वर्षी बरेच मध्यमवयीन लोक पहिला परदेशप्रवास करतात. तरुण पिढीत तर २५ पार करत असतानाच पहिली परदेशवारी घडते. लहान मुलांचं नशीब अजून फळफळलं आहे- कारण अनेक घरांतल्या मुलांना अगदी पहिलीत जात असतानाच परदेशात जायला मिळत आहे. हे आहे नवं पर्यटनाचं समीकरण : ५५-२५-५. मात्र, या पर्यटनाला क्रीडाप्रेमाची जोड असेल, तर त्यातून मिळणारा आनंद अवर्णनीय आहे. पुढच्या वर्षी असा आनंद मिळवण्याच्या अनेक संधी येणार आहेत.

ब्रिटनमध्ये विश्वकरंडक स्पर्धेचं वार्तांकन करत असताना क्रिकेटचा आनंद अनुभवायला आणि ब्रिटन भटकायला आलेले भारतीय वंशाचे असंख्य लोक मला भेटले. त्यात मराठी माणसं खूप जास्त प्रमाणात होती. अशा भेटीतला एक प्रसंग माझ्या मनावर कोरला गेला. नऊ मध्यमवयीन मुलांचा एक ग्रुप मला भेटला. त्यांनी एक वर्ष अगोदर मस्त योजना आखून त्यांच्या शाळेतल्या ग्रुपचं रियुनियन विश्वकरंडकाच्या वेळी करायचा घाट घातला होता. भारतीय क्रिकेट संघाच्या सामन्यादरम्यान ही मनमौजी टोळी मला भेटली, तेव्हा त्यातले दोघं मला बाजूला येऊन परत भेटले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता; पण डोळ्यांत पाणी होतं. कहाणी अशी होती, की नऊ जणांपैकी त्या दोघांची आर्थिक परिस्थिती सबळ नव्हती. ग्रुपमधल्या दोघांनी पुढाकार खाऊन विश्वकरंडकादरम्यान रियुनियन करायची कल्पना मांडली, तेव्हा सगळे जाम खूश झाले; पण अर्थातच या दोघांची आर्थिक बाजू मजबूत नसल्यानं ते काहीसे मागं सरकले. मग योजना मांडणाऱ्यांनी त्यांना विचारलं : ‘‘जास्त दडपण न घेता तुम्हाला किती पैसे जमवता येतील ते फक्त सांगा.’’ त्यावर एकाचं उत्तर २१ हजार, तर दुसऱ्याचं २३ हजार असं होतं. मग त्यावर परत चर्चा झाली नाही. आर्थिक बाजू सक्षम नसलेल्या मित्रांचा संपूर्ण दौऱ्याचा म्हणजे विमान प्रवास, खाणंपिणं, पर्यटन आणि हॉटेलमधलं राहणं इतकंच काय- सामन्याच्या महागड्या तिकिटांपर्यंतचा सगळा खर्च बाकीच्या सात मित्रांनी विभागून अगदी सहजी केला. परत त्याची वाच्यताही झाली नाही. ही कहाणी ऐकून मला अगदी भरून आलं. याला म्हणतात दोस्ती! त्या मस्त गँगला भेटून मी गप्पा मारल्या, तेव्हा त्यांच्यातला मैत्रीचा ओलावा स्पष्ट जाणवला.
आज ही कहाणी आठवली- कारण सन २०२० मध्ये तीन मोठ्या संधी अशाच भन्नाट खेळ पर्यटनाकरता रसिकांसमोर येत आहेत. फेब्रुवारी- मार्च महिन्यात महिलांचा टी-२० विश्वकरंडक ऑस्ट्रेलियात भरणार आहे. मग जुलै- ऑगस्ट महिन्यात टोकीयो ऑलिंपिक्स होतील आणि ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात पुरुषांचा टी-२० विश्वकरंडक परत ऑस्ट्रेलियात रंगणार आहे.

मजेदार आकडे
ऑस्ट्रेलियन पर्यटन विभागाचा भारत आणि गल्फ भागासाठीचा प्रमुख निशांत काशीकर नावाचा हसरा क्रिकेटवेडा मराठमोळा तरुण आहे. खेळाची इतकी आवड निशांत काशीकरला, की सोमवार ते शनिवार भरपूर काम करून सुटीच्या दिवशी घरच्यांची नाराजी पत्करत तो पांढरे कपडे घालून नीट क्रिकेट सामना खेळायला मैदानात हजर होतो.
‘‘सन २०२०च्या तयारीला आम्ही जोरात लागलो आहोत- कारण भारतातून प्रचंड मोठ्या प्रमाणात पर्यटक ऑस्ट्रेलियाला जाणार आहेत. सांगून आश्चर्य वाटेल, २००९ मध्ये एक लाख २४ हजार पर्यटक भारतातून ऑस्ट्रेलियाला गेले होते. या वर्षी म्हणजे दहा वर्षांत त्याची संख्या वाढून ती तीन लाख ७५ हजारपेक्षा जास्त झाली आहे. सन २०१८-१९च्या आर्थिक वर्षात भारतीय पर्यटकांनी तब्बल ८३०० कोटी रुपये फक्त ऑस्ट्रेलियाच्या पर्यटनावर खर्च केले आहेत, हे ऐकून कमाल वाटेल. कारण साधं सरळ आहे. ऑस्ट्रेलिया दूरदेश आहे. विमानात बसतानाच तिकीट आणि व्हिसा मिळून एक लाख खर्च झालेला असतो. त्यापुढे भटकंतीचा खर्च; पण भारतीय पर्यटक मोठ्या संख्येनं ऑस्ट्रेलियाकडे आकर्षित होत आहेत हे नक्की,’’ निशांत काशीकर उत्साहानं सांगत होता.

ऑस्ट्रेलियाचं आकर्षण का?
युरोपला जाणं स्वस्त नसलं, तरी ते खूप महाग नाही. मग ऑस्ट्रेलिया दूरदेश असून आणि त्या मानानं खर्चिक असून मग ऑस्ट्रेलियाचं आकर्षण का आहे, असं विचारता निशांत म्हणाला : ‘‘ऑस्ट्रेलिया खराखुरा खेळप्रेमी देश आहे. क्रिकेट विश्वकरंडकासारखी भव्य स्पर्धा लोकांना आकर्षित करते. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियात साडेसात लाख भारतीय लोक स्थायिक झाले आहेत आणि ७५ हजारपेक्षा जास्त विद्यार्थी विविध अभ्यासक्रमाचं शिक्षण घेत असल्यानं त्याचाही परिणाम होतो. अजून एक कळीचा मुद्दा म्हणजे प्रगत देश असूनही ऑस्ट्रेलियाचा डॉलर स्थिर आहे- ज्यानं पर्यटकांना चलनवाढीचा अनावश्यक बोजा सहन करावा लागत नाही.’’

आयसीसीचं ध्येय स्पष्ट
पुढील वर्षी फेब्रुवारी- मार्च महिन्यात होणाऱ्या महिलांच्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेकडे इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल खूप वेगळ्या नजरेनं बघत आहे. आयसीसीला ही स्पर्धा महिला क्रिकेटकरता मैलाचा दगड बनवायची इच्छा आहे. पेप्सी कंपनीच्या माजी अध्यक्षा इंद्रा नुई यांना आयसीसीनं समितीवर मानानं पाचारण करून महिला टी-२० विश्वकरंडक स्पर्धेचं झकास मार्केटिंग कसं होईल, यावर लक्ष केंद्रित करायला सांगितलं आहे.

आयसीसी आणि संयोजक मिळून एक महत्त्वाकांक्षी आकडा पार करायला झटत आहेत. महिलांच्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामना आठ मार्चला म्हणजेच जागतिक महिला दिनाला होणार आहे. हेच औचित्य साधून मेलबर्न क्रिकेट मैदानावर सर्वाधिक प्रेक्षकांचा जागतिक विक्रम करायचा मानस आयसीसी, क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियन पर्यटन महामंडळाचा आहे. सन १९९९ मध्ये महिलांच्या फिफा विश्वकरंडक अंतिम सामन्याकरता कॅलिफोर्नियाच्या रोझ बाऊल मैदानावर ९० हजार १८५ प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. ता. ८ मार्च २०२० च्या जागतिक महिला दिनी मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणाऱ्या टी-२० विश्वकरंडक अंतिम सामन्याकरता एक लाख प्रेक्षक जमा करण्याकरता संयोजक आणि आयसीसी झटणार आहेत.
‘‘सन २०२०च्या ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात पुरुषांची टी-२० विश्वकरंडक स्पर्धाही ऑस्ट्रेलियात भरणार आहे. त्या स्पर्धेकरता क्रिकेटप्रेमी लोकांचा उत्साह आत्तापासून ओसंडून वाहायला लागला आहे. त्याच्या अगोदर फेब्रुवारी- मार्च महिन्यात होणाऱ्या महिलांच्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेलाही भारतीय प्रेक्षक पर्यटक नक्की प्राधान्य देतील, अशी आम्हाला खात्री आहे. खास करून महाराष्ट्रीय पर्यटकांमध्ये खेळ पर्यटनाचं प्रेम झपाट्यानं वाढत आहे- कारण भारतातून ऑस्ट्रेलियाला एकूण जाणाऱ्या पर्यटकांपैकी १८ टक्के पर्यटक महाराष्ट्रातून असतात, हे सत्य आहे. ता. ८ मार्च २०२० रोजी महिलांच्या टी-२० विश्वकरंडक अंतिम सामन्याचा आनंद अतिभव्य मेलबर्न क्रिकेट मैदानावर जाऊन जागतिक महिला दिन साजरा कोण करतं हेच आता बघायचं आहे,’’ निशांत उत्साहानं हसतहसत म्हणाला.

जमाना बदलला आहे
अगदी सत्य सांगतो तुम्हाला. माझ्या आई- वडिलांना शक्य असून ते कधीही परदेशात गेले नाहीत. तसं बघायला गेलं, तर अगोदरच्या पिढीत साधेपणा इतका होता, की कोणी अनावश्यक पैसे खर्च करायचे नाहीत. स्वतःच्या आशा आकांक्षांना बगल देत त्या पिढीनं सतत बचतीचा मार्ग पसंत केला. आपल्यापेक्षा पुढच्या पिढीचा विचार जास्त केला. ‘काय घेतो यापेक्षा काय घेऊ शकतो,’ असा विचार ते जास्त करायचे. जमाना बदलला आणि विचार बदलले. आत्ताची पिढी फार पुढचा विचार करायला नकार देते. भरपूर कष्ट करून मिळवलेल्या पैशाचा उपभोग घ्यायला ते मागंपुढं बघत नाहीत. त्याचा परिणाम असा झाला आहे, की समीकरण ५५-२५-५ असं झालं आहे.
५५-२५-५ हा काय प्रकार आहे, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असणार. उलगडून सांगतो.

आधी सांगितल्याप्रमाणं पूर्वीच्या काळी घरातले ज्येष्ठ लोक परदेशी जायचे नाहीत. श्रीमंत घरांतली मुलं परदेशी जाऊन परत यायची, तेव्हा ‘फॉरेन रिटर्न्ड’ असं बिरुद त्यांना मिळायचं. वधू-वर सूचक माहितीत हा शब्द वापरला जायचा, तेव्हा प्रचंड वजन वाढायचं. बदलत्या जमान्यात घराघरांतली मुलं परदेशात असतात. मध्यमवर्गीय मुला-मुलींचे साधेसुधे पालक आपापल्या पाल्यांकडं जाण्याकरता श्रीमंत लोकांच्या खांद्याला खांदा लावून विमानात बसलेले दिसतात, तेव्हा खूप समाधान मिळतं. त्यानंच हे ५५-२५-५चं समीकरण बनलं आहे.
आता उतारवयात नव्हे, तर पन्नाशी पार केल्यावर म्हणजे सरासरी पंचावन्नाव्या वर्षी बरेच मध्यमवयीन लोक पहिला परदेशप्रवास करतात. तरुण पिढीत तर २५ पार करत असतानाच पहिली परदेशवारी घडते. लहान मुलांचं नशीब अजून फळफळलं आहे- कारण अनेक घरांतल्या मुलांना अगदी पहिलीत जात असतानाच परदेशात जायला मिळत आहे. हे आहे नवं पर्यटनाचं समीकरण : ५५-२५-५.

या लेखातून मला इतकाच मुद्दा मांडायचा आहे, की बरे पैसे जमा केले असतील किंवा करायची तयारी असेल आणि खेळप्रेमी असाल, त्याचबरोबर धमाल भटकंतीची आवड असेल, तर कृपया योजना आखायला लागा. ऑलिंपिक खेळात रस असेल, तर जपानला जायचा विचार करा. क्रिकेटप्रेमी असाल, तर सन २०२० मध्ये फेब्रुवारी किंवा ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियाला जायचा घाट घाला. भरपूर भटकंती केल्याच्या अनुभवाचा आधार घेत मी सांगेन, की पूर्वतयारीतच फायदा आहे.
सरतेशेवटी सांगतो : जी मजा प्रत्यक्ष मैदानावर जाऊन मोठे खेळ सामने बघण्यात आहे, ती एक लाखाच्या टीव्हीवर बघण्यात नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com