कहाणी खेड्यातल्या स्त्रियांची... (उमेश मोहिते)

saptarang umesh mohite write book review
saptarang umesh mohite write book review

ललितलेखिका म्हणून परिचित झालेल्या तनुजा ढेरे यांचा ‘फुलवा’ हा कथासंग्रह कष्टकरी गरीब जनसमूहाच्या जगण्याचं भीषण आणि भयावह वास्तव चित्रित करणारा आहे. 'जनाक्का' या पहिल्या कथेत जनाक्का नावाच्या कष्टकरी स्त्रीच्या आयुष्याची कर्मकहाणी आहे. वंशाला दिवा हवा म्हणून चार मुलींची आई असलेल्या जनाक्काला पोट भरण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात. वेळप्रसंगी अपमानही सहन करावा लागतो. चंद्री नावाची तिची मुलगी गावातल्या नामा दुकानदाराच्या वासनेची शिकार होते, तर दुसरी पेटवून घेऊन मरते. तिसरीला घटस्फोट मिळतो. थोडक्यात, मुलाच्या हव्यासापोटी तिच्या व तिच्या चारही मुलींच्या आयुष्यांची कशी धूळधाण होते, हे लेखिकेनं या कथेत रंगवलं असून ही कथा मन सुन्न करून टाकते. गावातील बचत गटाच्या स्त्रियांच्या बळावर गरीब घरातील निरक्षर असलेली ईनी कशी सरपंच होते, याचं वास्तव आणि नेमकं चित्रण ‘इलेक्शन' कथेत असून, ही कथा गावपातळीवरील राजकारणावर प्रकाशझोत टाकते आणि ग्रामीण स्त्रियांना आलेल्या आत्मभानाचं सूचनही करते.

ग्रामीण परिसरात नात्यात सोयरसंबंध सर्रास केले जातात; पण कधी-कधी असे सोयरसंबंध कसे क्लेशदायक व दुःखाचे ठरतात, याचं वास्तवदर्शी रेखाटन ‘सोयरीक' कथेत असून, या कथेच्या नायकाची- कोडिंबाची बहिणीकडून होणारी दमछाक नेमकेपणानं उजागर झाली आहे. गरीब आणि निरागस अशा आंधळ्या चंपाच्या आयुष्याची वाताहत ‘आंधळी' कथेत उमटली असून, तिचं दुर्दैव वाचून तिच्याविषयी मनात कणव उत्पन्न होते. 'बोरमाळ' ही कथा माना-पानाच्या मोहातून जावयाकडून सासऱ्याची होणारी आर्थिक पिळवणूक कथन करते आणि त्याचवेळी बापाच्या घराची झालेली पडझड पाहून मनूताई बंड करून उठते आणि नवऱ्याच्या अवाजवी मानपानाला विरोध करते. पर्यायानं नवरा तिला सोडून जातो आणि मनूताई माहेरी एकटी राहते. या कथेतील बंडखोर मनूताई मनात ठसते आणि लढण्याची प्रेरणाही देते. पतीच्या निधनानंतर शहरात रिक्षा चालवून उदरनिर्वाह करणारी रुक्मिण तारुण्यसुलभ भावनेतून मवाली असणाऱ्या समशेरच्या नादी लागते आणि दुर्दैव कसं ओढवून घेते, याचं नेमकं चित्रण ‘ रुक्मिण' कथेत येतं. ‘फुलवा' ही शीर्षकथा काहीशी दीर्घ असून, या कथेत अर्धनागर वातावरण आहे. ही चटका लावणारी कथा विचार करायला भाग पाडते. तसंच शिक्षण क्षेत्रातील भ्रष्ट आचारावर उजेडही टाकते.

‘फुलवा' कथासंग्रहात तनुजा ढेरेंनी गाव-खेड्यातील कष्टकरी शेतमजूर स्त्रियांच्या जगण्याचा संघर्ष अधोरेखित केला आहे. 'बक्कळ ' , 'खळगूट ' , कोरड्यास' , 'शेरडं' , 'जवा' , 'निरशा' , 'परवर' यांसारखे मराठवाडी बोलीभाषेतील शब्द वाचनानंद देतात. असं असलं तरी, दोन-तीन उणिवा नोंदवणं भाग आहे. 'मुंगळे मास्तर' ही विनोदी कथा असून, संग्रहातील तिचा समावेश खटकतो, तर 'वडा' आणि 'मन वढाय वढाय' या कथा नसून ललितलेख आहेत. शिवाय, काही कथांच्या शेवटी येणारी भाष्यं टाळायला हवी होती.

पुस्तकाचं नाव : फुलवा, लेखिका : तनुजा ढेरे
प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन, पुणे (०२०- २४४९५३१४, २४४८३९९५)
पृष्ठं : १६६, मूल्य : २४० रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com