आजी आठवताना... (विद्या सुर्वे-बोरसे)

vidya surve borse
vidya surve borse

लहानपणी आपल्याला केवळ हुंदडणं ठाऊक असतं. आपल्याला खेळ आणि भटकंती ठाऊक असते. आपल्याला वेग आणि उड्या माहीत असतात. आपल्या वेगाशी घरात फक्त एकाच व्यक्तीला जुळवून घेता येत नाही आणि ती व्यक्ती असते आजी. इकडून तिकडून येऊन तिच्या पारंबीला झोका घेऊन पुन्हा पळून जाणं एवढंच आपल्याला जमत असतं त्या दिवसांत.

आजी...आपण लहान असतो तेव्हा तिच्या अस्तित्वाचा एक कोपरा घरात दरवळत असतो. आजी असते आणि एक सुगंध आपल्या आजूबाजूला असतो. तिच्या कौतुकाचे शब्द आपल्या कानाशी रेंगाळतात सतत. आपल्याला त्याचं मोल असेलच असं नाही. खरं तर मोल-अनमोल हे कळण्याचं ते वयच नसतं आपलं. आपल्याला केवळ हुंदडणं ठाऊक असतं. आपल्याला खेळ आणि भटकंती ठाऊक असते. आपल्याला वेग आणि उड्या माहीत असतात. आपल्या वेगाशी घरात फक्त एकीलाच जुळवून घेता येत नाही आणि ती असते आजी. इकडून तिकडून येऊन तिच्या पारंबीला झोका घेऊन पुन्हा पळून जाणं एवढंच आपल्याला जमत असतं त्या दिवसांत. कमरेला खोचलेल्या तिच्या प्राचीन चंचीची आपण आठवण काढतो एखादा फेरीवाला दिसताच. इतर वेळी आपण तिला गृहीत धरलेलं असतं आणि मग पुढं कधीतरी भालचंद्र नेमाडे यांची कविता भेटते :

आजी, तू मेलीस तेव्हा कोणी रडलं नाही
कोणाचा गळा भरून आला नाही
दिसली तुझी तुटकी खाट परकर चोळ्या जस्ताची ताटली
जिच्यातली पोळी मांजराची पिलं ओढून खायची बिनधास्त
आणि गोखल्यात अनेक वर्षांच्या वैधव्याला साजेशी दाततुटकी लाकडी फणी
जिच्यातले न निघणारे शुभ्र धवल केस माझ्या बोटांना घट्ट बिलगले

तोपर्यंत आपलीही आजी कापूर होऊन विरघळून गेलेली असते. नंतर खूप दिवसांनी आपण आई होतो, बाबा होतो तेव्हा आजी आठवते. ती आठवते, कारण आपण नव्यानं जगणं शिकू लागलेलो असतो आणि तेव्हा आपला हात धरून सावरणारं आजूबाजूला कुणीही नसतं. प्रत्येक छोटं मूल त्याच्या आई-बाबांचा गुरू असतं. ते शिकवतं जगाकडे नव्या नजरेनं बघायला. आजीची भेट तेच घालून देतं. आई-बाबा झाल्यानंतर आपल्याला आपली आजी आठवते, तिच्या सोबतच्या सगळ्या वेळा आठवतात. सकाळच्या उन्हात आजी केसांना तेलमालीश कशी करून देत असे...मुलीची लेक म्हणून आपल्याकडे कांकणभर जास्तीचं लक्ष कसं पुरवत असे...रणरणत्या उन्हाच्या दुपारी ओसरीवर कशा गोष्टी सांगत असे...रात्र कलताना धाब्याच्या छतावरून एकेका नक्षत्राला कसं बोलकं करत असे...

आजही वेल्हाण्याच्या वाटेवर किंवा सटाण्याच्या आकाशात निबिड रात्री मी बघते तेव्हा आजीनं सांगितलेल्या ताऱ्यांच्या लोककहाण्या आठवतात. पुढं शिक्षिका होण्यासाठी मी घर सोडलं आणि दूर किनवटच्या महाविद्यालयात प्रवेश घेतला तेव्हा तिनं आशीर्वाद बांधून पाठवलेली पत्रं आजही स्मरतात. आजी अशी माझ्याबरोबर चालत आलेली तिच्याही नकळत. आजी म्हणजे घरातलं दुसरं टोक...पैलतीराकडे पाहणारं आणि घरात रांगणाऱ्या, धावणाऱ्या, मोठं होत जाणाऱ्या नातवंडांच्या आनंदात स्वतःचं सुख शोधणारं. आजी असते घरात, त्यामुळे कितीतरी लहान-मोठ्या प्रसंगांत घर सावरलेलं असतं. परीक्षेच्या समयी तिचा शब्द प्रमाण असेलच असं नाही; पण तो आधार असतो हे खरं.

विख्यात कवयित्री शान्ता शेळके यांच्या कवितेत आजी भेटली. ती कविता अभ्यासाला होती शाळेत कुठल्या तरी वर्षी. बालकविता नव्हती; पण किशोरवयीन विद्यार्थ्यांना कळेल-समजेल अशी होती. शोधाशोध करताना फडताळात अगदी तळाशी असणाऱ्या गाठोड्यात नारळी पदराची, चौकडी, सुंदर रंगसंगती ल्यालेली पैठणी सापडते आणि कवयित्री त्यात रंग भरत जाते. आजी तिच्या लग्नात हीच पैठणी नेसली असेल...हिचा पदर हातात धरून वडीलधाऱ्यांच्या पाया पडली असेल...या पैठणीनं किती उत्सव पाहिले असतील...श्रावणातले सगळे सण, सगळ्या पूजा पैठणीनं जपल्या असतील...आयुष्य उलगडत राहिलं आणि पैठणीचं मऊपण या सर्वांचं साक्षीदार झालं...
शान्ता शेळके लिहितात :

कधीतरी ही पैठणी
मी धरते उरी कवटाळून
मऊ रेशमी स्पर्शामध्ये
आजी भेटते मला जवळून

मधली वर्षे गळून पडतात
कालपटाचा जुळतो धागा
पैठणीच्या चौकड्यांनो
आजीला माझे कुशल सांगा

ज्या पैठणीच्या पदराला कधीकाळी आजीनं आपलं मंगलक्षेम सांगितलं असेल त्याच्याशी कवयित्री अनेक वर्षं लोटल्यानंतर नातं जोडून घेते. पुन्हा पदराशी संवाद साधते. त्या पदराशी, जो आजीच्या व्यक्तिमत्त्वाचाच जणू भाग होता. मला आठवतं की शाळा संपायच्या अखेरच्या दिवशी आमची आजी साक्रीला पोहोचायची आणि मग दुसऱ्या दिवशी पहिल्या गाडीनं आम्हां बहिणींचं आजोळी सटाण्याला प्रयाण होई...! त्या रस्त्यावरून आजही जाताना आजीनं तिचा उबदार हात पाठीवर ठेवला आहे असं जाणवत राहतं.

सुधा मूर्ती यांना कोण ओळखत नाही? त्याही आता आजीच्या वयात पोचल्या आहेत. जशा माधुरीताई पुरंदरे बालगोपाळांच्या आजी झाल्या आहेत तशाच सुधाताई.
सुधाताईंच्या एका पुस्तकाचं नावच मुळी ‘आजीच्या पोतडीतल्या गोष्टी’ असं आहे. त्यांच्या आजीच्या पोतडीत राजाच्या आणि भामट्यांच्या, माकडांच्या आणि उंदरांच्या, अस्वलाच्या आणि देवाच्या अशा विपुल गोष्टी आहेत. आजीनं नातवंडांचं कहाण्यांतून केलेलं मनोरंजन आणि खूपच सहजपणे केलेले संस्कार, दिलेलं ज्ञान यांचा त्रिवेणीसंगम या पुस्तकात आहे.
त्यांच्या आजीला सगळे ‘कृष्णक्का’ म्हणून ओळखत असत.
सुधाताई लिहितात : ‘‘ती एकाच वेळी बुद्धिमान आणि प्रेमळ होती. तिला हजारो गोष्टी ठाऊक होत्या. ती आम्हाला ज्ञानाची बाळगुटी पाजत बसली नाही, तर तिनं गोष्टी सांगितल्या. शहाणपणाच्या गोष्टी. मूल्यांचं संगोपन करणाऱ्या गोष्टी. कितीतरी जीवनविषयक मूल्यं तिनं या गोष्टींतून आम्हा नातवंडांच्या मनात रुजवली.’’
उत्तर कर्नाटकातील एक छोटं गाव, शिग्गाव. या शांत खेड्यात सुधाताईंचं बालपण गेलं. तिथं आजी-आजोबा, आतेभावंडं, मामेभावंडं असं भरलं गोकुळ होतं. ‘‘बालपण ताणरहित, चिंताविरहित, स्वच्छंदी गेलं ते आजीमुळं,’’ असं त्या लिहितात. सुधाताईंचे हे अनुभव केवळ त्यांचे थोडेच आहेत? ते एका पिढीचं मनोगत आहे. एक अशी पिढी जी आता स्वतःच आजी-आजोबा झाली आहे. मात्र, आता आजी-आजोबा हे नातवंडांना एवढ्या सहजपणे उपलब्ध होत नाहीत. छोट्या छोट्या फ्लॅट्सनी आणि धावत्या जीवनशैलीनं आजीआजोबांशिवायच्या नातवंडांना जन्म दिला आहे! ही नातवंडं त्यांचं आयुष्य पाळणाघरात घालवतात किंवा घराच्या बंद गजांआड. असुरक्षितता इतकी वाढली आहे की कोवळ्या मुलांची आधाराशिवायची एकेकटी वाढ होत आहे. मला प्रश्न पडतो, या लेकरांना जर सांगितलंच की आजी-आजोबांचं चित्र काढा...तर ही पोरकी नातवंडं कशाचं चित्र काढतील? ज्या गजांच्या, बंद दाराच्या आड अवघं बालपण जात आहे त्या गजांचं? की बंद दारांचं?

आणि अशातच धारा भांड मालूंजकर यांचं ‘आजी आठवताना...’ हे आत्मकथन हाती आलं. नातीनं आजीची सांगितलेली गोष्ट या पुस्तकात आहे. ही १९९० च्या दशकातली ‘घरघर की कहानी’ आहे. आजीचं निधन होतं आणि नात तिच्या आठवणींच्या निमित्तानं स्वतःचा सगळा प्रवास उलगडत राहते. एक मुलगी एका शहरात आजीच्या आधारानं कशी उमलून आली हे फार ओघवत्या पद्धतीनं ‘आजी आठवताना...’मध्ये आलं आहे. ही आजी गोदावरीकाठच्या वडजी नावाच्या खेड्यातली. तिचा पेहराव, तिची बोली, मुलावर असलेला तिचा विश्वास आणि नातवंडांना पदराखाली घेण्याचा स्वभाव, हे सारं वाचताना वाचकाला स्वतःचीही आजी आठवत राहील...

‘मातीशी नातं असलं पाहिजे तई...’, ‘तई, या अशा दिसांचं गणितच लई वंगाळ असतंया बघ, सुखाचा यळ थांबत नई आन् दुखाचा यळ संपता संपत नई.’ बोलता बोलता सहजपणे जगण्याचं तत्त्वज्ञान पेरत जाणारी आजी आणि ‘आजी, परत पुढच्या जन्मात भेटा, मला नेहमीच तुमची नात व्हायला आवडेल!’ असं लिहून ठेवणारी नात दोघीही कायमच्या लक्षात राहून जातात. आजच्या नातवंडांचे
आजी-आजोबा कुठं गेले आहेत? शाळेतल्या एका दिवसापुरतीच का त्यांची आठवण? स्वतःला हे असं वजा करून घेणं अपरिहार्य आहे की जाणीवपूर्वक? प्रश्नांची गरगरती वावटळ फेर धरते.

कुटुंब ही बालकाच्या आयुष्यातली अत्यंत महत्त्वाची जागा आहे. त्याची पहिली घडण तर तिथंच होते. माणसांवर प्रेम करायला, जीव- माया लावायला व्यक्ती कुटुंबातच शिकते. कुटुंब जसं आकुंचन पावत जातं तसतशा या संकल्पनाही, ही मूल्यंही आकुंचन पावत राहतात. नंतर केवळ ‘मी’ उरतो. मीपणाचा अवतार जन्म घेतो. ही पडझड पुढं थांबवता नाही येत. पत्त्यांचे बंगले कोसळावेत तशी उद्ध्वस्त होत जाणारी ही व्यवस्था छोट्या छोट्या मुलांसाठी तर नक्कीच हितावह नाही.
मी माझ्या आजीबद्दल सांगत होते, तिच्या हाताला सुरकुत्या पडल्या होत्या...तिची त्वचा सैल झाली होती...पण ती जेव्हा गालांवरून हात फिरवी तेव्हा लोण्याचा गोळा गालांवरून ओघळतोय असं वाटत राही. तो स्पर्श खास तिचाच होता. ती ऊब पुन्हा कुठंही कधीच लाभली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com