पाड्यावरच्या मुलांशी संवादानंतर... (विद्या सुर्वे-बोरसे)

vidya surve borse
vidya surve borse

पाठ्यपुस्तकांमध्ये सकारात्मक बदलांची आज सगळ्याच पातळ्यांवर गरज आहे. गावाकडच्या मुलांना, स्वातंत्र्याचं स्वप्न पाहणाऱ्या मुलींना आपलेसे वाटतील, त्यांना नवं क्षितिज कवेत घेण्याची संधी देतील असे बदल अपेक्षित आहेत. मुलांना दृष्टिकोन देणं, त्यांची समज घडवणं, त्यांना शहाणंसुरतं करणं हे पाठ्यपुस्तकांनी केलं पाहिजे.
गाव-शहरातल्या ज्या उमलत्या कळ्यांना स्वातंत्र्य हवं, त्यांना त्यांच्या जीवनजाणिवांचे धडे अभ्यासक्रमात हवे आहेत.

जयंतीच्या मिरवणुकीत सहभागी झाले की सगळं गाव फिरून होतं. गावाच्या काही भागांत मी महिनोन्‌महिने गेलेली नसते, त्यामुळे अशा गल्ल्यांशी यानिमित्तानं संवाद होतो. गावातले नवे प्रश्न कळतात, ज्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले होते त्या सुटल्यात की नाहीत हेही लक्षात येतं. गावातल्या स्त्रिया अभावानंच गावातल्या सार्वजनिक कार्यक्रमांत अथवा जाहीर सभेत सहभागी होत असतात. त्यांच्या गल्लीत-घरात पोचल्यावर मात्र त्या तोंडावर पदर धरून सगळी
सुख-दुःखं सांगत राहतात. शाळेत जाणारी छोटी-मोठी मुलं-मुली गोळा होतात. त्यातली एखादी चिमुरडी आपले कपडे नीटनेटके करत प्रश्न विचारते : ‘‘आमच्या शाळेत झेंडावंदनला आला होता नं तुम्ही?’’
तिच्या प्रश्नाचं उत्तर देताना मग जमलेल्या चिमुकल्यांशी मैत्री होऊन जाते. ते पुष्कळच प्रश्न विचारतात. त्यांच्या डोळ्यांत अपार कुतूहल आणि कौतुक असतं. आपणही ‘मोठ्ठं’ व्हायचं असा विश्वास त्यांच्या शब्दांतून झळकू लागतो.
गावाची सरपंच असल्याचा एक लाभ असा होतो की प्रत्येक स्वातंत्र्यदिनी, प्रजासत्ताकदिनी आणि महाराष्ट्रदिनी शाळेत जाणं होतंच. ध्वजारोहणाच्या निमित्तानं गावातल्या गुणवंत-कलावंत-प्रज्ञावंत विद्यार्थ्यांशी हितगुज करता येतं. त्यांची पाठ थोपटता येते.

एकदा वेळ काढून पाड्यावरच्या मुलांशी बोलत होते. त्यांना कविता म्हणून दाखवाव्यात, गोष्ट सांगावी आणि झालंच तर त्यांच्याकडून त्यांच्या शालेय पाठ्यपुस्तकांतल्या कथा-कविता ऐकाव्यात असा विचार मनात होता. त्यांना थोरा-मोठ्यांच्या कविता ऐकवल्या. महानगरातल्या, शहरातल्या गोष्टी सांगितल्या. मुलं प्रतिसाद देत होती; पण त्यात सहजता नव्हती. कुठं तरी गतिरोध असल्यासारखं जाणवत राहिलं. त्यांच्या मनातला संकोच घालवण्यासाठी मी त्यांच्याशी अहिराणीतून बोलू लागले आणि जवळ उभी असलेली सगळी मुलं
पाहता पाहता फुलासारखी उमलून आली. एकदम टवटवीत दिसू लागली. ही जादू कशी काय झाली? ही जादू होती बोलीतल्या संवादाची!
मुलांना मी म्हणाले : ‘‘आते तुमी कविता मनी दखाडा’’
मुलांना कंठ फुटला आणि त्यांनी कुठल्याशा इयत्तेत अभ्यासाला असलेली बहिणाबाई चौधरी यांची कविता ताला-सुरात म्हणायला सुरुवात केली. मुलं वेगवेगळ्या वर्गातली होती, निरनिराळ्या वयाची होती; पण जवळजवळ प्रत्येकालाच बहिणाबाईंची कविता तोंडपाठ होती. नंतर तर मुलांमध्ये जणू स्पर्धाच लागली, ‘मी’ ‘मी’ करत प्रत्येकजण कविता म्हणण्याचा उत्साह दाखवू लागला. बहुतेकांजवळ मला ऐकवण्यासाठी पुष्कळ काही होतं. आपलं म्हणणं ऐकवलंच पाहिजे ही अधीरताही होती.पाड्यावरच्या मुलांशी आणि पुढच्या काळात गावातल्या शालेय विद्यार्थ्यांशी चर्चा करताना एक गोष्ट प्रकर्षानं मला जाणवत राहिली व ती म्हणजे, बोलीभाषेशी असणारी त्यांची जवळीक, बोलीविषयी असणारं त्यांचं प्रेम आणि परिसराविषयीची व आई-वडिलांच्या जगण्याशी साधर्म्य सांगणाऱ्या विषयांबद्दलची शालेय विद्यार्थ्यांची उपजत आस्था.
गावाकडच्या मुलांना काय आवडतं? गावाकडच्या मुलांना गाव आवडतं. गावाच्या जैविक पर्यावरणात जे जे म्हणून काही आहे त्या सगळ्याशी त्यांचं जिव्हाळ्याचं नातं आहे. नदी, झाडी, डोंगर, शेती, प्राणी, पक्षी या सगळ्यांनी त्यांचा भोवताल समृद्ध आहे, त्यामुळे या भोवतालाविषयीचा कोणताही शब्द त्यांना आपला वाटतो.

माझी एक गाय होती, तिला होते वासरू
तोच माझा दोस्त होता, त्याला कसे विसरू!
मीही व्हायचो गुबगुबीत दूध पिऊ पिऊ
दोघांसाठी एक पान्हा, आम्ही भाऊ भाऊ

ही इंद्रजित भालेराव यांची कविता तिसरी-चौथीचे विद्यार्थी अगदी समरसून म्हणत असताना मी ऐकलं आहे. गोठ्यातल्या गाई-वासरांशी त्यांचं आई-भावाचं नातं असतं हे वेगळं सांगायची गरज नाही. इतके ते एकमेकांशी एकरूप झालेले असतात. घरात काही अघटित घडलं की ‘फक्त त्या दिवशी, गोठ्यातील चंद्री गाय, चाऱ्याला तोंड लावत नाही’ ही दासू वैद्य यांनी कवितेत मांडलेली भावना साक्षात उतरलेली असते. केविलवाणेपणानं रडणारं इमानी कुत्रं कुठल्याही गावातल्या अंगणात दिसेल. असे सगळे पशू-पक्षी गावमाणसांच्या आयुष्याचा अतूट भाग असतात. केवळ इंद्रजित भालेराव यांच्याच नव्हे, तर विठ्ठल वाघ, उत्तम कोळगावकर, विलास सिंदगीकर, अशोक कोळी, तुकाराम धांडे आदींच्या कविता शाळेतले विद्यार्थी समरसून गात असतात. अण्णा भाऊ साठे यांची ‘स्मशानातील सोनं’ ही कथा, आनंद यादव यांची ‘पाटी आणि पोळी’ ही हकीकत, लक्ष्मण माने यांचा ‘शाळंत जायचं’ हा पाठ किंवा प्रेमानंद गज्वी यांचा ‘म्या साळा सिकनार’ हा उतारा यांबद्दल शाळेतून बाहेर पडलेले विद्यार्थी अजूनही बोलत असतात. शाळेच्या अभ्यासक्रमात असणारे ठराविक पाठ गावाकडच्या मुलांना का आठवतात? या पाठात त्यांना त्यांचंच प्रतिबिंब उमटलेलं दिसतं. हे पाठ ते वाचतात तेव्हा हे विद्यार्थी स्वतःलाच नव्यानं वाचत जातात. गावाच्या निसर्गाचं वर्णन करणाऱ्या, गाव किती सुंदर असतं असं सांगणाऱ्या कितीतरी कविता अभ्यासात होत्या, असतात; पण अभ्यासात नसली तरी भालेराव यांची ‘काट्याकुट्याचा तुडवित रस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता’ ही कविता गावांतल्या अनेकांना तोंडपाठ असते. गावाचं वर्तमान हे सुंदर नाही, ते उन्हात तळलेल्या आणि मातीत मळलेल्या माणसांचं वर्तमान आहे याचं भान या कवितेतून मांडलं गेलं आहे, ते मुलांना एकदम खरंखुरं वाटतं. ‘शेतामधी माझी खोप, तिला बोराटीची झाप, तिथं राबतो-कष्टतो, माझा शेतकरी बाप’ हे भालेराव यांनी वर्णन केलेलं शब्दचित्र हे गावाकडच्या अर्ध्या-अधिक मुलांचं आत्मकथन असतं.

शालेय पाठ्यपुस्तकं जेव्हा जीवनाशी संवादी असतात तेव्हा मुलांना ती मुद्दाम शिकवावी लागत नाहीत. शालेय पाठ्यपुस्तकांची भाषा जर मुलांची भाषा असेल तर ‘दप्तरातून पुस्तक काढ’ असं त्यांना सांगावं लागत नाही; पण मुलांना त्यांचं वाटणारं लेखन अभ्यासक्रमात आहे, असं खूप कमी वेळा घडतं.
मुलांना दृष्टिकोन देणं, त्यांची समज घडवणं, त्यांना शहाणंसुरतं करणं हे पाठ्यपुस्तकांनी केलं पाहिजे. गाव-शहरातल्या ज्या उमलत्या कळ्यांना स्वातंत्र्य हवं, त्यांना त्यांच्या जीवनजाणिवांचे धडे अभ्यासक्रमात हवे आहेत. दुर्दैवानं सगळे शिक्षणक्रम मात्र परीक्षा आणि गुणदान यांत अडकले आहेत.
अच्युत गोडबोले यांचं ‘किमयागार’ हे पुस्तक अफलातून आहे. हे पुस्तक आठव्या-नवव्या इयत्तेत असणाऱ्या प्रत्येक मुलाला वाचायला द्यायला हवं. विज्ञानाकडे पाहण्याची विद्यार्थ्याची दृष्टी समूळ बदलून टाकणारं हे पुस्तक आहे. विज्ञान म्हणजे सिद्धान्त, आकडेमोड, प्रयोग आणि रुक्ष भाषा असा जो विद्यार्थ्यांचा समज होत असतो तो दूर करून विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञानाविषयी प्रेमभावना निर्माण करण्याची ‘किमयागार’मध्ये किमया आहे.

विद्यार्थ्यांना ते त्यांच्या ध्येयनिश्चितीसाठी उपकारक ठरू शकतं.
ज्येष्ठ कवी वसंत आबाजी डहाके हे काही वर्षांपूर्वी ‘मराठी अभ्यास मंडळ समिती’चे निमंत्रक होते. त्या वेळी त्यांनी नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांना किमान मराठीपुरते नवे पाठ, नव्या कविता देण्याचा प्रयत्न केला होता. महेश केळुस्कर, वर्जेश सोलंकी, भुजंग मेश्राम, राम दुतोंडे, आनंद गायकवाड यांच्या बोलीभाषेचं वैभव असणाऱ्या कविता त्यानिमित्तानं अभ्यासक्रमात आल्या होत्या. वैदर्भी, अहिराणी, मराठवाडी, मालवणी, कुडाळी, गोंडी, गोरमाटी, पारोसी, दखनी अशा असंख्य बोली हे महाराष्ट्राचं वैभव आहे. या बोलींमधून दैनंदिन व्यवहार करणारे अगणित लोक इथं आहेत. त्यांच्या घरांत याच बोली बोलल्या जातात, तेव्हा या बोलींमधला थोडा थोडा मजकूर पाठ्यपुस्तकांत आला तर या सगळ्या समूहांच्या मुला-मुलींना पाठ्यपुस्तकं आपलीशी वाटतील. बोली प्रतिष्ठित होतील हा दुसरा लाभही यामुळे आपोआपच होईल.

पाठ्यपुस्तकं निर्माण करणाऱ्यांनी ‘लिंगभाव’ नीट समजून घेऊन, स्त्रीला दुय्यमत्व देणाऱ्या बाबी कटाक्षानं टाळल्या पाहिजेत. ‘मुलगा अभ्यास करत आहे आणि मुलगी झाडून काढत आहे... बाबा पेपर वाचत आहेत आणि आई स्वयंपाक करत आहे’, अशी चित्रंही जाणीवपूर्वक टाळली पाहिजेत. पाठ्यपुस्तकं संस्कार करत असतात हे विसरता कामा नये. डॉ. सुनीता बोर्डे यांनी आपल्या एका निबंधात ‘पाठ्यपुस्तकातील स्त्रीचे दुय्यमत्व’ फार टोकदारपणे मांडलं आहे. मुलांसाठी असणाऱ्या लेखनातल्या गंभीर चुका यानिमित्तानं त्यांनी निदर्शनास आणल्या आहेत.
‘मुलीने सांगितलेली नवीन गोष्ट’ या मीनाक्षी पाटील यांच्या
कवितेचीही आठवण पुष्कळदा होते. आई आणि लेक यांच्यातला संवाद या कवितेत आहे. या कवितेत छोटी मुलगी आईला जे सांगते ते सगळ्यांनीच आचरणात आणण्यासारखं आहे :

वैतागून एक दिवस म्हणाली मला
ममा, सांग नवी गोष्ट
एक होती राणी, तिला होते दोन राजे
एक होता आवडता
एक होता नावडता
किंवा एक होती राणी, तिला नव्हता राजा
किंवा एक होता राजा, त्याला नव्हती राणी
नाहीतर एक कर ना...
बदलूनच टाक सगळ्या गोष्टी
सुरुवातीपासून शेवटपर्यंत!

या अशा बदलांची, सकारात्मक बदलांची आज सगळ्याच पातळ्यांवर गरज आहे. गावाकडच्या मुलांना, स्वातंत्र्याचं स्वप्न पाहणाऱ्या मुलींना आपलेसे वाटतील, त्यांना नवं क्षितिज कवेत घेण्याची संधी देतील असे बदल आपल्याला अपेक्षित आहेत.
गावाकडच्या पाड्यावरील शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधू लागले की विचारांचे असे धागे वस्त्र विणत जातात...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com