नेसी लेमाक, खफसा (विष्णू मनोहर)

vishnu manohar
vishnu manohar

मलेशियाई जेवणात  मुख्यतः तांदळापासून तयार केलेले प्रकार आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशा तिन्ही वेळच्या जेवणात आपल्याला तांदळाचे पदार्थ नक्कीच दिसतील. मलेशियात भाज्यांमध्ये मसाल्यांचा आणि जडी-बुटींचा अधिक प्रमाणात वापर केला जातो. मलेशियात मांसाहारी जेवणात ‘सी-फूड’चा अधिक प्रमाणात वापर केला जातो.

मलेशिया हा आग्नेय आशियात वसलेला एक उष्णकटिबंधीय देश आहे. हा देश दक्षिण चिनी सागरमुळे दोन भागांत विभाजित झालेला आहे. इथल्या पश्‍चिम तटावर मलक्का जलडमरू आणि पूर्व भागात दक्षिण चीन सागर आहे. या भागाला पूर्व मलेशिया म्हणूनसुद्धा ओळखलं जातं. क्वालालंपूर ही या देशाची राजधानी आहे; पण प्रशासनाच्या दृष्टीनं सोयीस्कर म्हणून नवीन तयार करण्यात आलेल्या पुत्रजया या शहरात ही राजधानी स्थानांतरीत करण्यात आलेली आहे.

सन १९६३ मध्ये मलाया, सिंगापूर आणि बोर्नियो या भागांना एकत्रित करून त्याला मलेशिया हे नाव देण्यात आलं. त्यानंतर मात्र सन १९६५ मध्ये सिंगापूर यापासून वेगळा होऊन स्वतंत्र देश म्हणून ओळखला जाऊ लागला. मलेशिया हा देश १३ राज्यं आणि ३ संघीय प्रदेश मिळून बनलेला आहे. मलेशियातला प्रमुख यांग डी-पेर्तुआन अगांग या नावानं ओळखला जातो- ज्याला मलेशियाचा राजा असे म्हणतात. मलेशियात चिनी, मलय आणि भारतीय यांसारखे विभन्न जातीचे लोक राहतात. इथं मुख्यतः मलय भाषा बोलली जाते; पण शिक्षण आणि आर्थिक क्षेत्रात मात्र इंग्लिश भाषेचा जास्त वापर केला जातो. या देशातलं एक वैशिष्ट्य म्हणजे इथं १३० पेक्षा जास्त प्रकारच्या बोलीभाषा ऐकायला मिळतात. मलेशियात विविध जातींचे, संस्कृतीचे आणि विविध भाषा बोलणारे लोक राहतात. या देशातला अधिकांश मलय समुदाय मुस्लिम आहे- कारण इथला प्रशासकीय कायद्यानुसार मलय होण्यासाठी मुस्लिम धर्म स्वीकारणं आवश्‍यक आहे.

मलेशियात क्वालांलपूर, पुत्रजया, लंकावी इत्यादी शहरं पर्यटनसाठी फार प्रसिद्ध आहेत. क्वालांलपूरमधलं ‘इस्ताना निगारा’ हे मलेशियन राजाचं निवासस्थान प्रमुख आकर्षणाचं केद्र आहे. याशिवाय इथला पेट्रोनास ट्विन टॉवर हा ४५१ मीटर उंच टॉवर हा पर्यटकांना आपल्याकडं आकर्षित करतो. या टॉवरमध्ये एकूण ८६ मजले आहेत; पण इथं पर्यटकांना ४१ मजलीवर असलेल्या पुलापर्यंत जाण्याची परवानगी दिली जाते. हा टॉवर क्वालांलपूर शहरात कुठंही थोड्या उंच भागावरून पाहिल्याससुद्धा नजरेसमोर दिसतो. इथलं अजून एक आकर्षण म्हणजे ‘बरजाया टाईम स्केअर मॉल’ ३४,५०,००० चौरस फुटांपेक्षाही जास्त क्षेत्रफळ असलेला हा मलेशियातला सर्वांत मोठा मॉल आहे. मलेशियात इतरही अनेक मोठमोठे मॉल पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. याव्यतिरिक्त पुत्रजया इथलं पंतप्रधान कार्यालय व ‘लंकावी आर्यलॅंड’ पर्यटकांना आपल्याकडं आकर्षित करून घेतात.

मलेशियाई जेवणात मुख्यतः तांदळापासून तयार केलेले प्रकार आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशा तिन्ही वेळच्या जेवणात आपल्याला तांदळाचे पदार्थ नक्कीच दिसतील. मलेशियात भाज्यांमध्ये मसाल्यांचा आणि जडी-बुटींचा अधिक प्रमाणात वापर केला जातो. मलेशियात मांसाहारी जेवणात ‘सी-फूड’चा अधिक प्रमाणात वापर केला जातो. इथल्या रेस्टॉरंटमध्ये लोकल फूडव्यतिरिक्त थाई, चिनी, भारतीय पदार्थसुद्धा आपल्याला चाखायला मिळतात. मलेशियात रेस्टॉरंटमधलं जेवण फारच स्वस्त आहे. त्यामुळं तिथल्या लोकांना बाहेर जाऊन जेवणं करणं फारच आवडतं. इथले काही प्रसिद्ध प्रकार म्हणजे नेसी लेमाक, रेन्डांग, रोटी कॅनाई, खफसा इत्यादी आहेत.

नेसी लेमाक
साहित्य : तांदूळ १ वाटी, नारळाचं दूध १ वाटी, पाणी एक १ वाटी, मीठ चवीनुसार, बारीक चिरलेलं आलं १ इंच.
कृती : सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ करून घ्या. नंतर कुकर गॅसवर ठेवून त्यात तांदूळ, पाणी, नारळाचं दूध, बारीक चिरलेलं आलं आणि मीठ घालून छान एकत्र करून घ्या. नंतर कुकर बंद करून साधारण दोन ते तीन शिट्टया होईपर्यंत शिजवून घ्या. नंतर कुकर थंड करून त्यात शिजलेला भात बाहेर काढून व्हेजिटेबल करीबरोबर सर्व्ह करा.

स्टीम मशरूम
साहित्य : वाळलेले मशरुम २५० ग्रॅम, बारीक चिरलेली हिरवी मिरची २-३ चमचे, सोया सॉस २ चमचे, शिमला मिरची, गाजर, चायनीज कॅबेज १ वाटी, कोथिंबिर २ चमचे, बारीक चिरलेले कांदा १ नग, लेटयूसची पानं ८-१०, मीठ चवीनुसार, काळी मिरी १ छोटा चमचा, तेल (तिळाचे) ३-४ चमचे.
कृती : एका भांड्यात मशरूम घेऊन त्याला सोया सॉस, मीठ आणि काळी मिरी लावून १० मिनिटं ठेवून स्टीम करून घ्या. एका पॅनमध्ये तेल घेऊन गरम झाल्यावर त्यात सर्व भाज्या घालून हायफ्लेममध्ये परतून घ्या. एका प्लेटमध्ये वाफवलेले मशरूम आणि तळलेली मासोळी ठेवून त्यावर या भाज्या घालाव्यात. लॅट्यूसच्या पानांनी गार्निश करून सर्व्ह करा.

खफसा
हा एक कत्री भाताचा प्रकार आहे.
साहित्य : चिकन स्टॉक १ लिटर, तांदूळ २ वाट्या, स्टारफूल ४-५, दगड फूल (इशना) ४-५, तेल ४ चमचे, चिली फ्लेक्‍स ४ चमचे, लिंबू, मीठ, साखर, व्हिनेगर १ चमचा
कृती : चिकन स्टॉक तयार करताना त्यातल्या चिकनचा तुकडा काढून त्याला मीठ, लिंबू लावून बाजूला ठेवा. एका पातेल्यात साखरेचं कॅरामल तयार करून त्यामध्ये स्टारफूल, दगड फूल चिली फ्लेक्‍स, मीठ, थोडं व्हिनेगर, चिकन स्टॉक घाला आणि तेल घाला. मिश्रण उकळल्यावर यामध्ये तांदूळ शिजवून घ्या. सर्व्ह करतेवेळी यावर एक भाजलेला चिकनचा तुकडा ठेवून सर्व्ह करा.

चिकन जॅकेट पोटॅटो
साहित्य : चिकन २५० ग्रॅम, आलं, लसूण पेस्ट ४ चमचे, कांदा १ नग, मीठ, साखर चवीनुसार, आमचूर पावडर १ चमचा, बटर २ चमचे, बटाटे २ नग.
कृती : सर्वप्रथम चिकन बोनलेस करून आलं, लसूण आणि कांदा परतून त्यामध्ये चिकनसुद्धा परतून घ्या. चवीनुसार मीठ, आमचूर पावडर मिसळून थोडी कोथिंबिर घाला. मिश्रण बाजूला ठेवा. बटाट्याचे २ मोठे पीस न सोलता घ्या. त्याचे मधून दोन भाग करा. मधला भाग काढून थोडा परतून चिकनमध्ये मिसळा. बटाट्याला बटर आणि मीठ लावा. त्यामध्ये हा मसाला भरून असा तयार बटाटा फेटलेल्या अंड्यात बुडवून प्रीहीट ओव्हनवर १८० डीग्रीवर १०-१२ मिनिटं बेक करा.

फिश विथ गार्लिक सॉस
साहित्य : पापलेट १, कॉर्नस्टार्च २ चमचे, मैदा २ चमचे, १०-१५ लसूण पाकळ्या, लिंबाचा रस १ चमचा, मीठ चवीनुसार, कांदा अर्धी वाटी, कोथिंबिर ४ चमचे,
कृती : कुठलाही आवडीचा मासा घेऊन त्याला मीठ चोळून ठेवा. नंतर २ चमचे कॉर्नस्टार्च, २ चमचे मैद्यामध्ये माशाचे तुकडे घोळवून मंद आचेवर कुरकुरीत तळून घ्या. १० ते १५ लसूण पाकळ्या ठेचून तेलात परतून घ्या, नंतर यात अर्धी वाटी पाणी, लिंबाचा रस, मीठ, लांब चिरलेला कांदा, कोथिंबिर घालून उकळवा. सर्वांत शेवटी कॉर्नस्टार्चच्या पाण्यानं घट्ट सर्व्ह करतेवेळी कुरकुरीत फिशचे तुकडे एकावर एक ठेवून त्यावर हे तयार घट्ट सॉस घाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com