स्वागत नव्या पुस्तकांचं

book review
book review

दडलेला इतिहास
‘हिडन हिस्ट्री’ या मूळ इंग्लिशमधील पुस्तकाचा स्नेहलता जोशी यांनी केलेला हा अनुवाद. जेरी डॉशेर्टी आणि जिम मॅकग्रेगर या दोन लेखकांनी एकत्र येऊन हे संशोधनात्मक पुस्तक लिहिलं आहे. पहिल्या महायुद्धाकडं वेगळ्या नजरेनं पाहणाऱ्या या पुस्तकात या युद्धामागची वेगळी कारणं देण्यात आली असून, लेखकांनी आपल्या मुद्द्यांच्या समर्थनार्थ अनेक पुरावे सादर केले आहेत. या लेखकद्वयीनं असा दावा केलाय, की या युद्धाला जर्मनी नाही, तर ब्रिटनच जबाबदार होता. मात्र, जेत्यांनी खऱ्या बाबी दडवल्या. या युद्धासंदर्भातले कागद आजही सहजासहजी मिळू दिले जात नाहीत, असा दावाही त्यांनी केला. प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे (०२०- २४४७६९२४, २४४६०३१३) पृष्ठं : ५५६, मूल्य : ६५० रुपये

दिल दौलत दुनिया
कोकणातल्या एका जमीनदार घराण्याची वाटचाल म्हणजे ही कादंबरी. दाजी, माई ही पहिली पिढी; तर रंगनाथ, राजाराम, काशी, शकू आणि दुर्गा ही दुसरी आणि हर्षा आणि सदाशिव ही तिसरी पिढी. या तीन पिढ्यांमध्ये घडणाऱ्या घडामोडी यातून कादंबरी पुढं सरकत जाते. रंगनाथ हा बेफिकीर आणि दांडगाईनं वागणारा; पण घर एकसंध ठेवणारा. राजाराम वैद्य. मनुष्यस्वभावाचं दर्शन घडवत लेखक सदानंद गोखले यांनी कुणालाही खलनायक न करता यातला संघर्ष रंगवलाय. पैसा, सौंदर्य यांचा आग्रह धरताना माणसं नीती, विवेक कसा बाजूला ठेवतात, ते यातल्या काही पात्रांच्या वागणुकीतून दिसतं. प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन, पुणे (०२०- २४४९५३१४, २४४८३९९५) पृष्ठं : २५२, मूल्य : ३५० रुपये

दौलतबंकी आणि त्याचा खजिना
छत्रपती शिवाजी महाराज यांचं आयुष्य सगळ्यांनाच प्रेरणादायी. बबन मिंडे यांनी याच गोष्टीचा उपयोग करून खास लहान मुलांसाठी ही साहस कादंबरी लिहिली आहे. यात एका छोट्या गावातल्या मुलांनी शिवजयंती साजरी करताना पाळलेली पथ्यं, तसंच त्यांची दौलतबंकी या अवलियाशी झालेली भेट आणि त्यांच्यात झालेली दोस्ती, यातून ही कादंबरी पुढं सरकते. दौलतबंकीचा खजिना, समाजातल्या वाईट गोष्टी या सगळ्यांचा मेळ घालत एक वेगळंच जग बालवाचकांसमोर उभं राहतं. शिवरायांचा वारसा कसा जपायचा, याबद्दलचं मार्गदर्शनही दौलतबंकीच्या रूपानं इथं लेखकानं केलंय. प्रकाशन : राजहंस प्रकाशन, पुणे (०२०- २४४७३४५९) पृष्ठं : १५६, मूल्य : २०० रुपये

श्री क्षेत्र गिरनार
गुजरात राज्यातल्या जुनागढ पर्वतावर गुरू दत्तात्रेयांच्या पादुका आहेत. दत्तभक्तीसाठी साडेआठ हजार पायऱ्या चढून या पादुकांचं दर्शन घेणं खूप महत्त्वाचं असतं. देश-विदेशांतून या यात्रेसाठी भाविक येत असतात. उदय नागनाथ यांनी या क्षेत्राची यात्रा करून याबद्दलची माहिती या पुस्तकात लिहिली आहे. गिरनारला कसं जायचं, कुठल्या कालावधीत जायचं, त्यासाठी काय तयारी करायची... याबद्दल त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केलंय. तीन डोंगरांच्या पायऱ्या पार केल्यावर दत्तात्रेयांच्या पादुकांचं दर्शन होतं. ही यात्रा करताना काय पथ्यं पाळावीत, याबद्दलही नागनाथ यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत. प्रकाशक : मायमिरर पब्लिशिंग हाउस, पुणे (०२०- २४२२६४३२, ९४२२३१६६८९)
पृष्ठं : ८०, मूल्य : १०० रुपये

चीन आणि भारत : इतिहास, संस्कृती, सहकार्य आणि चढाओढ
‘चायना अँड इंडिया : हिस्ट्री, कल्चर, कोऑपरेशन अँड कॉम्पिटिशन’ या मूळ इंग्लिशमधल्या पुस्तकाचा अनुवाद देवयानी देशपांडे यांनी केलाय. पारमिता मुखर्जी, अर्णव देब आणि मिआओ पांग या तिघांनी या पुस्तकाचं संपादन केलं आहे. भारत आणि चीनमधल्या वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या लेखकांनी यात लेखन केलंय. भारत आणि चीन यांच्यातल्या संबंधांचा, तसंच या दोन देशांमध्ये साहचर्य कसं होऊ शकतं याचा ऊहापोह आणि प्राचीन संबंधांचा वेध यातील विवध लेखांमध्ये घेतला गेलाय. या दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांची समीक्षाही या पुस्तकात केली आहे. प्रकाशक : सेज पब्लिकेशन, इंडिया, नवी दिल्ली
पृष्ठं : २४४, मूल्य ४९५ रुपये

चीन वेगळ्या झरोक्यातून
डॉ. अंजली सोमण यांनी या पुस्तकात चीनची दुसरी बाजू दाखवली आहे. पर्यटकांना दिसणारा चीन वेगळा असून, चीनसमोरही खूप समस्या असल्याची माहिती सोमण इथं देतात. एकच मूल हवं, या कायद्यामुळं चीनमध्येदेखील आता बऱ्याच समस्या निर्माण झाल्या आहेत. चीनमध्ये सरकार राबवत असलेली कामाची कठोर पद्धत कशी आहे, त्याची कल्पना या पुस्तकातून येते. चीनबद्दलच्या अनेक भ्रामक समजुती या पुस्तकातल्या माहितीनं दूर होतील. माओ त्से तुंग यांच्या काळातला चीन आणि शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखालचा आजचा चीन, यामध्ये बराच फरक आहे, तोच फरक सोमण यांनी टिपलाय.
प्रकाशक : प्रफुल्लता प्रकाशन, पुणे (०२०- २४४३००५२, ९४२२५०४०३०)
पृष्ठं : १५२, मूल्य : १६० रुपये

मऱ्हाठी माती
विजय देशमुख यांच्या या कथासंग्रहात ऐतिहासिक काळातल्या ९ कथा आहेत. यातल्या कथांचा काळ वेगवेगळा असून, त्यांतून शहाजी राजे, छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजीराजे यांची वेगळी ओळख तर होतेच; पण या कथांमधून त्यावेळच्या लोकांमध्ये स्वराज्यभक्तीची आणि निष्ठेची बीजं कशी रुजली ते लक्षात येतं. ‘आमचे अगत्य असो द्यावे’ या कथेतून पेशव्यांच्या सरदारांचा पराक्रम कळतो, तर ‘जीवित तृणवत मानावे’ या कथेतून एक नऊ वर्षांचा मुलगा जरपटक्यासाठी आपलं बलिदान कसं देतो ते कळतं. भारदस्त भाषा आणि ओघवती लेखनशैली यामुळं कथा वाचताना वाचक त्या काळात सहजपणे जातो. सातारा इथल्या अजिंक्यतारा किल्ल्याचा रोचक इतिहास समोर येतो.
पृष्ठं : ९२, मूल्य : १४० रुपये

कथांगण
शिवचरित्रकार विजय देशमुख यांचाच हा कथासंग्रह. मात्र, यातल्या काही कथा सामाजिक, तर काही विनोदी आहेत. ‘आमचे इतिहास संशोधन’ आणि ‘कथा बँक राष्ट्रीयीकरणाची’ या दोन कथा विनोदी असल्या तरी त्यातली बँकेबाबतची कथा वेगळ्याच शैलीत असून, राजकारणाची खिल्ली उडवत मार्मिक भाष्य करते. दुसऱ्या कथेत अतिशयोक्तीचा वापर करून हास्य निर्माण करणारे प्रसंग चांगले फुलवले आहेत. ‘झुंज’ या कथेत एक पैलवान आणि त्याच्यावर प्रेम करणारी तरुणी; पण गैरसमजानं दोघांचंही कसं नुकसान होतं, ते या कथेत मांडलयं. दोघांच्या शोकांतिकेमुळं वाचकांना ही कथा चटका लावते. 'बापू' ही कथा भाबड्या पण स्वप्नाळू माणसाची दशा सांगते, तर 'सेक्रेटरी' या कथेतून कार्यकर्त्या माणसाचे हाल व दुःख कळतं. या कथासंग्रहातल्या बऱ्याच कथांमध्ये वऱ्हाडी बोलीचा वापर केलाय.
पृष्ठं : ७६, मूल्य : १२० रुपये
दोन्ही पुस्तकांचे प्रकाशक : पत्रभेट प्रकाशन, बंगलोर, कर्नाटक
पुणे संपर्क (०२०-२४४४३४४४, ९९२१२३७९९९)

चल रे भोपळ्या
बा. ग. केसकर यांच्या या संग्रहात ११ विनोदी कथा असून, सर्व कथा ग्रामीण भागात घडतात. ‘कोठा’ या कथेत ऊसतोडणीची पद्धत व त्यातून शेतकरी आणि सहकारी साखर कारखान्यांची कामाची पद्धती यावर प्रकाश टाकला आहे. यात काही प्रसंग विनोदनिर्मिती करणारे असले, तरी त्यांतून शेतकऱ्याचे कसे हाल होतात तेच ठोसपणानं मांडलंय. 'तोडणी', 'कहाणी पांढऱ्या नागाची', 'चल रे भोपळ्या' या तीन कथांमधून शेतकरी व त्यांच्या उत्पादनाला भाव न मिळाल्यानं त्यांची होणारी ससेहोलपट समोर येते. 'ॲट्रॉसिटी' कथेतून ग्रामीण भागातलं राजकारण जोरकसपणानं मांडलं गेलंय, तर 'तोडगा' कथेतून बिलंदर पोरावर चतुर वडिलांनी केलेली मात दाद देऊन जाते. प्रकाशक : अक्षरबंध प्रकाशन,(०२११५ - २४२०४२, ९८२२८०८०२५)
पृष्ठं : १४४, मूल्य : १९० रुपये

माणूस'की’
सप्तरंग पुरवणीमधल्या ‘भ्रमंती लाइव्ह’ या सदरातील लेखांचं हे संकलन. संदीप रामराव काळे यांनी या सदरातून सामान्य माणसाला महानायक केलं. याच सदरातून त्यांनी आपल्या सभोवतलाच्या जगात आनंद पेरणाऱ्या माणसांना आपल्या लेखांचं नायक बनवलं. त्यांच्या या लेखांमधून जातपंचायतीवरुद्ध लढणारी माणसं भेटतात. तसंच, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नयेत यासाठी झटणारी माणसं, तर भिकाऱ्यांची सेवा करणारं डॉक्टर दाम्पत्य असे वेगवेगळ्या क्षेत्रांतले कृतिशील हात भेटतात.
पृष्ठं : २००, मूल्य : २४० रुपये

अश्रूंची फुले
'भ्रमंती लाइव्ह' या सदरातील आणखी काही लेखांचं संकलन असलेलं हे पुस्तक. यात समाजाच्या तळागाळात वावरणारे लोक आहेत, तसंच समाजसेवेचा आणि सामाजिक बंधुभाव जोपासला जावा, दंगली होऊ नयेत यासाठी काम करणारे कार्यकर्ते समोर येतात. साधारणत: राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात रचनात्मक आणि विधायक काम करणारी माणसं आणि त्यांना काम करताना आलेल्या अडचणी संदीप यांनी मांडल्या आहेत. सेवेशी आणि त्यागाशी नातं सांगणाऱ्या या माणसांचा संघर्ष वाचून डोळ्यांत अश्रू उभे राहतात; पण या माणसांचा पीळ आणि त्यांची कामाची चिकाटी पाहून त्यांना सलाम करावा असंच कुणालाही वाटेल. ज्येष्ठ लेखक व विचारवंत संदीप वासलेकर यांची या पुस्तकाला प्रस्तावना आहे.
पृष्ठं : २२४, मूल्य : २७० रुपये
दोन्ही पुस्तकांचे प्रकाशक : सकाळ प्रकाशन, पुणे (०२०- २४४०५६७८, ८८८८८४९०५०)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com