स्वागत नव्या पुस्तकांचं

welcome books
welcome books

रक्तगुलाब
काश्‍मीर खोऱ्यात अतिरेक्यांनी प्रचंड थैमान घातलं होतं, त्या काळात घडलेली ही कथा. अतिरेक्यांच्या कारवायांनी उद्ध्वस्त झालेले संपादक अभय प्रताप आपल्या कुटुंबासह अनंतनागमधून बाहेर पडतात आणि निर्वासितांच्या छावणीत आश्रय घेतात. त्यांच्या आयुष्यात पुढं काय काय घडामोडी घडतात, त्यांचा सूत्रबद्ध आलेख म्हणजे ‘रक्तगुलाब’ ही कादंबरी. आशिष कौल यांनी मूळ हिंदीत लिहिलेल्या ‘रेफ्युजी कॅम्प’ या पुस्तकाचा हा अनुवाद छाया राजे यांनी केलाय. प्रेम, गैरसमज आणि दहशतवादामुळं सामान्यांचे झालेले हाल हे सगळं यात विविध प्रसंगांतून समोर येतं. प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे (०२० - २४४७३४५९) पृष्ठं : २९४, मूल्य : ३३० रुपये

पिझ्झा टायगर
अमेरिकेतील पिझ्झा तयार करणाऱ्या मोठ्या कंपन्यांपैकी एक म्हणजे डॉमिनोज पिझ्झा. ३० मिनिटांत घरपोच पिझ्झा, हे तत्त्व बाळगणाऱ्या डॉमिनोज पिझ्झा या कंपनीच्या मालकाचं, म्हणजे टॉम मोनाघमचं हे आत्मचरित्र. अत्यंत छोट्या दुकानापासून त्यांनी आपल्या व्यवसायाची सुरुवात केली आणि आपल्या उद्योगाचा त्यांनी देश-विदेशांत विस्तार केला. आपल्या कंपनीची जगभरात त्यांनी हजारो स्टोअर्स उभी केली. कोट्यधीश झालेल्या या उद्योजकानं विमानं घेतली, तसंच बेसबॉलचा संघही विकत घेतला. पुढं त्यांनी आपल्या प्रंचड संपत्तीचा उपयोग जनसेवेसाठी केला. मूळ इंग्लिश पुस्तकाचा अनुवाद डॉ. सुधीर राशिंगकर यांनी केलाय.
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे (०२० - २४४७६९२४, २४४६०३१३) पृष्ठं : ३३०, मूल्य : ४२० रुपये

चहा, कांदेपोहे आणि मी
सुभाष मुरलीधर कर्णिक यांच्या या कथासंग्रहात १४ कथा आहेत. यातल्या दोन कथा विनोदी आहेत. अन्य १२ कथांमध्ये मानवी भावभावनांचा गुंता, तसंच मानवी स्वभावाचे नमुने आपल्याला भेटतात. प्रत्येकवेळी कुणी खलनायक असतो असं नाही, तर बऱ्याचवेळा परिस्थिती दुःखाला कारणीभूत ठरत असते. मात्र अशावेळी नात्याची किंवा ओळख नसलेली व्यक्तीही मदतीसाठी उभी राहते, असा अनुभव यातल्या काही कथांमधल्या नायिकेला किंवा नायकाला येतो. प्रसंगांची नेमकी गुंफण आणि कथानकातल्या काही माणसांचा भाबडेपणा, यामुळं कथा वाचनीय झाल्या आहेत. प्रकाशक : सुभाष मुरलीधर कर्णिक, पुणे (०२० - २४३७४६६६)
पृष्ठं : ११४, मूल्य : १३० रुपये

नेहरू व बोस : समांतर जीवनप्रवास
दिवंगत पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि आझाद हिंद सेनेचे प्रमुख नेताजी सुभाषचंद्र बोस या स्वातंत्र्यसंग्रामातील नेत्यांमध्ये सुरुवातीला मैत्रीचे संबंध होते. मात्र, नंतर त्यांत दुरावा निर्माण झाला आणि मग सगळीच गणितं बदलली. जवाहरलाल नेहरू यांच्याइतकी माझी कुणीच हानी केली नाही, असे उद्गार बोस यांनी काढले. या दोघांचं आयुष्य समांतर दिशेनं जात राहिलं. देश आणि स्वातंत्र्य यावरची त्यांची निष्ठा समान होती; पण त्यांचे मार्ग मात्र भिन्न राहिले. रुद्रांग्शू मुखर्जी यांनी मूळ इंग्लिशमध्ये लिहिलेल्या पुस्तकाचा अनुवाद अवधूत डोंगरे यांनी केलाय. प्रकाशक : रोहन प्रकाशन, पुणे (०२० - २४४८०६८६) पृष्ठं : २६४, मूल्य : ३५० रुपये

सोनेरी दिवस
जे. बी. प्रीस्टले या ब्रिटिश लेखकांच्या ‘ब्राइट डे’ या कादंबरीचा हा मराठी अनुवाद. कादंबरीचा नायक ग्रेगरी डॉसन हा हॉलिवूडमधील प्रसिद्ध पटकथालेखक असून, तो कॉनवॉल या किनाऱ्यावर शांतपणानं लेखन करण्यासाठी येतो. तिथं त्याची एका वृद्ध दाम्पत्याशी भेट होते. त्यांच्या सहवासात त्याला आपल्या शालेय काळाची आठवण होते. पहिल्या महायुद्धापूर्वीचं जग आणि इंग्लंडमधील सामाजिक बदल आणि तिथलं औद्योगीकरण या सगळ्याचा उल्लेख या कांदबरीत येतो. कादंबरीच्या नायकाच्या प्रेमात पडलेली एक अभिनेत्री, त्यामुळं त्याच्यासमोर उभा राहिलेला पेच, असं विलक्षण कथानक यात आहे. डॉ. विजया देशपांडे यांनी मराठी अनुवाद केलाय.
प्रकाशक : उत्कर्ष प्रकाशन, पुणे (०२० - २५५३७९५८, २५५३२४७९)
पृष्ठं : ३६०, मूल्य : ४०० रुपये

न्या. म. गो. रानडे आणि डॉ. रा. गो. भांडारकर एक सम्यक आकलन
दिवंगत विचारवंत रा. ना. चव्हाण यांनी गेल्या शतकात लिहून ठेवलेल्या लेखांचं संकलन करून त्यांचं पुस्तक करण्याचं काम त्यांचे पुत्र रमेश चव्हाण करत आहेत. या पुस्तकातदेखील त्यांनी चव्हाण यांचे रानडे आणि भांडारकर यांच्याबद्दलचे लेख संपादित केले आहेत. रा. ना. चव्हाण हे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे शिष्य. चव्हाण यांनी रानडे आणि भांडारकर यांचं नेमकं विश्‍लेषण केलंय. या पुस्तकाला डॉ. राजा दीक्षित यांनी जी प्रस्तावना लिहिली आहे, ती वाचल्यावर त्या काळाकडं कसं पाहायचं आणि या दोन मोठ्या व्यक्तिमत्त्वांचं आकलन कसं करायचं, हे लक्षात येतं. प्रकाशक : पुणे प्रार्थना समाज, पुणे (९८६०६०१९४४)
पृष्ठं : १२८, मूल्य : १२८ रुपये

बियॉन्ड सेक्स
सोनल गोडबोले यांच्या या कादंबरीमध्ये प्रेम हाच विषय केंद्रस्थानी असून, चाळिशीतल्या दोन व्यक्तींमधलं हे प्रेम आहे. मात्र, नवथर प्रेमापेक्षा या कादंबरीतले नायक-नायिका प्रेमापेक्षा मैत्री महत्त्वाची मानतात. शारीरिक सुखापेक्षा मनं जुळणं महत्त्वाचं यावर या दोघांचा विश्‍वास असतो. संपूर्ण कादंबरीत कुठंही अश्‍लीलता येऊ न देता, किंवा अकारण शृंगारिक वर्णनं न करता, प्रेमाचा भाग चांगल्या पद्धतीनं फुलवलाय. मीरा, समीर हे दाम्पत्य आणि सागर व राधा ही दुसरी जोडी यांच्यातलं नातं, त्यातला गुंता, त्या नात्याची कोरोनाच्या संकटात परीक्षा, असं सारं काही यात आहे.
प्रकाशक : चेतक बुक्स, पुणे (०२० - २४४५०४२४)
पृष्ठं : ९६, मूल्य : १४० रुपये

आठवणीतील शिकार
स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्याकडं शिकारीला बंदी नव्हती. त्या काळी शिकार करणं प्रतिष्ठेचं होतं. कोल्हापूर संस्थानात अशा शिकारी होत असत. त्या शिकारी पाहिलेल्या नव्हेत, तर काही शिकारींत स्वतः सहभागी झालेल्यांपैकी एक म्हणजे लीलावती दौलतराव जाधव. छत्रपती शाहू महाराजांच्या ज्येष्ठ कन्या अक्कासाहेब महाराजांच्या मानसकन्या असलेल्या लीलावतीबाईंचं लहानपण राजवाड्यातच गेलं. त्यांनी स्वतः काही शिकारींत भाग घेतला होता. त्या सर्व आठवणी या पुस्तकात आहेत. यशोधन जोशी यांनी या आठवणींचं शब्दांकन केलंय. त्याकाळचे पूरक फोटो असल्यानं हे पुस्तक वेगळंच ठरलंय.
प्रकाशक : कथाकथी प्रकाशन, पुणे (९८२३४५७०६०)
पृष्ठं : ६६, मूल्य : ३५० रुपये

भारतीय अर्थव्यवस्था
शासकीय स्तरावरच्या विविध स्पर्धापरीक्षांसाठी उपयोगी पडणारं हे पुस्तक. यात अर्थशास्त्रातील छोट्या छोट्या संज्ञा, तसंच महत्त्वाच्या संकल्पना सोप्या भाषेत समजावून दिल्या आहेत. पुस्तकात २४ विभाग असून, त्यामध्ये विमा, विविध व्यापार संघटना, तसंच रिझर्व्ह बँक, राज्याची अर्थव्यवस्था यांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये येणाऱ्या प्रश्‍नांचा विचार करून त्यांचं स्पष्टीकरण इथं दिलंय. भूषण देशमुख आणि हेमंत जोशी या लेखकद्वयीनं मेहनत घेऊन हा अवघड विषय सोपा करून सांगितला आहे. पत्रकार, अर्थशास्त्राचे अभ्यासक यांना संदर्भग्रंथ म्हणूनही हे पुस्तक महत्त्वाचं ठरेल.
प्रकाशक : सकाळ प्रकाशन, पुणे (०२० - २४४०५६७८) पृष्ठं : ५३२, मूल्य : ५९९ रुपये

मिळून मिसळून
मधुकर धर्मापुरीकर यांच्या व्यक्तिचित्रात्मक लेखांचा हा संग्रह. आपल्या मित्रपरिवारातील, तसंच कामाच्या ठिकाणी ज्यांच्याशी मैत्र जुळलं अशांवर लिहिताना त्यांनी ५५ लेखांतून त्यांना अक्षरशः आपल्यासमोर उभं केलंय. या प्रत्येक लेखाचा आकार तसा खूप छोटा आहे; पण धर्मापुरीकर यांची मिश्‍कील शैली आणि त्या व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज येण्यासाठी त्यांच्या कामाच्या ठिकाणचे किंवा त्यांच्या व्यवसायातले शब्द वापरून ते ते वातावरण त्या लेखातून ते निर्माण करतात. शायरी किंवा एखादा छंद अथवा एखादी वेगळीच बाब अशा वेगवेगळ्या धाग्यांनी ही सगळी माणसं एकमेकांशी जोडली गेली आहेत. धर्मापुरीकर त्यातल्या जिव्हाळ्याच्या नात्यांसह आणि त्यातल्या ओलाव्यासह हे मैत्र आपल्यापर्यंत पोहोचवतात.
प्रकाशक : अभंग प्रकाशन, नांदेड (९८२३४७०७५६) पृष्ठं : २३२, मूल्य : २५० रुपये

माझं गावं माझी माणसं
छोटी गावं, नगरं यांचं महत्त्व इतिहासाची पानं चाळताना लक्षात येतं. प्रत्येक जागेला त्याचा म्हणून एक इतिहास असतो. पुणे जिल्ह्यातील ओतूरजवळची ठिकेकरवाडी अशीच महत्त्वाची जागा. दावल दामोदर ठिकेकर यांनी आपल्या या वाडीच्या वैभवशाली इतिहासाचा वेध या पुस्तकात घेतलाय. त्याचबरोबर या परिसरातील महत्त्वाची माणसं आणि पंचक्रोशीतल्या गावांचीही माहिती त्यांनी इथं दिली आहे. सण साजरे करायची इथली पद्धत, लोकजीवन आणि लोककला, तसंच विविध यात्रांची परंपरा या सगळ्याची ओळख करून देताना त्यांनी गावगाडा कसा चालत होता, यावरही प्रकाश टाकलाय. प्रकाशक : सनय प्रकाशन, नारायणगाव (९८६०४२९१३४, ९९६०६१७३०६)
पृष्ठं : १६०, मूल्य : २०० रुपये

ध्येयपूर्ती
जयप्रकाश झेंडे यांच्या या पुस्तकातून स्वतःमध्ये बदल कसे घडवायचे आणि आपलं ध्येय कसं गाठायचं याबद्दल नेमकं मार्गदर्शन करण्यात आलंय. सकारात्मकतेची सोपी व्याख्या करताना झेंडे सांगतात की प्रत्येक गोष्ट परिपूर्ण होण्यासाठीची ओढ म्हणजेच सकारात्मकता. छोट्या छोट्या ४४ लेखांमधून झेंडे यांनी ध्येय गाठण्यासाठी काय बदल करायचे ते नेमकेपणानं सांगितले आहेत. संवाद कसा करायचा, संघर्ष कसा संपवायचा त्याचबरोबर प्रतिक्रियेपेक्षा प्रतिसाद कसा महत्त्वाचा असतो ते त्यांनी स्पष्ट केलंय. प्रकाशक : डायमंड पब्लिकेशन,पुणे (०२०- २४४५२३८७, २४४६६६४२)पृष्ठं : १९२ मूल्य : २५० रुपये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com