राहुल गांधींनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या शुभेच्छांचा अर्थ

Politics
Politics

शत्रूच्या सर्वांत जवळच्या मित्राला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न म्हणजे नवे राजकीय नियम लिहिले जात असल्याचे निदर्शक आहे. याचा उद्देश एकच : मोदींशिवाय कोणीही चालेल...

भारतीय राजकारणात सर्वसाधारणपणे कोणीही कायमचा मित्र अथवा शत्रू नाही, फक्त आपल्याला फायदा कोणापासून आहे, तितके पाहायचे. मी ‘सर्वसाधारणपणे’ हा शब्द विशेषकरून वापरला; कारण सध्याची ‘जोड-तोड की राजनीती’ हे प्रकार एका मोठ्या आराखड्याचा एक भाग आहेत. असे संबंध एखादी मागणी पदरात पाडून घेण्यासाठी प्रसंगी शक्‍य तितके ताणले जातात, पण कधीही तोडले जात नाहीत. पण, आता हे चित्र बदलत चालले आहे. 

ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात लालकृष्ण अडवानींनी त्यांच्या पक्षामध्ये जीव फुंकून त्याची ताकद १९८४ च्या दोन लोकसभा जागांवरून १९८९ ला ८५ जागांवर गेली आणि नंतर १९९८ ला सत्ताच मिळविली, त्या वेळी ते आघाडीची मोट बांधण्याचे साधे तत्त्व सांगायचे- ‘आम्ही विरोधी आहोत, असे मानणारे पाच पक्ष आहेत. त्यांच्याव्यतिरिक्त कोणाशीही हातमिळवणी करण्यास आम्ही मोकळे आहोत.’ त्यांच्या दृष्टीने पाच राजकीय ‘अस्पृश्‍य’ म्हणजे काँग्रेस, डावे, समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल आणि मुस्लिम लीग. याशिवाय, भाजपशिवाय पर्याय नाही असेही काही पक्ष होते, ते म्हणजे, शिवसेना, शिरोमणी अकाली दल, (त्या वेळी) तेलुगू देसम पक्ष. अडवानींनी दीर्घकालीन आघाडीसाठीचा अजेंडाच तयार केला. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी बनवलेले आघाडी सरकार हे आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले आघाडी सरकार होते. यामुळे आघाडी सरकार या प्रकाराबाबत असलेली भीतीही गेली आणि ‘इतर कोणताही पर्याय नाही,’ हा पर्यायही संपुष्टात आला. काही गोष्टी मात्र कधीही बदलत नाहीत. जसे, काही पक्षांबरोबर तुम्ही कधीही आघाडी करू शकत नाहीत, काही जणांना तुमच्याशिवाय इतर कोणताही पर्याय नसतो. हे सर्व आता बदलत आहे, पण भाजपने २०१४ ला संपूर्ण बहुमत मिळविल्यानंतर आपण अपेक्षा केल्याप्रमाणे हा बदल नाही. काही राजकीय विश्‍लेषकांच्या अंदाजानुसार गेल्या लोकसभेप्रमाणे या वेळीही संपूर्ण बहुमत मिळू शकेल, मात्र ते मिळविणारा कोणताही पक्ष असू शकतो.  

राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या निरोगी प्रकृतीसाठी प्रार्थना केली. आपल्या विरोधकांना शुभेच्छा देणे यात तसे काहीही विशेष नाही. पण, काँग्रेसच्या कोणत्याही अध्यक्षाने पक्षाच्या विचारधारेशी पूर्णपणे विरोधी असलेल्या एका पक्षाच्या प्रमुखाला जाहीरपणे आतापर्यंत कधीही शुभेच्छा दिलेल्या नाहीत. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, ही युद्ध आणि राजकारणातील जुनीच म्हण आहे. पण, तुम्ही आता शत्रूच्या सर्वांत जवळच्या मित्राशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असाल, तर हा एक नवाच दृष्टिकोन आहे. पूर्वी मी लोकसभा निवडणुकीची तुलना नऊ सेटपर्यंत चालणाऱ्या टेनिस सामन्याशी करत असे. जो कोणी यापैकी पाच जिंकेल, तो राज्य करणार. हे नऊ ‘सेट’ म्हणजे उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र, तमिळनाडू, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, कर्नाटक आणि केरळ. आपण ही राज्ये केवळ मोठी आहेत म्हणून नाही निवडली, तर या राज्यांमध्ये बदल शक्‍य आहे म्हणूनही ती महत्त्वाची आहेत. या नऊ राज्यांमध्ये एकूण ३४२ लोकसभा जागा आहेत. जी आघाडी यापैकी पाच राज्य जिंकेल, ती २०० या आकड्याच्या आसपास जाण्याची शक्‍यता आहे.  

मोदी-शहांच्या भाजपच्या हातात पुन्हा सत्ता जाऊ न देण्याचे उद्दिष्ट असलेल्या कोणाच्याही (राहुल गांधी) नजरेतून याकडे पाहा. सप आणि बसप एक राहिले, तर उत्तर प्रदेशात भाजपला संधी नाही. भाजपला राजस्थान, मध्य प्रदेश आणि हरियानासारख्या ‘घरच्या’ राज्यांमध्येही फटका बसण्याची दाट शक्‍यता आहे. त्यामुळे महाराष्ट्र ताब्यात ठेवणे, यालाच त्यांचे प्राधान्य असणार आहे. अमित शहा यांनी शिवसेनेला टाळून महाराष्ट्र काबीज करण्यासाठी बरेच प्रयत्न केले. पण, शिवसेनेशिवाय संपूर्ण विजय शक्‍य नाही, हे त्यांनाही माहीत आहे. राहुल यांनाही हे माहीत आहे. २०१९ मध्ये पुन्हा एकदा ‘नऊ सेटचा सामना’ होणार असेल, तर त्यांना महाराष्ट्रात भाजप/रालोआचा पराभव करणे आवश्‍यक आहे. शिवसेना काँग्रेसशी हातमिळविणी करेल, असे म्हणण्याइतके दुधखुळे कोणीही नाही. पण, राहुल यांना त्याची गरजही नाही. शिवसेना रालोआपासून दूर जरी राहिली, तरी त्यांचे उद्दिष्ट साध्य झाल्यासारखेच आहे. बाकी जुळवाजुळवी करण्यात काँग्रेस आणि शरद पवार यांचा हात कोण धरणार?

‘हॅपी बर्थडे उद्धवजी’ याचा राजकीय अर्थ हाच आहे. अविश्‍वास ठरावाला मोदींनी दिलेले उत्तर पुन्हा एकदा ऐका. त्यातील एक वाक्‍य महत्त्वाचे होते : साथ सोडून दिलेल्या चंद्राबाबूंचे नावही न घेता ते के. चंद्रशेखर राव यांना तेलंगणचे ‘विकास पुरुष’ म्हणाले. चंद्रशेखर राव आठवताहेत का?.,

मोदींविरोधात सर्व प्रादेशिक पक्षांची मोट बांधण्यासाठी हे काही दिवसांपूर्वीच देशभर फिरत होते. मग मोदी हे त्यांची स्तुती करत असतील, आणि राहुल हे उद्धव यांना शुभेच्छा देत असतील, तर एकच तर्कशुद्ध निष्कर्ष निघतो : हा आता खुला राजकीय आखाडा आहे आणि दोन्ही बाजूंना हे माहीत आहे. 

आघाडीची नवी भाषा
राजकीय विचारधारेच्या जवळपासही नसणाऱ्या शिवसेनेच्या प्रमुखांशी राहुल गांधी संपर्क साधत असतील, शिवाय जाहीरपणे गोडीगुलाबी दाखवत असतील, तर यातून तीन गोष्टी निदर्शनास येतात. एक म्हणजे, राहुल यांना भाजप-शिवसेनेतील ठिणगी स्पष्ट दिसत आहे आणि ते खुशीखुशीने त्यात तेल ओतत आहेत. दुसरी बाब म्हणजे, त्यांनी २०१९ साठीचे त्यांचे धोरण स्पष्ट केले आहे : मोदींशिवाय कोणीही चालेल. त्यात ते स्वत:ही नसले तरी चालतील. तिसरा मुद्दा म्हणजे, २०१९ मध्ये पुन्हा एकदा भारतात आघाडीची सत्ता आल्यास, आपले राष्ट्रीय राजकारण अडवानींनी आखून दिलेली आघाडीधर्माची चौकट मोडू पाहत आहे.
(अनुवाद - सारंग खानापूरकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com