योगाभ्यासाचा चांगला परिणाम जनुकांवरही

अंजली परांजपे
बुधवार, 21 जून 2017

योगाभ्यासाच्या विविध परिणामांचा अभ्यास करताना जनुकांवरील परिणामही आढळून आले. ऑस्ट्रेलियात नुकत्याच झालेल्या यासंदर्भातील संशोधनाविषयीची ही माहिती, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने. 

आतापर्यंत अनेक लिखाणातून तसेच संशोधनाने योगाचे शरीरावर तसेच मनावर कसे चांगले परिणाम होत आहेत, हे आपण सतत वाचतोय, ऐकतो आहोत; परंतु योगाभ्यासाचा परिणाम यापेक्षाही खोलवर जाऊन जीन्सवर म्हणजेच जनुकांवर कशाप्रकारे कशारीतीने होऊ शकतो याचे संशोधन नुकतेच ऑस्ट्रेलियात झाले आहे. एस. कोहेन वुड्‌स या संशोधकाने फ्लिंडरस युनिव्हर्सिटी, ॲडलेड येथे एका छोट्या पथदर्शक अभ्यासातून असा निष्कर्ष काढला आहे.

जीवशास्त्रीय परिणामांच्या जनुकांवर होणाऱ्या रासायनिक बदलाचा परिणाम योगाच्या अभ्यासामुळे कसा चांगल्या प्रकारे होऊ शकतो, हे ह्या अभ्यासात दिसून आले आहे. योगाच्या अभ्यासाने मनाची स्थिती चांगली होते. नैराश्‍य, मनाचा ताण कमी होतो; तसेच जीर्ण वेदना ज्या व्याधींमध्ये असतात असे संधिवात, किंवा इतर स्नायूंचे आजारही बरे होऊ शकतात. यात स्नायू शिथिल झाल्यामुळे हे परिणाम साध्य होतात; परंतु ह्या शिथिलीकरणाबरोबरच जनुकांवरही शिथिलीकरणाचा परिणाम दिसून आला आहे. योगाचा सूक्ष्म पातळीवरही किती चांगल्या प्रकारे परिणाम होऊ शकतो हे यातून दिसले. यावर अधिक संशोधनासाठी एक दालन उघडून देण्यात आले आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये हा पाहणी अभ्यास झाला. ज्या स्त्रियांना अधिक मानसिक ताण आहे, अशांना आठवड्यातून दोनदा एक तास योगाचा अभ्यास करून घेण्यासाठी एक गट निवडला. या गटात प्रामुख्याने अधोमुख श्वानासन आणि शवासन यांसारखी आसने करून घेण्यात आली. ज्यात खोल शिथिलीकरण साध्य होऊ शकते; तर दुसऱ्या गटात कोणताही व्यायामप्रकार समाविष्ट केला नाही. या दोन्ही गटांचा काही काळ अभ्यास केल्यावर असे दिसून आले, की योगाचा अभ्यास केलेल्या स्त्रियांमध्ये त्यांच्या जीवशास्त्रीय रचनेत चांगले बदल दिसून आले आहेत. याशिवाय एका विशेष प्रथिनाची वाढ दिसून आली की ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते.
अनेक वेळेस शरीरातील ताण किंवा नैराश्‍यात दाह वाढतो व त्यातून अनेक रोगांना निमंत्रण मिळते. योगातील शारीरिक व्यायामामुळे हा दाह कमी होतो. शारीरिक तसेच मानसिक पातळीवरही सकारात्मक बदल दिसून येतात. याच बरोबरीने जनुकांच्या पातळीवर चालणारी एक रासायनिक प्रक्रियाही मंदावते. त्यामुळे जनुके मुक्तपणे व्यक्त होऊ शकतात. तसेच याचा परिणाम वजन नियंत्रित ठेवण्यासाठीदेखील होऊ शकतो.

अर्थात अशाप्रकारे जनुकांवर योगाच्या होणाऱ्या परिणामांच्या अभ्यासाचा असा पहिलाच प्रयत्न आहे. अभ्यासातील सदस्यांची संख्या मर्यादित असल्याने अधिक मोठ्या संख्येने असा अभ्यास होणे गरजेचे आहे. तसेच हे झालेले बदल किती काळ टिकतात, हेही बघणे जरुरीचे आहे. असा सखोल अभ्यास करणे जिकिरीचे आहे, तसेच खर्चिक आहे; परंतु योगाचा परिणाम शरीर आणि मनावर सूक्ष्म पातळीवर होऊ शकतो, याला या संशोधनाने नक्कीच पुष्टी मिळाली आहे.

Web Title: saptrang news anjali paranjape artical on yoga