अगोदर उल्हास; त्यातून पावसाचा त्रास (सुनंदन लेले)

Cricket
Cricket

महाराष्ट्र क्रिकेटला पावसाचा मोठा फटका बसला आहे. गेले चार महिने पावसानं खेळाडूंना मैदानावर उतरण्यापासून रोखल्यानं एक प्रकारची मरगळ आलेली आहे. सर्व क्लब्ज आणि क्रिकेट अकादमीच्या संयोजकांना विचार करून खेळाडूंची मरगळ दूर करायला वेगळे प्रयत्न करावे लागतील. एकीकडं ही स्थिती असताना महाराष्ट्र क्रिकेटमध्ये आलेली मरगळ दूर करणारे काही आशेचे किरणही आहेत. त्यात केदार जाधवचं सातत्य आणि ऋतुराज गायकवाडचा धडाका लक्षणीय आहे.

‘बास झालं. मी नाही नाचणार आता. या पावसाच्या वागण्याला काहीच अर्थ नाही... कंटाळलेला मोर’, अशी एक मजेदार ग्राफिटी वाचनात आली. ‘जुलैपासून सुरू झालेल्या पावसानं नोव्हेंबरच्या दुसऱ्या‍ आठवड्यात माघारी जाण्याचा अखेर निर्णय घेतला आहे,’ असं धाडसी विधान करताना मलाच भीती वाटत आहे. गेला गेला वाटत असताना पावसानं महाराष्ट्राला वारंवार असं काही झोडपून काढलं आहे, की बोलायची सोय नाही. इतका पाऊस झाला, की सर्वांत जास्त नुकसान शेतकऱ्यांचं झालं आहे. कोणाची भातपीकं कुजली, तर कोणाच्या सोयाबिनला कोंब फुटले. कोणाच्या द्राक्षाच्या बागेवर कीड आली, तर कोणा शेतकऱ्या‍च्या भाजीपाल्याचं हाताशी आलेलं शेत अतिपावसानं काळवंडलं. नुकसानाबरोबर मानसिक नैराश्य शेतकऱ्यांच्या मनात घर करून राहत आहे. शेतऱ्यांना जसा पावसानं जबरदस्त धक्का दिला, तसाच धक्का महाराष्ट्राच्या मैदानी खेळांना बसला आहे. कारण गेले चार महिने मैदानं पाण्यानं भरून गेली आहेत. खेळणं तर सोडाच, साधं व्यायामाकरता खेळाडूंना मैदानात उतरणंही अशक्य होऊन बसलं आहे.

महाराष्ट्र क्रिकेटचं अतोनात नुकसान
महाराष्ट्राच्या क्रिकेटला या सगळ्या नैसर्गिक आपत्तीचा असा काही दणका बसला, की सर्व वयोगटातल्या संघांना सराव आणि सराव सामन्यांविना थेट मुख्य स्पर्धेत सहभागी व्हावं लागेल. झालं असं, की महाराष्ट्र क्रिकेटची तयारी मुख्यत्वेकरून निमंत्रितांची साखळी स्पर्धेतून व्हायची. मी जेव्हा खेळायचो, तेव्हा १०-११ संघात मुख्य खुल्या गटाची निमंत्रितांची साखळी स्पर्धा पुण्यात व्हायची. जिल्ह्यातले गुणवान खेळाडू पुण्यातल्या क्लब्जमधून खेळायचे. इतकंच काय, मुख्य स्पर्धेत १९ वर्षांखालचा संघ दाखल करून महाराष्ट्र क्रिकेट संघटनेनं मोठी कल्पकता आणि धाडसही दाखवलं होतं. सहभागी होणारे सर्व संघ साखळी पद्धतीनं एकमेकांविरुद्ध खेळायचे- ज्यातून महाराष्ट्रातल्या सगळ्या चांगल्या खेळाडूंचा कस लागायचा. तीन महिन्यांच्या या स्पर्धेतून ताक घुसळून लोणी वर निघावं, तसे चांगले खेळाडू आपोआप वर यायचे. निवड समितीचे सदस्य बऱ्या‍च सामन्यांना हजर राहून चांगल्या खेळाडूंची पारख करायचे- ज्यातून संघ निवड करण्याची प्रक्रिया सुकर व्हायची.

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या कारभारात बदल झाले. नव्या सत्ताधाऱ्यांनी, ‘महाराष्ट्र क्रिकेट म्हणजे पुण्याचं क्रिकेट नसून जिल्ह्यातल्या खेळाडूंना न्याय मिळाला पाहिजे,’ असा मुद्दा मांडत निमंत्रितांची साखळी स्पर्धा विस्तृत केली. पुणे शहरातल्या क्लब्जबरोबर जिल्हा संघटनांचे संघ या मुख्य साखळी स्पर्धेत सामावून घेतले गेले. ज्यानं क्रिकेट विस्तार झाला; पण स्पर्धा भरवताना गेली काही वर्षं महाराष्ट्र क्रिकेट संघटना चार संघांचे नऊ गट करून स्पर्धा भरवू लागली- ज्यानं मोठं नुकसान झालं.

प्रत्येक संघाला चार सामने खेळायला मिळू लागले. बरं, ही स्पर्धा पावसाच्या दिवसात होत असल्यानं चारपैकी एखादा सामना पावसानं धुतला गेला, तर सामने अजून कमी अशी परिस्थिती व्हायला लागली. काही वेळा दहा दिवसांत तीन सामने खेळाडूंना खेळणं भाग पाडून कडेलोटही झाला. एसटी बसनं प्रवास करून सामान्य जागी राहून दोन दिवसांचे तीन सामने दहा दिवसांत खेळून खेळाडू पार थकून गेले. काही वेळा जळगाव धुळ्याच्या भागात तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्या पुढं गेलं असतानाही महाराष्ट्र क्रिकेट संघटनेनं लहान वयोगटातले सामने त्या जागी भरवून एका अर्थानं लहान वयातल्या खेळाडूंवर अन्याय केला.

पुण्यातल्या क्रिकेटला धक्का
महाराष्ट्राचे क्रिकेट ऐन भरात होतं, तेव्हा पुण्यातली क्लब्जधली सकारात्मक क्रिकेट स्पर्धा मोठं काम करत होती. पीवायसी, पूना क्लब, डेक्कन जिमखाना, क्लब ऑफ महाराष्ट्रसारख्या प्रथितयश क्लब्जना स्वत:ची मैदानं नसलेले स्टार्स क्लब, युनायटेट क्लब, विलास क्लब सारखे संघ जबरदस्त टक्कर द्यायचे. गेली काही वर्षं महाराष्ट्र क्रिकेट संघटनेनं क्रिकेटचा विस्तार जिल्ह्यातून करत असताना पुण्यातील क्रिकेटकडे साफ दुर्लक्ष केलं. या प्रकारानं झालं, असं की खेळाडूंची संख्या वाढली; पण सामन्यांची संख्या घटली आणि परिणामी दर्जेदार खेळाडूंची फळी निर्माण होण्याच्या प्रक्रियेला खीळ बसली. महाराष्ट्र क्रिकेटला सबळ करणाऱ्या‍ काही स्पर्धा पुण्यातले क्लब्ज भरवायचे- ज्यासुद्धा अभावानं भरवल्या जाताना दिसत आहेत. या सगळ्या परिस्थितीचा दुष्परिणाम दिसू लागला आहे.

नवा गडी नवं राज्य
असंख्य कायदेशीर अडचणींची अडथळ्याची शर्यत पार करून अखेर महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या बहुचर्चित निवडणुका पार पडल्या. नवे पदाधिकारी संघटनेच्या कारभारावर आले आहेत. दरम्यानच्या काळात इतके दिवस जाणूनबुजून दहा हात दूर ठेवले गेलेले मिलिंद गुंजाळ यांच्यासारख्या जुन्या जाणत्या खेळाडूला महाराष्ट्र क्रिकेट संघटनेनं अचानक मुख्य प्रवाहात सामील करून घेतलं आणि चक्क एका वयोगटातल्या संघाच्या प्रशिक्षणाची आणि रणजी संघाच्या निवड समितीची धुरा सोपवली.

वरकरणी हे बदल स्वागतार्ह असलं, तरी मुख्य क्रिकेट प्रक्रिया डळमळीत झाली आहे, हे मान्य करण्याचा खुलेपणा महाराष्ट्र क्रिकेट संघटना दाखवेल असं आत्ता तरी वाटत नाहीये. नव्या नियमांनुसार क्रिकेट सल्लागार समिती नेमणं प्रत्येक राज्य क्रिकेट संघटनेला बंधनकारक आहे. क्रिकेट सल्लागार समितीची नेमणूक सर्वांत कळीचा मुद्दा ठरते- कारण हीच समिती विविध संघांच्या निवडीकरता निवड समिती नेमणार आहे. साहजिकच क्रिकेट सल्लागार समितीत कोण नेमलं जातं याकडे लक्ष ठेवावं लागेल. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेनं मोठं क्रिकेट खेळून अनुभवांचं भरपूर गाठोडं जमा असलेले जाणकार माजी खेळाडू या समितीत घेतलं, तर महाराष्ट्राच्या क्रिकेटला दिशा मिळेल; पण जर ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात करण्याच्या नादात परत त्याच मर्जीतल्या आणि अननुभवी माजी खेळाडूंना किंवा थेट मोठं क्रिकेट न खेळलेल्या संयोजकांना क्रिकेट सल्लागार समितीत नेमलं, तर तो निर्णय महाराष्ट्राच्या क्रिकेटला विनाशाकडे नेणारा ठरेल.

घसरण थांबवायची गरज
संपूर्ण स्थानिक क्रिकेट मौसम अंतर्गत वादावादीतून आणि अतिरेकी पावसानं धुतला गेला. खेळाडूंना ना सराव करता आला, ना सामने खेळता आले. त्याचा गंभीर दुष्परिणाम महाराष्ट्राच्या क्रिकेटवर आत्तापर्यंत झालेला स्पष्ट दिसतो आहे. एकीकडे मुख्य संघाचे एकदिवसीय सामने बडोद्यात पावसानं धपाधप रद्द झाले. दुसरीकडे गेल्या एका महिन्यात सरावाअभावी महाराष्ट्राच्या संघांना विविध वयोगटांत जास्त करून पराभवाचा सामना करावा लागला आहे, हे सत्य नाकारून चालणार नाहीये. पराभवाचं खापर पावसावर फोडणं अगदीच शक्य आहे, तरीही नव्यानं निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यां‍समोर घसरण थांबवायचं मोठं आव्हान उभं आहे.  

गेले चार महिने पावसानं खेळाडूंना मैदानावर उतरण्यापासून रोखल्यानं एक प्रकारची मरगळ आलेली आहे. सर्व क्लब्ज आणि क्रिकेट अकादमीच्या संयोजकांना विचार करून खेळाडूंची मरगळ दूर करायला वेगळे प्रयत्न करावे लागतील. चार महिने खेळ न झाल्यानं खेळाडूंनी भरलेली फी एका अर्थानं वाया गेली आहे. त्यांना पुढील चार महिने एक तर शुल्क न आकारता प्रशिक्षण द्यायचा विचार करावा लागेल; तसंच हाती असलेल्या मैदानावर बाहेरचे सामने कमी भरवून प्रशिक्षण घेत असलेल्या खेळाडूंना सराव सामने खेळायची संधी द्यायला पाहिजे. जर असे काही पुरोगामी विचार केले नाहीत, तर नुसताच अभ्यास करायचा; पण परीक्षा द्यायची नाही हे समीकरण उलटू शकतं हे लक्षात घ्यायला हवं.

आशेचा किरण
महाराष्ट्र क्रिकेटमध्ये आलेली मरगळ दूर करणारे काही आशेचे किरण आहेत. त्यात केदार जाधवचं सातत्य आणि ऋतुराज गायकवाडचा धडाका लक्षणीय आहे. ऋतुराज गायकवाडकडे भारतीय मुख्य निवड समितीची बारीक नजर आहे हे नक्की. याला कारण आहे ऋुतुराजनं भारतीय ‘अ’ संघाकडून खेळताना केलेली कामगिरी. दिलीप वेंगसरकरांच्या व्हॅरॉक क्रिकेट अकादमीचा हा खेळाडू धडाकेबाज फलंदाजीनं आणि सातत्यपूर्ण कामगिरीनं लोकांच्या नजरेत भरला आहे. ऋतुराजला मुख्य भारतीय संघात खेळायची संधी मिळायची शक्यता खूप वाढली असल्याचं मला समजलं आहे.

केदार जाधव भारतीय संघाकडून चांगली कामगिरी करत आहेच; तसंच स्थानिक महत्त्वपूर्ण सामन्यांतही संघाला विजयी करून देणाऱ्या खेळ्या उभारत आहे. त्याच्या सोबतीला केदार जाधव पुण्यातल्या क्लब्जमधली सकारात्मक क्रिकेट खुन्नस जिवंत ठेवायला काही पावलं उचलणार असल्याचं समजलं. पीवायसी आणि डेक्कन जिमखाना या दोन क्लबमधली पारंपरिक स्पर्धा कायम ठेवण्याकरता केदार जाधवला तीन दिवसांचे दोन सामने खेळवायची इच्छा होती- ज्याकरता आर्थिक पाठबळासह संपूर्ण योजना केदार जाधवनं आखल्याचं समजलं. पावसाच्या हजेरीनं योजना पुढं ढकलावी लागली असली, तरी भविष्यात केदार जाधव तीन दिवसांचे किमान दोन सामने पीवायसी आणि डेक्कन जिमखाना संघात आयोजित करेल ही खात्री आहे. ‘‘खेळाडूंना स्पर्धात्मक वातावरणात तीन किंवा चार दिवसांचे सामने खेळायला मिळावेत, ही माझी इच्छा आहे. जोपर्यंत खेळाडूंची तीन-चार दिवसांचे सामने खेळायची मानसिकता तयार होणार नाही, तोपर्यंत रणजी स्पर्धेत मोठी कामगिरी करायची मानसिक, शारीरिक तयारी होणार नाही. केवळ या विचारानं मी ही सुरवात करायच्या पक्क्या विचारात आहे,’’ असं केदार जाधव ‘सकाळ’शी बोलताना म्हणाला.

भारतीय संघाकडून खेळणारा केदार असा सकारात्मक विचार करतो आहे, याचा अर्थ महाराष्ट्र क्रिकेट पूर्वपदावर याची शक्यता मावळली नाहीये असं वाटतं. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या नव्यानं निवडून आलेल्या अपेक्स कौन्सिल सदस्यांसमोर तीच सकारात्मकता पुढं घेऊन जाण्याची जबाबदारी आहे.
मार्ग खडतर असला तरी अशक्य नाहीये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com