Saptrang Sunday Article in Marathi Vishal Torade
Saptrang Sunday Article in Marathi Vishal Torade

चंडोलांच्या मागावर... 

माळावरच्या पक्ष्यांचं छाचाचित्रण करण्यासाठी माझी भटकंती सुरू होती. दिवेघाटाच्या पायथ्याशी व भुलेश्‍वरच्या माळावर मी "चिमणा चंडोल' (ऍशी क्राऊन स्पॅरो लार्क) व "मुरारी' (रुफस टेल्ड्‌ लार्क) या देखण्या पक्ष्यांचं छायाचित्रण केलं होतं; परंतु हवी तशी छायाचित्रं मिळाली नव्हती. पुणे-सोलापूर महामार्गावर कवडी इथं पाणपक्ष्यांचा अभ्यास करत असताना मी तिथं या दोन प्रजातींची नोंद केली होती. 

पाठीवर मातकट तपकिरी आणि छाती-पोटावर काळा असा या पक्ष्यांचा रंग असतो. हे पक्षी ओसाड जमीन, शेती व कोरड्या माळरानावर आढळतात. त्यांचा रंग माळावरच्या दगड-मातीशी कमालीचा एकरूप झालेला असतो. आपण माळावरच्या पाखरांचं अवलोकन करत हिंडत असताना चिमण्या चंडोलांच्या हालचालींना वेग आलेला असतो. थव्यातला एखादा सभासद लाल तांबड्या मातीत धूळस्नान करत असतो...कुणी तुरूतुरू चालत गवतातलं बी, कीडे-कीटक टिपत असतो, तर कुणी दगडाच्या उंच सुळक्‍यावर बसून गोड सुरांची बरसात करत असतो. 

चिमणा चंडोल हा पक्षी भारतात सर्वत्र आढळतो. हे पक्षी सुस्वर गातात व विलक्षण हवाई कसरती करतात. नर हा बाणासारखा हवेत झेप घेतो व पंख मिटून अतिशय वेगानं सूर मारत, गोड शीळ घालत खाली येतो. त्याचा तीरासारखा वेग पाहून एखाद्या नवख्या पक्षीनिरीक्षकाला वाटेल, की हा आता जमिनीवर आपटणार! पण तोच हा पठ्ठ्या पंख पसरून पुन्हा हवेत झेप घेतो व शेवटी एखाद्या उंचवट्यावर उतरतो. गावाबाहेरच्या माळावर दिवसभर या चिमण्या चंडोलांच्या कंठातून बरसणाऱ्या गोड लकेरींनी चैतन्य पसरलेलं असतं. सूर्य अस्ताला गेल्यावर अंधारून आलं, की त्यांचा थवा रात्रीची नीज घेण्यासाठी जमिनीवरच जागा शोधतो. हे पक्षी झाडा-झुडपांवर विश्रांती घेत नाहीत. यांचा विणीचा हंगाम अनियमित असून, पावसाळ्यापूर्वी मादी स्वतः मऊ पिसं व केस यांच्या साह्यानं जमिनीवर उबदार घरटं बांधून दोन-तीन अंडी घालते. अंडी उबवणं व पिलांचं संगोपन करणं यासाठी मादीला नर मदत करतो. 

पुन्हा एकवार चिमण्या चंडोलांचं छायाचित्रण करावं म्हणून मी कवडीची निवड केली. नदीपात्राच्या पश्‍चिमेला जमिनीच्या उतारामुळं नदी दोन प्रवाहांमधून वाहते. या प्रवाहांनी कवेत घेतलेल्या बेटांवर चिमण्या चंडोलांच्या सुरेल लकेरी कानावर येतात. पंधरा दिवसांपूर्वी आठ-दहा दिवस नियमितपणे कवडीला भेट देऊन छायाचित्रण केलं. 

हिवाळ्यात स्थलांतर करून आलेल्या स्थलांतरित पक्ष्यांनी पाणवठ्यावर गर्दी केली होती. थापट्यांचा (नॉर्दर्न शॉव्हेलर) थवा पाण्यावर तरंगत होता. त्यांचं निरीक्षण करून पुढं निघालो. नदीकाठच्या काटेरी वनातून तांबोल्याची (रेड-थ्रोटेड फ्लाय कॅचर) कर्णसुखद साद ऐकू येत होती. नदीकाठी हिरवळीवर काळ्या शराट्यांचा (ब्लॅक आयबिस) थवा खाद्य शोधत होता. माझी चाहूल लागताच पंखांचा फडफडाट करत ते दूर उडून गेले. 

स्थलांतरित पिवळे धोबी शेपूट नाचवत पाण्यातले कीटक पकडत होते. नदीपात्र ओलांडून खडकावर येताच चिमण्या चंडोलांचा परिचित स्वर कानावर आला. कॅमेरा, लेन्स, ट्रायपॉड आदी वस्तूंची जुळवाजुळव करून मी छायाचित्रणासाठी बैठक मारली. नुकतंच उजाडलं होतं. पाणकावळ्यांच्या माळा पूर्वेकडं झेपावत होत्या. हळूहळू कोवळी उन्हं पसरली. चिमण्या चंडोलांच्या हालचालींना वेग आला. एकमेकांशी पाठशिवणीचा खेळ खेळावा तशा त्यांच्या हवाई कसरती सुरू झाल्या. मी दुर्बिणीतून त्यांचं निरीक्षण करू लागलो. बऱ्याच वेळानंतर एक नर गुळगुळीत खडकावर उतरला व गोड शीळ घालू लागला. त्याच्या फुगणाऱ्या गळ्यावरची पिसं फुलत होती. गालावरचे पांढरे ठिपके भस्म लावल्यासारखे भासत होते. 

माझ्या डावीकडं काहीतरी हालचार जाणवली. पंधरा-वीस फूट उंतरावर चिमण्या चंडोलाची मादी खडकाच्या खळग्यात साठलेलं पाणी पित होती. पाणी पिऊन झाल्यावर ती माझ्या पाठीमागं मोकळ्या जागेत आली. पंख फुलवून धूळस्नान करू लागली. मी तिचं छायाचित्र घेण्यासाठी तिच्यावर लेन्स रोखली तर सूर्यप्रकाश थेट लेन्सवर येऊ लागला. मी ट्रायपॉडसह कॅमेरा उचलला व प्रदक्षिणा घालावी तसं मादीभोवती गोल फिरून जागा बदलली. सूर्य पाठमोरा झाला, लगेच मी मादीवर फोकस केलं. दोन्ही पंख पसरून व छाती-पोट मातीत घुसळून ती धूळ अंगावर घेत होती. तिच्या शरीरावरची पिसं फुलत होती. डोक्‍यावरची पिसं तुरा उभारावा तशी दिसत होती. काही वेळानंतर ती शांत झाली. पंखांचा "भुर्रर्र' असा आवाज करून तिनं अंगावरची धूळ झटकली व खडकावर काहीबाही शोधायला लागली. कुठं कुठं सुकलेल्या पिवळसर गवताची खुरटी बेटं दिसत होती. बराच वेळ तिनं शोधोशोध केली. तिला एक हिरवं बी सापडलं. कितीतरी वेळ ते बी चोचीत धरून ती उभी होती. एवढा वेळ ते हिरवं बी चोचीत धरून ती का उभी असेल, याचा मी विचार करत असताना मध्येच तिनं "चिप्‌' असा आवाज करून हवेत झेप घेतली. 
चिमण्या चंडोलाच्या मादीच्या सतत होणाऱ्या हालचालींमुळं मी केव्हातरी ट्रायपॉडवरचा कॅमेरा काढून गळ्यात अडकवला होता व मादीच्या मागोमाग जागा बदलत मी तिची छायाचित्रं घेत होतो. वाढलेल्या उन्हामुळं मानेभोवती लपेटलेला कॅमेऱ्याचा बेल्ट गरम होऊन मानेला चटके बसू लागले, तेव्हा मी भानावर आलो. सामानाची आवराआवर केली व परतीच्या वाटेला लागलो. दुसऱ्या दिवशी पावसाची एक हलकीशी सर झडून गेल्यामुळं हवेत गारवा होता. पूर्वेला तांबडं फुटलं तशी माझी पावलं कवडीकडं वळली. सुखद गारव्यात उमलणारी सकाळ अनुभवत मी नदीकाठानं चालू लागलो. चिमण्या चंडोलांच्या खडकावर असलेला दलदल ससाणा (युरेशियन मार्श हॅरियर) उडाला व संथपणे पंख हलवत नदीप्रवाहाकडं गेला. मी माझ्या जागेवर बसून चिमण्या चंडोलांची वाट पाहू लागलो. आकाशात काळे-करडे ढग तरंगत होते. प्रकाश पुरेसा नाही म्हणून मी कॅमेऱ्याचा आयएसओ वाढवला. आज चिमण्या चंडोलांच्या हालचाली कमी दिसत होत्या. सकाळचे सव्वानऊ नुकतेच वाजून गेले होते, तरीही मला त्यांचं एकही छायाचित्र मिळालं नाही. माझ्या समोरून नदीप्रवाह वाहत होता. नदीसुरय (रिव्हर टर्न) प्रचंड चीत्कार करत पाण्यावर सूर मारून मासे पकडत होते. ब्राह्मणी बदकांचा थवा "आँग आँग ऽऽ' आवाज करत उदरभरण करत होता. माझ्या कार्यालयीन कामाची वेळ जवळ येऊ लागल्यामुळं मी झपझप पावलं टाकत हमरस्त्याला लागलो. 
चिमण्या चंडोलांच्या माझं छायाचित्रण नियमितपणे सुरू होतं. एका सकाळी पुन्हा भिजपाऊस झाल्यामुळं मी कवडीला गेलो नाही. दुसऱ्या दिवशी मात्र स्वच्छ उजाडलं. उल्हसित मनानं पुन्हा कवडीला भेट दिली. मुरारी (रुफस टेल्ड लार्क) हा पक्षी प्रसन्न शीळ घालत खडकावरच्या खळग्यांमध्ये साठलेल्या पाण्यावर उतरला. पाणी पितानाचं त्याचं सुंदर छायाचित्र मला मिळालं. पाणी पिऊन झाल्यावर तो उडाला व माझ्यासमोर सुमारे पंधरा फुटांवर येऊन बसला. क्षणाचाही विलंब न करता मी कॅमेऱ्याच्या व्ह्यू फाइंडरला डोळा लावला. अनपेक्षितपणे मुरारी या पक्ष्याची सुंदर छायाचित्रं मिळाली. मुरारी व चिमणा चंडोल हे दोन्ही एकाच कुळातले पक्षी असून, त्यांच्या अनेक सवयींमध्ये साम्य आढळतं. माळरानं, शेती, नांगरलेली जमीन या प्रदेशात आढळणारा मुरारी हा पक्षी गवताच्या बिया, इतर धान्य व कीटक यांच्यावर गुजराण करतो. फेब्रुवारी ते मे या काळात मादी तीन-चार अंडी घालते. 

पाच फेब्रुवारी 2016 रोजी सासवडजवळ धाविक (इंडियन कोर्सर) या पक्ष्याचं छायाचित्रण करताना आम्हाला मुरारी या पक्ष्याचं घरटं सापडलं होतं. माळरानावर कुणीतरी प्लॉट्‌स पाडलेले होते. जागेची मोजणी करून खांब रोवण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात मुरारी नर-मादी घरटं बांधत होते. आपण सिमेंटची जंगलं उभी करण्यासाठी पक्ष्यांच्या अधिवासावर अतिक्रमण करत आहोत, याचं जिवंत उदाहरण पाहून मी व्यथित झालो. 

माझ्यासमोर मुरारी पक्ष्यानं चोचीनं पिसं साफ केली. पांढऱ्या पातळ विष्ठेची खडकावर पिचकारी मारली व उडून गेला. मी कॅमेऱ्याच्या डिसप्लेवर मुरारीची छायाचित्रं पाहत असताना खडकावरची शांतता भेदत एक गोड मंद आवाज कानावर येऊ लागला. "चीऽ चीऽऽ चीईऽऽऽ.' एक चिमणा चंडोल नर हवेत तरंगत (हॉवरिंग) शीळ घालत होता. मी डोळ्यांना दुर्बिण लावून त्याचं निरीक्षण करत असताना कळ दाबावी तसा त्याचा आवाज बंद झाला व तो एका उंच खडकावर उतरला. आमच्या दोघांमध्ये सुमारे 40 फूट अंतर होतं. मी ट्रायपॉडवरचा कॅमेरा हातात घेऊन पोटावर झोपलो. शरीराचा भार दोन्ही हातांच्या कोपरांवर पेलत चिमण्या चंडोलाजवळ पोचलो. त्या नरापासून सुमारे दहा फुटांवर येऊन मी कॅमेरा डोळ्यांना लावला, तोच नर पुन्हा गाऊ लागला. मी श्‍वास रोखून कमीत कमी हालचाली करत छायाचित्रं घेत होतो. शरीराचा भार कोपरांवर पेलल्यामुळं जमिनीवरचे खडे खूप रुतत होते. माझ्या हातातल्या कॅमेऱ्याच्या आणि लेन्सच्या वजनामुळं माझ्या त्रासात भर पडली होती. मात्र, हा सगळा त्रास विसरून मी छायाचित्रण करतच होतो. उष्मा वाढल्यामुळं अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. गाई-म्हशींच्या गळ्यातल्या घंटांची किणकिण कानावर येऊ लागली, तशी मला भोवतालाची जाणीव झाली. गाई-म्हशींचा कळप नदीकाठच्या हिरवळीवर चरण्यासाठी येत होता. परवा मी याच ठिकाणावरून घरी परतत अलताना माझ्या अंगातले हिरवे कपडे पाहून कळपातली एक मारकी म्हैस माझ्या मागं लागली होती. एवढ्या विशाल नदीकाठावर कुठं पळावं यासाठी मला वाट सापडत नव्हती. घाबरलेल्या अवस्थेत केवढी फजिती झाली माझी! 
या प्रसंगाची आठवण होऊन मी चिमण्या चंडोलापासून मागं वळण्यासाठी हालचाल केली. एवढ्यात तो उडाला व हवेत तरंगत पुन्हा गाऊ लागला...चीऽ चीऽऽ चीईऽऽऽ !

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com