निर्व्याज प्रेम (सरोज काशीकर)

सरोज काशीकर
रविवार, 23 डिसेंबर 2018

सुमितच्या आई-बाबांनी भाऊ-वहिनीला नमस्कार केला. काकूंनी ताईला छानसा ड्रेस दिला आणि सुमितला एक डझन संत्री आणि भारीपैकी क्रिकेटचा सेट. तो पाहून सुमित आश्‍चर्यचकित झाला आणि म्हणाला ः ""काकू, अहो कशाला इतकं?'' काकू म्हणाल्या ः ""सुमित तू रोज येत होतास. त्यामुळं किती बरं वाटायचं माहितेय? त्याच्यापुढं हे काहीच नाही.''

सुमितच्या आई-बाबांनी भाऊ-वहिनीला नमस्कार केला. काकूंनी ताईला छानसा ड्रेस दिला आणि सुमितला एक डझन संत्री आणि भारीपैकी क्रिकेटचा सेट. तो पाहून सुमित आश्‍चर्यचकित झाला आणि म्हणाला ः ""काकू, अहो कशाला इतकं?'' काकू म्हणाल्या ः ""सुमित तू रोज येत होतास. त्यामुळं किती बरं वाटायचं माहितेय? त्याच्यापुढं हे काहीच नाही.''

सुमितची आई अपर्णा सुमितची वाट पाहत होती. "आज सुमित खूप चिडलाय. आता आला, की आदळआपट करेल. त्याची काय चूक म्हणा! तो तसा अजून लहानच आहे. गेल्या वर्षी तो सातवीत होता. अनेक वर्षं रोज क्रिकेट खेळतोय. म्हणून त्याच्या वाढदिवसाला त्याला क्रिकेट-सेट हवा होता,' असे विचार तिच्या डोक्‍यात सुरू होते. अपर्णाला तो दिवस आठवला. सुमितच्या आजोबांचं मोठं आजारपण आणि निधन यामुळं आर्थिक तंगी सुरू होती. क्रिकेट सेट घेणं शक्‍य नव्हतं. खरं म्हणजे मे महिन्याच्या सुटीत अपर्णाच त्याला म्हणाली होती ः ""यंदा वाढदिवसाला तुला नक्की क्रिकेट-सेट आणूया.'' पण पुढं आजोबांचं असं होणार हे तिला काय माहीत? मात्र, "क्रिकेट-सेट घेता येणार नाही,' असं सुमितला सांगितल्यावर तो खूप चिडला होता. आईशी बोलतही नव्हता. बाबा घरी आले. ताईही शाळेतून आली. त्या दोघांशीही तो बोलला नाही. आईनं हळूच त्या दोघांना त्याच्या रागाचं कारण सांगितलं. शेवटी रात्री आठ वाजता बाबा म्हणाले ः ""अरे आज सुमितचा वाढदिवस. म्हणून आपण काहीच केलं नाही की.'' अपर्णा म्हणाली ः ""हे बघा, मी आज सुमितला पुढच्या वाढदिवसाला क्रिकेट-सेट घेता यावा म्हणून बॅंकेत रिकरिंग खातं सुरू केलंय.'' बाबा म्हणाले ः ""अरे वा! मग आज काय आईस्क्रीम खायला जाऊया.'' सुमित आईसक्रीमचं नाव ऐकताच हसून मान डोलावू लागला.

""कोण कोण जाऊ या?'' बाबांनी विचारलं. ""तुम्ही, मी, ताई आणि आई सगळेच जाऊया...'' सुमितचं हे वाक्‍य ऐकून आई-बाबांना बरं वाटलं. सगळे मजेत बाहेर जाऊन थोडा वेळ फिरून आईसक्रीम खाऊन आले होते.
यंदा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच पैसे मिळाले होते. आज- उद्या करत काही दिवसांत क्रिकेट-सेट आणायला जायचं ठरलं. पण काय दुर्दैव! त्याच दिवशी सकाळी राकेशकाकांचा म्हणजे सुमितच्या बाबांच्या मावसभावाचा अपघात झाला. फोन आल्याबरोबर अभिजित म्हणजेच सुमितचे बाबा ताबडतोब गेले. जाताना त्यांनी बरोबर बरेच पैसेही नेले होते. राकेशकाकांना मोठ्या हॉस्पिटलमध्यं ऍडमिट केलं. बराच ऍडव्हान्स भरावा लागला. ताबडतोब आवश्‍यक ती शस्त्रक्रिया करावी लागणार होती. शस्त्रक्रिया आणि प्लॅस्टर केल्यावरही त्यांना 15 दिवस दवाखान्यात राहावं लागेल, असं डॉक्‍टर म्हणाले.

रात्री बाबा घरी आले. ते जेवून परत हॉस्पिटलमध्ये जाणार होते. ते जेवताना आईला म्हणाले ः ""उद्या सकाळी वहिनी येतील फ्लाइटनं. दिल्लीला त्यांच्या घरापासून एअरपोर्ट जवळच आहे; पण इथं मात्र लोहगावला कॅब पाठवावी लागेल. आज मी झोपायला जातो. उद्या त्यांचा डबा घेऊन जाईन आणि त्यांना देऊन तिथूनच कामावर जाईन. सुमितला पाच वाजता त्या दोघांचा चहा घेऊन पाठव.''
""चालेल,'' अपर्णा म्हणाली. सुमित घरी आल्यावर त्याला ""आज क्रिकेट-सेट आणायला जायचं नाहीये. कारण काकांचा अपघात झालाय. काका खूप श्रीमंत आहेत; पण सध्या तरी आपल्याला खर्च करावा लागेल,'' असं अपर्णानं सांगितलं. ते ऐकल्यावर सुमित खूप चिडला.
""बाबांना पैसे भरण्याची काय गरज होती?'' असं तो चिडून म्हणाला.
""सुमित, ते बाबांचे मावसभाऊ आहेत. ते बेशुद्ध पडले होते अपघातामुळं. अशा वेळी प्रेमानं नातेवाईकांना मदत करायची असते. तूही आता चिडचिड न करात काका-काकूंचा चहा घेऊन हॉस्पिटलमध्ये जा,'' अपर्णा म्हणाली.
""आणि मग मी खेळायला कधी जाणार?'' सुमितनं रागानं विचारलं. ""आज नको जाऊस खेळायला. आज बाबांनी तुला हे काम सांगितलंय. मी चहा भरून थर्मास इथं ठेवलेला आहे,'' असं म्हणून ती तिच्या कामाकडं वळली.
"आता परत आला, की हा किती चिडेल कुणास ठाऊक?,' असा विचार करत अपर्णा घरातलं काम उरकत होती. तेवढ्यात सुमित परत आला. प्रसन्नपणे हसत. अपर्णाला आश्‍चर्यच वाटलं. ""काय बाळासाहेब खुशीत?,'' तिनं विचारलं.

सुमित म्हणाला ः ""अगं आई, मी थर्मास घेऊन निघालो तेव्हा सम्या, उप्या सगळे मला खेळायला बोलवायला लागले. मी म्हणालो, "माझे काका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. त्यांचा चहा घेऊन चाललोय,' तर शिल्पाकाकू वगैरे बऱ्याच जणी तिथं उभ्या होत्या ना! त्या सगळ्यांनी इतकं कौतुक केलं. "अरे वा! तू चाललायस चहा घेऊन? बघा. तुम्ही सगळे लक्षात ठेवा. हा कसं आईचं ऐकतोय. हल्ली कोण एवढं करतंय? वा सुमित! शाब्बास!' असं म्हणाल्या... आणि आई, काका-काकू पण खूप चांगले आहेत बरं का! आज काकांना अजिबात हलता येत नव्हतं. पण त्यांना क्रिकेटची इतकी माहिती आहे, त्यांनी मला क्रिकेटमधल्या खूप गमतीजमती सांगितल्या. काकूंनी पण माझं खूप कौतुक केलं. चहा घेऊन गेलो म्हणून. मला खाऊही दिला. चिवडा, बिस्किटं, संत्रे वगैरे.''
"चला, आज तरी सुमित चिडला नाही,' अपर्णाचा जीव भांड्यात पडला.

राकेशकाका मोठे इंजिनिअर होते. ते दिल्लीला एका मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर होते. त्यांची एकुलती एक मुलगी आरती विवाह होऊन ब्रिटनमध्ये गेली होती. त्यामुळं इथं फक्त काका-काकूच होते. काका कंपनीच्या कामासाठी पिंपरीजवळच्या एका कंपनीत आले होते. तेव्हाच परत एअरपोर्टवर जाताना त्यांच्या कारला अपघात झाला. काकू दुसऱ्याच दिवशी दिल्लीहून आल्या. आता काही दिवस सुमित आणि त्याचे आई-बाबा, ताई यांनाच हॉस्पिटलमध्ये ये-जा करून त्यांना मदत करावी लागणार होती आणि ती ते आनंदानं करणार होते. सुमितची काका-काकूंशी इतकी गट्टी जमली, की रोज संध्याकाळी चहा घेऊन जाण्याचं काम तो आनंदानं करू लागला.
एकदा काकूंनी त्याला संत्रं दिलं आणि म्हणाल्या ः ""तुझ्यासाठी सफरचंद आणायचं का? हॉस्पिटलच्या गेटपाशीच गाडी असते.'' सुमित म्हणाला ः ""नको. मला संत्रंच सर्वांत जास्त आवडतं.'' ""पण संत्रं कधी कधी आंबट असतं नाही का?'' काकूंनी विचारलं. सुमित म्हणाला ः ""मला आंबट असलं, तरी संत्रंच आवडतं. मला संत्र्याचा स्वादच खूप आवडतो. मला ज्यूसही संत्र्याचाच आवडतो आणि स्क्वॅशही संत्र्याचाच आवडतो.''

अशा रोज त्याच्या आणि काका-काकूंच्या खूप गप्पा रंगायच्या. त्या दरम्यान त्याचा आलेला वाढदिवस त्याच्या आईनं त्याच्या आवडीचे गुलाबजाम करून घरच्या घरीच साजरा केला. काका-काकूंशी रोज होणाऱ्या क्रिकेटच्या गप्पांवरच त्यानं समाधान मानलं. एकदा काका म्हणाले ः ""तू कधी काश्‍मीरला गेलास, तर तिथली बॅट्‌सची फॅक्‍टरी नक्की बघून ये. तिथं तयार होणाऱ्या बॅट्‌स सगळ्या जगात पाठवल्या जातात. तुला माहितेय? बॅट तयार करण्यासाठी जे लाकूड लागतं ते विलो नावाच्या झाडाचं असतं. ही झाडं जगात फक्त काश्‍मीर आणि ब्रिटन या दोनच ठिकाणी वाढू शकतात. कारण त्याला विशिष्ट हवामानाची आवश्‍यकता असते. तुझा क्रिकेटसेट कुठून घेतलाय?''
""मी क्रिकेटसेट घेतला नाही. बाबा बहुतेक पुढच्या वाढदिवसाला देतील घेऊन...'' सुमित हसतहसत म्हणाला.

शेवटी काकांच्या डिस्चार्जचा दिवस आला. त्या दिवशी पाच वाजता त्यांची दिल्लीची फ्लाइट होती. त्यांना दोनलाच निघावं लागणार होतं. आदल्या दिवशी अपर्णा म्हणाली ः ""उद्या मी स्वतःच त्या दोघांचं जेवण घेऊन हॉस्पिटलमध्ये जाईन आणि ते निघेपर्यंत आपण चौघंही तिथंच थांबू. शनिवार आहे. मुलं बारालाच येतील शाळेतून.''
सर्वजण हॉस्पिटलमध्ये गेले. काका-काकूंची जेवणं झाली. काकूंनी सुमितच्या बाबांना सगळ्या हिशेबाचा चेक दिला. ""अहो वहिनी काय करता हे?'' सुमितचे बाबा म्हणाले. त्या म्हणाल्या ः ""हे मी फक्त तुमचे पैसे परत करते; पण तुम्ही सगळ्यांनी आमच्यासाठी जे केलंय ते आम्हाला कधीच फेडता येणार नाही.''

त्यांचं सामान कॅबमध्ये ठेवण्यात आलं. राकेशकाका सुमितच्या बाबांपेक्षा मोठे. सुमितच्या आई-बाबांनी भाऊ-वहिनीला नमस्कार केला. काकूंनी ताईला छानसा ड्रेस दिला आणि सुमितला एक डझन संत्री आणि भारीपैकी क्रिकेटचा सेट. तो पाहून सुमित आश्‍चर्यचकित झाला आणि म्हणाला ः ""काकू, अहो कशाला इतकं?''
काका हसतहसत म्हणाले ः ""काल ही स्वतः जाऊन घेऊन आली सगळं.''
काकू म्हणाल्या ः ""सुमित तू रोज येत होतास. त्यामुळं किती बरं वाटायचं माहितेय? त्याच्यापुढं हे काहीच नाही. आता सुटीत दिल्लीला या हं सगळ्यांनी.''
काका-काकू कॅबमध्ये बसून गेले. त्यांना टाटा करताना सुमित खूप हळवा झाला होता. मग आईनं हसतहसत त्याच्या डोक्‍यावरून हात फिरवला. जणू ती विचारत होती ः "झालं ना बाळा तुझ्या मनासारखं?' सुमितनं आईच्या गळ्याला मिठी मारली. त्याला वाटलं होतं ः "क्रिकेटपेक्षा तू, बाबा, काका-काकू यांचं एकमेकाविषयीचं प्रेम अन्‌ आदर बघून मला जास्त आनंद होतोय.''

Web Title: saroj kashikar write article in saptarang