एका 'यूथ आयकॉन'चा प्रवास (सतीश देशपांडे)

सतीश देशपांडे sdeshpande02@gmail.com
रविवार, 13 जानेवारी 2019

"सागर रेड्डी नाम तो सुना होगा' या सुनीता तांबे यांच्या पुस्तकाच्या मलपृष्ठावर एक वाक्‍य आहे : "सैराट चित्रपटाची कहाणी जिथं संपते, तिथून सागरच्या आयुष्याची सुरूवात होते.' पुस्तक वाचत गेल्यावर याच्या सत्यतेची आणि आपल्या आजूबाजूलाच असणाऱ्या; पण सहज न दिसणाऱ्या वास्तवाची प्रकर्षानं जाणीव होते. जातिधर्माच्या पलीकडे जाऊन प्रेमविवाह केलेल्या उच्चशिक्षित आईवडिलांच्या पोटी जन्माला आलेल्या सागरवर अनाथ म्हणून जगण्याची वेळ येते. त्याच्या आईचे वडील काळे आजोबा त्याला लोणावळ्यातल्या आंतरभारती बालग्राममध्ये दाखल करतात. तिथं त्याच्यासारखी अनेक मुलं-मुली भेटतात.

"सागर रेड्डी नाम तो सुना होगा' या सुनीता तांबे यांच्या पुस्तकाच्या मलपृष्ठावर एक वाक्‍य आहे : "सैराट चित्रपटाची कहाणी जिथं संपते, तिथून सागरच्या आयुष्याची सुरूवात होते.' पुस्तक वाचत गेल्यावर याच्या सत्यतेची आणि आपल्या आजूबाजूलाच असणाऱ्या; पण सहज न दिसणाऱ्या वास्तवाची प्रकर्षानं जाणीव होते. जातिधर्माच्या पलीकडे जाऊन प्रेमविवाह केलेल्या उच्चशिक्षित आईवडिलांच्या पोटी जन्माला आलेल्या सागरवर अनाथ म्हणून जगण्याची वेळ येते. त्याच्या आईचे वडील काळे आजोबा त्याला लोणावळ्यातल्या आंतरभारती बालग्राममध्ये दाखल करतात. तिथं त्याच्यासारखी अनेक मुलं-मुली भेटतात. लोणावळा बालग्राम, पुढं नांदेड जिल्ह्यातली सगरोळीची शाळा, परत लोणावळा, शेवटी मुंबई आणि मुंबई म्हणजे अनाथालयातून बाहेर पडल्यावर त्याला मिळालेला फूटपाथचा आधार... हे सारे मुक्काम वाचताना डोळ्यांतून पाणी आल्याविना राहत नाही. शिक्षणाची जिद्द असणाऱ्या सागरनं अनेकांपुढं मदतीची याचना केली. भिकारी माणसाच्या वाट्याला येणारं आयुष्यही तो जगला. अखेर टी. शिवराम नावाच्या एका दात्यानं त्याचं इंजिनिअरिंग डिप्लोमाचं शिक्षण पूर्ण केलं आणि पुढं त्याला स्वत:च्या पायावर उभं राहता आलं.

हे पुस्तक वाचताना डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या "खाली जमीन वर आकाश' या पुस्तकाची आठवण येते. मराठी साहित्यात नकार, आत्मभान, वेदना, विद्रोह याची मांडणी झालीच आहे. "सागर रेड्डी..'च्या निमित्तानं वेदनेची आणखी एक किनार साहित्यातून मांडली गेली आहे. ही वेदना एकट्या सागरची नाही, त्याच्यासारख्या असंख्य मुला-मुलींची आहे. अठरा वर्षं पूर्ण झालीत म्हणून अनाथालयातून बाहेर पडणारी मुलं-मुली, हा या पुस्तकाचा आणि सागरच्या कार्याचाही केंद्रबिंदू आहे. अनाथांना आश्रय द्यायचा म्हणून आपल्या कल्याणकारी शासनानं बालग्रामला अनुदान दिलं, अनाथालयं उभारली, तिथं शिक्षणाची मोफत व्यवस्था केली; पण हे सर्व अठरा वर्षांपर्यंतच. अठरानंतर मुला-मुलींनी पुढं करायचं काय, जायचं कुठं, खायचं काय, राहायचं कुठं, असे असंख्य प्रश्न घेऊन तिथून बाहेर पडावं लागतं. कुणाची मिळालीच मदत तर ठीक, नाही तर आयुष्याची वाट कुठल्या दिशेला जाईल सांगता येत नाही. मुलांपेक्षा मुलींची अवस्था आणखी बिकट. एक तर त्यांना अठरा वर्षं पूर्ण झालीत म्हणून लग्न करावं लागतं, नाही तर स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी बाहेर पडावं लागतं. जो समाज आई-बाप असणाऱ्या पोरींची कदर करत नाही, तो समाज अनाथ, असहाय मुलींना कसं वागवत असणार? अन्याय सहन करणाऱ्या, केलेल्या असंख्य स्त्रिया पुस्तकात भेटतात.

आयुष्यभर वेदना सहन केलेल्या एखाद्या व्यक्तीस कष्टानं एखादी चांगली नोकरी मिळाली, की ती व्यक्ती सुखासीन जगण्याच्या दिशेनं पाऊल टाकते. हे साहजिकही आहे. सागरही असाच विचार करायचा. चांगली नोकरी मिळाली, आता घर, गाडी घ्यायची, लग्न करून सुखाचा संसार करायचा, हा त्याचाही विचार होता. दिवाळीला तो बालग्राममधल्या आपल्या चिमुकल्या भावा-बहिणींना भेटायला भरपूर खाऊ, वस्तू घेऊन जातो. तिथं त्याला त्याची आवडती अप्पूदीदी (अपर्णा) भेटते. तिची अवस्था, अनाथ म्हणून तिच्यावर सासरी झालेला अन्याय पाहून तो हेलावून जातो. अठरा वर्षांनंतर अनाथालयातून बाहेर पडलेल्या मुला-मुलींच्या वेदनांनी भरलेल्या कथा ऐकून तो आपल्या सुखासीन जगण्याच्या विचारांवर पुनर्विचार करायला लागतो. आपल्या जगण्याचा अर्थ तो ओळखतो. "माझं जीवन हे केवळ माझं नाही, ते स्वत:साठी जगायचं नाहीच मुळी, माझ्यासारख्या असंख्य मुला-मुलींकरता जगायचं,' असं तो ठरवतो. अनाथालयातून बाहेर पडल्यावर ज्यांना कुणीच वाली नाही, त्यांचा पालक सागर बनला. त्यांच्या आयुष्याला सागरनं दिशा देण्यासाठी "एकता निराधार संघ' उभारला. आपल्या नोकरीतून मिळणारा सर्व पैसा त्यानं यासाठी खर्च केला. आता तर तो नोकरी न करता पूर्णवेळ हेच सामाजिक काम करतो. अनेक दानशूर मंडळींच्या साह्यानं आज वेगवेगळ्या राज्यांत सागरनं "एकता'मार्फत काम उभं केलंय. हजारो मुला-मुलींचा तो पालक बनलाय.

प्रेमाचा, सुखासीन जगण्याचा त्याग करून आपलं आयुष्य समाजासाठी वाहणारा सागर खराखुरा युथ आयकॉन आहे. हे पुस्तक ओघवत्या शैलीत त्याचा आपल्याला परिचय करून देतं.

पुस्तकाचं नाव : सागर रेड्डी : नाम तो सुना होगा
लेखिका : सुनीता तांबे
प्रकाशन : अक्षयभारती प्रकाशन
पानं : 152, मूल्य : 200 रुपये.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: satish deshpande write book review in saptarang