‘यात्रेमध्‍ये हात सुटलेले मूल नाही शोधायचे...’!

‘माझी कविता हे एक बेट आहे. मीही एक बेटच आहे. या बेटावरून परतण्याची हमी मी वाचकाला देत नाही. त्याने स्वतः होडी होऊन गेले पाहिजे.’
‘यात्रेमध्‍ये हात सुटलेले मूल नाही शोधायचे...’!

- सतीश सोळांकूरकर, satishsolankurkar@gmail.com

‘माझी कविता हे एक बेट आहे. मीही एक बेटच आहे. या बेटावरून परतण्याची हमी मी वाचकाला देत नाही. त्याने स्वतः होडी होऊन गेले पाहिजे.’

स्वतःला आणि मुख्यतः स्वतःच्या निर्मितीला एका बेटाची उपमा देऊन कवी ग्रेस यांनी आपल्या अस्तित्वाचा स्थायी भाव दर्शवला आहे. ‘मी कुठंही जात नाहीये आणि कुठूनही येत नाहीये. मला काही विशेष उद्दिष्ट साध्य करायचं नाहीये. मी केवळ आहे आणि स्वतंत्र जगतोय...’ स्वतःच्याच आयुष्य जगण्याच्या पद्धतीतूनसुद्धा ग्रेस यांनी हाच दृष्टिकोन दिलेला आहे.

लेखक-कवी; मग तो कितीही मोठा असो वा छोटा, त्‍याला निर्मितिनाशाचं भय सतत सतावत असतं. कोणत्‍याही क्षणी आपली निर्मितिक्षमता आपला हात सोडून निघून जाईल...असं त्‍याला नेहमी वाटत असतं. ग्रेसही त्‍याला अपवाद नाहीत. ‘राजपुत्र आणि डार्लिंग’ या कवितासंग्रहात त्‍यांची एक कविता आहे, जीमध्‍ये त्‍यांनी आपली ही तळमळ आणि भीती दोन्‍ही मांडण्‍याचा प्रयत्‍न केला आहे असं मला वाटतं.

शिशिरमार्गी शब्‍दांचे उद्ध्‍वस्‍त मुलूख

भूकंपासकट गंडांतर आणणाऱ्या नद्या

कोणत्‍या डोळ्यांत साठवू?

परतीच्‍या घोड्याला कोणासंगे पाठवू?

हा अंतराळउणा ऋतू असता तर

कदाचित् बर्फालाही फुले आली असती...

मेंदूच्‍या घळीत वितळलेला पुखराज

हा, तो, पुढे-मागे, सगळीकडून अंगावर...

येत आहेत हिमनगांच्‍या टोळ्या

यात्रेमध्‍ये हात सुटलेले मूल नाही शोधायचे तुम्‍हाला

यात्रा तुटल्‍यावर मीच तपासून घेईन तुमचे चेहरे...

या कवितेच्‍या पहिल्‍या ओळीत ‘शिशिरमार्गी’ असा शब्‍द आला आहे. शिशिर ऋतू म्‍हणजे पानगळीचा ऋतू...बहरलेल्‍या झाडांची हिरवळ मातीमध्‍ये उतरण्‍याचा ऋतू. हा ऋतू येतो आणि सगळा मुलूख उघडा-बोडका, उद्ध्‍वस्‍त होत जातो. कवीच्‍या मनातही हे दु:ख सलते आहे.

आजवर आपल्‍या लेखनानं जपलेली शब्‍दांची जादूई हिरवळ आता गळून जाईल आणि आपल्‍या साहित्‍याचा मुलूख उद्ध्‍वस्‍त होत जाईल अशी भावना कवीच्‍या मनात‍ आहे. पुढच्‍याच ओळीत ‘भूकंप’ आणि ‘नद्या’ अशा प्रतिमा येतात. भूकंप म्‍हणजे परत सगळी उलथापालथ आणि नदीलाही आपला आवेग थोपवून धरायला लावणारं, तिच्‍यावर आलेलं न पेलता येणारं गंडांतर...आपल्‍या आतल्‍या निर्मितिनाशाचा हा उद्रेक कवीला भूकंपासारखा वाटतो आणि आतले निर्मितीचे सगळे उमाळे, जे कधीकाळी नदीसारखे प्रवाहित होते.

तेही आता विस्‍कळित होतील की काय अशी भीती वाटत जाते. ही भीती एवढी विलक्षण आहे की, आपल्‍याच डोळ्यांमध्‍ये तिची जपणूक करणंही अवघड होऊन बसलं आहे आणि आजवर साथ करत आलेला परतीचा विश्‍वासाचा घोडाही साथ करेलच याची खात्रीही देता येत नाही...कवीची अशी काहीतरी विचित्र अवस्‍था झाली आहे. ‘हा अंतराळउणा ऋतू असता तर...’असं कवीनं, अर्थात् ग्रेस यांनी, म्‍हटलं आहे.

इथं अंतराळ म्‍हणजे कवीच्‍या मनात निर्मितिनाशाच्‍या भयानं निर्माण झालेली प्रचंड पोकळी आहे आणि अंतराळउणा म्‍हणजे - जर अशी निर्मितिनाशाची भयानक पोकळी नसलेली अवस्‍था...अशी अवस्‍था जर असती तर - मग बर्फाप्रमाणे गोठून गेलेल्‍या निर्मितीलाही सुंदर फुलं आली असती, असं कवीला वाटतं.

जणू काही मेंदूच बधीर झाला आहे आणि कोणतीही संवेदना त्‍याला पोहोचत नाही असंही कवीला वाटतं आणि पुढची ओळ ‘मेंदूच्‍या घळीत वितळलेला पुखराज...’ अशी येते. पुखराज हे रत्‍न गुरूचं आहे. गुरू ज्ञानदाता आहे, बुद्धि‍दाता आहे आणि निर्मितीचेही सगळे स्रोत गुरूच्‍या कृपेनं अवतरत असतात; पण इथं मात्र पुखराजही वितळून गेला आहे मेंदूच्‍या घळीत, अशी अवस्‍था झाली आहे आणि निर्मितीचे सगळे स्रोतही आटून गेल्‍यासारखे झाले आहेत.

निर्मितीला आवश्‍यक असलेले सगळे घटकच गोठून गेले आहेत आणि हिमनगांच्‍या टोळ्या अंगावर चाल करून याव्‍यात आणि अंतरात्‍म्‍याचा सगळा पसारा गोठून जावा तशी काहीशी अवस्‍था कवीची झाली आहे. ‘यात्रेमध्ये हात सुटलेलं मूल नाही शोधायचे...’ या ओळीपाशी आपण येऊन पोहोचतो आणि आपल्‍याला एक विलक्षण धक्‍का बसतो.

‘यात्रेमध्‍ये हात सुटलेले मूल’ असे ग्रेस यांनी म्‍हटलं आहे. म्‍हणजे, जी कविता आजवर पोटच्या अपत्‍यासारखी जपली, जोपासली, वाढवली, तिचं कोडकौतुक केलं, तिचा हातच यात्रेमध्‍ये हरवलेल्‍या मुलासारखा सुटून गेला आहे आणि परत तो हात आपल्‍या हातात येईल की नाही याबद्दल कवीच्‍या मनात भीती आहे; पण आपल्‍या वाचक-रसिकांना कोणतीही तसदी देण्‍याची कवीची इच्‍छा नाही.

‘माझे हरवलेले मूल तुम्‍हाला नाही शोधायचे...मीच तो शोध घेईन आणि कदाचित जर त्‍याची-माझी भेट झाली तर आणि माझ्या निर्मितिक्षमतेला परत धुमारे फुटले तर त्‍या आनंदात न्‍हाऊन निघालेले तुमचे चेहरे मीच पुन्‍हा तपासून घेईन’, असं कवी ग्रेस इथं नमूद करतात.

या कवितेतून निर्मितिनाशाच्‍या भयाचा एकसलग आशय वाचकांच्‍या समोर येत जातो. या कवितेची प्रत्‍येक ओळ आणि त्या ओळीमधल्‍या प्रतिमा यांचा एक आंतर्निहित संबंध आहे आणि तो पूर्ण कविता व्‍यापून उरला आहे असं आपल्‍याला जाणवत राहतं. कलावंताच्‍या मनात असलेलं निर्मितिनाशाचं भय किती अस्‍वस्‍थ करणारं असू शकते याचा दाखला ही कविता देत राहते.

यात्रेमध्‍ये हात सुटलेले मूल नाही शोधायचे तुम्‍हाला

यात्रा तुटल्‍यावर मीच तपासून घेईन तुमचे चेहरे...

(लेखक हे सुप्रसिद्ध कवी आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com