सिक्रेट बॅलट (गुप्त मतदान )

file photo
file photo

बाबाक पायामी या दिग्दर्शकाच्या "सिक्रेट बॅलट (गुप्त मतदान )'या 2001 साली प्रदर्शित इराणी चित्रपटाला, विविध आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. इराणमधल्या एका बेटावर, मतदान प्रक्रियेसाठी आलेल्या एका मतदान प्रतिनिधीच्या अनुभवांवर आधारित या चित्रपटात
लोकशाही, कायदेपालन, मतदात्याचा अधिकार, स्त्रियांचा लोकशाहीतला सहभाग या विषयांवर खुसखुशीत संवादातून अर्थगर्भ भाष्य केलं आहे.
इराणमध्ये एकेदिवशी, भल्या पहाटे, एका बेटावर, विमानातून पॅराशूटने एक खोका उतरविण्यात येतो. तो खोका एक सैनिक त्यांच्या ठाण्याजवळ नेऊन ठेवतो. सकाळी तो कनिष्ठ सैनिकाला सांगतो की, "आठ वाजता येणाऱ्या निवडणूक प्रतिनिधीसोबत तुला दिवसभर ड्यूटी करायची आहे' .
सव्वाआठ नंतर एक बोट येते. तिच्यातून एका स्त्रीला उतरवताना नावाडी म्हणतो, ठीक पाच वाजता तुम्ही इथंच या आम्ही तुमच्यासाठी थांबणार नाही'. ती स्त्री लगबगीनं निवडणूकसंदर्भात सैनिकाला भराभर सूचना देऊ लागते. सैनिक आश्‍चर्यचकित होतो. तुम्हाला इथे कोणी पाठवलं विचारतो.
मी निवडणूक प्रतिनिधी आहे आणि मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी माझी नेमणूक झाली आहे असं ती सांगते.
सैनिक म्हणतो प्रतिनिधी येईल असं म्हटलं आहे, एक स्त्री येईल असं म्हटलेलं नाही. हे काही बरोबर केलं नाही. ती म्हणते प्रतिनिधीचं लिंग ऑर्डरमध्ये लिहिलं नाही. सैनिक हुज्जत घालतो की ऑर्डर चुकीची आहे. इथल्या कामाचे निर्णय मी घेतो. त्यांनी पुरुष प्रतिनिधी पाठवायला हवा होता. ती चिडून कठोर कारवाईची धमकी देते. तो नाइलाजाने उघड्या जीपमधून तिला घेऊन जातो. प्रवासात तो निवडणुकीसंदर्भात प्रश्न विचारू लागतो. तस्करांनाही मतदानाचा हक्क आहे कळल्यावर नाराज होऊन म्हणतो, "त्यांना मतदान करू दिलं तर माझी नोकरी जाईल.' मतदार शोधताना तिला एक माणूस धावताना दिसतो. तो धावतोय म्हणजे चोर आहे असं सैनिक जाहीर करतो. त्याचा पाठलाग करून त्याला पकडतात. पळत असल्याने तुझ्यावर संशय घेतला असं ती म्हणते. पळणं हा गुन्हा आहे का, असं माणूस संतापून विचारतो. ती त्याची क्षमा मागून, त्याचं ओळखपत्र बघून, मतदान करायची विनंती करते. तुम्ही या वाळवंटात बंदुकी घेऊन आम्हाला मतदान करायला सांगणार आहात का, असंही तो विचारतो. विनंतीला मान देत, मतपत्रिकेवर
दोन पसंतीच्या उमेदवारांची नावं तो लिहतो. अशातऱ्हेनं बेटावरचं पहिलं मतदान होतं.
सशस्त्र सैनिक आणि आर्मीची जीप दिल्यानं मतदार घाबरतील म्हणून तिची चिडचिड होऊ लागते. सैनिक म्हणतो बंदुकीशिवाय हे गुंड तुमचं काही ऐकणार नाहीत. लोकांनी शांततेत मतदान केलं पाहिजे, शस्त्रामुळे लोक गप्प बसतात. चर्चा होऊ शकत नाही असं तिला वाटतं. तुला गाडी चालवता येते का, असं विचारून सैनिक रागावून पायी चालू लागतो. या बेटावर बायकांना गाडी चालवायची परवानगी आहे की नाही हे मला माहीत नाही असं ती म्हणते. त्याच्या बाजूने गाडी चालवत त्याला कर्तव्याची जाणीव करून देऊ लागते. बंदुकीशिवाय तू इथे सुरक्षित नाहीस असं तो पुन्हा म्हणतो. आज पॅराशूटमधून एक खोका पडून माझा दिवस वाया गेला असं त्याला वाटतं. इतक्‍यात एका ट्रकमधून तीस मतदार स्त्रियांना घेऊन एक मनुष्य येतो. सगळ्या स्त्रियांची पसंतीची मतं तोच लिहून टाकणार असतो. ती म्हणते असं होणार नाही, त्या स्वतः आपली पसंती लिहितील. मनुष्य म्हणतो त्या माझ्या देखरेखीत इथं आल्या आहेत, शिवाय त्यांना लिहितावाचता येत नाही. ती ठाम विरोध करून म्हणते की मतदान ही सामूहिक क्रिया नाही, स्वतंत्र आणि गुप्त मतदान झालं पाहिजे. एका साक्षर स्त्रीला घेऊन ती मतदान सुरू करते. बाराव्या वर्षीच स्त्रीचं लग्न करून देतात तर मतदानासाठी सोळा वयाची अट का आहे असं एक स्त्री विचारते. यावर हाच नियम आहे हे गुळमुळीत उत्तर देऊन ती गप्प बसते. तिची कार्यनिष्ठा आणि तळमळ बघून सैनिक निमूटपणे गाडी चालवू लागतो.
काही मतदार कोळ्यांची ओळखपत्रे समुद्रात बोटीवर आहेत समजल्यावर, ती सैनिकाला एक नाव वल्हवून बोटीजवळ न्यायला लावते. तिथे लग्नासाठी पळून गेलेल्या एका मुलीची सुटका करून, यांच्या नावेतून बेटावर पाठवण्यात येतं. या नाट्यामुळे मतदान कमी झालं याचं तिला वाईट वाटतं. ती कोळ्यांना विनंती करते एक दिवस मासे पकडू नका, मतदान करा. मासळी नाही आणली तर खायचे वांधे होतील असं कोळी म्हणतात. ते परदेशी असल्याने त्यांना मतदान करता येणार नाही असं तिच्या लक्षात येतं. तिथे मतदानाला आलेले काही लोकं, "आमच्या पसंतीचे उमेदवार यादीत नाहीत. इतक्‍या लांबून आम्ही या अनोळखी लोकांना मत द्यायला आलो नाही' म्हणू लागतात.
सुटका करून आलेली मुलगी सोळा वर्षांची आहे, कळल्यावर सैनिक म्हणतो तिला मतदान करता येईल. ती म्हणते मुलीला आधीच खूप समस्या आहेत.
मतदान करून समस्या सुटतात ना? सैनिक विचारतो. सगळ्या समस्या सुटत नाहीत असं ती समजावते. मुलीच्या घराजवळ येताच मुलगी घाईघाईने बॅग घेऊन निघून जाते. तिथली स्त्री म्हणते घरी पुरुषमंडळी नाहीत. त्यांच्या परवानगीशिवाय आम्ही मतदान करू शकत नाही.
पुढच्या वस्तीत गेल्यावर तिथला प्रमुख तिला भेटत नाही, तिथं फारसी भाषा कोणाला समजत नाही आणि कोणी मतदानही करत नाही. त्या दोघांसाठी एका लहान मुलाच्या हातून जेवण पाठवलं जातं. इथं गावप्रमुखाचं शासन आहे, त्यामुळे या लोकांनी मतदान केलं नाही तरी चालेल असा निर्णय ती घेते.
जेवून झाल्यावर गावातला मुलगा, एका ठिकाणी दगडाखाली मतपत्रिका ठेवल्याचं सांगतो. तिथे खोदलेला मजकूर पाहून समजतं की त्या चार वर्षांपूर्वी ठेवल्या होत्या. पुढे जाताना एका सोलर स्टेशनमधल्या माणसासाठी ती थांबते आणि त्याला निवडणुकीबद्दल समजावून सांगते. मी अनोळखी लोकांना कशाला मतदान करू? मी फक्त सर्वशक्तिमान खुदाला मतदान करेन असं तो म्हणतो. खुदा हा उमेदवार नाही त्यामुळे त्याला मत देता येणार नाही असं ती सांगते. खुदा हाच माझा उमेदवार आहे मी त्यालाच मत देईन हे तो हट्टानं सांगतो.
वाळवंटात निर्मनुष्य रस्त्याने जाताना सैनिक लाल सिग्नल पाहून थांबतो. तो सिग्नल बंद पडलेला आहे हे तिने सांगूनही तो कायदा मोडायला तयार होत नाही. सुनसान वाळवंटात या सिग्नलला काही अर्थ नाही असं तिने म्हणताच तो म्हणतो की दिवसभर तुम्हीच कायद्याच्या गोष्टी सांगताहात. अखेर तिला पाच वाजायच्या आत बोटीजवळ नेणं आवश्‍यक आहे हे लक्षात घेऊन तो गाडी पुढे नेतो. मोठे वृक्ष आणि हिरवळ असलेली एक वस्ती दिसते तिथे एका पुरुषाचा मृत्यू झाला असतो. सगळे एकत्र सापडतील या आशेनं, ती चिवटपणे थेट दफनभूमीवर जाते. स्त्रियांना इथे यायची परवानगी नाही. आम्ही इथं मतदान करू शकत नाही म्हणून सगळे निघून जातात. अशातऱ्हेने मतदारांचा शोध संपून ती परतीच्या थांब्यावर येते. बोटीची वाट बघत असताना ती सैनिकाला मतदान करायला सांगते. दिवसभर सोबत राहिल्याने त्याला तिच्याबद्दल आदर आणि आपुलकीची भावना निर्माण झाली असते. तो मतपत्रिकेवर तिचंच नाव लिहून देतो. ती म्हणते मी उमेदवार नाही. मी फक्त तुला ओळखतो आणि मतदान गुप्त असल्याची आठवण तो करून देतो. बोट मला न घेता निघून गेली तर हे मतदान व्यर्थ होईल अशा चिंतेत असताना तिला घ्यायला चक्क एक विमान येतं आणि सैनिक विस्मयचकित होऊन तिला निरोप देतो.
रुढीप्रिय बेटावर एक स्त्री निवडणूक प्रतिनिधी पाठवणं, मतदानाचा दिवस आणि हक्क याची लोकांना आठवण करून देणं, विक्षिप्त सैनिकासोबत दिवसभर वाळवंटात मतदार शोधत हिंडणं अशा अनेक परस्परविरोधी गोष्टींनी विनोद निर्मिती होते. एकंदरीत लोकशाही प्रक्रियेबाबत या कर्तव्यदक्ष स्त्री प्रतिनिधीचा भ्रमनिरास होतो. मुक्त निवडणुकीत मतदान करणे हा जगात सर्वत्र विशेषाधिकार आहे हे सांगणारा हा एक वेगळाच, मजेशीर आणि उत्तम चित्रपट आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com