खासगी माहितीची सुरक्षितता

मुलांच्या सायबर-सुरक्षेअंतर्गत त्यांच्या वैयक्तिक माहितीची सुरक्षितता हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे; कारण, मुलं दीर्घ काळासाठी इंटरनेटच्या जगाचे वापरकर्ते आणि ग्राहक असणार आहेत.
Security of Private Information
Security of Private Informationsakal

- मुक्‍ता चैतन्य, muktaachaitanya@gmail.com

मुलांच्या सायबर-सुरक्षेअंतर्गत त्यांच्या वैयक्तिक माहितीची सुरक्षितता हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे; कारण, मुलं दीर्घ काळासाठी इंटरनेटच्या जगाचे वापरकर्ते आणि ग्राहक असणार आहेत. ‘एआय’मुळं (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) भविष्यात येणाऱ्या अतिप्रगत तंत्रज्ञानाचा वापर ते करणार आहेत. अशा वेळी स्वतःच्या खासगी माहितीची सुरक्षितता हा मुद्दा मुलांसाठी अतिशय महत्त्वाचा ठरतो. तो मोठ्यांच्या जगानंही समजून घेतला पाहिजे.

गेल्या वेळच्या लेखात आपण ‘डिजिटल-फूटप्रिंट्स’ हा विषय पाहिला आहे. पालक आणि मोठ्यांचं जग त्यांच्याही नकळत मुलांचे डिजिटल-फूटप्रिंट तयार करत असतात, तसंच मुलंही मोठ्या प्रमाणावर ही डिजिटल-फूटप्रिंट्स तयार करतात. लहान वयात सोशल मीडियावर मुलं जातात, गेमिंग करतात, तिथं ओळखीच्या आणि अनोळखी लोकांशी चॅटिंग करतात. त्यांचे विविध प्लॅटफॉर्म्सवर ग्रुप असतात. त्यात विविध विषयांच्या चर्चा सुरू असतात.

ई-शॉपिंगपासून पॉर्न सर्चपर्यंत अनेक गोष्टी मुलं करतात आणि या सगळ्या गोष्टी त्यांच्या डिजिटल-फूटप्रिंट्समध्ये नोंदवल्या जातात. हा त्यांच्या जो डेटा तयार होतो त्याचा वापर विविध पद्धतीनं होण्याची शक्यता असते. गेली दहाहून अधिक वर्षं माध्यमं, उत्पादन-कंपन्या, जाहिरात-कंपन्या ग्राहक म्हणून ही मुलं डोळ्यासमोर ठेवूनच गोष्टी तयार करत आहेत,

हे आपण मुळात लक्षात घेतलं पाहिजे; मग ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स असोत नाहीतर वॉशिंग मशिनची जाहिरात; कारण, कुटुंबरचनेतही झपाट्यानं बदल झालेले आहेत. विभक्त कुटुंबरचनेत घरातल्या सगळ्या सदस्यांच्या मतांचा विचार करून वस्तू खरेदी करणं हा विचार रुजला आहे. आणि, अर्थातच त्यात मुलांच्या मतांना, विचारांना, आग्रहांना प्राधान्यही अनेकदा दिलं जातं. काय विकत घ्यायचं, काय वापरायचं याचे निर्णय आता फक्त मोठ्यांच्या जगापुरते मर्यादित नाहीत. त्यामुळे सगळ्याच बाजाराचा फोकस ‘मुलं’ आहेत.

इंटरनेटच्या जगाचा मुलं हा तर प्रमुख ग्राहक आहे; त्यामुळं ते काय विचार करतात, काय शोधतात, त्यांना काय हवंय, काय अपेक्षित आहे, काय नकोय, कशाकडं ते पाठ फिरवतात या सगळ्याकडं कंपन्यांचं बारीक लक्ष असतं. आणि, आता या सगळ्यासाठी मुलांचा डेटा सहज उपलब्ध असल्यानं डिजिटल-जगातलं त्यांचं वर्तन आणि त्यांचे अग्रक्रम अधोरेखित करणं सहज शक्य आहे, ज्याचा वापर वेगळ्या अर्थानं ग्राहक म्हणून त्यांना ‘ग्रुम’ करण्यासाठी केला जातोय.

जी मुलं आता आठ-दहा वर्षांची आहेत, ती जेव्हा त्यांच्या टीनएजची होतील, तरुण होतील, नातं निर्माण करतील, नोकरी-व्यवसाय सुरू करतील, लग्न करतील, लिव्ह-इनमध्ये राहतील (किंवा लग्नच करणार नाहीत) त्यांना मुलं होतील, मध्यमवयीन होऊन म्हातारपणाकडे झुकतील, म्हणजेच त्या दहा वर्षांच्या मुलांच्या पुढच्या किमान साठ वर्षांच्या आयुष्याचा आलेख, त्यातले त्यांचे निर्णय या सगळ्यामध्ये डिजिटल-जगाचा यापुढं हस्तक्षेप असणार आहे.

कळत-नकळत. आणि, हा हस्तक्षेप विविधस्तरीय आहे. असू शकेल. त्या मुलाचं (इथं ‘मुलाचं’ या शब्दात मुलगा-मुलगी असे दोघंही अपेक्षित आहेत.) डिजिटल-जगावरचं अवलंबित्व, ते मूल विचार काय करतंय, काय करू शकतं, त्यानं काय विचार करावा, त्यानं काय खरेदी करावी, त्याच्या आवडी-निवडी, त्याचे निर्णय, त्याची स्वप्रतिमा, जगाकडं बघण्याचा दृष्टिकोन या प्रत्येक गोष्टीवर डिजिटल -जगाचा प्रभाव असणार आहे आणि हस्तक्षेपही असणार आहे.

त्यामुळं मुलांना या सगळ्याची जाणीव करून देणं, या डिजिटल-जगाचा वापर करत असताना हा प्रभाव सीमित स्वरूपात कसा राहील, डिजिटल-जग आणि त्या जगाच्या आडून विविध कंपन्या आपल्यावर प्रतिकूल प्रभाव टाकणार नाहीत याची खबरदारी कशी घ्यायची हे शिकवावं लागेल. माध्यमशिक्षण म्हणजे फक्त तांत्रिक शिक्षण नसतं. एखादं ॲप, गॅजेट, समाजमाध्यम किंवा इतर कुठलाही डिजिटल प्लॅटफॉर्म वापरणं हे तांत्रिक शिक्षण आहे. ते आज मुलांना द्यायची गरज नाही. मुलांच्या हातात गॅजेट्स दिली की ते ती सफाईदारपणे वापरायला लागतात; पण त्यांना माध्यमभान देण्याची मात्र नितांत गरज आहे, त्या प्रशिक्षणाची गरज आहे; कारण, ते वर्तमानाचे आणि भविष्याचे ग्राहक आहेत.

मुलांशी आपण काय बोलू शकतो?

1) वैयक्तिक माहिती किती सार्वजनिक करायची याविषयी मुलांशी बोलणं आवश्यक आहे. यात समाजमाध्यमांवर मुलं जे स्वतःच्या आयुष्याबद्दलचं शेअरिंग करत असतात त्याविषयी चर्चा आवश्यक आहे.

मिनिटामिनिटाचे अपडेट्स देणं आवश्यक आहे का? मनातल्या प्रत्येक भावना त्या स्पेसमध्ये मांडणं आवश्यक आहे का, गरजेचं आहे का? आनंद झाला, दुःख झालं, वाईट वाटलं, राग आला...सगळं सतत तिथं सांगितल्यानं या गोष्टीही डिजिटल-फूटप्रिंट्समध्ये जमा होतात हे लक्षात घेतलं पाहिजे हेही त्यांना सांगायला हवं; कारण, सायबर-जग हा भावनांवर चालणारा बाजार आहे.

2) सगळ्या गॅजेट्सना आणि प्लॅटफॉर्मवर ‘प्रायव्हसी सेटिंग्ज्’ असतात. उदाहरणार्थ : इंस्टाग्रामवर अकाउंट प्रायव्हेट ठेवण्याची सोय आहे. प्रत्येक ठिकाणी तुमचं खासगी आयुष्य जपण्यासाठीच्या सुविधा दिलेल्या असतात. त्यांचा वापर करण्यासाठी मुलांना प्रवृत्त केलं पाहिजे, त्याची त्यांना सवय लावली पाहिजे.

3) लोकेशन-ट्रॅकिंग आवश्यक नसतं. सोशल मीडियावर पोस्ट करताना लोकेशन-शेअरिंगची गरज नसते. तुम्ही कुठं आहात हे इतरांना सतत माहीत असणं आवश्यक नाही.

4) सुरक्षित आणि चटकन ओळखू येणार नाही असा पासवर्ड तयार करण्याची मुलांना सवय लावायला हवी.पासवर्डमध्ये कधीही वाढदिवस, घरातल्या सदस्यांची नावं, आधारकार्डाचे नंबर असता कामा नयेत.

5) मुलांना ऑनलाईन-जगातली विविध ‘क्विक्स’ खेळायला खूप आवडतं. चेहरा बदलणारी ॲप्स, चॅलेंजेसही मुलं मोठ्या प्रमाणावर स्वीकारत असतात; पण या सगळ्याच प्रकारांतून मोठ्या प्रमाणावर खासगी माहिती वापरकर्त्याच्या नकळत गोळा केली जाऊ शकते. अनेकदा या प्रश्नमंजूषेमधले प्रश्न वैयक्तिक माहिती विचारणारे असतात.

त्यामुळे या गोष्टी कितीही गमतीशीर, मनोरंजक आणि ट्रेंडी वाटल्या तरी त्यातले धोके मुलांना समजावून सांगितले पाहिजेत.

मुलांच्या माहितीची सुरक्षितता त्यांच्याच हातात असायला हवी आणि त्यासाठी त्यांना सक्षम माध्यम वापरकर्ते म्हणून तयार केलं पाहिजे.

(लेखिका ह्या ‘सायबर-मैत्र’च्या संस्थापक, तसंच सायबर-पत्रकार आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com